Followers

Wednesday, November 4, 2009

वारी विदेशाची - भाग 3




'मेरिकेत यायचे आणि न्यूयॉर्क पाहायचे नाही म्हणजे काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन न घेण्यासारखे आहे' असे मला खूप जणांनी सागितले होते. त्यामुळे न्यूयॉर्क पाहूनच स्वदेशी परत यायचे असा विचार मी मनात पक्का केला होता. त्याला जोडून काय काय करता येईल असा अभ्यास करताना बरीच नावे पुढे आली. उदा. Washington, Niagara, Mexico वगैरे. पण शिल्लक असणारा वेळ आणि घराची ओढ याची सांगड घालताना नायगारा पाहूनच घरी परतायचे असा मी निश्चय केला. माझे मिनियापोलीस येथील काम आटोपून झाल्यावर तिथे फारसे रेंगाळत न राहता मी त्याच दिवसाच्या विमानाने न्यू जर्सीला माझ्या मेव्हण्याकडे (समीर राईलकर) आलो. तो अमेरिकेमध्ये बरीच वर्षे असल्याने त्याला बऱ्याच ठिकाणांची माहिती झाली होती आणि कुठे काय पाहायचे आणि किती वेळ घालवायचा हे चांगलेच ज्ञात होते. मी ट्रेकर असल्याने आणि मला भटकायची खूप आवड आहे हे त्याला माहित झाल्यामुळे त्याने मला २ दिवस नायगारा आणि Corning Glass Factory आणि तिसऱ्या दिवशी न्यूयॉर्क असे करण्याचा सल्ला दिला. त्याला GMAT च्या परीक्षेची तयारी करायची असल्याने तो माझ्याबरोबर तो येऊ शकत नव्हता. त्याच्या सल्याप्रमाणे एका चिनी कंपनीच्या बसच्या टूरचे बुकिंग केले आणि त्याच्या घरी माझे सर्व सामान ठेऊन फक्त मी आणि माझा कॅमेरा असा मी पुढचा प्रवास चालू केला.
न्यू जर्सी पासून नायगारा साधारण ४०० मैल असून बफेलो या गावाच्या जवळ अमेरिका आणि कॅनडा याच्या सीमेवरती हे जगातील एक आश्चर्य आहे. अमेरिकेच्या भेटीला पर्यटक गेला आणि त्याने नायगारा धबधबा पहिला नाही असे सहसा होत नाही. ४० लाख चौरस फुट पाणी प्रत्येक मिनिटाला पडणारा हा जगातील सगळ्यात (त्या अर्थाने) मोठ्ठा धबधबा आहे. Goat Island ने या धबधब्याचे २ मोठे भाग केले आहेत. Horseshoe Falls आणि American Falls. Horseshoe Falls हा कॅनडा च्या सीमेला लागून असून त्यानंतर अमेरिकन प्रदेश चालू होतो आणि नंतर दुसरा म्हणजे American Falls लागतो. हिमायुगामध्ये झालेल्या विविध भौगोलिक हालचालींमध्ये या परिसरातील प्रस्तर एकावर एक चढल्याने हा परिसर तयार झाला असून त्यामुळे नायगारा नदीला इतका मोठ्ठा धबधबा येथे प्राप्त झाला आहे. साधारणपणे १०००० वर्षांपूर्वी नायगारा धबधबा आणि अमेरिकेतील Great Lakes तयार झाले आणि हा मोठा पाण्याचा प्रवाह तयार झाला.
अतीव सुंदरता आणि आणि वीजनिर्मिती या दोनही कारणांसाठी हा धबधबा सुप्रसिद्ध असून दर वर्षी कोट्यावधी पर्यटक अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशात केवळ हा धबधबा पाहण्यासाठी येतात. १९८० सालानंतर कॅनडा सरकारने नायगारा आणि पर्यटन याचा खूप जास्त प्रमाणात विचार करून कॅनडाच्या बाजूला अनेक चांगली हॉटेल्स आणि पर्यटकांना आवडेल अशा अनेक गोष्टी केल्या. येथे दोन्ही देश जोडणारा एक मोठा पूल असून पूर्वी हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही बाजूंनी एकाच व्हिसा वर पाहता यायचा. पण ७/११ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व प्रकार बंद झाले आणि आता दोन्ही देशांचा व्हिसा असल्याशिवाय दोन्ही बाजूंनी हा पाहता येत नाही. Horseshoe Falls ची उंची १७३ फुट असून तो २६०० फुट लांब आहे. तर American Falls ८० ते १०० फुट उंच असून त्याची लांबी १०६० फुट आहे. या धबधब्यातून १८७ MW एवढी वीजनिर्मिती होते. या धबधब्या पासून खूप प्रमाणात जमिनीची झीज आणि धूप होते. ती टाळण्यासाठी १९६९ मध्ये American Falls काही काळासाठी पूर्ण बंद करण्यात आला होता !!! जास्तीचे पाणी तेव्हा Horseshoe Falls मधून सोडण्यात आले होते. जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह काळजीपूर्वक बंद करून जमिनीची झीज होणार नाही याची काळजी घेतली गेली. यासाठी तात्पुरता एक छोटेसे धरण American Falls च्या अलीकडे बांधण्यात आले होते. त्याचे तेव्हाचे फोटो ही अजून त्यांनी जतन करून ठेवले आहेत. सर्व डागडुजी करून झाल्यावर बॉम्बने हे धरण उडवून देण्यात आले आणि परत American Falls चा जलस्रोत सुरु झाला.
मी अमेरिकन साईड ने नायगाराला आलो असल्याने मला अमेरिकेच्या बाजूच्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या. यातील सगळ्यात महत्वाचे म्हणजे Maid Of the Mist Tour. १८४८ साली हे सुरु झालेली बोट गेली १५० वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्याला सफर घडवते. धबधब्याचे पाणी पडल्यावर खालच्या नदीतल्या पाण्यामध्ये सफर करायची बोट म्हणजे Maid Of the Mist Tour. तिकीट काढायचे आणि निळा किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवायचा आणि Maid Of the Mist Tour च्या बोटीत डेक वर जाऊन उभे राहायचे. ही बोट आपल्याला दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून चक्कर मारून आणते. दोन्ही धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या प्रवाहाचे उडणारे पाणी अंगावर घेत या बोटीतून फिरायचे. पाण्याचे तुषार इतके जोरात अंगावर येत असतात की आपण त्यात चिंब भिजुनच जातो. त्यामुळे धबधब्याच्या जवळून फोटो काढणे हे जरा अवघडच जातं. दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून जाता येत असल्याने फार मजा येते.
Cave of the Winds येथूनही American Fall अगदी जवळून न्याहाळता येतो. नायगारा वरती एक छान फिल्म ही Inox Theatre ला येथे दाखवण्यात येते. नायगारा धबधब्याच्या अनेक रंजक कथा आहेत. अनेक जणांनी या धबधब्यात उडी मारून खाली जिवंत राहण्याचा पराक्रम केला आहे. याची सुरुवात १८२९ साली झाली. १९०१ साली ६३ वर्षीय Annie Edson या एका शाळेच्या शिक्षिकेने पहिल्यांदा ड्रम मधून या धबधब्यात उडी मारायचा पराक्रम केला. तिला यात खूप त्रास झाला पण फारशी इजा झाली नाही. तिच्यानंतर एकूण १४ जणांनी असे उपद्व्याप केले.
नायगारा धबधबा पहायची खरी मजा आहे रात्री. आणि ती कॅनडा च्या बाजूने. Horseshoe Falls मधून पडणाऱ्या पाण्यावर कॅनडाच्या बाजूने लाईट सोडलेले असतात. ते दृश्य पहायची मजा काही औरच !!! लाईट कॅनडा च्या बाजूने सोडलेले आहेत आणि नायगारा धबधबा वर सोडलेले लाईट त्या बाजूनेच चांगले दिसतात. अमेरिकेच्या बाजूने एवढे छान दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्याचा पडणारा आवाज आणि वेगवेगळ्या रंगात दिसणार पाणी. हे पाहताना नजर तेथून ढळत नाही. कितीही वेळ तिथे थांबलात तरी तिथून निघावसच वाटत नाही. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला नायगारा धबधबा हे खरोखर जगातील एक आश्चर्यच आहे. अमेरिकेत येऊन जे लोक नायगारा पाहू शकत नाहीत त्यांच्या सारखे कमनशिबी तेच !!! इतका तो सुंदर आहे. एका सर्वेक्षणानुसार या वर्षी एकूण २ कोटी ८० लाख लोक नायागारचे दर्शन घेण्यासाठी अख्या जगातून येतील असा अंदाज आहे.
या पुढचं आकर्षण म्हणजे Corning Museum of Glass. नायगारा हून परत येताना Corning Museum of Glass and Factory लागते. ३५०० वर्षांपूर्वीचा इतिहास आणि ४५००० पेक्षा जास्त काचेच्या वस्तू एका ठिकाणी पाहायचे एकमेव ठिकाण म्हणजे Corning Museum of Glass. १९५० साली सुरु झालेल्या या वस्तू संग्रहालयात सुरुवातीला फक्त २००० काचेच्या वस्तू होत्या. हे वस्तू संग्रहालय Corning Factory च्या मालकीचे असले तरी त्यांच्या मालाची जाहिरात करायचे ठिकाण नाही. Corning Museum of Glass हे आता एक स्वतंत्र " ना नफा ना तोटा" या तत्वावर चालणारी एक संस्था आहे.
हा केवळ काचेच्या प्लेट बनवायची कारखाना नसून एक मोठी कार्यशाळाच आहे. आपल्याला काचेच्या वस्तू म्हणजे कप, बशी, झुंबर, तावदाने, पेपर वेट फार तर फार प्लेट्स, रसायन शास्त्रातील उपकरणे या पुढे आपली गाडी जात नाही. पण येथे तर आपण फक्त मनात कल्पना करायची आणि ती वस्तू काचेच्या रुपात आपल्याला पाहायला मिळते!!! काचेच्या वस्तूंचे 'वस्तू संग्रहालय' असू शकते यावरच काही आपला विश्वास बसत नाही. पण तेथील एकेक विभाग पाहिले की थक्क होते. २-२ इंचाच्या पेपरवेट पासून १५-२० फुटाच्या काचेच्या दरवाज्यांचा संग्रह इथे आहे. मग, बाउल, प्लेट्स, खिडक्या, दरवाजे, decoration items अशा अनंत गोष्टी तेथे आहेत. जगाचा काचेचा इतिहास, त्यातील कला, कलेचे बदललेले विचार आणि संदर्भ हे सारे अतिशय विस्ताराने तेथे विषद करण्यात आलेले आहे. The Juliette K. and Leonard S. Rakow Research Library ही जगातील काचेच्या संदर्भात माहिती देणारी Library येथे असून तेथे जगातील ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये काचेची जगात असेल नसेल ती माहिती मिळते. ३ लाखापेक्षा जास्त संदर्भ आणि १२ व्या शतकापासूनची माहिती असे याचे स्वरूप आहे.
१९७२ साली या परिसरात खूप प्रमाणात पाऊस झाला आणि हे सारे वस्तू संग्रहालय पाण्याखाली गेले होते. सगळ्या काचेच्या वस्तू चिखलात जमा होऊन खराब झाल्या. सगळी पुस्तके आणि संदर्भ पाण्यावर अनेक दिवस तरंगत होते. साधारण ४०% मालमत्तेचे आणि वस्तूंचे नुकसान यात झाले. आता पर्यंतच्या जगातील इतिहासातील सर्वात मोठे नुकसान झालेले वस्तू संग्रहालय असे याचे वर्णन करत येईल. आता या साऱ्या वस्तू आणि माहिती होती तशी बनवायला काय प्रयास पडले असतील? वस्तू संग्रहालयाच्या कर्मचारी वर्गाने दिवस-रात्र एक करून एक एक काचेची वस्तू चिखलातून शोधून स्वस्छ करून होती तशी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पुस्तके आणि संदर्भाचे एकेक पान उन्हात वाळवून त्याची परत डागडुजी करण्यात आली. वस्तू संग्रहालयाला मिळालेल्या वाढीव जागेसह परत एकदा वस्तू संग्रहालय १९८० साली उभे राहिले ते नव्या उत्साहाने आणि अजून मोठा काचेचा संग्रह घेऊन. आज वर्षाला ३ लाखापेक्षा जास्त पर्यटक या वस्तू संग्रहालयाला भेट देतात. त्यांना आवडेल असे एक काचेचे Shopping Market हा तर प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो.
यातील सगळ्यात प्रेक्षणीय प्रकार म्हणजे तेथील Hot Glass Show. दर दोन तासांनी हा शो करतात आणि त्यात काचेची वस्तू आपल्यासमोर करू दाखवतात. एक जण काचेची वस्तू करतो तर दुसरा त्याला मदत करतो आणि निवेदन करतो. आपल्या नजरेसमोर एखादी काचेची सुंदर वस्तू होताना पाहण्याचा अनुभव फारच मस्त आहे. काचेचे विविध उपयोग सांगण्यासाठी इथे एक वेगळा विभाग केला आहे. दुर्बीण बनवण्यापासून आरश्या पर्यंत अनेक गोष्टी तेथे ठेवण्यात आल्या आहेत. कमीत कमी एक दिवस पूर्ण काढला तर हे वस्तू संग्रहालय पूर्ण पाहून होऊ शकते.
राहिलेले कमी दिवस आणि त्याही पेक्षा कमी वेळ तसेच पहायच्या अनेक गोष्टी याची सांगड घालणे मला जरा कठीणच होते. पण Time Management चा थोडासा अभ्यास झाला असल्याने समीर बरोबर बसून नीट नियोजन केले. न्यूयॉर्क पहायच्या अनेक लोकांच्या अनेक कल्पना होत्या आणि सारेजण त्यांच्या कल्पना माझ्यावर लादू पाहत होते. "न्यूयॉर्क पाहायला एक महिना सुद्धा पुरणार नाही" इथपासून "न्यूयॉर्क मध्ये काय पाहायचे? २ तास सुद्धा पुरतील " अशी अत्यंत परस्पर विरोधी विधाने मला करण्यात आली होती त्यामुळे मी फारच बुचकळ्यात पसलो होतो. शेवटी हातात असेलेले एकूण २२ तास आणि माझी आवड याचा विचार करून नियोजन केले आणि न्यूयोर्क पाहायला सुटलो....
सुरुवात केली ती अर्थात Empire State Building ने. नायगाराहून परत येत असतानाच ही बिल्डींग मला खुणावत होती. थोडेसे Willis Tower ची आठवण होईल अशाच सर्व गोष्टी तेथे होत्या. Willis Tower वर मी १०३ व्या मजल्यावर होतो तर Empire State Building वरती ८६ आणि १०२ वा मजला हाच फरक. तीच शिस्त, तशीच तिकीटाची रांग, तसाच फोटो काढण्याचा कार्यक्रम, तशीच जाहिरात बाजी आणि उत्सुकता ही तशीच आणि तेवढीच. ही न्यूयॉर्क मधील सर्वात उंच बिल्डिंग असून ती १९३१ साली पूर्ण झाली. जवळ जवळ ४० वर्षे न्यूयॉर्क मधील सर्वात उंच बिल्डिंग होती. १९७२ साली World Trade Center चा उत्तरेकडील टौवर हा या बिल्डिंग पेक्षा जास्त उंच असल्याने Empire State Building उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर गेली. २००१ साली World Trade Center पडल्यानंतर परत एकदा Empire State Building न्यूयॉर्क मधील सर्वात उंच बिल्डिंग बनली आहे.
१९३१ साली सुरु झालेल्या बिल्डींगवर १९४५ साली एका विमानाने धडक मारली. दाट धुक्यामुळे भरकटलेल्या या विमामाने ७९ आणि ८० व्या मजल्यावर धडक मारली. एकूण १४ लोक यात मारले गेले. गमतीचा भाग यातला असा की, ही घटना घडली शनिवारी आणि तरीही सोमवारी सकाळी या बिल्डिंग मधील बहुतेक कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. Betty Lou Oliver या बाईच्या आयुष्यातील हा एक अत्यंत महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी तो ८० व्या मजल्यावर काम करत होती आणि विमानाच्या अपघातात ती भाजली होती. अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी ४० मिनिटात आग विझवली आणि तिला लिफ्टने खाली आणण्याचा निर्णय घेतला. आगीमुळे लिफ्टचे दोरही नाजूक झाले होते याची त्यांना काय कल्पना? Betty Lou Oliver ला लिफ्ट मध्ये बसल्यावर त्या दोरांनी प्राण सोडला आणि लिफ्ट वायू गतीने खाली यायला कागली, जवळ जवळ ७५ मजले खाली ती आली आणि तरीही बाई साहेब जिवंत!!! परत एकदा अग्नी शामकाच्या कर्मचाऱ्यांनी तिला तेथून बाहेर काढून दवाखान्यामध्ये पोहोचते केल्यावर काही महिन्यांनी त्या ठणठ्नीत झाल्या. Guinness World Record मध्ये नोंदला गेलेला हा एक चमत्कार आहे.
Empire State Building ची उंची १४५३ फुट अर्थात ४४३ मीटर असून त्याला १०३ मजले आहेत. १०० पेक्षा जास्त मजले असलेली ही जगातील पहिली बिल्डिंग!!! Willis Tower प्रमाणे या बिल्डिंग मधल्या लिफ्ट ने एका मिनिटात ८६ व्या मजल्यावर जाता येते. १९६४ साली या बिल्डिंग वर दिव्यांची रोषणाई करण्यात आली. पण ती करताना अमेरिकेचे महत्वाचे दिवस यांचा विचार करून ते त्या दिवशी चालू केले जातात. साधारण पणे Empire State Building ची 3 भागात लाईट मुळे विभागणी होते. वरचे ३० मजले अशा प्रकारच्या रोषणाईने उजळले जातात.
White/White/ White - हा Empire State Building ची नेहमीची रोषणाई दर्शवतात
Red/White/ Green - X mas, वेगवेगळ्या कॅलेंडरचे पहिले दिवस या दिवशी अशी रोषणाई करतात
Red/White/ Blue - राष्ट्रीय सुट्ट्या, स्वातंत्र दिन, कामगार दिन, निवडणूक दिन, ७/११ ची आठवण.
Yellow/ Yellow/ Yellow - US open चा पहिला दिवस आणि अंतिम सामन्याचे दिवस. (टेनिस बॉल चा रंग)
Green/ Green / Green - Go green day - ७ जुलै
Blue/ Blue/ Blue - घरच्या फुटबॉल च्या टीम ला प्रोत्साहन देण्याचा दिवस - ७ ऑक्टोबर
Empire State Building (ESB) वरून दिसणारे न्यूयॉर्क शहराचे दृश्य केवळ अवर्णनीयच..... विशेषतः रात्री तर फारच सुंदर. रात्रीच्या दिव्यांनी अख्खी उजळलेली न्यूयॉर्क सिटी, त्यातून जाणारी हडसन नदी (नुकतेच एका विमानाचे Emergency Landing केले तीच ही हडसन नदी !!!) आणि रात्री उशिरापर्यंत चालू राहणारे रस्ते पाहायचे असतील तर ESB वर रात्रीच यायला हवे. ESB वरून दिसणारा सूर्यास्त म्हणजे केवळ सुंदर. मी जेव्हा ESB ला पोहोचलो तेव्हा वादळ होण्याची शक्यता होती. आम्ही घाई घाईनेच वरती पोहोचलो. रात्रीचे न्यूयोर्क डोळ्यात साठवून ठेवत असताना आम्हाला अगदी समोर खरे वादळ रोन्गावत आमच्याच कडे येताना अक्षरशः पाहायला मिळाले!!! सुरक्षा रक्षकांनी जबरदस्तीने आम्हाला तेथून दूर करून काचेच्या आत नेले. जे लोक दुर्बीण घेऊन आले होते त्यांचा जरा मूड गेला होता पण पर्यायच नव्हता. ESB वरून खाली उतरे पर्यंत जोराचा पाऊस आला आणि त्याने सगळे शहर धुऊन काढले. माझ्याकडे छत्री नव्हती (कमीत कमी सामान हे ब्रीद वाक्य असल्याने माझी छत्री समीरच्या घरी सुरक्षित होती !!!) Maid Of the Mist Tour च्या बोटीतला रेनकोट अंगावर चढवला आणि दिमाखात परत न्यूयोर्क शहराची मार्ग-क्रमायला करायला लागलो.
Empire State Building (ESB) आणि Times Square हे रात्रीच पाहायला पाहिजेत हा हट्ट असल्याने पावसाची परवा न करता मी न्यूयॉर्क च्या कुठल्या कुठल्या स्ट्रीट आणि कुठल्या कुठल्या Avenue वरून फिरत होतो. न्यूयॉर्कची माहिती आपल्याला शंभर ठिकाणी मिळेल पण न्यूयॉर्क च्या वातावरणाचा Feel तिथे फिरल्याशिवाय कसा मिळणार? राहून राहून मला न्यूयॉर्क आणि मुंबई हे फार जवळचे वाटतात. रात्रीची मुंबई प्रेक्षणीय तसेच रात्रीचे न्यूयॉर्क ही तितकेच आकर्षक. फरक एकटाच की झगमग झगमग Times Square ला जास्त आहे. जशी मुंबई भारताची राजधानी नाही तशी न्यूयॉर्क अमेरिकेची. पण खऱ्या राजधानीच्या तोडीस तोड अशी ही गावे आहेत. अमेरिकेत आगगाडीचे जाळे फारसे नाही पण न्यूयॉर्क मात्र सब-वे ने संपूर्ण पोखरून काढले आहे मुंबईच्या लोकल सारखे. ही सबवे जमिनीच्या खाली फक्त १० फुट आहे आणि बऱ्याचशा सबवे च्या जाळ्यावरती फुटपाथ आहेत. त्यामुळे ट्रेन खालून गेल्याचे न्यूयॉर्कच्या फुटपाथ वारू जाताना लगेच कळते. मी आयुष्यात पहिल्यादाच सबवे चा अनुभवत असल्याने मला तर सारेच नवीन आणि अनोखे होते. अगदी तिकीट काढण्यापासून ते योग्य त्या ट्रेनने प्रवास करून पाहिजे त्या जागी पोहोचणे हा माझ्यासाठी एकदम मजेशीर प्रकार होता. न्यूयॉर्क चा खरा वेग पाहायचा तो सकाळी ऑफिस च्या वेळेला. जशी मुंबई करांची सकाळी ७.५४ ची ट्रेन पकडायची घाई असते तशीच घाई इथेही. तोच वेग, होणारी धावपळ अगदी तशीच. अख्ख्या प्रवाहालाच प्रचंड वेग त्यामुळे आपण ही त्या वेगात कधी सामील होतो ते कळत नाही. एक सेकंद ही बोलायला कोणाला फुरसत नसते. सकाळच्या वेळी न्यूयॉर्क शहरात येणाऱ्यांची गर्दी सांभाळण्यासाठी सरकारने खूप उपाययोजना केल्या आहेत. त्या थोडक्यात नमूद करतो - -
१. सकाळच्या वेळी ३ तास परत येणाऱ्यांच्या लेन मध्ये फक्त बस ला जाण्यासाठी वेगळा रस्ता.
२. खूप दूरवरून येणाऱ्या लोकांनी न्यूयॉर्क शहराजवळ आल्यावर हायवे जवळ गाडी पार्क करायची आणि Public Transport ने शहरात यायचे.
३. नोकरदार वर्गाला Public Transport वापरायला उद्युक्त करण्यासाठी करामध्ये भरपूर सवलत.
४. Public Transport चे मासिक पास अत्यंत कमी दारात
५. शहरामध्ये कार पार्किंग (स्वतःची) अत्यंत महाग.
या उपाययोजनामुळे न्यूयॉर्क आणि उपनगरातील नोकरदार वर्ग Public Transport आपसूकच वापरायला लागला आहे. एक बस बदलून नंतर एक ट्रेन बदलून मुंबई सारखाच आपल्या ऑफिसला सकाळी वेळेत पोहोचायची धडपड करतो.
Streets आणि Avenues मुळे या शहरात चुकायची शक्यता फारच कमी. आणि अगदी चुकलात तर देवानी तोंड नावाचं साधन कशाला दिला आहे? शिवाय चौका चौकात नकाशे आहेत, Taxi आहेत हेच कशाला अगदी नागपूर सारख्या सायकल रिक्षा सुद्धा आहेत. (ज्यांना विश्वास बसणार नाही त्यांना मी सायकल रिक्षाचा फोटो सुद्धा पाठवू शकतो. संपर्क: mvkulkarni23@gmail.com). Public Transport सुधारण्यासाठी या शहराने केलेले प्रयत्न वाखाडन्यासारखे आहेत. BRT रस्त्याच्या मधून नेण्यासारखे आचरट प्रकार त्यांनी केलेले नाहीत. मुंबई च्या BEST सारखी इथली Public Transport BEST आहे. Port Authority Bus Terminal सारखे ७ मजली बस स्टेशन गावात बांधलेले आहे. मी या गावात नवखा असून मला एकदाही Public Transport चा त्रास झाला नाही. या शहरामध्ये वेग आहे, रोजगार आहे आणि म्हणूनच नोकरदार वर्ग २०० मैलावरून या गावात कामासाठी रोज येतो. फक्त आपल्या मुंबईलाच का यासाठी नावं ठेवायची? असो.
Statue of Liberty पेक्षा उंच शिवाजी चा पुतळा मुंबईच्या समुद्रात उभारणार अशी एक बातमी कानावर आली होती. त्यामुळे म्हटलं, शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईच्या समुद्रात होईल तेंव्हा होईल, Statue of Liberty ची उंची तरी आपण मोजून येऊ .... असा विचार करून मी भल्या सकाळी Battery Park च्या त्या मारुतीच्या शेपटाएवढ्या लांब रांगेमध्ये उभे होतो. ७/११ नंतर सगळीकडेच सुरक्षा इतकी वाढवली आहे की जिथे १० मिनिटात रांग पुढे जाऊ शकते तितके आता तास तास थांबावे लागते. X Ray checking वगैरे भानगडीनी जीव अगदी नकोसा होतो. ३ तासाच्या तपस्चर्येनन्तर Statue of Liberty ज्या बेटावर आहे त्या कडे नेणाऱ्या बोटीत मला प्रवेश मिळाला. आणि सर्वांनी आपापले कॅमेरे सरसावले.
Statue of Liberty हे जगातील सगळ्यात जास्ती फोटो काढला जाणारे ठिकाण अशी याची एका ओळीची ओळख आहे !!! रोज लाखो पर्यटक Statue of Liberty चे कोट्यावधी फोटो कडून आपापल्या देशात परत जातात. १८८६ साली फ्रांसच्या लोक्कांनी अमेरिकेला दिलेली ही छोटीशी भेट आहे. १५१ फुट उंच असलेल्या या बाईच्या पुतळ्याच्या उजव्या हातात ज्योत असून डाव्या हातात पुस्तक आहे. त्यावर ४ जुलै १७७६ ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख लिहिलेली आहे "July IV MDCCLXXVI". पाया धरून याची उंची ३०५ फुट असून तिच्या मुकुटात ७ खिडक्या आहेत. ते जगातील ७ खंड दर्शवतात. उजव्या हातातील ज्योत प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक ज्ञान दर्शवते. १८७० मध्ये Jules Joseph Lefebvre's चे painting La Vérité च्या चित्राशी Statue of Liberty मिळतेजुळते आहे. २.४ mm च्या तांब्याच्या पत्र्यापासून हा संपूर्ण पुतळा बनवलेला असून आतून त्याला लोखंडाच्या/ स्टीलच्या पट्ट्यांचा आधार दिला आहे. आताचा हिरवा रंग हा तांब्याचे Oxidation झाल्यामुळे बनलेला आहे. हे होण्यासाठी १२ वर्षे जावी लागली. १९८६ साली नवीन ज्योत बदलण्यात आली. ९/११ च्या हल्यानंतर जुलै २००९ पर्यंत हा पुतळा आतून पाहायला बंदी होती. त्यामुळे मला मुकुटापर्यंत जाता आले नाही.
पायाच्या आंत एक कविता लिहिलेली आहे तो अशी --
Not like the brazen giant of Greek fame,
With conquering limbs astride from land to land;
Here at our sea-washed, sunset gates shall stand
A mighty woman with a torch, whose flame
Is the imprisoned lightning, and her name
Mother of Exiles. From her beacon-hand
Glows world-wide welcome; her mild eyes command
The air-bridged harbor that twin cities frame.
"Keep, ancient lands, your storied pomp!" cries she
With silent lips. "Give me your tired, your poor,
Your huddled masses yearning to breathe free,
The wretched refuse of your teeming shore.
Send these, the homeless, tempest-tossed to me,
I lift my lamp beside the golden door!"

फक्त Mother of Exiles हे कवितेतील नाव मात्र सर्वमान्य झाला नाही...
खरोखर पण कुणीही प्रेमात पडावं असा हा पुतळा आहे. फोटो काढण्याची आवड ज्यांना आहे त्यांना तर फारच !!! असा सुंदर पुतळा मी आज पर्यंत पहिला नाही. त्यामुळे किती फोटो काढू आणि नको असे होते. Statue of Liberty पासून न्यूयॉर्क शहर ही मस्त दिसते. अमेरिकेची पहिली ओळख ज्यामुळे होते तो म्हणजे Statue of Liberty.
याच्या अगदी जवळ आहे ते म्हणजे Ellis Island. अमेरिकेमध्ये १७ व्या शतकापासून अनेक लोक कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातून आले. त्यामुळे प्रथम पासूनच अमेरिकेच्या स्थानिक नागरिकांना तेथे फारसा थारा दिला गेला नाही. अमेरिकेची क्रमांक एक ची भाषा इंग्लिश. त्यानंतर स्पानिष आणि नन्तर पोर्तुगीज... १९ व्या शतकाच्या शेवटी परदेशातून येणाऱ्या लोकांचे लोंढे खूप प्रमाणात वाढले. त्यावर थोडासा अंकुश हवा या साठी १ जाने. १८९२ साली Ellis Island हे Emigration Centre - US Bureau of Immigration (Immigration and Naturalization Service) म्हणून सुरु करण्यात आले. १९५४ सालपर्यंत १ कोटी २० लाख लोकांना या वास्तूने अमेरिकेमध्ये प्रवेश दिला. १९०७ साली १० लाखापेक्षा जास्त लोकांना प्रवेश याने दिला. आहेत अशा लोकांना २७ प्रश्न विचारले जात. आणि जे लोक त्यांना येथे काम करण्यासाठी अयोग्य वाटत त्यानं तेथुनच परत पाठवले जात असे. काही जन . त्यांचा गाव आणि देश कायमचा सोडून आलेले असत . अमेरिकेत येऊन पुढचे जीवन व्यतित करणे हे एकाच ध्येय त्यांचे असायचे. दुर्दैवाने ३००० पेक्षा जास्त लोक येथील दावाखन्यात वरती गेले. तेथे त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जात. पण एकंदरीत हा सारा प्रकार प्रवेश देणे यापेक्षा प्रवेश नाकारणे याकडे जास्त झुकनारा मला वाटला. त्याच्या या सर्व कार्यवाहीची एक फिल्म तेथे बनवण्यात आली आहे. त्यांचे जुने सामान , जुन्या आठवणी, जुनी नाणी, जुने चलन आणि जुन्या गोष्टी तेथील वस्तू संग्रहालयात त्यांनी जपून ठेवले आहे. येथे एका विभागात किती लोक कुठल्या उपखंडातून आले याची माहिती तसेच त्याचे फोटोही लावलेले आहेत. इतिहासाची आवड असणाऱ्या मंडळींना हे ठिकाण Statue of Liberty इतकेच आवडेल.
न्यूयॉर्क मध्ये नुसती भटकंती करायली तर खूप ठिकाणे आहेत उदा. New york Stock Exchange आणि Stock Exchange Bull. Zero Point (World Trade Centre पडले त्याची जागा),The Metropolitan Museum of Art, Believe it or Not?, Rockefeller Center, Chinatown , Brooklyn Bridge , Big Apple Bus Tour, Fifth Avenue (फक्त खरेदीसाठी), मादाम तुसा Musuem वगैरे वगैरे. पण ....पण वेळ कधी थांवत नाही हेच खरे . मला संध्याकाळी ८ वाजता भारतासाठी विमान असल्याने या साऱ्या गोष्टी उरका पडून पहावी लागल्या आणि खरतर धावत पळतच विमान गाठले.
या छोट्याशा वारीत नाही म्हटला तरी म्हटलं गोष्टी झाल्या. बऱ्याच गोष्टी पहायच्या राहिल्या त्या पुढच्या वारीत. पण 'पहिली अमेरिका भेट' याची मजा काही औरच असते ना.....
लेखन सीमा .......mvkulkarni23@gmail.com

Monday, September 28, 2009

वारी विदेशाची - भाग 2

वारी विदेशाची - भाग 2

मिनियापोलीस हे मिनिसोटा राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहरामधून मिसिसिपी नदी आणि शहराच्या बाजूने मिनिसोटा नदी वाहते. सेंट पॉल ह्या मिनिसोटा राज्याच्या राजधानीच्या शेजारीच हे गाव वसलेले आहे. त्यामुळे या गावांना 'जुळी शहरे' अर्थात Twin Cities असे म्हणतात. मिनियापोलीस शहरात जवळपास २० मोठ्ठी पाण्याची तळी आहेत. पाण्याचा तुटवडा हा शब्द या गावाला माहिती नाही. मिनिसोटा राज्यात १०००० पेक्षा जास्त तळी आहेत! ही गोष्ट ते त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर अभिमानाने मिरवतात. मिनियापोलीस मध्ये पूर्वीच्या काळी टिंबरच्या खूप मिल्स होत्या. म्हणूनच मिनियापोलीस ला "मिल्सचे शहर" किंवा "तळयांचे शहर" असे म्हणतात. मिनियापोलीस चे नाव हे मिनी म्हणजे पाणी आणि पोलिस म्हणजे शहर किंवा गाव, पाण्याचे शहर अर्थात मिनियापोलीस. आपल्याकडे जसे "जळगाव" आहे तसे.
मिनियापोलीसला तापमान फार विचित्र असते. हिवाळ्यात फार थंडी तर उन्हाळा खूप सुसह्य असतो. हिवाळ्यात तापमान नेहमीच शून्याच्या खाली जाते आणि बर्फ ही खूप पडतो. 1888 मधे -41 डिग्री पर्यंत तापमान गेले होते. साधारण पणे -15 ते -20 डिग्री पर्यंत तर खाली जातेच. 1984 मधे येथे सर्वात जास्ती हिमवर्षाव झाला होता. किती माहिती आहे? 100 इंच किंवा 2.5 मीटर !!! त्यामुळे हिवाळ्यात बाहेर पडणे म्हणजे 'नको रे बाबा' अशी परिस्थिती असते. सगळीकडे फक्त बर्फ आणि बर्फ. गाडीवर, रस्त्त्यावर जिथे पहावे तिथे बर्फच. हिवाळ्यातील पहिला Rainfall फार छान वाटतो पण नंतरचे 3 ते 4 महिने नको इतका बर्फ पडतो. अमेरिकेच्या उत्तरेस असल्याने आणि कॅनडाची सीमा लागूनच असल्याने येथे वर्षभराचे Average Temp 7 डिग्री सेल्सिअस असते. उन्हाळा वर सांगितल्याप्रमाणे बराच सुसह्य असतो. 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान दुपारी जाते. रात्री 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत. म्हणजे अगदी पुण्यासारखे हो ! या काळात येथील लोक सुद्धा एकदम खुष असतात. उन्हाळ्यात दिवशी खूप मोठ्ठा असतो. सकाळी 5 वाजताच उजडते तर रात्री 9 वाजता सुयास्त होतो. जवळ जवळ रात्री 10 ते 10.30 पर्यंत उजेड असतो. अर्थात लोकांना जास्त वेळ दिवस मिळतो. सगळेजण आपल्याला पाहिजे ते कपडे (?) घालून संध्याकाळी मस्त फिरू शकतात. या काळात त्यांना घराबाहेर किंवा ऑफीस बाहेर जास्त काळ राहायला आवडते. छान पैकी गाडीच्या काचा उघड्या करून किंवा टप उघडे करून ते या काळातच Long Ride ला जाऊ शकतात. निसर्गाचे नवे रूप याच काळात पाहायला मिळते. याच्या अगदी विरुद्ध हिवाळयात. सकाळी 9 वाजता उजाडते आणि दुपारी 4 वाजता अंधार गुडूप! सकाळी अंधारातच ऑफीस ला जायचे आणि अंधारातच परत यायचे. किती बोअर .... आणि ते ही अंगावर आपल्या वजनाचे गरम कपडे घालून. शिवाय रोजच्या रोज गाडीवरचा बर्फ काढत बसायचा तो वेगळाच. सिमेंटचे रस्ते जिथे प्राण सोडतात तिथे माणसाचे काय? यावर उपाय म्हणून मिनियापोलीस च्या डाउन टाउन मधील सगळ्या इमारती या आतून जोडलेल्या आहेत. साधारण जमिनीपासून 2 मजले उंचीवर हे जोडणारे रस्ते आहेत. ऑफीस ला जाताना गाडी पार्क करायची आणि जवळच्या कुठल्यातरी एका इमारतीमधे शिरायचे. आणि मग या मार्गांनी आपल्या इच्छित स्थळी पोहोचायचे.
अमेरिकेची संपूर्ण इकॉनॉमी ही कार उत्पादनावर अवलंबून असल्याने मुद्दामूनच कार संदर्भातील गोष्टी जसे पेट्रोल, रस्ते वगैरे पायाभूत सुविधा त्यांनी चांगल्या करून ठेवल्या आहेत. त्याचा विचार आणि अंमलबजावणी दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर झाली. सगळे रस्ते अगदी मोठ्ठे आणि चकाचक असतात ३ ते ४ लेन, Left Hand Drive, त्यामुळे उजवीकडून मोठ्या रस्त्यावर येणे सोपे तर डावीकडून येण्यासाठी २७० अंशाचे वळण. Flyover या साऱ्या गोष्टो त्यांनी फार पूर्वी करून ठेवल्या आहेत. आज आपल्याला भारतातीलही रस्ते आणि Flyover दिसतात आणि चांगले वाटतात पण हीच गोष्ट त्यांनी ६० ते ७० वर्षांपूर्वी केली आहे. स्वस्छ सुंदर मोठ्ठे Sign Board वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी आणि शिस्त ह्या गोष्टी तर सांगायला नकोतच. सगळ्या रस्त्यांवरील सगळे सिग्नल २४ X ७ चालू असतात आणि कोठेही पोलीस नसला तरी प्रत्येक जण पाळतात. येथील नंबर प्लेट मात्र जरा मजेशीर आहेत. आपल्यासारखे MH12 , DL01 असला प्रकार नाही. अक्षर आणि अंक कोणतेही आणि कितीही हेच त्याची विशेषता. त्यामुळे नंबर पाहून ही गाडी कुठल्या गावाची आहे ते काळात नाही पण कुठल्या राज्याची किंवा प्रांताची आहे ते मात्र लिहावे लागते शिवाय त्या प्रांताची विशेषता. जसे "मिनीसोटा - १०००० तळी" , "न्यूजर्सी - गार्डन स्टेट", "न्यूयॉर्क - एम्पायर स्टेट". शिवाय गाडीचे Registration स्त्रेपरत कधी करायचं आहे त्याची तारीख. गावाची विशेषता ही क्वचित पाटीवर पडलेली असते. जसे मिनीसोटा - "Save Trees". सुरुवातीला या नंबर प्लेट समजायला थोडा वेळ लागला पण हे समजून घेताना मजा आली. अमेरिकेतही टोल नाके आहेत पण भारतातल्या सारखे इंचा इंचा वर नाहीत. त्यातही आधुनिकता आणि वेळ वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. उदाहरण द्यायचे झाले तर - तेथील काही टोल नाक्यावर काही High Speed Lanes बनवलेल्या आहेत. त्या लेन वरती High Speed Sensors बसवलेले असून गाडीत एक पैसे भरलेली चीप काचेवर लावायची आणि ते सेन्सर १२० मैल प्रती तास या वेगाने गाडी गेली तरी त्या चीप मधून टोल चे पैसे ओढून घेते आणि आपल्याला टोल नाक्यावर थांबावे लागत नाही किंवा गाडीचा वेग कमी करावा कागत नाही !!! ती चीप आपल्या डेबिट किंवा क्रेडीट कार्ड ला जोडलेली असते. चीपमधील पैसे संपत आले की चीप आपोआप कार्ड मधून पैसे डेबिट करून घेते जेणेकरून चीप मध्ये पुरेसे पैसे कायम राहतात सगळच अजब !!!
Traffic Jam ही गोष्ट अमेरिकेला भेडसावते आहे याचे कारण Train च्या सुविधा जवळपास नाहीतच. चार चाकी ही तेथील मुलभूत गरज आहे. कोणी जरी अमेरिकेत आला तरी पहिल्यांदा गाडीच घेतो कारण Public Transport फारसे चांगले नाही आणि Taxi फार महाग. सोई सुविधा, चंगळ वाद, क्रेडीट कार्ड, ऐशो आराम या गोष्टी तेथे एकमेकांमध्ये फार घट्ट विणलेल्या आहेत. आधी क्रेडीट कार्ड वर खर्च करायचा आणि मग त्याची बिले भरत पगार संपवायचा. शंभर लोन काढायची आणि ती फेडण्यात आयुष्य संपवायचे. तेथील बँक त्यामुळेच गाळात गेल्या आहेत. क्षमता नसलेल्या माणसांना लोन गळ्यात मारायचे आणि नंतर लोन फिटले नाही म्हणून बँक लिलावात ..... गेल्या रेसेशन ची एक गोष्ट सांगतो.
इकॉनॉमी जेव्हा चांगल्या वेगात होती तेव्हाची गोष्ट. तेव्हा सगळे चांगलेच होते. भारतातूनच नव्हे तर जगातून अमेरिकेत लोक नोकरीकरिता जात होते. Green Card मिळणे सुद्धा सोप्पे होते. जो उठतो तो अमेरिकेत पळत जात होता. आय टी मधील तरुण मुले मुली काही दिवसात श्रीमंत होत होती. पगार इतका जास्त की कार, घर आणि आदी गोष्टी सहज साध्य होत्या. शिवाय बँक लोन द्यायला तयार होत्याच. पण लवकरच दिवस पालटले ..... Recession आले. लोकांना द्यायला काम नाही मग एवढ्या लोकांचे कराचे काय? Bench वर किती दिवस बसवणार? धडाधड लोकांना काढायला सुरुवात झाली. पण नुकत्याच आलेल्या आणि अमेरिकेत सेटल होऊ पाहणाऱ्या लोकांनी काय करावे? दुसरीकडे नोकरी शोधायचा खूप प्रयत्न केला पण सगळीकडे हीच परिस्थिती. गाडी, घर यांची लोन्स . आता करायचे काय? बर लोनचा हप्ता इतका जास्त की २ महिनेही बिन पगारी काढणे अशक्य. शेवटी काय करावे या लोकांनी? आपले आवश्यक समान घेतले, गाडी घेतली आणि विमान तळ गाठले. गाडी विमान तळाबाहेर पार्क करून मिळेल त्या विमानाने अमेरिका सोडली....
मी Traffic Jam बद्दल सांगत होतो.... Traffic Jam हा येथील जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठलं आणि ऑफिस ला जाण्यापूर्वी प्रथम Traffic Jam बद्दल TV वर पाहायचे आणि मगच बाहेर पडायचे. सकाळी TV वर याच बातम्या असतात. यावर उपाय म्हणून काही लोक भल्या पहाटेच ऑफिस ला जातात. सकाळी Traffic Jam मध्ये २ तास घालवण्या पेक्षा पहाटे २०-२५ मिनिटात ऑफिस. तसेच बऱ्याच ऑफिस ना भारत आणि चीन बरोबर बोलायचे असते म्हणूनही ऑफिस मध्ये लवकर येण्याचे प्रमाण आता बरेच वाढले आहे. USA १०.३० तास मागे (मिनियापोलीस साठी) तर चीन,सिंगापूर त्यापेक्षा जास्त त्यामुळे या देशांशी सकाळीच बोलणे बरे पडते. चांगल्या सवई लागतात त्या अशा. Traffic आणि असे फोन या निमित्ताने लोक लवकर उठायला लागले आहेत. ऑफिस ला लवकर येत त्यामुळे घरी लवकर जायला मिळू शकते. आपल्या कुटुंबाबरोबर आणि आपल्या छंद आणि आवडी जोपासायला भरपूर वेळ त्यामुळे मिळतो. मी असे काही लोक पहिले आहेत की जे ऑफिसला पहाटे ४-५ वाजता किंवा ६ वाजता येतात. "लवकर झोपा आणि लवकर उठा" ही उक्ती त्यांना आता चांगली लागू पडली आहे. एक व्यवस्थित शिस्तशीर आणि नियोजन बद्ध आयुष्य जगायला त्यामुळे त्यांना आज मदत होते. याच्या अगदी उलट आपली स्थिती असते. अमेरिकेशी बोलायचे म्हणून रात्री घरी यायला रोजच उशीर. त्याच्या पुढे जेवण मग झोप. सगळं Cycle च उशिराचे. काय करणार. बर, आपण जर म्हटलं की आपल्या सकाळी कधीतरी फोन करू तर ते आपले Customer वा मालक. त्यांना कशाला रात्री त्रास द्यायचा असे आपल्याला मार्गदर्शन !!!
Minneapolis – St. Paul international airport हे साधारण शहरापासून २० मैल अंतरावर येते आणि Mall of America त्याच्या अगदी जवळ येते. शहराचे मुख्य २ भाग Downtown आणि Uptown. सगळ्या मुख्य इमारती आणि ऑफिस या परिसरात आणि सर्वात उंच इमारती ही याच परिसरात. बाकी सगळीकडे इमारतींची उंची ही बरीच कमी असते. खूप म्हणजे खूपच पसरलेले असे हे गाव आहे. किंबहुना अमेरिकाच मुळी खूप पसरलेली आहे. जवळ पास अथवा जवळ जवळ काही नाही. मिनियापोलीस चा बेसबॉल क्लब खूपच नामांकित आहे. गावात मोठ्ठी मैदाने आहेत. लोकांना बेसबॉल म्हणजे जीव की प्राण. आपल्याकडे जसे क्रिकेट तसे इथे बेसबॉल. इथल्या बेसबॉलच्या टीम ला "Minneapolis – St. Paul" असे न म्हणता "Twins" असे नाव आहे ! इथे क्रिकेट बाबत अजिबात प्रेम आणि ज्ञान नाही. पण बेसबॉल बाबत नुसता विचारा, पोपटा सारखे बोलायला लागतील. कोण खेळाडू कुठल्या क्लबचा, कोणाला किती पैसे मिळतात? कोण कसा महत्वाचा खेळाडू आहे, सगळी माहिती अगदी तोंडपाठ !!!
या शहरात एक मोठ्ठी बाग आहे. त्याचे नाव Spoon and the Stobery असे आहे. त्या बागेत मध्यभागी एक मोठ्ठा Spoon आहे आणि त्याच्यावरती एक Stobery ठेवेलेतिथे वेगवेगाळी मेटल मधून बनवलेली ठेवेलेली आहेत. पाहायला फार ती मजेशीर आहेत. या शिवाय, मिनियपोलिस मधे अनेक बागा, तलाव आहेत. ती पाहाताना मला भोपाळ आणि नैनितालची आठवण आली. लांब लांब अंतरापर्यंत पाणीच पाणी. बाकी काहीच नाही. भोपाळचे बडा झिल आणि छोटा झिल हे या सारखेच. अनेक तलावांच्या बाजूने चालायचे रस्ते आणि सायकल चालवायचे रस्ते केलेले आहेत. त्यामुळे खूप जण सकाळी किंवा संध्याकाळी या तलावावर व्यायाम करण्यासाठी यात असतात. तेथील बंगले पहाल तर तोंडात बोटे जातील. एकेका बंगल्याची किंमत फक्त १५ ते २० लाख USD !!!
तसा पहिला गेला तर मिनियापोलीसच नव्हे तर अख्खी अमेरिका फारफार पसरलेली आहे. जवळ जवळ, चालत पटकन जाता येईल असे काहीच नाही. कुठेही जायचे म्हणले तर आधी गाडी काढावी लागते. नुसता नाश्ता करायचा म्हणाला तरी ५ ते १० मैल लांब गाडी चालवत जावे लागते. सगळे गाव कसं लांब लांब पसरलेले असते. फार गजबजाट नाही. कामाकरता चालणे या लोकांना फारसे मान्य नाही. व्यायाम म्हणून खूप चालतील पण सहज म्हणून लांब कुठे गेले असे प्रकार अंमळ कमीच. सगळीकडे समृद्धता असल्याने सहजासहजी अंग हलवले आणि तेही पटकन हे त्यांना जमत नाही.
आठवडाभर काम करून झाल्यावर शनिवार आणि रविवार काय करायचे हा एक मोठ्ठा प्रश्नच होता. Duluth ला जावे असा एक विचार होता पण दोन दिवस पूर्ण हातात असल्याने त्यावर कडी केली ते "शिकागो"नेच...
स्वामी विवेकानंदांनी इ स १८९३ साली या गावी "Brothers and Sisters of Amerika....." असे म्हणून सगळ्या जगाची वाहवा मिळवली आणि हिंदू धर्म आणि प्रथा याची जगाला काही प्रमाणात ओळख करून दिली ते गाव म्हणजे शिकागो एवढीच माहिती माझ्याकडे होती कारण तेवढीच शाळेत असताना आम्हाला देण्यात आली होती. पण या व्यतिरिक्त ही ते एक वेगळे गाव आहे यावर तेथे जाई पर्यंत माझा विश्वास बसला नाही. Greyhound च्या बस ने आम्ही शनिवारी सकाळी शिकागोला पोहोचलो आणि आम्हाला हळू हळू हे गाव कळायला सुरुवात झाली. त्यापूर्वी जरा Greyhound बस बद्दल. अमेरिकेतील ही सर्वात मोठी बस ची सर्व्हिस देणारी कंपनी आहे. आपल्या वोल्वो इतकी झकास नसली तरी भाडे मात्र फारच कमी आहे. ज्यांना विमान प्रवास परवडत नाही किंवा ज्यांना Public Transport नेच जायची इच्छा असेल त्यांना हा पर्याय फार चांगला आहे. मी असे काही लोक पहिले की जे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरुन पश्चिम किनाऱ्यापर्यंत बसने प्रवास करतात. Greyhound ची बाकी Service म्हणजे अगदी "प्रवाशांच्या सेवेसाठी" सारखीच. अगदी सगळ काही वेळेत करणार. वेळेवर बस निघेल , वेळेवर पोहोचेल. आपल्याकडच्या Private Transport सारखी मगरुरी नाही किंवा फसवणूक नाही. Greyhound चे बस स्टेशन ही पाहण्यासारखे असतात. सगळीकडे माहिती, स्वच्छता, Greyhound चा इतिहास सांगणारे फोटो, लहान मुलांना खेळायला Play Area वगैरे. तर मी शिकागो बद्दल सांगत होतो. मिनियापोलीस पासून शिकागो अंदाजे ४०० मैल आहे. विमानाने दीड तास किंवा बस ने ७ तास. शिकागो संपूर्ण पाहायचे असेल तर आठवडा सुद्धा कमी पडेल इतके ते गाव छान आहे. शिकागोतील प्रत्येक बिल्डिंगला एक इतिहास आहे. एक महत्व आहे. जवळ जवळ १०० ते १२५ वर्षे होऊनही या बिल्डिंग ची परिस्थिती अगदी उत्तम आहे. प्रत्येक बिल्डिंग चा आकार वेगळा. एक तर काय Marble Building, तर दुसरी Rusty बिल्डिंग. कारण काय तर ती बनवल्यापासून तिला रंगच दिला नाही. तेव्हापासून ती गन्जलेलीच आहे. Half Painted Building, काहींचा आकार विचित्र तर काही संपूर्ण स्टीलच्या. शिकागोची Sky Line या बिल्डींग्समुळे कायम लक्षात राहते....
अनेक वर्षे Red Indian लोकांशी युद्ध केल्यानंतर इस १८३३ मध्ये शिकागो शहराची मांडणी झाली. शिकागोचे विमानतळ आज जगातील २ नंबरचे गर्दीचे विमानतळ म्हणून ओळखले जाते. दर वर्षी अंदाजे ५ कोटी पर्यटक शिकागोला भेट देतात !!! शिकागो शहराची अशी हळूहळू वाढ होत असताना रविवार, ८ ऑक्टोबर १८७१ ला रात्री ९ वाजता या शहरात आग लागली. असे म्हणतात, एका गाईची कंदिलाला धक्का लागून ही आग लागली पण ते खरा असेलच असे नाही. शिकागो शहरात लाकडी बिल्डिंग खूप जास्त असल्याने ही आग भराभर पेटत गेली. त्यात प्रचंड जोरात वाहणारे वारे यांनी तर ती फारच भडकली. रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी अग्निशामक विभागाला याची माहिती मिळाली पण दुर्दैव असा की त्यांनी आग विझवायला बंब पाठवले ते उलट दिशेला. तोवर आगीने असे काही रुद्र रूप धारण केले की सारे हतबल झाले. शिकागोच्या मेयर ने आजूबाजूच्या परिसरातून मदत मागितली पण आगीचे प्रमाण एवढे मोट्ठे होते की कशा कशाचा उपयोग झाला नाही शिकागो शहराची पाणी पुरवठा विभागाची बिल्डिंग जाळून गेली आणि शहराला आग विझवायला पाणी मिळायची शक्यताही अंदुक अंधुक होत गेली. हॉटेल्स, मोठ्ठी दुकाने, वाडे, सिटी हौल, झाडे, चर्चेस, बिल्डींग्स सगळे जाळून गेले. शेवटी सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने आणि वाऱ्याच्या बदललेल्या दिशेने आग आटोक्यात आली आणि ३५ टक्के शहर जाळून गेल्यावर ३ दिवसांनी मंगळवारी सकाळी ही आग विझली! जवळ जवळ २००० एकर परिसर जळून बेचिराख झाला होता. तीन लाखांपैकी एक लाख लोक यात बेघर झाले. २० ते ३० लाख पुस्तके तेथील ग्रंथालयातील जळून गेली.या घटनेला Great Chicago Fire of 1871 असे म्हणतात.
या धक्यातून शिकागो शहर मात्र लवकर सावरले. संपूर्ण देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. देश विदेशातून लोक आले आणि त्यांनी शिकागो शहर नव्याने उभे केले. लाकडाचा वापर जास्त केल्याने जळलेल्या शहराने मग स्टील चा वापर केलेल्या बिल्डिंग बांधायला सुरुवात केली. शिकागोतील प्रत्येक बिल्डिंगला एक इतिहास आहे आणि तेथील लोक आणि गाईड ते अगदी आवडीने सांगतात. या शहरात सिटी टूर करणाऱ्या बस मधून फिरायची मजा काही औरच आहे. दर २० मिनिटांनी बस येते. आपण टपावर जाऊन बसायचे आणि शहर भटकत फिरायचे. शिकागो मध्ये असंख्य ठिकाणे अशी आहेत की जी पाहायलाच हवीत. या प्रत्येक ठिकाणावरती मी एक एक पान लिहू शकतो पण जागा आणि काळा अभावी फक्त ओझरता उल्लेख करून पुढे जातो
मिलेनियम पार्क - हे शहरातील एक मोठ्ठे पार्क आहे. याच्या बाजूलाच एक सिटी पार्क पण आहे. येथे एक कल्चरल सेंटर आहे. ते पाहतां मला पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाची आठवण झाली. येथील Clould Gate फारच प्रेक्षणीय. २००५ साली Bean च्या आकाराची ही वस्तू स्टील ची बनवलेली असून सर्व बाजूंनी पॉलिश करून चकाचक दिसते. शिकागो ची Sky Line यात फार सुंदर दिसते.
Machigan Ave Bridge
Garrett Popcorn
Palmer House
Art Institute
Hilton Chicago
Shedd Aquarium
Field Museum
Sheraton Hotel
Navy Pier
Chicago Water Tower
John Hancock Observatory
Union Station - This is like our VT station
Skydeck
Chicago Theatre
आता यातील बऱ्याच गोष्टी मी पाहिल्या पण ज्या गोष्टी वाचून मी पुढे जाऊच शकत नाही ती गोष्ट अर्थात Willis Tower....
१९७४ साली बांधली गेलेली ही अमेरिकेतील सर्वात उंच बिल्डिंग आहे. फक्त १०८ मजले आणि १४५० फुट (४४२ मीटर)!!! जेव्हा ही बांधली गेली त्यावेळी ही जगातील सर्वात उंच बिल्डिंग होती. या बिल्डिंगचे पूर्वीचे नाव Sears Tower असे होते पण २००३ साली Sears, Roebuck & Co. चे Sears नावाचे अधिकार संपले पण नवीन नाव काही लागले नाही. मार्च २००९ मध्ये Willis Group Holdings, Ltd., या लंडन मधील कंपनीने याचे अधिकार घेतले आणि दिनांक १६ जुलै २००९ रोजी सकाळी १० वाजता याचे नाव Willis Tower असे अधिकृत रित्या बदलले!!!
गमतीचा भाग असा की त्या नंतर चारच दिवसांनी मी Willis Tower पाहिला! त्यामुळे माझ्या सर्व मित्र मंडळीत आणि नातेवाईकांत सर्वात आधी Willis Tower पाहणारा मीच.... जगातील असंख्य Sears Tower च्या चाहत्यांसाठी हा एक धक्काच होता. काही लोक तर इतके नाराज आहेत की अजूनही ते नवीन नाव मान्य करण्यास किंवा उच्चारण्यास तयार नाहीत.... हे असे का याची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया.
Sears, Roebuck & Co. ही जगातील Retail क्षेत्रातील एक नंबर ची कंपनी १९६९ साली होती. त्यांची अनेक ऑफिस शिकागो शहरामध्ये पसरलेली असून त्यात त्याकाळी ३५०००० लोक काम करत असत. Sears, Roebuck & Co. च्या उच्च अधिकाऱ्यांनी असा विचार केला की आपले सर्व कर्मचारी एकाच ठिकाणी कामाला बसले तर काय होईल? काम करणे ही सोपे आणि भेटणे ही!. या कल्पनेतून पुढची पावले टाकले गेली या बिल्डिंग चे चित्र तयार झाले. कंपनीचा भविष्यकालीन विस्तार लक्षात घेता साधारण ३० लाख चौरस फुट एवढी जागा लागेल असा अंदाज करून विचार चालू झाला. भविष्यकालीन विस्तार होईपर्यंत मोकळी असलेली जागा छोट्या व्यावसायिकांना देण्याचा विचार झाला. त्यांना ती जागा परवडायला हवी असेल तर जागा लहान हवी. जागा लहान पण खिडक्या आणि बाहेरचे दृश्य मात्र चांगले दिसायला हवे ! या साठी प्रत्येक मजल्यावर कमी क्षेत्रफळाची पण जास्त उंच अशी बिल्डिंग बनवण्याची कल्पना पुढे आली. ९ मोठ्या ट्यूब एकत्र करून कशी दिसेल असे एक चित्र तयार झाले आणि मान्य ही झाले.... सर्वात खाली ५५००० चौरस फूट आणि हळूहळू वरती कमी होत जाणारे क्षेत्रफळ असे चित्र करताना ही बिल्डिंग १०० माजले पार करणार असे लक्षात आले. Federal Aviation Administration च्या नियमांचे पालन करत १९६९ साली याचे काम सुरु झाले आणि मे १९७३ ला पूर्ण झाले. त्याकाळी या बिल्डिंगला १५ कोटी USD ( १ अब्ज USD आत्ताच्या हीशोबात ) खर्च आला होता. का सर्व खर्च Sears, Roebuck & Co. ने उचलला होता !!! १९८२ साली २ अन्टेना तेथे बसवण्यात आले ज्यामुळे त्याची उंची १७०७ फुट झाली. TV चें reception चांगले होण्यासाठी नंतर त्यातला एक अन्टेना अजून वाढविल्यावर ती १७३० फुट अर्थात ५२७ मीटर झाली.
शिकागो मध्ये पोहोचल्यावर सर्वात पहिली गोष्ट आम्ही पहिली ती म्हणजे अर्थात Willis Tower ....
सकाळी १० वाजताच रांगेत उभे राहून नम्बर लावला. वरती पाहून मान मोडेल अशी त्याची उंची. आत गेल्यावर आम्हाला एका लिफ्ट ने पहिल्या मजल्यावर नेल्यात आले. तेथे तिकीट काढणे आदि सोपस्कार झाल्यावर परत आम्हाला एका लिफ्ट ने दुसऱ्या मजल्यावर नेल्यात आले. तेथे Willis Tower कसा सुंदर आहे, कसा वेगळा आहे, तो किती उंच आहे अशा असंख्य गोष्टींची माहिती भिंतीवर लिहिलेली असते. तेथून पुढे गेल्यावर आम्हाला एका Auditorium मध्ये नेण्यात आले, तेथे Willis Tower ची एक फिल्म आम्हाला दाखवण्यात आली. अशी जाहिरात बाजी अमेरिकेत सगळीकडेच चालते. Marketing करावे ते अमेरिकन लोकांनीच.... असो
हळू हळू उत्चूकता शिगेला पोहोचल्यावर आम्हाला परत एकदा एका लिफ्ट मध्ये बसवण्यात आले. आणि अक्षरश: जादूने एक मिनिटात १०३ मजल्यावर नेऊन ठेवले गेले! २६ फूट प्रती सेकंद या भन्नाट वेगाने Schindler Group च्या लिस्ट आपल्याला या उंचीवर नेऊन ठेवतात. पोटात गोळा उठणे काय असते हे कळायच्या आताच आपण १३५३ फुट उंचीवर आलेले असतो. हे अंतर कापत असताना कोणत्या क्षणी आपण कोणती बिल्डिंग पार करत आहोत याची माहितीही लिस्ट मध्ये दिली जाते . आणि आपण पोहोचतो १०३ मजल्यावर.... तेथे पोहोचल्यावर लिफ्ट च्या बाहेत Floor No. 103 आपले स्वागत करतो. आणि मग जणू "नभ आता ठेंगणे" अशी अवस्था होते. यालाच The Skydeck आहे म्हणतात. या मजल्यावर चारी बाजूंनी शिकागो चा नजाराकाचेतून पाहता येतो. आणि तेही कितीही वेळ. या मजल्यावरून आकाश स्वच्छ असेल तर ५० मैल एवढ्या अंतरापर्यंतचा प्रध्ये पाहता येतो. ४ राज्य एका ठिकाणाहून पाहता येण्यासारखे एकमेव ठिकाण म्हणजे Willis Tower.... Illinois, Indiana, Michigan आणि Wisconsin या प्रदेशातील बराचसा प्रदेश नजरेच्या टप्यात येतो.....
५०-५० मजली बिल्डिंग ही एकदम पिल्लू पिल्लू पाहायला मिळतात. शिकागो शहराच्या भूगोलाचा चांगला अभ्यास येथून करता येतो. प्रत्येक दिशेला काय दिसेल याचे ताजे फोटो काढून त्याला नावे देऊन अतिशय व्यवस्थित पणे लाऊन ठेवलेले आहेत. शिकागो चे रास्ते, रेल्वेचे रूळ, नदी, बिल्डींग्स, कारंजी, Navy Pier अशा अनेक गोष्टी स्पष्टपणे पाहता येतात.
या सर्वांवर कडी करणारा प्रकार म्हणजे अर्थात "The Skydeck- glass balconies"..... जानेवारी २००९ मध्ये याचे काम चालू झाले. जवळ जवळ ४ फुट बाहेर काढलेल्या ३ संपूर्ण काचेच्या बाल्कॅनी हा एक अजब प्रकार आहे. या बाल्कॅनीला सर्व बाजूंनी काच असून ५ टन वजन घेण्याची त्याची क्षमता आहे. या ठिकाणी प्रवेश करणे आणि त्यात उभे राहणे हे मोठे धीराचे काम आहे. कारण येथे पायाखाली ही काचच!!! तेथे उभे राहिलेल्या लोकांचे हावभाव आणि चीत्कार पाहण्यासारखे !! दीड इंच जाडीची काच असली तरी, तरी ती काचच ना... जीवाचे पाणी पाणी होते काहींचे... काही जण तर तेथे पाऊलच टाकत नाहीत. कारण पायाखाली बिल्डींग्स आणि नदी !!! लोकांसाठी २ जुलै २००९ ला हे सुरु झाले. हा थरारक अनुभव मी कधीच विसरू शकत नाही.
The Art Institute of Chicago च्या बाहेर २ सिंह आहेत. Oxidation झाल्यामुळे त्यांचा रंग आता हिरवा झाला आहे. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी सार्या जगाला हिंदू धर्माचे महत्व सांगितले होते. विशेष म्हणजे त्या The Art Institute of Chicago ज्या रस्त्यावर आहे त्यालाही स्वामी विवेकानंद यांचे नाव देण्यात आले आहे !!!
दुसल्या दिवशी पुराण वस्तू संग्रहालय आणि Shedd Aquarium पाहता पाहता पायाचे तुकडे पडायची वेळ आली. Shedd Aquarium हे अमेरिकेतील २ क्रमांकाचे मोठ्ठे Aquarium असून १९३० साली सुरु झाले. असंख्य प्रकारचे जलचर ज्यात साप, बेडूक, मासे, डॉल्फिन, पेंग्विन, सरडे, कासव असे नानाविध प्राणी येतात. यातील सर्वात आकर्षक प्रकार म्हणजे डॉल्फिन शो... ३ डॉल्फिन एका वेळेस ज्या अशक्य कसरती करू दाखवतात त्याला तोड नाही. माझे काम दोन आठवड्याचे असल्याने मला खरतर एकच Weekend मिळाला होता तो अशा प्रकारे आम्ही शिकागोला सत्कारणी लावला....
क्रमशः..........

Monday, August 31, 2009

वारी विदेशाची - भाग १

श्री

नमस्कार मंडळी .....
माझे परदेश गमन ठरवण्याची चर्चा इतक्या लोकांकडून इतक्या वेगवेगळ्या स्तरावर गेल्या वर्षी पासून चालू होती कि मला त्याचा अगदी वीट आला होता. "मंदार ला ह्या कामासाठी परदेशात पाठवायचे" हे नक्की झाले होते पण कधी ? ह्याचे उत्तर कमिन्स मधील कोणीच देत नव्हते. वर्षभर नुसती चर्चा... अगदी इंग्लंड चा व्हीसा पण गेल्या जुलै मध्ये आला पण कुठे माशी शिंकली पण इंग्लंड ला गाडी इंचभरही सरकली नाही.
ह्या वेळेला "अमेरिका" ह्या देशी जाण्याची चर्चा परत जोर धरू लागली तेम्हा मी शहाणपणाने ह्यात भाग घेतलाच नाही. व्हीसा आणि विमानाचं तिकीट दाखवा मग पुढचं बोलू असे मी मित्रांमध्ये सांगायला सुरुवात केली. पण हळू हळू 'माझ्या' नावाची चर्चा चालू आहे आणि ती सुद्धा खरी खरी तेव्हा मला जरा अंधुकशी आशा वाटायला लागली. काही दिवसांनी "व्हीसा काढून या" असा जेव्हा आदेश आला तेव्हा मात्र मी या विषयी थोडा थोडा विचार करायला सुरुवात केली. पण व्हीसा मिळेलच कशावरून अशी एक शंका मनात होतीच. अमेरिकेचा व्हीसा पुण्यात काढून मिळत नाही. साहजिकच मुंबईची एक वारी अपेक्षित होती. व्हीसा साठी लागणाऱ्या कागद पत्रांची जुळवा जुळव सुरु झाली आणि गेल्या वर्षीचे आयटी रिटर्न माझ्याकडे सापडेना. धावपळ सुरु. माझ्या सिए ला विचारले. ते म्हणाले की त्यांच्याकडे ते सुरक्षित आहेत. त्यांच्याकडे आणायला गेलो तर ती कागद पत्रे चुकून मुंबईला गेली असा साक्षाकार झाला! मला पुढचे अडचणीचे डोंगर दिसायला सुरुवात झाली होती. शेवटी तातडीने कुरियरने त्याच रात्री ती कागद पत्रे मुंबईहून मागवून घेऊन दुसऱ्या दिवशी सगळी कागद पत्रे ऑफिस मध्ये धावत पळत नेऊन दिली. मुंबईतील व्हीसा चे काम त्या मानानी खूपच सुरळीत आणि वेळेत झाल. एकतर सकाळी ७.४५ ची वेळ देण्यात आली होती म्हणून आम्ही (आता या पुढे आम्ही म्हणजे मी आणि मोरेश्वर दिक्षित बर का..) आदल्या दिवशी मुंबई ला मुक्कामाला गेलो होतो. मला इंग्लंड ला लागणारा व्हीसा काढायची माहीती झाली होती पण "अमेरिका" व्हीसा हा एक अजबच प्रकार होता.
"अमेरिका" Embassy च्या मुंबई च्या ऑफिस मधून दररोज अंदाजे ३००० लोकांची व्हीसा साठी मुलाखत होते. दर १५ मिनिटांनी काही शे लोक आत घेण्यात येतात. व्हीसा ला अप्लाय केलेल्या लोकांना नेट वर तारीख आणि वेळ देण्यात येते. त्या वेळेच्या १५ मिनिटे आधी व्हीसा ऑफिस च्या दारात उभे राहणे अपेक्षित आहे. आधीपण नाही आणि नंतर पण नाही. ऑफिस च्या आत गेल्यावर त्यांच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे तपासणी, हाताच्या बोटांचे ठसे, मुलाखत हे सारे सोपस्कार झाले. मला फार अडचणीत टाकणारे प्रश्न काही त्यांनी मला विचारले नाहीत. त्यतून लहान पणापासून क्रमिक पुस्तकापेक्षा "२१ अपेक्षित" वर माझा भक्कम विश्वास असल्याने आणि अगदी शाळेपासून पाठांतर यावर श्रद्धा असल्याने माझे काम तसे सोपे होते. काय सांगायचे आणि त्याहून महत्वाचे काय सांगायचे नाही हे सारे पढवून ठेवलेले असल्याने मी तिथे अगदी पोपटा सारखी उत्तरे दिली. "अमेरिका" च्या त्या व्हीसा देणाऱ्या ऑफिसरला मी फार गरजू आहे आणि मला व्हीसा दिल्याने त्याचे आणि अमेरिकेचे फार काही बिघडणार नाही याची खात्री पडली आणि माझ्यावर खुश होऊन मला १० वर्षांचा व्हीसा मला बहाल केला. व्हीसा आणि पास पोर्ट घेऊनच पुण्याला परत यायचे असा मला आदेश असल्याने आम्हाला दिवसभर वेळ मुंबईत मिळाला. त्यात सुद्धा एक गम्मत झाली. मला काही पैसे हवे होते म्हणून मी जवळच्या एका ए टी एम मध्ये गेलो. पास वर्ड टाकून पैसे देण्याची आज्ञा केली आणि तेथील मशीन ने संप पुकारला. पैसे आत आणि माझे ए टी एम कार्ड ही आतच. मग पुढचे सगळे सोपस्कार, गुन्हा दाखल करा. वगैरे वगैरे. शिवाय कार्ड मिळायला ४ दिवस लागतील हे आश्वासन!
दिवसभर वेळ काढून सायंकाळी ५ वाजता परत आम्ही व्हीसा ऑफिस पाशी हजर. मागे सांगितल्या प्रमाणे व्हीसा आणि पासपोर्ट घेऊन आम्ही विजयी वीर पुण्याला रात्री परत. व्हीसा मिळाला असला तरी चेअरमन ची परवानगी मिळालेली नव्हती. त्यामुळे मनात धागधुग होतीच. त्यातून आम्ही ३ लोकांची मागणी केली होती पण २ लोकांचीच परवानगी दिल्यामुळे कोण २ जण जाणार हे गुलदस्त्यात!
मनाचा धीर करून तयारीला सुरुवात केली. यादी बनवून काही आवश्यक गोष्टींची खरेदी करणे, ऑफिस मधून डॉलर मिळवणे, इतर परवानग्या, तिकीट बुक करणे, तिकडचे हॉटेल बुक करणे आदी असंख्य गोष्टी शेवटच्या दिवसापर्यंत चालू होत्या आणि निघायच्या एक दिवस आधी सर्व परवानग्या आणि विमानाची तिकिटे हातात पडली. मी तेथील काम झाल्यावर पुण्यात २ दिवस रजा टाकून अमेरिकेत राहणार होतो त्याची परवानगी. कार बुकिंग. घरी एका बाजूला सामान ठरवणे आणि भरणे हा एक कमालीचा अवघड प्रकार सुरूच होता. अमेरिकेमध्ये आता उन्हाळा असूनही आमच्या सौ नी "मी उत्तर ध्रुवावर जाणार असून तेथे माझे जेवणाचे फारच हाल होणार आहेत किंव्वा मला तिथे काही मिळणार नाही" असे गृहीत (?) धरून त्या अंदाजाने मला सामान दिले होते. चर्चा करून ते कमी करणे कारण एका बैगेत २३ किलो च्या वर एक गुंज भर ही सामान नेऊ देणार नाही असा दम विमान कंपनीने दिल्याने परिस्थिती जरा नाजूकच होती. मी जेथे जाणार आहे तिथे उन्हाळा असून आपल्यासारखेच तापमान तेथे असते हे Net वर दाखवून ही त्यावर फारसा विश्वास तिचा बसला नाही. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जरा जास्तच सामान झाले. तेथे मायक्रोवेव्ह मध्ये करून खाता येण्यासारखे अनेक पदार्थ, तिथल्या लोकांना देण्यासाठी अति-आवश्यक जगप्रसिद्ध "चितळेंची बाकरवडी", लाडू, चिवडा आणि अनेक पदार्थ.... आणि त्याशिवाय अनेक लोकांच्या शुभेच्छा यांचे सगळ्यांचे ओझे घेऊन आम्ही शनिवारी दुपारी पुणे सोडले. मुंबईहून रात्री ११.३० ला विमान असल्याने साधारण ८.३० पर्यंत विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. शिवाय पावसाळी दिवस.
शनिवार रात्री चे विमान आणि मी Net वरून चेक इन केले होते पण म्हणतात ना, भित्यापाठी ब्रह्मराक्षस. मनात धाकधूक होतीच. कस होईल काय होईल..... त्याचा साक्षात्कार विमानतळावर लगेच झाला. एका बैगेचे वजन ४ किलो जास्त भरले. चेक इन वाले म्हणाले, ४ किलो कमी करा नाहीतर ५० डॉलर दंड ! निमूट पणाने मी परत माझे सगळे सामान घेऊन बाहेर. विमानतळावर मांडी ठोकून बसलो. सगळ्या ब्यागा उघडून हे सामान त्याच्यात, ते इकडे असा गणित करून पुन्हा परीक्षेला हजर. आता मात्र पास झालो कारण २ किलोचे जर्किन अंगावर घेतले होते आणि ३ किलोचे इलेक्रोनिक सामान वरच्या बॅग मध्ये घेतल्या मुळे "पप्पू पास हो गया".... पण ही नुसती सुरुवात होती. इलेक्रोनिक सामान वरच्या बॅग मध्ये घेतल्यामुळे पुढे मिनियापोलीस ला पोहोचे पर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यातले पेन्सिल सेल मला ते काढून, उघडून दाखवावे लागले ! असो.
विमान फुल असल्याने सामानाचा हा प्रश्न येणारच होता. चेक इन करून विमानात बसायची वेळ आली तर मोठ्ठे Surprise. आम्हाला बिझिनेस क्लास ला upgrade करण्यात आले होते. आणि ते ही Window Seat !!!. Lottery च लागली होती. आम्ही दोघे तर विमान सुरु होण्याच्या अगोदरच हवेत गेलो होतो. आयुष्यातला पहीला US चा प्रवास आणि तो ही बिझिनेस क्लास ने. अजून काय पाहिजे? विमान फुल असल्याने त्यांना असे करावे लागले. त्यातून चतुराईने आम्ही Frequent Flyer चे Registration केलेले असल्याने आम्हालाचं Upgrade. पुढच्या ट्रीप चा का शुभ शकुनच म्हणायचा !!! Business Class ची काय मजा असते ती अनुभवल्याशिवाय कळणार नाही. भरपूर Leg Space, १८० Degree Seat Resting, Separate VDO Screen, चांगले हेडफोन आणि बराच काही. ती काही मजाच और आहे. आता तसा पहीले तर विमान प्रवास ही काही चंद्रावर जाण्यासारखी काही फार अवघड किंवा अशक्य गोष्ट राहीलेली नाही तरीपण काहींना यामध्येही नाविन्य अनुभवण्याची आवड असते. माझेही असेच झाले. एकतर मुंबई नेवार्क Direct Flight त्यामुळे प्रवास कसा होतो, किती अवघडायला होता, किती कंटाळवाणा होतो हे काहीच माहीती नव्हते. जगातील सगळ्यात मोठी विमाने बनवणाऱ्या कंपनीचे बोईंग ७७७ हे विमान मला अमेरिकेला घेऊन जाणार होते. २२६ Economy Class, ४८ Business Class , शिवाय ११ विमान कंपनीचे कर्मचारी आणि २ पायलट असे साधारण २८७ लोकांना हे विमान एकत्र उडत घेऊन जाणार होते आणि ते ही ६२५ मैल प्रती तास या भन्नाट वेगाने. विमानाचा प्रवास बहुतेक वेळेला जमिनीपासून ३४००० फुट एवढ्या उंचीवरून झाला. तेव्हा बाहेरील तापमान -५४ अंश फ इतके होते. ही सगळी आकडेवारी अटक्या असली तरी खरी आहे कारण ही सगळी माहिती समोरच्या Screen वर सारखी दिसत असते. Ground Speed, Attitude, Distance Travelled, Distance to Destination, Outside Air Temperature, Time to Destination, Local time of Origin, Local Time of Destiination, Estimated time of अर्रीअल आणि जगाचा नकाशा अशी सारी माहीती सारखी त्यावर दिसत असते. त्यशिवाय असंख्य मुवीज, गाणी, Short Film, TV Serials असे अनेक पर्याय असतातातच. कसा वेळ घालवायचा हे आपण ठरवायचं. ह्या विमानाचा मार्ग फार मजेशीर होता. विमान मार्ग म्हटला कि तो कायम एकदम सरळ अशी माझी आपली लहानपणी कल्पना होती. पण तसा काही नसतं. ह्या विमानाने तर मुंबई हून सुरुवात केल्यावर पाकिस्तान - अफगाणिस्थान – रशिया – मोस्को – नॉर्वे स्वीडन च्या वरून - इंग्लंडच्या खूप वरून – ग्रीनलंड च्या अगदी जवळून मग अमेरिकेमध्ये प्रवेश केला. शाळेत कधीतरी "मध्यरात्रीचा सूर्य" असे शिकलेले प्रकरण डोळ्यासमोर आले. माझा सगळा प्रवास रात्री असल्याने उगीचच पटकन "मध्यरात्रीचा सूर्य" दिसेल की काय असे वाटत होते. नाहीतरी आपण उत्तर ध्रुवावर किंवा दक्षिण ध्रुवावर जाण्याचा आणि "मध्यरात्रीचा सूर्य" पाहायचा योग कधी येणार म्हणा... (भूगोल काही माझा शाळेत नावडता विषय नव्हता हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेल....)
अगदी वेळेवर विमान निघाले. किंबहुना माझ्या संपूर्ण ३ आठवड्याच्या प्रवासात 'मला उशीर झाला' किंवा 'वाहन उशिरा निघाले' असा सहसा झालाच नाही. रात्रीचा प्रवास आणि मी पश्चिमेकडे जात असल्याने सूर्याला विरुद्ध बाजूला ठेऊनच माझा प्रवास होणार होता. सुरुवातीचे ६-७ तास प्रयत्न पूर्वक जागा राहीलो आणि मग मस्त झोप काढली. पहाटे ५ वाजता नुवर्क (Newark) Local Time ला पोहोचलो. हा अमेरिका भूमीवर झालेला माझा पहीला स्पर्श. ३ तास Break घेऊन नुवर्क (Newark) ते मिनियापोलीस (Minneapolis) ला एका छोट्या विमानाने सकाळी ११.३० ला पोहोचलो. ठरवल्या प्रमाणे आमचा मित्र रघु आम्हाला नेण्यासाठी आला होता. जवळ जवळ २६ तासाचा प्रवास आणि घड्याळ बदल त्यामुळे शरीर काहीतरी वेगळच बोलत होतं. मिनियापोलीस - सेंट पॉल विमानतळावरून आमची वरात घेऊन तो आम्हाला एका मस्त भारतीय Restaurant मध्ये घेऊन गेला. तेथे झकास पैकी जेवण करून आता हॉटेल वर जाऊन आराम करू असा आम्ही विचार करत होतो. रघु म्हणाला, तुमच्याकडे एकच Week end आहे तर आज Mall of America का पाहत नाही आणि ते विमानतळापासून अगदी जवळ आहे. क्षणात आम्ही निर्णय बदलला. आणि त्याला 'हो' म्हटले. पुढचे ५ तास Mall of America......
Mall of America हा अमेरिकेतील सगळ्यात मोठ्ठा माल असून अमेरिकन लोकांना त्याचा अपार अभिमान आहे. किंबहुना 'अमेरिके'बाहेर ही काही जग आहे आणि तेथेही काही छान, मोठ्ठे असू शकते हे त्यांना मान्यच नसते. असो. ४२ लाख चौरस फुट जागेवर २५ लाख चौरस फुट बांधकाम असलेला हा Mall साधारण आयताकृती आकाराचा आहे. ३ मजले आणि एका बाजूला ४ मजले बांधकाम असलेल्या या Mall मध्ये ५२० दुकाने आहेत. गमतीचा भाग असा की मिनीसोटा (Minisota) प्रांतामध्ये हिवाळ्यात नेहमीच शून्यापेक्षा खाली तापमान जात असूनही हा Mall Air Conditioned नाही. फक्त प्रवेश द्वार सोडल्यास बाकी सगळीकडे नैसर्गिक हवा संचारत असते. दिवे, इतर विजेची उपकरणे, येणारी माणसे आणि इथे काम करणारी मंडळी येथील हवामान योग्य पातळीत ठेवतात असा त्यांचा दावा आहे ! दर वर्षी ४ कोटी लोक या Mall ला भेट द्यायला येतात.
Ghermezian फमिली च्या Triple Five Group च्या मालकीचा हा असून १९९२ साली हा सर्वांसाठी खुला करण्यात आला. 7 मजली पार्किंग च्या जागेमध्ये साधारणपणे २०००० वाहने बसायची सोय केलेली आहे ! Phase II expansion मध्ये अजून ८००० पार्किंग वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. पण Phase II expansion चा खर्च २ अब्ज डॉलर असल्याने त्यांनी सध्या त्याचे काम सुरु केलेले नाही. पैशाची कमतरता आणि Recession याचा अमेरिकेवर फार परिणाम झाला आहे. आता प्रांतातील कर वाढवून पैसा गोळा करायचे प्रयत्न चालू आहेत.
Mall of America मध्ये Nickelodeon Universe indoor theme park हे Mall च्या मधे असलेले ठिकाण मस्त आहे. मुलांना आणि मोठ्यांनाही मजा करता येईल. तसेच Underwater Adventures Aquarium ची ही मजा घेता येते. भारतात Mall हा प्रकार येऊन ५-६ वर्ष झाली पण जगातील Malls ची मुहूर्तमेढ याने रोवली असे म्हणायला हरकत नसावी. टाचणी पासून टी वी पर्यंत आणि देशोदेशीच्या झेन्ड्यापासून कपड्यापर्यंत एका ठिकाणी सर्व काही मिळायची सोय येथे आहे. फार दमला तर बसायची आणि क्षुधा-शांती गृहाची पण सोय आहेच. मुलांना आवडणारे Nickelodeon Universe indoor theme park असल्याने पालक नेहमीच इकडे येतात. आज जगात सगळी कडेच Mall झाले असल्याने याचे फार काही कौतुक नाही पण "अमेरिकेतील सर्वात मोठ्ठा" हे विशेषण असलेले ठिकाण पहायची मजा काही औरच आहे. Mall of America मध्ये नुसते भटकणे हा सुद्धा एक अनुभव होता. वेगवेगळे Brands पाहणे, माहीती करून घेणे, निरनिराळे गिफ्ट शोप्स पाहणे हे सुद्धा भरपूर पाय दुखवायचं काम करतात.
Ressession मुळे अमेरिका काही प्रमाणत तरी जमिनीवर आली असे म्हणायला हरकत नाही. मला तेथे नवीन Road Construction चे असे बरेच Project पाहायला मिळाले की जे गेली ३-३ वर्ष चालू आहेत. पैशाअभावी काहींचे काम फारच हळू हळू चालू आहे किंवा पूर्ण पणे थांबले आहे. रस्ते दुरुस्ती सुद्धा काही काही ठिकाणी झालेली दिसत नाही किंवा ती वेळेत होत नाही. सर्व साधारणपणे रविवारी तेथे सुट्ट्या असल्याने रस्ता दुरुस्तीची कामे करतात पण या असा अनेत करणा मुळे ते काम पूर्ण होत नाही आणि सोमवारी तेथे भरपूर Traffic Jam असतात ! हीवाळ्यामध्ये अतिशीत हवामान असल्याने रस्ते Crack होण्याचे प्रमाण खूप आहे. पण पैशा अभावी ते सुद्धा वेळच्या वेळी दुरुस्त होत नाहीत.
अमेरिका या देशाबद्दल आजकाल सर्वांनाच खूप सारी माहीती असते. त्यामुळे त्या देशाबद्दल फार काही नवीन सांगावे असे काही नाही. इ स १६०० सालापासून ६ कोटी लोक अमेरिकेला गेले आणि तिथलेच झाले. युरोप, आफ्रिका, आशिया असा जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक कामासाठी अमेरिकेत पोहोचले. त्यामुळे अमेरिकेला स्वतःचा असा फारसा इतिहासच नाही. ज्या काही आहेत त्या Immigrants च्या गोष्टी. त्यामुळे अमेरिकेच्या मुख्य भाषा ३. इंग्लिश, स्पॅनिश आणि पोर्तुगीझ. आज अमेरिकेला स्वतःची भाषाच नाही. सगळीकडे इंग्लिश नसतील पण स्पॅनिश बोर्ड नक्की असतात. अमेरिकेत एकूण ४ Time Zones आहेत. Eastern time, Central time, Mountain time, Western time. त्यामुळे त्या देशातल्या देशात फोन करायचा म्हटला तरी वेळ (काळ) पाहून करावा लागतो. उदा. न्युयोर्कहून लॉस एंजलीस ला फोन करायचा तर ३ तासाचा फरक आहे. पलीकडल्या माणसाची वेळ पाहूनच फोन करणे इष्ट.
आपल्याकडे 'डबल हाड' म्हणजे साधारण पंजाबी लोक असतात. तेथील सगळेच लोक तसे. अंग पिंडाने मजबूत. उंची कमीत कमी ६ फुट. पण ह्या मजबुतीला ऐशा आरामाचे ग्रहण मात्र खूप लागले आहे. त्यामुळे फारसे कोणी मापात (!!!) नसते. ना पुरुष ना स्त्रिया. "Use and Throw" च्या जमान्यात वस्तूंसकट माणसांना सोडणारे लोक स्वतःच्या शरीराची काळजी घेताना दिसत नाहीत. "आजची जिंदगी-ऐश करो" हा जीवनाचा मुलभूत मंत्र घेऊन जन्माला आलेली मंडळी तो मंत्र आयुष्यभर न चुकता पाळतात. त्यामुळे अती खाणे, अती चरबी या गोष्टी तेथे कॉमन आहेत. त्यातल्यात्यात मिनियापोलीस मधील लोक अख्या अमेरिकेत सर्वात जास्त Health conscious आहेत असा म्हणतात आणि मला तसे दिसले सुद्धा. Over all पण मिनियापोलीस मधील लोकांना चांगला राहावं, चांगला दिसावं याची जाण असावी.
अमेरिकेत काही शब्द खूप नवीन समजले. Toilet ला Rest Room आणि पेट्रोलला गैस म्हणतात (Gasoline चा Shortform) आणि ते ही लिटर मध्ये ना मोजता गैलन मध्ये मोजतात. २.५ USD / गैलन असा तेथे सध्या भाव आहे. पेट्रोलच नव्हे तर पाणी, दुध किंवा काही द्रव पदार्थ तेथे गैलन मधेच मोजतात. जसे दुध २ USD / गैलन. पाणी १-२ USD / गैलन. तेथे मनुष्य बळ खूप महाग असल्याने जी कामे मशीन वर किवा आपोआप किवा स्वतः करणे शक्य आहे ती तशीच करावी लागतात. उदा.
१. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणे - इथे पेट्रोल भरायला माणूसच नसतो. आपण स्वतः गाडी पेट्रोल पंपावरील मशीन पाशी न्यायची. गाडीतून उतरून आधी कॅश किंवा क्रेडीट कार्ड ने पैसे ( डॉलर) भरायचे. आपले आपण पेट्रोल गाडीत भरून घ्यायचे. तेथील Wiper ने काचा साफ करून घ्यायच्या आणि मग गाडीत पुन्हा बसून पुढे जायचे.
२. कार पार्किंग - येथेही माणूस नाही. गाडी पार्किंग करायच्या वेळेला एक बटन दाबून एक कार्ड मिळवायचे. परत जाताना जेवढे पैसे झाले असतील तेवढे पैसे Swap करायचे आणि पुशे निघायचे.
३. वर्तमान पत्र - वर्तमान पत्र भरलेल्या पेट्या चौकामध्ये ठेवलेले असतात. आपण स्वतः पैसे टाकायचे आणि त्यातील पेपर मिळवायचा. बहुतेक ठिकाणी दुपारचे जेवळ (Lunch) Buffet च असते. एकतर दुपारी वेळ कमी असतो.
वेळ कमी असल्याने सगळेजण पटापट Buffet मध्ये घेतात आणि आपापल्या ऑफिसला परत जातात. काही ठिकाणी मात्र सर्विंग असते. इथेही कामाचा वेग मात्र खूप जास्त असतो. वेळेची किंमत काय असते ते इथे कळते. मिनियापोलीसमध्ये अजुनेक मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत बर्फ टाकून घेतात. अर्थात बियर सोडून !!! मिनियापोलीस येथील तापमान हिवाळ्यात शून्याच्या खालीच असते. कधी कधी तर उणे ३० ते उणे ४० अंश पर्यंत खाली जाते. त्यामुळे मुळातच येथील लोकांना थंडीची सवय असते. साहजिकच उन्हाळ्यात ते सारेजण प्रत्येक गोष्टीत बर्फ टाकून घेतात. कोक, ज्यूस , पाणी काहीही मागा. प्रथम ग्लास मध्ये भरपूर बर्फ टाकायचा आणि मग उरलेल्या जागेत पेय.
क्रमशः..........

Thursday, June 25, 2009

दयाघना.... (माझे आवडते गाणे ...)

दयाघना का तुटले चिमणे घरटे
उरलो बंदी असा मी ... दयाधना II धृ II

अरे जन्म बंदिवास
सजा इथे प्रत्येकास
चुकेना कुणास आता बंदी पुन्हा मी .... दयाघना II 1 II

दहा दिशांची कोठडी
मोहमाया झाली वेडी
प्राण माझे ओठी उरलो बंदी पुन्हा मी ... दयाघना II 2 II

बालपण उतू गेले अन तारुण्य नासले
वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी .... दयाघना II 3 II

Wednesday, June 17, 2009

रांगोळीकार देशपांडे


आपल्याला या आयुष्यात अनेक व्यक्ती आणि वल्ली भेटत असतात. काही खूप आवडतात तर काही परत कधीच भेटू नये असे वाटणार्‍या पण असतात. काही जण मनात घर करून जातात तर काही मनात चीड आणून जातात. काळाच्या ओघात आपण अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली पाहतो आणि विसरून जातो. फक्त आजूबाजूच्या आणि रोजच्या जीवनातील व्यक्ती लक्षात राहतात आणि अशा वल्ली काळाच्या उदरात गुडूप होऊन जातात. अशीच एक व्यक्ती मला भेटली आणि अगदी मनापासून वाटला की या व्यक्तीबद्दल लिहावे आणि चार लोकांना सांगावे.

या माणसाचे नाव मला आठवत नाही कारण ते फार महत्वाचे नाही. गावातले सगले जण त्यांना "देशपांडे" असेच संभोदितात. या माणसाचा माझा परिचय एका घरातील मुंजी निमित्त आला. "ते फार सुंदर रांगोळी काढतात" हे टाइटल वरुन सुजाण वाचकांच्या लक्षात आलेच असेल. मुंजीच्या ग्रहमखाच्या दिवशी आम्ही त्यांना मुद्दामून रांगोळी काढण्यासाठी बोलावले होते आणि त्यांनी एक सुंदर रांगोलीही आमच्या अंगणात काढली होती. साधारात 15 फूट व्यासाची रांगोळी एकहाती न चुकता न थांबता काढणे आणि तितकीच सुंदर रंगवणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. या 2-3 तासाच्या काळात त्यांच्या बद्दलचे अनेक पैलू समजले.

देशपांडे यांचा जन्म सातारा शहरापासून 15 किमी वर असणार्‍या वडूस या खेड्यातला. वाड-वडिलांची भरपूर जमीन होती. फार पूर्वी पेशव्यानी दिलेली जमीन आणि परगणा. पूर्वापार चालत आलेली हा जमीन जुमला आणि तशाच कष्ट करणार्‍या पिढ्या. 1950 च्या दशकापर्यंत सगळा काही व्यवस्थित चालू होत. गावात नाव होते, पत होती. हाताखाली चार गडी माणसे होती. कशाला काही कमी नव्हते. भरपूर जमीन , शेतात विहिरी, मुबलक गुरे ढोर, कामाला माणसे. कशाला काही कमी नव्हते.

आणि एक मोठ्ठ वादळ त्यांच्या आयुष्यात आले. तो काळ होता गांधी वधाचा. गोडसेनी गांधींना दिल्लीमधे मारले आणि त्याचे पडसाद सार्‍या भारतभर उमटले. विशेष करून सातारा, सांगली या जिल्ल्यात. ब्राह्मणांची घरे जाळण्याचे अनेक प्रकार या परिसरात झाले आणि एथेच या देशपांडे यांचे कुटुंब उद्वस्त झाले. घरातील करती सावरती माणसे मारली गेली किंवा कायमची जायबंदी झाली. गावात राहणे नको अशी परिस्थिती निर्माण झाली. गावातील अशी बरीच घरे मोकळी व्ह्ययला लागली. कुठेतरी सुरक्षित ठिकाणी राहू पण येथे नको आहे बहुतेकांचे मत होते. देशपांडे यांच्या वडिलांनी धीर न सोडता तेथेच पाय रोवून उभे राहण्याचा निर्णय घेतला.

परत एकदा घरची घडी नवीन बसवण्यपासून सुरूवात. जळूनगेलेली पिके परत लावण्यापासून मुळारंभ. हे सारे मार्गी लागे पर्यंत थोडासा काळ जातो ना जातो तोवर नवीन कूळ कायदयाप्रमाणे हातातील जमीन कुळांना द्यावी लागली. "कसेल त्याची जमीन....." या अजब नियमाने बहुतेक जणांच्या हक्काच्या जमिनी हातातून निघून गेल्या. ह्या सर्व घटनेचे आमचे देशपांडे हे लहान असतानाचे साक्षीदार होते. कसायाला जमीन नाही. खिशामधे पैसा नाही. त्यामुळे म्हणावे असे चांगले शिक्षण सुद्धा झाले नाही. अशा परिस्थितीत देशपांडे यांनी शहराची वाट ना धरली तरच नवल. गुजराण करायला शिक्षण नाही पण हातात थोडीशी कला होती, रांगोळी काढायची. अगदी लहान पणापासूनची. शाळेत जाण्याआधी आईचा पदर धरून जेव्हा आपण सगळीकडे वावरत असतो तेव्हा त्यांनी आईबरोबर अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या काढायला सुरूवात केली होती. त्याकाळी रांगोळी मधे रंग मिसळले म्हणून आईच्या हातचा मार खाल्ला होता. आता त्याच हातांना दोन वेळची पोटाची खळगी भरण्यासाठी याच रांगोलीचा आधार मिळाला. स्वत:च्या जीवनात निरनिराळे रंग भरायचे सोडून दुसर्‍यांसाठी काढलेल्या रांगोळित रांग भरायची वेळ आली.

सुरुवातीला कोणकोणाच्या घरी जाऊन त्यांच्याच घरी एक वेळेच्या जेवणाची सोय या रांगोळीने करून दिली. मग कोणीतरी सांगितले, अरे जरा संस्कार भारती वगैरे काही येत का? देशपांडे म्हणाले, हे काय असते? सगळे खो खो हसले. देशपांडे ओशाळून गेले पण जिद्द सोडली नाही. इकडून तीकडून माहिती कडून संस्कार भारती रांगोळी पण शिकून घेतली. मुळात हातात कला होती मग संस्कार भारतीची वळणे जमायला कितीसा वेळ लागतो? कष्ट करायची इच्छा असेल आणि मनात जिद्द असेल तर काय अशक्य आहे या जगात? हळू हळू संस्कार भारती मधे पण प्रावीण्या मिळवला आणि आता लोक सांगतील ती रांगोळी देशपांडे काढायला लागले.

थोड्याशा ओळखी वाढायला लागल्या. कोणीतरी सांगितले, अरे शाळांमधे जा. तेथे सणवारी, 15 औगस्ट ला, 26 जानेवारी ला रांगोळ्या काढ, चार पैसे हाताशी येतील. देशपांडेन्नी ही पण गोष्ट मनावर घेतली पण शाळेत प्रवेश कोण देणार? ना ओळख ना पाळख. शाळेतला शिपाई सुद्धा आत प्रवेश देईना. प्रिन्सिपल पर्यंत पोहोचणे तर दूरच राहीले. मोठा प्रश्न पडला. देशपांडे यांनी मग एक शक्कल लढवली. शाळेत भेटायाचा नाद सोडला आणि स्वतः शाळेच्या बाहेर मिरवणूकीच्या आधी मनाने रांगोळी काढू लागले. कधी नगरपालिकेच्या मैदानात तर कधी मंदिराच्या बाहेर. जिथे जागा मिळेल तिथे आपल्या कलेचे प्रदर्शन करू लागले. हळूहळू लोकांच्या ही गोष्ट लक्षात येऊ लागली. शाळेतुन देशपांडे यांना निरोप येऊ लागले. आज हा कार्यक्रम तर उद्या तो कार्यक्रम. चार पैसे गाठिशी जमू लागले.

आता लोक आठवणिनी त्यांना रांगोळी काढायला सगळीकडे बोलवू लागले. कधी नुसती रांगोळी तर कधी रांग भरलेली. कधी नुसतेच हातानी काढलेले निरनिराळे डिज़ाइन तर कधी पूर्ण संस्कार भारती. सातार्‍याच्या महाराजांची कधी गावातून मोठी मिरवणूक असेल तर राजपथ आणि अनेक ठिकाणी 20-20 फूट व्यासाच्या मोट्ठ्या रांगोळ्या. नवीन माणूस तर ही कला पाहून तोंडात बोटच घालून बसेल.
पण व्यवस्थितपणा आणि व्यावसायिकपणा त्यांना कधी जमलाच नाही. अगदी लोक देतील त्या पैशावर आयुष्यभर कामे केली. कधी "वाजवून" पैसे घेतलेच नाहीत. काहींनी बुडवले पैसे पण त्याचे त्यांना दुख: नाही. त्यामुळे शिल्लक अशी फारशी कधी राहिलीच नाही. बर्‍याच वेळा पैसे न घेता एका वेळचे जेवण हाच सौदा त्यामुळे गाठिशी पुंजी कितीशी राहणार.... एकदा अशाच विषयावर त्यांना छेडाले तेव्हा म्हणाले, माणसाला ह्या जन्माचे ह्या जन्मातच भरून जायचे असते. मला कमी पैसे देऊन त्यांच्या कुठे हवेल्या भरून गेल्या. मला माझ्या पोटपुरता मिळाले म्हणजे बस !!!

आता काळानुरूप त्यांच्यात पण थोडा बदल होत चालला आहे. वयोमानाने हात इतका सफाईदार पणे चालत नाही. ठरलेल्या वेळी अगदी वेळेवर पोहोचायला जमतेच असे नाही. अशा वेळेला जुने जाणते लोक त्यांना कधी प्रेमाने तर कधी खरोखर रागवतात. काय करणार? पु ल च्या हरितात्यांसारखे लहान मुले पण त्यांची आता चेष्टा करतात. देशपांडे कधी याचा राग करीत नाहीत. मुळातच मृदूभाषी आणि कमी बोलणारे. त्यात परिस्थीतीने कोणावर हुकुमात करायची किंवा कोणावर अधिकार गाजवायची सवयच कधी लागू दिली नाही त्याला ते तरी काय करणार? अनेक वेळा अपमान सहन करून केवळ आजच्या दिवसाची किमान एक वेळची सोय हेच फक्त नशिबाने पाहायला शिकवले...

जीवनाच्या संध्याकाळी आयुष्यात त्यांना अजूनही स्थैर्य नाही. अशा माणसांची काळजी मनात घर करून राहते ती या मुळेच नाही का?....

Tuesday, May 26, 2009

मराठी बाणा

"अशोक हांडे" हे नाव बरेच दिवस नव्हे तर बरेच वर्षे मी ऐकत होतो. त्यांचा "आवाज की दुनिया " आणि इतर अनेक कार्यक्रमाबद्दल मला फार उत्सुकता होती आणि एक दिवस "मराठी बाणा" हा कार्यक्रम पाहायचा योग आला.

125 कलाकार आणि अशोक हांडे यांची निर्मीती, दिग्दर्शन, कल्पना, सहभाग, निवेदन आणि गायन अशी बहुआयामी, बहुरंगी कमाल म्हणजे "मराठी बाणा".... कोकणातील एक आंबा विकणारा पण अफाट बुद्धी आणि कल्पना असणारा माणूस काय काय करू शकतो...

या कार्यक्रमाची सुरूवात होते अमर भुपळी पासून आणि तेथपसून तो कार्यक्रम मनाची अशी काही पकड गेतो की बस..... वासुदेवाच गीत, कोळी गीते, शेतीची गीते, भावगीते, भक्तिगीते, पोवाडे, गण, गौळण, महाराष्ट्रातील निरनिराळ्या सण आणि उत्सवाच्या वेळची गीते..... आणि हे सर्व गात असताना समोर कलावंतांनी त्या तालावर केलेली धमाल न्रुत्ये..... एका वेळेला साधारण पणे 40 ते 50 जण स्टेज वर न्रुत्ये करतात. त्यांची नृत्यातील तयारी, सफाईदारपणा हा नजरेस भरतो अगदी !!!

स्टेज चा वापर या कार्यक्रमात अतिशय उत्तम पणे केला आहे. मुर्तिमन्त गावाचा सेट, विठ्ठलाचे मंदिर, आणि त्याच्या मागे वादक कलाकार. गायक कलाकार सर्वजण स्टेज वर उभे आणि त्यांच्या पुढे नृत्य करणारे कलाकार.... स्टेज वरची 1 इंच ही जागा त्यांनी न वापरता ठेवलेली नाही.....

त्यांचा गाण्याची निवड सुद्धा अतिशय उत्तम आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमाची प्रकाशयोजना ही गाण्यांना एकदम एकरुंप अशीच आहे. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, चुक नाही. सामुहगाणात पण फोकस आणि प्रकाशयोजना अतिशय उत्तम. पिवळ्या आणि निळ्या प्रकाशयोजनेचा फार सुंदर वापर केला आहे. प्रकाशयोजनेवरती घेतलेले कष्ट नजरेत भरतात अगदी.....

हीच गोष्टा नृत्याच्या बाबतीत. समुहन्रत्यात अत्यावश्यक असणारे टाइमिंग जबरदस्त..... नृत्यावर्ती घेतलेले कष्ट लक्षात राहतात. नृत्याचा स्पीड आणि जोश कायम राहण्यासाठी कलाकार स्टेज वर येण्या आधीपासूनच नृत्य साइड स्टेज करत करतच स्टेज वर येतात ! त्याची वेशभूषा, केशभूषा ही नृत्याला अनुरूप अशीच बनवली आहे. त्यांचे दागिने हे सुद्धा त्यांच्या साडीला पीन अप केलेले असतात! बारीक बारीक गोष्टींचा फार विचार केलेला दिसतो.... कलाकारांची नृत्यातली एनर्जी पाहण्यासारखी आहे. वन्स मोर घेऊन सुद्धा तेवढीच एनर्जी ठेवणे सोपी गोष्ट नाही. गायक कलाकार आणि न्रुत्य करणारे कलाकार यांच्यातील संवाद फार सुंदर आहे.

कार्यक्रमाचा स्पीड इतका जोरात आहे की प्रेक्षकांना विचार करायला फारसा वेळच मिळत नाही. प्रेक्षक त्या कार्यक्रमाचे एक भाग होऊन जातात ते त्यांचे त्यांनाच काळात नाही. पुरूष कलाकारांनी केलेले देवीच्या गोंधलाचे न्रुत्य असो किंवा सर्व कलाकारांनी मिळून केलेली दही हांडी असो, लग्नाची वरात असो किंवा कोळी नृत्य असो....कार्यक्रंतून दिला जाणारा संदेश सगळेच सुंदर आणि लक्षात राहणारे.....

सर्वांनी एकदाच नव्हे तर अनेकदा पाहण्यासारखा कार्यक्रम म्हणजे "मराठी बाणा" !!!