Followers

Wednesday, November 4, 2009

वारी विदेशाची - भाग 3




'मेरिकेत यायचे आणि न्यूयॉर्क पाहायचे नाही म्हणजे काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन न घेण्यासारखे आहे' असे मला खूप जणांनी सागितले होते. त्यामुळे न्यूयॉर्क पाहूनच स्वदेशी परत यायचे असा विचार मी मनात पक्का केला होता. त्याला जोडून काय काय करता येईल असा अभ्यास करताना बरीच नावे पुढे आली. उदा. Washington, Niagara, Mexico वगैरे. पण शिल्लक असणारा वेळ आणि घराची ओढ याची सांगड घालताना नायगारा पाहूनच घरी परतायचे असा मी निश्चय केला. माझे मिनियापोलीस येथील काम आटोपून झाल्यावर तिथे फारसे रेंगाळत न राहता मी त्याच दिवसाच्या विमानाने न्यू जर्सीला माझ्या मेव्हण्याकडे (समीर राईलकर) आलो. तो अमेरिकेमध्ये बरीच वर्षे असल्याने त्याला बऱ्याच ठिकाणांची माहिती झाली होती आणि कुठे काय पाहायचे आणि किती वेळ घालवायचा हे चांगलेच ज्ञात होते. मी ट्रेकर असल्याने आणि मला भटकायची खूप आवड आहे हे त्याला माहित झाल्यामुळे त्याने मला २ दिवस नायगारा आणि Corning Glass Factory आणि तिसऱ्या दिवशी न्यूयॉर्क असे करण्याचा सल्ला दिला. त्याला GMAT च्या परीक्षेची तयारी करायची असल्याने तो माझ्याबरोबर तो येऊ शकत नव्हता. त्याच्या सल्याप्रमाणे एका चिनी कंपनीच्या बसच्या टूरचे बुकिंग केले आणि त्याच्या घरी माझे सर्व सामान ठेऊन फक्त मी आणि माझा कॅमेरा असा मी पुढचा प्रवास चालू केला.
न्यू जर्सी पासून नायगारा साधारण ४०० मैल असून बफेलो या गावाच्या जवळ अमेरिका आणि कॅनडा याच्या सीमेवरती हे जगातील एक आश्चर्य आहे. अमेरिकेच्या भेटीला पर्यटक गेला आणि त्याने नायगारा धबधबा पहिला नाही असे सहसा होत नाही. ४० लाख चौरस फुट पाणी प्रत्येक मिनिटाला पडणारा हा जगातील सगळ्यात (त्या अर्थाने) मोठ्ठा धबधबा आहे. Goat Island ने या धबधब्याचे २ मोठे भाग केले आहेत. Horseshoe Falls आणि American Falls. Horseshoe Falls हा कॅनडा च्या सीमेला लागून असून त्यानंतर अमेरिकन प्रदेश चालू होतो आणि नंतर दुसरा म्हणजे American Falls लागतो. हिमायुगामध्ये झालेल्या विविध भौगोलिक हालचालींमध्ये या परिसरातील प्रस्तर एकावर एक चढल्याने हा परिसर तयार झाला असून त्यामुळे नायगारा नदीला इतका मोठ्ठा धबधबा येथे प्राप्त झाला आहे. साधारणपणे १०००० वर्षांपूर्वी नायगारा धबधबा आणि अमेरिकेतील Great Lakes तयार झाले आणि हा मोठा पाण्याचा प्रवाह तयार झाला.
अतीव सुंदरता आणि आणि वीजनिर्मिती या दोनही कारणांसाठी हा धबधबा सुप्रसिद्ध असून दर वर्षी कोट्यावधी पर्यटक अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशात केवळ हा धबधबा पाहण्यासाठी येतात. १९८० सालानंतर कॅनडा सरकारने नायगारा आणि पर्यटन याचा खूप जास्त प्रमाणात विचार करून कॅनडाच्या बाजूला अनेक चांगली हॉटेल्स आणि पर्यटकांना आवडेल अशा अनेक गोष्टी केल्या. येथे दोन्ही देश जोडणारा एक मोठा पूल असून पूर्वी हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही बाजूंनी एकाच व्हिसा वर पाहता यायचा. पण ७/११ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व प्रकार बंद झाले आणि आता दोन्ही देशांचा व्हिसा असल्याशिवाय दोन्ही बाजूंनी हा पाहता येत नाही. Horseshoe Falls ची उंची १७३ फुट असून तो २६०० फुट लांब आहे. तर American Falls ८० ते १०० फुट उंच असून त्याची लांबी १०६० फुट आहे. या धबधब्यातून १८७ MW एवढी वीजनिर्मिती होते. या धबधब्या पासून खूप प्रमाणात जमिनीची झीज आणि धूप होते. ती टाळण्यासाठी १९६९ मध्ये American Falls काही काळासाठी पूर्ण बंद करण्यात आला होता !!! जास्तीचे पाणी तेव्हा Horseshoe Falls मधून सोडण्यात आले होते. जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह काळजीपूर्वक बंद करून जमिनीची झीज होणार नाही याची काळजी घेतली गेली. यासाठी तात्पुरता एक छोटेसे धरण American Falls च्या अलीकडे बांधण्यात आले होते. त्याचे तेव्हाचे फोटो ही अजून त्यांनी जतन करून ठेवले आहेत. सर्व डागडुजी करून झाल्यावर बॉम्बने हे धरण उडवून देण्यात आले आणि परत American Falls चा जलस्रोत सुरु झाला.
मी अमेरिकन साईड ने नायगाराला आलो असल्याने मला अमेरिकेच्या बाजूच्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या. यातील सगळ्यात महत्वाचे म्हणजे Maid Of the Mist Tour. १८४८ साली हे सुरु झालेली बोट गेली १५० वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्याला सफर घडवते. धबधब्याचे पाणी पडल्यावर खालच्या नदीतल्या पाण्यामध्ये सफर करायची बोट म्हणजे Maid Of the Mist Tour. तिकीट काढायचे आणि निळा किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवायचा आणि Maid Of the Mist Tour च्या बोटीत डेक वर जाऊन उभे राहायचे. ही बोट आपल्याला दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून चक्कर मारून आणते. दोन्ही धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या प्रवाहाचे उडणारे पाणी अंगावर घेत या बोटीतून फिरायचे. पाण्याचे तुषार इतके जोरात अंगावर येत असतात की आपण त्यात चिंब भिजुनच जातो. त्यामुळे धबधब्याच्या जवळून फोटो काढणे हे जरा अवघडच जातं. दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून जाता येत असल्याने फार मजा येते.
Cave of the Winds येथूनही American Fall अगदी जवळून न्याहाळता येतो. नायगारा वरती एक छान फिल्म ही Inox Theatre ला येथे दाखवण्यात येते. नायगारा धबधब्याच्या अनेक रंजक कथा आहेत. अनेक जणांनी या धबधब्यात उडी मारून खाली जिवंत राहण्याचा पराक्रम केला आहे. याची सुरुवात १८२९ साली झाली. १९०१ साली ६३ वर्षीय Annie Edson या एका शाळेच्या शिक्षिकेने पहिल्यांदा ड्रम मधून या धबधब्यात उडी मारायचा पराक्रम केला. तिला यात खूप त्रास झाला पण फारशी इजा झाली नाही. तिच्यानंतर एकूण १४ जणांनी असे उपद्व्याप केले.
नायगारा धबधबा पहायची खरी मजा आहे रात्री. आणि ती कॅनडा च्या बाजूने. Horseshoe Falls मधून पडणाऱ्या पाण्यावर कॅनडाच्या बाजूने लाईट सोडलेले असतात. ते दृश्य पहायची मजा काही औरच !!! लाईट कॅनडा च्या बाजूने सोडलेले आहेत आणि नायगारा धबधबा वर सोडलेले लाईट त्या बाजूनेच चांगले दिसतात. अमेरिकेच्या बाजूने एवढे छान दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्याचा पडणारा आवाज आणि वेगवेगळ्या रंगात दिसणार पाणी. हे पाहताना नजर तेथून ढळत नाही. कितीही वेळ तिथे थांबलात तरी तिथून निघावसच वाटत नाही. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला नायगारा धबधबा हे खरोखर जगातील एक आश्चर्यच आहे. अमेरिकेत येऊन जे लोक नायगारा पाहू शकत नाहीत त्यांच्या सारखे कमनशिबी तेच !!! इतका तो सुंदर आहे. एका सर्वेक्षणानुसार या वर्षी एकूण २ कोटी ८० लाख लोक नायागारचे दर्शन घेण्यासाठी अख्या जगातून येतील असा अंदाज आहे.
या पुढचं आकर्षण म्हणजे Corning Museum of Glass. नायगारा हून परत येताना Corning Museum of Glass and Factory लागते. ३५०० वर्षांपूर्वीचा इतिहास आणि ४५००० पेक्षा जास्त काचेच्या वस्तू एका ठिकाणी पाहायचे एकमेव ठिकाण म्हणजे Corning Museum of Glass. १९५० साली सुरु झालेल्या या वस्तू संग्रहालयात सुरुवातीला फक्त २००० काचेच्या वस्तू होत्या. हे वस्तू संग्रहालय Corning Factory च्या मालकीचे असले तरी त्यांच्या मालाची जाहिरात करायचे ठिकाण नाही. Corning Museum of Glass हे आता एक स्वतंत्र " ना नफा ना तोटा" या तत्वावर चालणारी एक संस्था आहे.
हा केवळ काचेच्या प्लेट बनवायची कारखाना नसून एक मोठी कार्यशाळाच आहे. आपल्याला काचेच्या वस्तू म्हणजे कप, बशी, झुंबर, तावदाने, पेपर वेट फार तर फार प्लेट्स, रसायन शास्त्रातील उपकरणे या पुढे आपली गाडी जात नाही. पण येथे तर आपण फक्त मनात कल्पना करायची आणि ती वस्तू काचेच्या रुपात आपल्याला पाहायला मिळते!!! काचेच्या वस्तूंचे 'वस्तू संग्रहालय' असू शकते यावरच काही आपला विश्वास बसत नाही. पण तेथील एकेक विभाग पाहिले की थक्क होते. २-२ इंचाच्या पेपरवेट पासून १५-२० फुटाच्या काचेच्या दरवाज्यांचा संग्रह इथे आहे. मग, बाउल, प्लेट्स, खिडक्या, दरवाजे, decoration items अशा अनंत गोष्टी तेथे आहेत. जगाचा काचेचा इतिहास, त्यातील कला, कलेचे बदललेले विचार आणि संदर्भ हे सारे अतिशय विस्ताराने तेथे विषद करण्यात आलेले आहे. The Juliette K. and Leonard S. Rakow Research Library ही जगातील काचेच्या संदर्भात माहिती देणारी Library येथे असून तेथे जगातील ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये काचेची जगात असेल नसेल ती माहिती मिळते. ३ लाखापेक्षा जास्त संदर्भ आणि १२ व्या शतकापासूनची माहिती असे याचे स्वरूप आहे.
१९७२ साली या परिसरात खूप प्रमाणात पाऊस झाला आणि हे सारे वस्तू संग्रहालय पाण्याखाली गेले होते. सगळ्या काचेच्या वस्तू चिखलात जमा होऊन खराब झाल्या. सगळी पुस्तके आणि संदर्भ पाण्यावर अनेक दिवस तरंगत होते. साधारण ४०% मालमत्तेचे आणि वस्तूंचे नुकसान यात झाले. आता पर्यंतच्या जगातील इतिहासातील सर्वात मोठे नुकसान झालेले वस्तू संग्रहालय असे याचे वर्णन करत येईल. आता या साऱ्या वस्तू आणि माहिती होती तशी बनवायला काय प्रयास पडले असतील? वस्तू संग्रहालयाच्या कर्मचारी वर्गाने दिवस-रात्र एक करून एक एक काचेची वस्तू चिखलातून शोधून स्वस्छ करून होती तशी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पुस्तके आणि संदर्भाचे एकेक पान उन्हात वाळवून त्याची परत डागडुजी करण्यात आली. वस्तू संग्रहालयाला मिळालेल्या वाढीव जागेसह परत एकदा वस्तू संग्रहालय १९८० साली उभे राहिले ते नव्या उत्साहाने आणि अजून मोठा काचेचा संग्रह घेऊन. आज वर्षाला ३ लाखापेक्षा जास्त पर्यटक या वस्तू संग्रहालयाला भेट देतात. त्यांना आवडेल असे एक काचेचे Shopping Market हा तर प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो.
यातील सगळ्यात प्रेक्षणीय प्रकार म्हणजे तेथील Hot Glass Show. दर दोन तासांनी हा शो करतात आणि त्यात काचेची वस्तू आपल्यासमोर करू दाखवतात. एक जण काचेची वस्तू करतो तर दुसरा त्याला मदत करतो आणि निवेदन करतो. आपल्या नजरेसमोर एखादी काचेची सुंदर वस्तू होताना पाहण्याचा अनुभव फारच मस्त आहे. काचेचे विविध उपयोग सांगण्यासाठी इथे एक वेगळा विभाग केला आहे. दुर्बीण बनवण्यापासून आरश्या पर्यंत अनेक गोष्टी तेथे ठेवण्यात आल्या आहेत. कमीत कमी एक दिवस पूर्ण काढला तर हे वस्तू संग्रहालय पूर्ण पाहून होऊ शकते.
राहिलेले कमी दिवस आणि त्याही पेक्षा कमी वेळ तसेच पहायच्या अनेक गोष्टी याची सांगड घालणे मला जरा कठीणच होते. पण Time Management चा थोडासा अभ्यास झाला असल्याने समीर बरोबर बसून नीट नियोजन केले. न्यूयॉर्क पहायच्या अनेक लोकांच्या अनेक कल्पना होत्या आणि सारेजण त्यांच्या कल्पना माझ्यावर लादू पाहत होते. "न्यूयॉर्क पाहायला एक महिना सुद्धा पुरणार नाही" इथपासून "न्यूयॉर्क मध्ये काय पाहायचे? २ तास सुद्धा पुरतील " अशी अत्यंत परस्पर विरोधी विधाने मला करण्यात आली होती त्यामुळे मी फारच बुचकळ्यात पसलो होतो. शेवटी हातात असेलेले एकूण २२ तास आणि माझी आवड याचा विचार करून नियोजन केले आणि न्यूयोर्क पाहायला सुटलो....
सुरुवात केली ती अर्थात Empire State Building ने. नायगाराहून परत येत असतानाच ही बिल्डींग मला खुणावत होती. थोडेसे Willis Tower ची आठवण होईल अशाच सर्व गोष्टी तेथे होत्या. Willis Tower वर मी १०३ व्या मजल्यावर होतो तर Empire State Building वरती ८६ आणि १०२ वा मजला हाच फरक. तीच शिस्त, तशीच तिकीटाची रांग, तसाच फोटो काढण्याचा कार्यक्रम, तशीच जाहिरात बाजी आणि उत्सुकता ही तशीच आणि तेवढीच. ही न्यूयॉर्क मधील सर्वात उंच बिल्डिंग असून ती १९३१ साली पूर्ण झाली. जवळ जवळ ४० वर्षे न्यूयॉर्क मधील सर्वात उंच बिल्डिंग होती. १९७२ साली World Trade Center चा उत्तरेकडील टौवर हा या बिल्डिंग पेक्षा जास्त उंच असल्याने Empire State Building उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर गेली. २००१ साली World Trade Center पडल्यानंतर परत एकदा Empire State Building न्यूयॉर्क मधील सर्वात उंच बिल्डिंग बनली आहे.
१९३१ साली सुरु झालेल्या बिल्डींगवर १९४५ साली एका विमानाने धडक मारली. दाट धुक्यामुळे भरकटलेल्या या विमामाने ७९ आणि ८० व्या मजल्यावर धडक मारली. एकूण १४ लोक यात मारले गेले. गमतीचा भाग यातला असा की, ही घटना घडली शनिवारी आणि तरीही सोमवारी सकाळी या बिल्डिंग मधील बहुतेक कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. Betty Lou Oliver या बाईच्या आयुष्यातील हा एक अत्यंत महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी तो ८० व्या मजल्यावर काम करत होती आणि विमानाच्या अपघातात ती भाजली होती. अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी ४० मिनिटात आग विझवली आणि तिला लिफ्टने खाली आणण्याचा निर्णय घेतला. आगीमुळे लिफ्टचे दोरही नाजूक झाले होते याची त्यांना काय कल्पना? Betty Lou Oliver ला लिफ्ट मध्ये बसल्यावर त्या दोरांनी प्राण सोडला आणि लिफ्ट वायू गतीने खाली यायला कागली, जवळ जवळ ७५ मजले खाली ती आली आणि तरीही बाई साहेब जिवंत!!! परत एकदा अग्नी शामकाच्या कर्मचाऱ्यांनी तिला तेथून बाहेर काढून दवाखान्यामध्ये पोहोचते केल्यावर काही महिन्यांनी त्या ठणठ्नीत झाल्या. Guinness World Record मध्ये नोंदला गेलेला हा एक चमत्कार आहे.
Empire State Building ची उंची १४५३ फुट अर्थात ४४३ मीटर असून त्याला १०३ मजले आहेत. १०० पेक्षा जास्त मजले असलेली ही जगातील पहिली बिल्डिंग!!! Willis Tower प्रमाणे या बिल्डिंग मधल्या लिफ्ट ने एका मिनिटात ८६ व्या मजल्यावर जाता येते. १९६४ साली या बिल्डिंग वर दिव्यांची रोषणाई करण्यात आली. पण ती करताना अमेरिकेचे महत्वाचे दिवस यांचा विचार करून ते त्या दिवशी चालू केले जातात. साधारण पणे Empire State Building ची 3 भागात लाईट मुळे विभागणी होते. वरचे ३० मजले अशा प्रकारच्या रोषणाईने उजळले जातात.
White/White/ White - हा Empire State Building ची नेहमीची रोषणाई दर्शवतात
Red/White/ Green - X mas, वेगवेगळ्या कॅलेंडरचे पहिले दिवस या दिवशी अशी रोषणाई करतात
Red/White/ Blue - राष्ट्रीय सुट्ट्या, स्वातंत्र दिन, कामगार दिन, निवडणूक दिन, ७/११ ची आठवण.
Yellow/ Yellow/ Yellow - US open चा पहिला दिवस आणि अंतिम सामन्याचे दिवस. (टेनिस बॉल चा रंग)
Green/ Green / Green - Go green day - ७ जुलै
Blue/ Blue/ Blue - घरच्या फुटबॉल च्या टीम ला प्रोत्साहन देण्याचा दिवस - ७ ऑक्टोबर
Empire State Building (ESB) वरून दिसणारे न्यूयॉर्क शहराचे दृश्य केवळ अवर्णनीयच..... विशेषतः रात्री तर फारच सुंदर. रात्रीच्या दिव्यांनी अख्खी उजळलेली न्यूयॉर्क सिटी, त्यातून जाणारी हडसन नदी (नुकतेच एका विमानाचे Emergency Landing केले तीच ही हडसन नदी !!!) आणि रात्री उशिरापर्यंत चालू राहणारे रस्ते पाहायचे असतील तर ESB वर रात्रीच यायला हवे. ESB वरून दिसणारा सूर्यास्त म्हणजे केवळ सुंदर. मी जेव्हा ESB ला पोहोचलो तेव्हा वादळ होण्याची शक्यता होती. आम्ही घाई घाईनेच वरती पोहोचलो. रात्रीचे न्यूयोर्क डोळ्यात साठवून ठेवत असताना आम्हाला अगदी समोर खरे वादळ रोन्गावत आमच्याच कडे येताना अक्षरशः पाहायला मिळाले!!! सुरक्षा रक्षकांनी जबरदस्तीने आम्हाला तेथून दूर करून काचेच्या आत नेले. जे लोक दुर्बीण घेऊन आले होते त्यांचा जरा मूड गेला होता पण पर्यायच नव्हता. ESB वरून खाली उतरे पर्यंत जोराचा पाऊस आला आणि त्याने सगळे शहर धुऊन काढले. माझ्याकडे छत्री नव्हती (कमीत कमी सामान हे ब्रीद वाक्य असल्याने माझी छत्री समीरच्या घरी सुरक्षित होती !!!) Maid Of the Mist Tour च्या बोटीतला रेनकोट अंगावर चढवला आणि दिमाखात परत न्यूयोर्क शहराची मार्ग-क्रमायला करायला लागलो.
Empire State Building (ESB) आणि Times Square हे रात्रीच पाहायला पाहिजेत हा हट्ट असल्याने पावसाची परवा न करता मी न्यूयॉर्क च्या कुठल्या कुठल्या स्ट्रीट आणि कुठल्या कुठल्या Avenue वरून फिरत होतो. न्यूयॉर्कची माहिती आपल्याला शंभर ठिकाणी मिळेल पण न्यूयॉर्क च्या वातावरणाचा Feel तिथे फिरल्याशिवाय कसा मिळणार? राहून राहून मला न्यूयॉर्क आणि मुंबई हे फार जवळचे वाटतात. रात्रीची मुंबई प्रेक्षणीय तसेच रात्रीचे न्यूयॉर्क ही तितकेच आकर्षक. फरक एकटाच की झगमग झगमग Times Square ला जास्त आहे. जशी मुंबई भारताची राजधानी नाही तशी न्यूयॉर्क अमेरिकेची. पण खऱ्या राजधानीच्या तोडीस तोड अशी ही गावे आहेत. अमेरिकेत आगगाडीचे जाळे फारसे नाही पण न्यूयॉर्क मात्र सब-वे ने संपूर्ण पोखरून काढले आहे मुंबईच्या लोकल सारखे. ही सबवे जमिनीच्या खाली फक्त १० फुट आहे आणि बऱ्याचशा सबवे च्या जाळ्यावरती फुटपाथ आहेत. त्यामुळे ट्रेन खालून गेल्याचे न्यूयॉर्कच्या फुटपाथ वारू जाताना लगेच कळते. मी आयुष्यात पहिल्यादाच सबवे चा अनुभवत असल्याने मला तर सारेच नवीन आणि अनोखे होते. अगदी तिकीट काढण्यापासून ते योग्य त्या ट्रेनने प्रवास करून पाहिजे त्या जागी पोहोचणे हा माझ्यासाठी एकदम मजेशीर प्रकार होता. न्यूयॉर्क चा खरा वेग पाहायचा तो सकाळी ऑफिस च्या वेळेला. जशी मुंबई करांची सकाळी ७.५४ ची ट्रेन पकडायची घाई असते तशीच घाई इथेही. तोच वेग, होणारी धावपळ अगदी तशीच. अख्ख्या प्रवाहालाच प्रचंड वेग त्यामुळे आपण ही त्या वेगात कधी सामील होतो ते कळत नाही. एक सेकंद ही बोलायला कोणाला फुरसत नसते. सकाळच्या वेळी न्यूयॉर्क शहरात येणाऱ्यांची गर्दी सांभाळण्यासाठी सरकारने खूप उपाययोजना केल्या आहेत. त्या थोडक्यात नमूद करतो - -
१. सकाळच्या वेळी ३ तास परत येणाऱ्यांच्या लेन मध्ये फक्त बस ला जाण्यासाठी वेगळा रस्ता.
२. खूप दूरवरून येणाऱ्या लोकांनी न्यूयॉर्क शहराजवळ आल्यावर हायवे जवळ गाडी पार्क करायची आणि Public Transport ने शहरात यायचे.
३. नोकरदार वर्गाला Public Transport वापरायला उद्युक्त करण्यासाठी करामध्ये भरपूर सवलत.
४. Public Transport चे मासिक पास अत्यंत कमी दारात
५. शहरामध्ये कार पार्किंग (स्वतःची) अत्यंत महाग.
या उपाययोजनामुळे न्यूयॉर्क आणि उपनगरातील नोकरदार वर्ग Public Transport आपसूकच वापरायला लागला आहे. एक बस बदलून नंतर एक ट्रेन बदलून मुंबई सारखाच आपल्या ऑफिसला सकाळी वेळेत पोहोचायची धडपड करतो.
Streets आणि Avenues मुळे या शहरात चुकायची शक्यता फारच कमी. आणि अगदी चुकलात तर देवानी तोंड नावाचं साधन कशाला दिला आहे? शिवाय चौका चौकात नकाशे आहेत, Taxi आहेत हेच कशाला अगदी नागपूर सारख्या सायकल रिक्षा सुद्धा आहेत. (ज्यांना विश्वास बसणार नाही त्यांना मी सायकल रिक्षाचा फोटो सुद्धा पाठवू शकतो. संपर्क: mvkulkarni23@gmail.com). Public Transport सुधारण्यासाठी या शहराने केलेले प्रयत्न वाखाडन्यासारखे आहेत. BRT रस्त्याच्या मधून नेण्यासारखे आचरट प्रकार त्यांनी केलेले नाहीत. मुंबई च्या BEST सारखी इथली Public Transport BEST आहे. Port Authority Bus Terminal सारखे ७ मजली बस स्टेशन गावात बांधलेले आहे. मी या गावात नवखा असून मला एकदाही Public Transport चा त्रास झाला नाही. या शहरामध्ये वेग आहे, रोजगार आहे आणि म्हणूनच नोकरदार वर्ग २०० मैलावरून या गावात कामासाठी रोज येतो. फक्त आपल्या मुंबईलाच का यासाठी नावं ठेवायची? असो.
Statue of Liberty पेक्षा उंच शिवाजी चा पुतळा मुंबईच्या समुद्रात उभारणार अशी एक बातमी कानावर आली होती. त्यामुळे म्हटलं, शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईच्या समुद्रात होईल तेंव्हा होईल, Statue of Liberty ची उंची तरी आपण मोजून येऊ .... असा विचार करून मी भल्या सकाळी Battery Park च्या त्या मारुतीच्या शेपटाएवढ्या लांब रांगेमध्ये उभे होतो. ७/११ नंतर सगळीकडेच सुरक्षा इतकी वाढवली आहे की जिथे १० मिनिटात रांग पुढे जाऊ शकते तितके आता तास तास थांबावे लागते. X Ray checking वगैरे भानगडीनी जीव अगदी नकोसा होतो. ३ तासाच्या तपस्चर्येनन्तर Statue of Liberty ज्या बेटावर आहे त्या कडे नेणाऱ्या बोटीत मला प्रवेश मिळाला. आणि सर्वांनी आपापले कॅमेरे सरसावले.
Statue of Liberty हे जगातील सगळ्यात जास्ती फोटो काढला जाणारे ठिकाण अशी याची एका ओळीची ओळख आहे !!! रोज लाखो पर्यटक Statue of Liberty चे कोट्यावधी फोटो कडून आपापल्या देशात परत जातात. १८८६ साली फ्रांसच्या लोक्कांनी अमेरिकेला दिलेली ही छोटीशी भेट आहे. १५१ फुट उंच असलेल्या या बाईच्या पुतळ्याच्या उजव्या हातात ज्योत असून डाव्या हातात पुस्तक आहे. त्यावर ४ जुलै १७७६ ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख लिहिलेली आहे "July IV MDCCLXXVI". पाया धरून याची उंची ३०५ फुट असून तिच्या मुकुटात ७ खिडक्या आहेत. ते जगातील ७ खंड दर्शवतात. उजव्या हातातील ज्योत प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक ज्ञान दर्शवते. १८७० मध्ये Jules Joseph Lefebvre's चे painting La Vérité च्या चित्राशी Statue of Liberty मिळतेजुळते आहे. २.४ mm च्या तांब्याच्या पत्र्यापासून हा संपूर्ण पुतळा बनवलेला असून आतून त्याला लोखंडाच्या/ स्टीलच्या पट्ट्यांचा आधार दिला आहे. आताचा हिरवा रंग हा तांब्याचे Oxidation झाल्यामुळे बनलेला आहे. हे होण्यासाठी १२ वर्षे जावी लागली. १९८६ साली नवीन ज्योत बदलण्यात आली. ९/११ च्या हल्यानंतर जुलै २००९ पर्यंत हा पुतळा आतून पाहायला बंदी होती. त्यामुळे मला मुकुटापर्यंत जाता आले नाही.
पायाच्या आंत एक कविता लिहिलेली आहे तो अशी --
Not like the brazen giant of Greek fame,
With conquering limbs astride from land to land;
Here at our sea-washed, sunset gates shall stand
A mighty woman with a torch, whose flame
Is the imprisoned lightning, and her name
Mother of Exiles. From her beacon-hand
Glows world-wide welcome; her mild eyes command
The air-bridged harbor that twin cities frame.
"Keep, ancient lands, your storied pomp!" cries she
With silent lips. "Give me your tired, your poor,
Your huddled masses yearning to breathe free,
The wretched refuse of your teeming shore.
Send these, the homeless, tempest-tossed to me,
I lift my lamp beside the golden door!"

फक्त Mother of Exiles हे कवितेतील नाव मात्र सर्वमान्य झाला नाही...
खरोखर पण कुणीही प्रेमात पडावं असा हा पुतळा आहे. फोटो काढण्याची आवड ज्यांना आहे त्यांना तर फारच !!! असा सुंदर पुतळा मी आज पर्यंत पहिला नाही. त्यामुळे किती फोटो काढू आणि नको असे होते. Statue of Liberty पासून न्यूयॉर्क शहर ही मस्त दिसते. अमेरिकेची पहिली ओळख ज्यामुळे होते तो म्हणजे Statue of Liberty.
याच्या अगदी जवळ आहे ते म्हणजे Ellis Island. अमेरिकेमध्ये १७ व्या शतकापासून अनेक लोक कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातून आले. त्यामुळे प्रथम पासूनच अमेरिकेच्या स्थानिक नागरिकांना तेथे फारसा थारा दिला गेला नाही. अमेरिकेची क्रमांक एक ची भाषा इंग्लिश. त्यानंतर स्पानिष आणि नन्तर पोर्तुगीज... १९ व्या शतकाच्या शेवटी परदेशातून येणाऱ्या लोकांचे लोंढे खूप प्रमाणात वाढले. त्यावर थोडासा अंकुश हवा या साठी १ जाने. १८९२ साली Ellis Island हे Emigration Centre - US Bureau of Immigration (Immigration and Naturalization Service) म्हणून सुरु करण्यात आले. १९५४ सालपर्यंत १ कोटी २० लाख लोकांना या वास्तूने अमेरिकेमध्ये प्रवेश दिला. १९०७ साली १० लाखापेक्षा जास्त लोकांना प्रवेश याने दिला. आहेत अशा लोकांना २७ प्रश्न विचारले जात. आणि जे लोक त्यांना येथे काम करण्यासाठी अयोग्य वाटत त्यानं तेथुनच परत पाठवले जात असे. काही जन . त्यांचा गाव आणि देश कायमचा सोडून आलेले असत . अमेरिकेत येऊन पुढचे जीवन व्यतित करणे हे एकाच ध्येय त्यांचे असायचे. दुर्दैवाने ३००० पेक्षा जास्त लोक येथील दावाखन्यात वरती गेले. तेथे त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जात. पण एकंदरीत हा सारा प्रकार प्रवेश देणे यापेक्षा प्रवेश नाकारणे याकडे जास्त झुकनारा मला वाटला. त्याच्या या सर्व कार्यवाहीची एक फिल्म तेथे बनवण्यात आली आहे. त्यांचे जुने सामान , जुन्या आठवणी, जुनी नाणी, जुने चलन आणि जुन्या गोष्टी तेथील वस्तू संग्रहालयात त्यांनी जपून ठेवले आहे. येथे एका विभागात किती लोक कुठल्या उपखंडातून आले याची माहिती तसेच त्याचे फोटोही लावलेले आहेत. इतिहासाची आवड असणाऱ्या मंडळींना हे ठिकाण Statue of Liberty इतकेच आवडेल.
न्यूयॉर्क मध्ये नुसती भटकंती करायली तर खूप ठिकाणे आहेत उदा. New york Stock Exchange आणि Stock Exchange Bull. Zero Point (World Trade Centre पडले त्याची जागा),The Metropolitan Museum of Art, Believe it or Not?, Rockefeller Center, Chinatown , Brooklyn Bridge , Big Apple Bus Tour, Fifth Avenue (फक्त खरेदीसाठी), मादाम तुसा Musuem वगैरे वगैरे. पण ....पण वेळ कधी थांवत नाही हेच खरे . मला संध्याकाळी ८ वाजता भारतासाठी विमान असल्याने या साऱ्या गोष्टी उरका पडून पहावी लागल्या आणि खरतर धावत पळतच विमान गाठले.
या छोट्याशा वारीत नाही म्हटला तरी म्हटलं गोष्टी झाल्या. बऱ्याच गोष्टी पहायच्या राहिल्या त्या पुढच्या वारीत. पण 'पहिली अमेरिका भेट' याची मजा काही औरच असते ना.....
लेखन सीमा .......mvkulkarni23@gmail.com