
परवाच एका मस्त नवीन मराठी नाटक पाहायचा योग आला. नाटकाचा नाव होता " नवा गाडी ... नव राज्य". शुभंकरोती ची थोडीशी टीम म्हणजे उमेश कामत, प्रिया बापट आणि हेमंत ढोमे यात असल्याने एकदम उत्साह निर्माण झाला आणि नाटकाचा योग जुळून आला. नवीन लग्न झाल्येल्या नव्या जोडप्याची ही एक कहाणी. या पूर्वी अशी अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आली असल्याने यात काय विशेष असा प्रश्न कोणालाही साहजिकच पडेल. पण यात नावाप्रमाणे बराच काही नवीन आहे एवढं नक्की....
या नाटकाची सुरुवात होते ते ४ महिन्या पूर्वी लग्न झालेल्या ऋषी (उमेश कामत) आणि अमृता (प्रिया बापट) या एका नवीन जोडप्याने. लग्न झाल्या झाल्या काही दिवस इंग्लंड मध्ये राहून आलेले हे जोडपे येथे पण एकदम खुशीत आहे. दोघांमध्ये ८ वर्षाचे अंतर असले तरी तो तिला एकदम फुलासारखे जपत असतो आणि ती पण तिचा नवरा या नात्याने त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते. आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात तिचा एक जुना मित्र हिम्मत राव (हेमंत ढोमे) अवतरतो आणि तिथून या दोघांमध्ये ठिणग्या पडायला सुरुवात होते. हिम्मत राव हा एक शास्त्रज्ञ असून तो फुलपाखरांवर संशोधन करत असतो. उमेश ला आवडत नाही म्हणून प्रिया हेमंत ला घरी येण्यास बंदी घालते. याच काळात उमेश च्या ऑफिस मध्ये त्याची एक जुनी मैत्रीण केतकी (उर्जा देशपांडे) रुजू होते. येथूनच संशय आणि इतर गोष्टी सुरु होतात. या सर्व घडामोडींचा शेवट काय होतो हे नाटकातच पाहिलेले बरे....
या नाटकाचा विषय नावाप्रमाणेच ताजा आहे आणि कलाकार सुद्धा. उमेश ने रंगवलेला नवरा फारच सुंदर. प्रियाने अल्लड मुलीचे केलेले काम फारच सुंदर. सर्वात कमाल केली आहे ती हेमंत ने. हिम्मत राव या गावरान माणसाचे बेअरिंग त्याने इतके मस्त घेतले आहे की बस. त्याने अक्खे नाटक त्यामुळे फारच खुमासदार बनवलेले आहे. उर्जा चा नवखे पणा मात्र सारखा जाणवत राहतो. तिचं शब्दोच्चारण चांगला आहे पण डोळे आणि शरीर फारसा हलत नाही ! तसेच नाटकात विसरा विसरी ही तिने विसरायला हवी. पाठांतर हा तर नाटकाचा प्राणच....
लेखक क्षितीज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी पण एक चांगला प्रयत्न केला आहे. प्रसाद वालावलकर चे नेपथ्य ही लक्षात राहील असं आहे. संपूर्ण घर गच्ची सकट छान सजवलं आहे. सर्वात लक्षात राहते ते ऋषिकेश कामेरकर याचे संगीत आणि त्याचे गाणं. ..." नवा गाडी ...राज्य नवं...."