Followers

Monday, January 13, 2014

सबवे सर्फर

माझ्या आयुष्यात सबवे सर्फर बनलो आहे.
कशाच्या तरी मागे मी सतत धावतो आहे ॥ धृ ॥

इथे खेळाच्या नियमातच धावणे लिहिले आहे
कारण मागे भितीचा पोलिस लागला आहे ॥
वाटेत थांबणे इथे सर्वथा वर्ज आहे ...॥ १ ॥

धावता धावता मिळतात वाटेत नाणी आणि अडथळे...
जेट आणि रॉकेटचे इथे उडतात भुईनळे ॥
प्रत्येक आकर्षणामुळे येथे वेेग वाढतो आहे ...॥ २ ॥

मॅजिक बॉक्स मध्ये आहेत अनेक प्रलोभने
चुंबकाने मिळतात नाणी कमी श्रमाने ॥
हरएक टप्यावर येथे वॆग वाढतो आहे ...॥ ३ ॥

कधी मिळतात खूप सारी नाणी कधी मिळते गिटार
कधी मिळतो हॉवरबोर्ड कधी टेप रेकॉर्डर ॥
एक चूक झाली मात्र तर मृत्यू अटळ आहे ...॥ ४ ॥

किल्ली घेण्यासाठी लढतो आहे पुनर्जन्म मिळण्यासाठी
हॉवरबोर्ड आहे फक्त ३० सेकंद अमरत्वासाठी ॥
याच जन्मातील जगण्याच्या आनंदाला मुकतो आहे ...॥ ५ ॥

ट्रेनवरून उड्या मारून जीव आता थकला आहे
वेग इतका वाढला की मागे पहाणं व्यर्थ आहे ॥
वेगाच्या याच कैफात शुमाकर आज कोमात आहे ...॥ ६ ॥

माझ्या आयुष्यात सबवे सर्फर बनलो आहे
कशाच्या तरी मागे मी सतत धावतो आहे ॥

- मंदार कुलकर्णी
७ जाने. २०१४