Followers

Friday, October 23, 2015

विरेंद्र सेहेवाग

विरेंद्र सेहेवाग

 एकदा मनात विचार आला … सचिन retire झाला तेव्हा काही लिहिले नाही आणि आता का एवढी खुमखूमी आली? पण काही प्रश्नांना उत्तरं नसतात त्यातला हा प्रकार …

विरेंद्र सेहेवाग याने त्याच्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. तो आला क्रिकेट मध्ये ते सचिन ची zerox कॉपी म्हणून. कारकीर्दीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याने कधीही त्याच्या शैली मध्ये बदल केला नाही. अजिबात विचार न करता कुठल्याही प्रकारच्या खेळ पट्टीवर दांडपट्टा फिरवत फलंदाजी करायची आणि तितक्याच सहजपणे आउट होऊन मैदान सोडायचे हा याचा खाक्या. "गाजराची पुंगी वाजली तर वाजली … नाहीतर खाऊन टाकली" अशी त्याची तऱ्हा होती. कित्येक वेळा हा लगेच आउट होणार आणि मग द्रविड, सचिन यांनी पुढचे tension सांभाळत खेळी करत धावफलक पुढे न्यायचा. जी गोष्ट टेस्ट क्रिकेट ची तीच एक दिवसीय सामन्याची. सचिन आणि सेहेवाग मैदानात उतरणार आणि काही वेळातच सेहेवाग आउट होऊन मैदान सोडून पेवेलियनमध्ये. सचिनची भारतीय संघातील dependability वाढवण्यामध्ये सेहेवागचा मोठ्ठा वाटा होता असे मला वाटते. सचिन कडून प्रत्येक मेच मध्ये शतक करण्याची आपल्याला सवय का लागली? कारण सेहेवागने समजूतदारपणे आणि शांतपणे खेळून एक बाजू लावून धरण्याची कधी सवयच झाली नाही !

हा कायम पहिल्या चेंडू पासून मारामारीच्या पवित्य्रात. थोड्याफार धावा काढून पुढचे ३ तास पेवेलियन मध्ये आराम करायला हा मोकळा. २०११ च्या वल्डकपचे उदाहरण घ्या ना. ४ वर्षातून एकदा येणारा हा क्रिकेट चा सर्वात मोठा उत्सव. पण या महाराजांनी गल्ली क्रिकेट खेळतोय अशा थाटात प्रत्येक सामन्यात पहिल्या बॉल ला चौकार मारलेला आहे. समोर गोलंदाज कोणीही असो. पिच कसेही असो. बॉल कसाही येवो, याचा चौकार नक्की.

मी सेहेवागला शतक केलेल्या सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना पाहिलं आहे. "सुरुवातीला मी जरा पिचचा अंदाज घेत खेळत होतो पण नंतर एकदा जम बसल्यावर मला मनमोकळी फलंदाजी करता आली आणि त्यामुळे मी हे शतक करू शकलो". माझ्या मते हा डायलॉग त्याच्या लहानपणी गांगुली किंवा सचिन ने त्याला पाठ करायला सांगितला होता आणि तोच तो प्रत्येक सामन्यानंतर घडाघडा म्हणतो. ज्याची पहिल्या बॉल पासून फक्त बॉल फोडून काढणे हीच मनीषा तो असा विचार करू शकेल का? कसोटी क्रिकेट मध्ये बॉल ला रन ह्याची सुरुवात केली ती सेहेवागनेच. शांत डोक्याने शैलीदार पद्धतीने रन काढणे त्याला कधी मानवलेच नाही. आला बॉल की मार & झोड हेच ब्रीदवाक्य. त्याच्या या स्वभावामुळे क्रिकेटमध्ये ही त्याला कोणी फार गृहीत नाही धरलं. ५ - ५० रन काढून गाडी धावायला लागली म्हणजे झालं हीच त्याच्या कडून आपली अपेक्षा. याच कारणामुळे तो अनेक वेळा संघाबाहेर पडला. गांगुली, सचिन आणि नंतर धोनी यांचे संरक्षण त्याला वाचवू शकले नाही. वाईट वाटते ते या मुळेच….

एक चांगला शैलीदार फलंदाज, भात्यात सर्व प्रकारचे फटके, उत्कृष्ट timing, बेडर वृत्ती या जीवावर त्याने जी फलंदाजी केली त्याला मात्र तोड नाही. त्याचे ऑफ side चे बंदुकीच्या गोळीच्या वेगाने जाणारे चौकार हा म्हणजे केवळ अवर्णनीय आनंद. कणभर ही पदलालित्य न करता केवळ timing आणि फलंदाजी मधील ताकद या जीवावर त्याने १५००० पेक्षा जास्त धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये काढल्या त्याला खरंच तोड नाही. कित्येक वेळा सचिनही त्याची मैदानावरील फलंदाजी पाहून (अम्पायर पाशी उभे राहून) दिन्मुढ झालेला मी स्वत: पाहिले आहे.  कधी त्याची फलंदाजी पाहून श्रीकांतची आठवण व्हायची तर कधी रिचर्डसची. कधी सचिनची तर कधी आरशातल्या गांगुलीची (गांगुली लेफ्टी होता म्हणून).

सेहेवाग ला भारतीय क्रिकेट ने भरपूर काही दिले आणि भारतीय क्रिकेटला सेहेवागने. सेहेवाग, सचिन, गांगुली आणि धोनी यांनी भारत जिंकूही शकतो आणि पुढे वर्ल्ड कप जिंकू शकतो हा आत्मविश्वास दिला. पहिल्या १० ओवर मध्ये २० रन आणि ५० ओवर मध्ये मरत मरत २०० ते २२५ रन हे वर्षानुवर्षाचे गणित बदलण्यात यांचा सिंहाचा वाटा होता. १९७५  साली सुनील गावस्करने वन डे मध्ये १७४ बॉल मध्ये ३६ रन काढल्या होत्या आणि त्याच क्रमांकावर येउन ६० बॉल मध्ये १०० रन काढणारा सेहेवाग. हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. स्फोटक खेळी आणि धावांचा पाऊस असे वर्णन करता येतील अशा अनेक खेळी सेहेवाग ने केल्या. अशक्य वाटणारे सामने भारताला जिंकून देण्यात त्याचे योगदान होतेच. फक्त मनात एकच इच्छा राहते. जरा सुज्ञपणे आणि शांतपणे हा खेळला असता तर अजून एक भारतरत्न सचिन आपल्याला पाहायला मिळाला असता. अनिश्चित खेळी असूनही टेस्ट क्रिकेट मध्ये ५० ची सरासरी देणाऱ्या सेहेवागने निश्चित खेळी करून कदाचित Bradman ना गाठले असते. २०-२० सामन्याची मुळे सेहेवागच्या खेळात सापडतात पण त्याला त्यातही करियर करता आले नाही. पण नियतीची तशी इच्छा नव्हती. आणि मैदानावर निवृत्ती न घेता त्याला अशी निवृत्ती घ्यावी लागली.

भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन ३१९ काढणारा सेहेवाग आपल्या मनात घर करून राहतो ते त्यामुळेच…. नाही का?

- मंदार कुलकर्णी
23 Oct. 15