Followers

Saturday, December 17, 2016

नेवासे



नेवासे

नेवासे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. मुळात हे गाव मुख्य रस्त्यावर म्हणजे high way वर नाहीये त्यामुळे येथे येताना नेवासा फाटा येथून आत वाकडी वाट काढून यावे लागते. नगर आणि औरंगाबाद च्या मध्ये असूनही इतिहास आणि पर्यटन या बाबतीत काहीसे मागे असलेले हे गाव आहे.

प्रवरा नदी हि येथे अमृतवाहिनी समजली जाते. अगस्तीऋषींच्या तपोभूमितून उगम पावलेली प्रवरा नेवासा येथे संत श्री ज्ञानेश्वरांच्या भक्तीसंवादाचा ठेवा सामावून घेत दक्षिण गंगा गोदावरी ला जाऊन मिळते. नेवासे तालुक्यातून या शिवाय गोदावरी आणि मुळा या दोन नद्यासुद्धा वाहतात. या तीन नद्या आणि त्यावरील धणांतील पाणी यांमुळे या तालुका सुपीक बनला आहे. नेवासे तालुक्यात मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना हे दोन साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांच्या अनुषंगाने येथे काही शिक्षणसंस्था निघाल्या आहेत. पाण्यासाठी खर्‍या अर्थाने समृद्ध असलेल्या या गावाला राजकारणामुळे खुंटलेली प्रगती पहावी लागत आहे.

नेवासे आज प्रसिद्ध आहे ते ज्ञानेश्वरांनी येथे ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून. बहुसंख्यांना ज्ञानेश्वर म्हणजे आळंदी इतकेच माहिती असते त्यांच्या ज्ञानात थोडी भर. या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात म्हणजे 1291 साली भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो.
ॐ नमोजी आद्या |
वेद प्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या |
आत्मरुपा |
देवा तूंचि गणेशु |
सकलमति प्रकाशु |
म्हणे निवृत्ति दासु |
अवधारिजो जी |
असे सांगून जगाचा उद्धार करणार्‍या ज्ञानेश्वरांनी ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे या गावात आहे. त्याला पैस असे म्हणले जाते.


नेवासे येथे मोहिनीराजाचे 75 फुट उंच एक खूप जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर हेमाडपंती कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे. या ठिकाणी पुरातत्व खात्याने उत्खनण केले असून येथे दगडी हत्यारे सापडली आहेत. त्यात हातकुर्‍हाडी सापडल्या आहेत. 1773 साली 5 लाख रुपये खर्च करून गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी या मंदिराचा जिणोद्धार केला आहे. शहाजी भोसले यांच्या वडिलांना वेरूळ ची जहागिरी असताना शहाजी भोसले नेवासे येथे च राहत होते अशी इतिहासात नोंद आहे. त्यांनी मोहिनिराजाच्या मंदिराला अनेक देणग्या दिल्याचे उल्लेख आढळतात. त्यानंतर पेशव्यांनी वार्षिक रु 1500 देणगी देवू केली होती जी इ स 1860 पर्यन्त चालू होती.

नेवासा येथे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या मदतीने ज्ञानेश्वर पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरीचे कथन करीत असलेले एक मोठे शिल्प नुकतेच नेवासे येथे मंदिराच्या मागे बसवण्यात आले आहे. त्या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम सध्या चालू आहे. मला आशा आहे, त्या निमित्ताने का होईना हे गाव आणि हा सर्व परिसर भारताच्या नकाशावर येईल आणि आपल्या पुढील पिढ्यांना ज्ञानेश्वर महाराजांची आठवण करून देत राहील.



-     - मंदार कुलकर्णी

शनि शिंगणापुर

मी या दिवाळी सुट्टी मधे काही गावे पाहिली. "मी पाहिलेली काही गावे" ही सिरिज लिहीत आहे, त्याची आज सुरुवात करीत आहे.... 


शनि शिंगणापुर

शनि शिंगणापुर हे ठिकाण नगर जिल्यात नेवासा तालुक्यात सोनाई येथे असून ‘शनिदेवाचे स्थान’ म्हणून प्रसिद्ध आहे. नगर जिल्हा तसाही खूप शांत, शेतीसाठी समृद्ध. हे ठिकाण ही त्याला अपवाद नाही. मी येथे सर्व प्रथम गेलो होतो १९८९ साली. शनि देवाचे एक छोटेसे देवस्थान इतपतच माहिती होती. तेथे एक ५ फुट उंचीचा काळा उभा दगड आहे. हाच स्वयंभू शनिदेव. पूर्वी अशी कथा सांगतात, की हा दगड एका मेंढपाळाला जमिनीत दिसला. त्याच्या काठीने त्याने टोचून पाहिला तर त्यातून रक्त येवू लागले. रात्री शनि देवाने त्याच्या स्वप्नात येवून सांगितले आणि त्याची दर शनिवारी तेल वाहून पुजा करण्यास सांगितले. गावकर्यां्नी येथे मोठे मंदिर बांधायचे ठरवले पण शनि देवांनी तसे न करता फक्त पुजा करण्यास सांगितले. त्यामुळे आजही येथे मोठे मंदिर वा छत नाही. आकाश हेच छत आणि तेल हीच पुजा. शनि देवाचा दगड / शिळा ही स्वयंभू असून त्याला बाकी काही संरक्षण नाही. तेव्हा त्या चौथर्यान पर्यन्त आरामात जाता यायचे. शनि देवाच्या शिळेला कोणी स्पर्श करू शकत नाही. हे देवस्थान भारताला माहिती पडले ते “सूर्य पुत्र शनिदेव” या गुलशन कुमार यांच्या चित्रपटामुळे. तेव्हापासून येथे भक्तांचा ओघ सुरू झाला आहे.  

या ठिकाणाचे अजून एक महत्वाची विशेषता की शनि देवाच्या कृपेने येथे चोर्याण मार्याी होत नाहीत अशी श्रद्धा आहे. येथील घरांना बंद दारे नाहीत, बंद खिडक्या नाहीत. फक्त चौकटी आहेत. येथील रहिवासी त्यांच्या वस्तू बिनधास्त घरात सोडून जातात. जगातील हे असे एकमेव गाव असेल. येथील सरकारी रेशनचे दुकान काय बँक सुद्धा तशाच. मागील काही काळात छोटे मोठे चोर्यां चे प्रकार घडले पण ते फारच किरकोळ.
२०१६ साली खर्यां अर्थाने जगासमोर हे गाव आले. २६ जानेवारीला तृप्ति देसाई यांनी महिलांना येथे प्रवेश हवा म्हणून मोठे आंदोलन केले आणि तेव्हा पासून येथील गर्दी अजूनच वाढली.

आता या गावाचे पुर्णपणे व्यावसायिक अशा देवस्थानात रूपांतर झाले आहे. प्रचंड गर्दी आवरण्यासाठी लांबच लांब रांगा लावायची सोय, प्रसादाची सोय, शनि देवाला वाहण्यासाठी तेल मिळायची सोय आणि तेही मोटरने मोठ्या पिपातून पंप करून शनि देवावर वाहिले जाईल अशी सोय. नेहेमी प्रमाणे ‘इथे फोटो काढू नका; असे फलक आहेतच. 

हळूहळू हे देवस्थान गर्दीचे नवे उच्चांक मोडेल अशी स्थिती आहे पण या सगळ्यात हे स्थान पूर्वीची शांतता, प्रसन्नता गमावून बसते आहे की काय असे वाटते आहे. 

- मंदार कुलकर्णी