निसर्गाचं चक्रनेमिक्रमण
या वर्षी पुण्यात पाऊस तसा वेळेत सुरू झाला. बऱ्यापैकी नियमितपणे पडत राहिला आणि ऑगस्ट संपेपर्यंत पावसाने सरासरी सुद्धा गाठली. हिंदू महिन्याप्रमाणे जेष्ठ, आषाढ आणि श्रावण महिने संपले आणि आज भाद्रपद महिना सुरू झाला. खरं तर भाद्रपद म्हणजे गौरी गणपती यांचा महिना. पुढचा पंधरवडा पितरांसाठी गेल्यानंतर सुरू होते नवरात्र. त्याच्या पाठोपाठ दसरा आणि मग दिवाळी. म्हणजे सणाची एक अखंड मालाच.
पण आज निसर्गाचा मूड काहीसा वेगळाच आहे. कालपासून एकदम कडक ऊन पडायला लागलंय, जणूकाही नवरात्रालाच सुरुवात झाली आहे. श्रावण आणि भद्रपदातला ओलेपणा आणि पाऊस जणूकाही पूर्ण संपूनच गेला आहे. हवेतील आर्द्रता ही संपून गेल्यासारखं वाटतंय. कास च्या पठारावर च नव्हे तर अख्या सह्याद्री मध्ये फुलं उगवून मालवायला सुरुवात झाली आहे. दुपारी सूर्य आग ओकू लागलाय तर रात्री गार वाऱ्यानी थंडगार करून टाकल्या आहेत. क्षणभर वाटतंय की आपण ऑक्टोबर संपवून हिवाळ्यात प्रवेश करत आहोत.
काय कारण असेल या अशा बदलाचे? आजकाल सगळेच जण ग्लोबल वोर्मिंग किंवा प्रदूषण यांना जबाबदार धरतात. पण त्यात आता तथ्य वाटायला लागले आहे. हवामानातील अतर्क्य बदल, उन्हाळ्यात अशक्य प्रमाणात वाढणारे तापमान, अंगाची लाही लाही करणारा उकाडा हे दिवसेंदिवस अधिकाधिक कडक आणि जास्त प्रमाणात होत आहे असे दिसते आहे. पाण्याच्या हव्यासापोटी होत असलेला प्रचंड उपसा, वाढत्या लोकसंख्येला पुरी पाडण्यासाठी कुठेही बांधलेली घरे, निसर्गाचा सूर आणि नूर ओळखता होत चाललेली बेसुमार जंगल तोड या गोष्टी माहिती असूनही आपण त्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करतो.
निसर्गाचे हे चक्रनेमीक्रमण थांबणार नाही पण त्याला थोडासा धक्का बसलाय हे मात्र नक्की.
- @ मंदार कुलकर्णी
१० सप्टेंबर २०१८
|
Followers
Tuesday, September 11, 2018
निसर्गाचं चक्रनेमिक्रमण
Subscribe to:
Comments (Atom)