Followers

Monday, June 1, 2020

आज १ जून

आजच्या नवीन पिढीला कदाचित ज्ञात नसेल पण २० व्या शतकातील बऱ्याच लोकांची जन्म तारीख १ जून असायची. याचे सर्व यश हे त्यांच्या पालकांच्या प्रयत्नांना नसून शाळेतील शिक्षक, कारकून यांना असायचे. त्याकाळी बहुतेक मुलांची नक्की जन्म तारीख आई वडिलांना माहीत नसायची किंवा इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सांगता यायची नाही. त्यामुळे शाळेत बालवाडी किंवा पहिलीत प्रवेश घेतांना शाळेच्या रेकॉर्डवर नक्की काय तारीख लिहायची हा प्रश्न असायचा. शैक्षणिक वर्ष दर वर्षी जून मध्ये चालू जात असल्याने शिक्षक, कारकून किंवा शाळेचे मुख्याध्यापक अशा मुलांची जन्म तारीख १ जून अशी नोंदणी करायचे. १ जून ला ५ वर्षे पूर्ण असली की पहिली प्रवेश असा हिशोब करून मुलांचे शिक्षण चालू व्हायचे. अशा रीतीने शाळेतील बऱ्याच मुलांची कागदोपत्री जन्म तारीख १ जून असायची आणि त्यामुळे त्याची सेवा निवृत्ती ही बरोब्बर ३१ मे ला व्हायची !!! या व्यतिरिक्त ज्या मुलांची जन्म तारीख जून ते डिसेंम्बर या महिन्यात असायची, त्यांनाही शाळेत प्रवेश घेताना ५ वर्षे पूर्ण नसायची, कारण काही मुले साडे चार तर काही पावणे पाच वर्षांचे असायची. अशा मुलाचे शैक्षणिक वर्ष काही महिन्यासाठी वाया जाऊ नये, असे पालक सुद्धा त्या मुलाची किंवा मुलीची कागदोपत्री जन्म तारीख १ जून ठेवायचे. तात्पर्य: भारतात कागदोपत्री १ जून जन्मतारीख असणारे आणि ३१ मे ला सेवा निवृत्त झालेले भरपूर लोक आजही जिवंत आहेत आणि आपल्याला सापडतील. त्यांची खरी जन्म तारीख नक्कीच वेगळी असेल पण वरील कारणामुळे त्या सर्वांचा कागदोपत्री किंवा सरकारी वाढदिवस हा आज म्हणजे १ जून ला असतो. अशा सर्व मंडळींना आपण सरकारी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ या !!!