मित्राशी चर्चा करीत असताना पूर्वीची एक घटना आठवली. ती त्याला थोडक्यात सांगितली पण त्याचा विश्वासच बसेना, म्हणाला ही घटना कशी घडली आणि काय झाले हे लिहायचा प्रयत्न कर. खूप जणांना छान वाटेल. म्हणून हा थोडासा प्रयत्न.
काही वर्षांपैकी आमच्या फॅमिली मित्रांनी अहमदनगरहून मोरगाव आणि वाटेत काही प्रेक्षणीय आणि धार्मिक ठिकाणी असे पहायचे ठरवले होते. प्लॅन मध्ये असे होते, रांजणगाव गणपती करून शिरूर सातारा रस्ता पकडून मोरगाव गणपती - मयुरेश्वर गाठायचा आणि तिथे मुक्काम करायचा. पुढची अजून मंदिरे दुसऱ्या दिवशी पाहून परत नगर कडे येणे. स्पेशल बस बुक केली आणि ठरल्याप्रमाणे ऑफिस, शाळा झाल्यावर संध्याकाळी नगरहून निघालो. रात्री शिरूडच्या पुढे रस्ता जाम झाला. चालकाने खाली जाऊन चौकशी केली तर माहिती मिळाली की पुढे भीमा नदी आहे आणि प्रचंड पावसाने दुथडी भरून आणि जास्त वेगाने तर जात आहे. तिच्यावर असलेल्या पारगाव पूल या वरूनच नदीचे पाणी जाते आहे. मोरगावला जायला हाच पूल आणि हाच रस्ता असल्याने रस्ता जाम.
आम्ही खाली उतरून आजूबाजूच्या लोकांनाकाही चौकशी करायचा प्रयत्न केला. त्यांना म्हटले, आम्हाला पलीकडे जायचे, काही वेगळा मार्ग आहे का? त्यांनी आम्हाला हसायला सुरुवात केली. आज सकाळ पासून भीमा नदी रौद्ररूप आम्ही पाहिले आहे. सकाळी पुलावर १० फूट पाणी वाहत होते आणि काही वाहनेही पाण्याच्या जोराने वाहून गेली पण आता जरा जोर थोडा कमी झाला आहे. पण वाहने जाऊ शकतील का हे सांगू शकत नाही. हलकी वाहने या पाण्यात काही क्षणात वाहून जातील.
एकतर भूक लागलेली, त्यात रस्ता बंद आणि पुढचा मार्ग कधी आणि कुठून निघेल हेच कळत नव्हते. आम्ही मित्रांनी थोडी चर्चा केली पण मार्ग काही निघत नव्हता. एकजण म्हणाला, आपण आहे तिचेच थांबू बसमध्ये आणि पाणी कमी व्हायची वाट पाहू. दुसऱ्याने सल्ला दिला, बसमध्ये नुसते बसून राहण्यापेक्षा जरा देवाचे नाव घेऊ, गणपतीचे स्तोत्र , राम रक्षा, मारुती स्तोत्र अशी स्तोत्र आपल्या सर्वांना येते, आपण सगळे मोठ्या आवाजात म्हणू. देवाला आपली हाक ऐकू आली तर पाहू या. सर्वजण बसमध्ये अंधार असूनही छान मांडी घालून, ताठ बसून स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. ४-५ स्तोत्र म्हणेपर्यंत अर्धा तास गेला. इतक्यात काही बाहेत काही हालचाल होतीय असे वाटू लागले. बाहेर २-३ बसवले आपण पाण्यात घालूया का अशी चर्चा करित होते. पण चालक मंडळींचा याला पूर्ण विरोध होता. बस वाहून गेली आणि आणि आमचा जीव गेला तर कोण जबाबदारी घेणार? असा त्यांचा स्पष्ट त्यांनी विचारला. बसमधील प्रवासी विरुद्ध चालक अशीच चर्चा अनेक बसमध्ये, नवीन प्रश्न आणि या संदर्भातील प्रश्न आणि त्यांची वाद मय चर्चा चालू होती. रस्ता कसा आहे, पाणी किती उंच आहे, पुलावर रस्त्याची काय परिस्थिती आहे, काही अंदाज नसल्याने कोणतेच चालक अजिबात तयार होत नव्हते. त्यामुळे इथे एकमत काही होईना.
इतक्यात एक अनोळखी माणूस आमच्या इथे आला. म्हणाला मी तुमच्या मोकळे करतो. बसच्या पुढे पाण्यातून चालतो. माझी उंची ६ फूट आहे, त्यामुळे माझा पाण्यातील आणि पाण्याबाहेर भाग पाहून तुम्हाला पाणी नक्की आहे हे कळेल. बसच्या लाईट मध्ये मी तुम्हाला कायम दिसेल. माझ्या मागे बरोबर पूल पार करा. मी इथलास आहे, त्यामुळे मला इथल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. काळजी करू नका.
बसचे चालक आपल्या प्रवाशांची चर्चा करायला गेले पण त्यांचे एकमत होईना. या बाबतीत एकमत करायला आम्ही पहिला क्रमांक लावला. आणि आम्ही त्या माणसाला विनंती केली. पुढच्या सेकंदाला बस चालू आणि तो माणूस आमच्या पुढे जवळ जवळ ३ फुटात आणि जोरात वाहत्या पाण्यात बसच्या लाईट मध्ये पुढे जाऊ लागला. बसमधले सगळे जण देवाचे नाव घेऊन आणि चालक एक एक फूट बस त्याच्या वर विश्वास ठेवून पुढे जात आहेत. मी हे सर्व पाहायला बसच्या आत यायच्या ज्या पायऱ्या असतात तिथे उभा राहून चालकाला डावी बाजूही सांगत होतो.
काही वेळाने त्या पायरीवर असताना नदीचे पाणी माझ्या पायाला थोडेसे ढकलत होते. पुलाच्या सुरुवातीला रस्ता थोडा खाली असल्याने असे पाणी मला लागणे अपेक्षितच होते. मी काही ही माहिती चालगाला सांगितली नाही आणि चाल पुढे असे सांगत राहिला. आमच्या बसचा पुढचा माणूस ही हाताने मार्ग दर्शन आम्हाला करत होता.
साधारण २०-२५ मिनिटात आम्ही हे मिशन पूर्ण करत आणले आणि पुलाच्या पलीकडेही बस आणि आमच्या सकट सुखरूप पोहोचलो!! आमच्या बसमधले सगळे लोक प्रचंड खुश... शिट्या आणि आवाज करायला सुरुवात केली. सगळे प्रचंड आनंदमय. आमच्या बसच्या मागे आता बाकीच्या बस यायला लागल्या.
या आनंदात आमच्या बसच्या पुढे पाण्यात असलेला माणूस आता अचानक दिसेना. आम्ही एवढे पण ठरवले की त्याला या कामासाठी छोटी का होईना मदत किंवा बक्षीस देऊ. पण हा माणूस आता दिसेना. आम्ही ५-६ लोकांनी बस मधून उतरून चारी बाजूस पाहिले. त्याला शोधायचा खूप प्रयत्न सोडला पण नाहींच दिसला. शेवटी बस निघाली मोरगाव कडे आणि काही वेळातच मंदिरापाशी पोहोचलो.
त्या रात्री मी विचार केला की असा कोण माणूस स्वतः ३-४ फूट पाण्यात इतक्या रिस्क मध्ये, रिस्क म्हणजे अशा जोरदार नदीच्या पाण्यात वाहून जायची शक्यता, साप आणि त्याच्या सारखे प्राणी येऊन डसू शकतात. पण रात्री अपरात्री अनोळखी बस मधल्या लोकांसाठी असे करणे आणि कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता काम झाल्यावर आणि अदृश्य होणारी व्यक्ती म्हणजे देवच असणार. मला सांगा, देवाव्यतिरिक्त अशी मदत कोण करणार?
या घटनेमुळे आमची सहल वेळेप्रमाणे पुढे झाली आणि आयुष्यभर लक्षात राहिली. आम्ही खरंच नशीबवान, ज्या देवाच्या दर्शनासाठी आम्ही ही सहल केली, त्याच देवाने मला आणि आम्हा सर्वांना नदीत दर्शन दिले आणि आम्हाला कुठलेही अपघात न करता सुरक्षित आणि वेळेत पुढच्या रस्त्याला लावले.
गणपती बाप्पा मोरया... !!! 

- ©मंदार कुलकर्णी
संकष्ट चतुर्थी, शके १९४२