Followers

Monday, August 31, 2009

वारी विदेशाची - भाग १

श्री

नमस्कार मंडळी .....
माझे परदेश गमन ठरवण्याची चर्चा इतक्या लोकांकडून इतक्या वेगवेगळ्या स्तरावर गेल्या वर्षी पासून चालू होती कि मला त्याचा अगदी वीट आला होता. "मंदार ला ह्या कामासाठी परदेशात पाठवायचे" हे नक्की झाले होते पण कधी ? ह्याचे उत्तर कमिन्स मधील कोणीच देत नव्हते. वर्षभर नुसती चर्चा... अगदी इंग्लंड चा व्हीसा पण गेल्या जुलै मध्ये आला पण कुठे माशी शिंकली पण इंग्लंड ला गाडी इंचभरही सरकली नाही.
ह्या वेळेला "अमेरिका" ह्या देशी जाण्याची चर्चा परत जोर धरू लागली तेम्हा मी शहाणपणाने ह्यात भाग घेतलाच नाही. व्हीसा आणि विमानाचं तिकीट दाखवा मग पुढचं बोलू असे मी मित्रांमध्ये सांगायला सुरुवात केली. पण हळू हळू 'माझ्या' नावाची चर्चा चालू आहे आणि ती सुद्धा खरी खरी तेव्हा मला जरा अंधुकशी आशा वाटायला लागली. काही दिवसांनी "व्हीसा काढून या" असा जेव्हा आदेश आला तेव्हा मात्र मी या विषयी थोडा थोडा विचार करायला सुरुवात केली. पण व्हीसा मिळेलच कशावरून अशी एक शंका मनात होतीच. अमेरिकेचा व्हीसा पुण्यात काढून मिळत नाही. साहजिकच मुंबईची एक वारी अपेक्षित होती. व्हीसा साठी लागणाऱ्या कागद पत्रांची जुळवा जुळव सुरु झाली आणि गेल्या वर्षीचे आयटी रिटर्न माझ्याकडे सापडेना. धावपळ सुरु. माझ्या सिए ला विचारले. ते म्हणाले की त्यांच्याकडे ते सुरक्षित आहेत. त्यांच्याकडे आणायला गेलो तर ती कागद पत्रे चुकून मुंबईला गेली असा साक्षाकार झाला! मला पुढचे अडचणीचे डोंगर दिसायला सुरुवात झाली होती. शेवटी तातडीने कुरियरने त्याच रात्री ती कागद पत्रे मुंबईहून मागवून घेऊन दुसऱ्या दिवशी सगळी कागद पत्रे ऑफिस मध्ये धावत पळत नेऊन दिली. मुंबईतील व्हीसा चे काम त्या मानानी खूपच सुरळीत आणि वेळेत झाल. एकतर सकाळी ७.४५ ची वेळ देण्यात आली होती म्हणून आम्ही (आता या पुढे आम्ही म्हणजे मी आणि मोरेश्वर दिक्षित बर का..) आदल्या दिवशी मुंबई ला मुक्कामाला गेलो होतो. मला इंग्लंड ला लागणारा व्हीसा काढायची माहीती झाली होती पण "अमेरिका" व्हीसा हा एक अजबच प्रकार होता.
"अमेरिका" Embassy च्या मुंबई च्या ऑफिस मधून दररोज अंदाजे ३००० लोकांची व्हीसा साठी मुलाखत होते. दर १५ मिनिटांनी काही शे लोक आत घेण्यात येतात. व्हीसा ला अप्लाय केलेल्या लोकांना नेट वर तारीख आणि वेळ देण्यात येते. त्या वेळेच्या १५ मिनिटे आधी व्हीसा ऑफिस च्या दारात उभे राहणे अपेक्षित आहे. आधीपण नाही आणि नंतर पण नाही. ऑफिस च्या आत गेल्यावर त्यांच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे तपासणी, हाताच्या बोटांचे ठसे, मुलाखत हे सारे सोपस्कार झाले. मला फार अडचणीत टाकणारे प्रश्न काही त्यांनी मला विचारले नाहीत. त्यतून लहान पणापासून क्रमिक पुस्तकापेक्षा "२१ अपेक्षित" वर माझा भक्कम विश्वास असल्याने आणि अगदी शाळेपासून पाठांतर यावर श्रद्धा असल्याने माझे काम तसे सोपे होते. काय सांगायचे आणि त्याहून महत्वाचे काय सांगायचे नाही हे सारे पढवून ठेवलेले असल्याने मी तिथे अगदी पोपटा सारखी उत्तरे दिली. "अमेरिका" च्या त्या व्हीसा देणाऱ्या ऑफिसरला मी फार गरजू आहे आणि मला व्हीसा दिल्याने त्याचे आणि अमेरिकेचे फार काही बिघडणार नाही याची खात्री पडली आणि माझ्यावर खुश होऊन मला १० वर्षांचा व्हीसा मला बहाल केला. व्हीसा आणि पास पोर्ट घेऊनच पुण्याला परत यायचे असा मला आदेश असल्याने आम्हाला दिवसभर वेळ मुंबईत मिळाला. त्यात सुद्धा एक गम्मत झाली. मला काही पैसे हवे होते म्हणून मी जवळच्या एका ए टी एम मध्ये गेलो. पास वर्ड टाकून पैसे देण्याची आज्ञा केली आणि तेथील मशीन ने संप पुकारला. पैसे आत आणि माझे ए टी एम कार्ड ही आतच. मग पुढचे सगळे सोपस्कार, गुन्हा दाखल करा. वगैरे वगैरे. शिवाय कार्ड मिळायला ४ दिवस लागतील हे आश्वासन!
दिवसभर वेळ काढून सायंकाळी ५ वाजता परत आम्ही व्हीसा ऑफिस पाशी हजर. मागे सांगितल्या प्रमाणे व्हीसा आणि पासपोर्ट घेऊन आम्ही विजयी वीर पुण्याला रात्री परत. व्हीसा मिळाला असला तरी चेअरमन ची परवानगी मिळालेली नव्हती. त्यामुळे मनात धागधुग होतीच. त्यातून आम्ही ३ लोकांची मागणी केली होती पण २ लोकांचीच परवानगी दिल्यामुळे कोण २ जण जाणार हे गुलदस्त्यात!
मनाचा धीर करून तयारीला सुरुवात केली. यादी बनवून काही आवश्यक गोष्टींची खरेदी करणे, ऑफिस मधून डॉलर मिळवणे, इतर परवानग्या, तिकीट बुक करणे, तिकडचे हॉटेल बुक करणे आदी असंख्य गोष्टी शेवटच्या दिवसापर्यंत चालू होत्या आणि निघायच्या एक दिवस आधी सर्व परवानग्या आणि विमानाची तिकिटे हातात पडली. मी तेथील काम झाल्यावर पुण्यात २ दिवस रजा टाकून अमेरिकेत राहणार होतो त्याची परवानगी. कार बुकिंग. घरी एका बाजूला सामान ठरवणे आणि भरणे हा एक कमालीचा अवघड प्रकार सुरूच होता. अमेरिकेमध्ये आता उन्हाळा असूनही आमच्या सौ नी "मी उत्तर ध्रुवावर जाणार असून तेथे माझे जेवणाचे फारच हाल होणार आहेत किंव्वा मला तिथे काही मिळणार नाही" असे गृहीत (?) धरून त्या अंदाजाने मला सामान दिले होते. चर्चा करून ते कमी करणे कारण एका बैगेत २३ किलो च्या वर एक गुंज भर ही सामान नेऊ देणार नाही असा दम विमान कंपनीने दिल्याने परिस्थिती जरा नाजूकच होती. मी जेथे जाणार आहे तिथे उन्हाळा असून आपल्यासारखेच तापमान तेथे असते हे Net वर दाखवून ही त्यावर फारसा विश्वास तिचा बसला नाही. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जरा जास्तच सामान झाले. तेथे मायक्रोवेव्ह मध्ये करून खाता येण्यासारखे अनेक पदार्थ, तिथल्या लोकांना देण्यासाठी अति-आवश्यक जगप्रसिद्ध "चितळेंची बाकरवडी", लाडू, चिवडा आणि अनेक पदार्थ.... आणि त्याशिवाय अनेक लोकांच्या शुभेच्छा यांचे सगळ्यांचे ओझे घेऊन आम्ही शनिवारी दुपारी पुणे सोडले. मुंबईहून रात्री ११.३० ला विमान असल्याने साधारण ८.३० पर्यंत विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. शिवाय पावसाळी दिवस.
शनिवार रात्री चे विमान आणि मी Net वरून चेक इन केले होते पण म्हणतात ना, भित्यापाठी ब्रह्मराक्षस. मनात धाकधूक होतीच. कस होईल काय होईल..... त्याचा साक्षात्कार विमानतळावर लगेच झाला. एका बैगेचे वजन ४ किलो जास्त भरले. चेक इन वाले म्हणाले, ४ किलो कमी करा नाहीतर ५० डॉलर दंड ! निमूट पणाने मी परत माझे सगळे सामान घेऊन बाहेर. विमानतळावर मांडी ठोकून बसलो. सगळ्या ब्यागा उघडून हे सामान त्याच्यात, ते इकडे असा गणित करून पुन्हा परीक्षेला हजर. आता मात्र पास झालो कारण २ किलोचे जर्किन अंगावर घेतले होते आणि ३ किलोचे इलेक्रोनिक सामान वरच्या बॅग मध्ये घेतल्या मुळे "पप्पू पास हो गया".... पण ही नुसती सुरुवात होती. इलेक्रोनिक सामान वरच्या बॅग मध्ये घेतल्यामुळे पुढे मिनियापोलीस ला पोहोचे पर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यातले पेन्सिल सेल मला ते काढून, उघडून दाखवावे लागले ! असो.
विमान फुल असल्याने सामानाचा हा प्रश्न येणारच होता. चेक इन करून विमानात बसायची वेळ आली तर मोठ्ठे Surprise. आम्हाला बिझिनेस क्लास ला upgrade करण्यात आले होते. आणि ते ही Window Seat !!!. Lottery च लागली होती. आम्ही दोघे तर विमान सुरु होण्याच्या अगोदरच हवेत गेलो होतो. आयुष्यातला पहीला US चा प्रवास आणि तो ही बिझिनेस क्लास ने. अजून काय पाहिजे? विमान फुल असल्याने त्यांना असे करावे लागले. त्यातून चतुराईने आम्ही Frequent Flyer चे Registration केलेले असल्याने आम्हालाचं Upgrade. पुढच्या ट्रीप चा का शुभ शकुनच म्हणायचा !!! Business Class ची काय मजा असते ती अनुभवल्याशिवाय कळणार नाही. भरपूर Leg Space, १८० Degree Seat Resting, Separate VDO Screen, चांगले हेडफोन आणि बराच काही. ती काही मजाच और आहे. आता तसा पहीले तर विमान प्रवास ही काही चंद्रावर जाण्यासारखी काही फार अवघड किंवा अशक्य गोष्ट राहीलेली नाही तरीपण काहींना यामध्येही नाविन्य अनुभवण्याची आवड असते. माझेही असेच झाले. एकतर मुंबई नेवार्क Direct Flight त्यामुळे प्रवास कसा होतो, किती अवघडायला होता, किती कंटाळवाणा होतो हे काहीच माहीती नव्हते. जगातील सगळ्यात मोठी विमाने बनवणाऱ्या कंपनीचे बोईंग ७७७ हे विमान मला अमेरिकेला घेऊन जाणार होते. २२६ Economy Class, ४८ Business Class , शिवाय ११ विमान कंपनीचे कर्मचारी आणि २ पायलट असे साधारण २८७ लोकांना हे विमान एकत्र उडत घेऊन जाणार होते आणि ते ही ६२५ मैल प्रती तास या भन्नाट वेगाने. विमानाचा प्रवास बहुतेक वेळेला जमिनीपासून ३४००० फुट एवढ्या उंचीवरून झाला. तेव्हा बाहेरील तापमान -५४ अंश फ इतके होते. ही सगळी आकडेवारी अटक्या असली तरी खरी आहे कारण ही सगळी माहिती समोरच्या Screen वर सारखी दिसत असते. Ground Speed, Attitude, Distance Travelled, Distance to Destination, Outside Air Temperature, Time to Destination, Local time of Origin, Local Time of Destiination, Estimated time of अर्रीअल आणि जगाचा नकाशा अशी सारी माहीती सारखी त्यावर दिसत असते. त्यशिवाय असंख्य मुवीज, गाणी, Short Film, TV Serials असे अनेक पर्याय असतातातच. कसा वेळ घालवायचा हे आपण ठरवायचं. ह्या विमानाचा मार्ग फार मजेशीर होता. विमान मार्ग म्हटला कि तो कायम एकदम सरळ अशी माझी आपली लहानपणी कल्पना होती. पण तसा काही नसतं. ह्या विमानाने तर मुंबई हून सुरुवात केल्यावर पाकिस्तान - अफगाणिस्थान – रशिया – मोस्को – नॉर्वे स्वीडन च्या वरून - इंग्लंडच्या खूप वरून – ग्रीनलंड च्या अगदी जवळून मग अमेरिकेमध्ये प्रवेश केला. शाळेत कधीतरी "मध्यरात्रीचा सूर्य" असे शिकलेले प्रकरण डोळ्यासमोर आले. माझा सगळा प्रवास रात्री असल्याने उगीचच पटकन "मध्यरात्रीचा सूर्य" दिसेल की काय असे वाटत होते. नाहीतरी आपण उत्तर ध्रुवावर किंवा दक्षिण ध्रुवावर जाण्याचा आणि "मध्यरात्रीचा सूर्य" पाहायचा योग कधी येणार म्हणा... (भूगोल काही माझा शाळेत नावडता विषय नव्हता हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेल....)
अगदी वेळेवर विमान निघाले. किंबहुना माझ्या संपूर्ण ३ आठवड्याच्या प्रवासात 'मला उशीर झाला' किंवा 'वाहन उशिरा निघाले' असा सहसा झालाच नाही. रात्रीचा प्रवास आणि मी पश्चिमेकडे जात असल्याने सूर्याला विरुद्ध बाजूला ठेऊनच माझा प्रवास होणार होता. सुरुवातीचे ६-७ तास प्रयत्न पूर्वक जागा राहीलो आणि मग मस्त झोप काढली. पहाटे ५ वाजता नुवर्क (Newark) Local Time ला पोहोचलो. हा अमेरिका भूमीवर झालेला माझा पहीला स्पर्श. ३ तास Break घेऊन नुवर्क (Newark) ते मिनियापोलीस (Minneapolis) ला एका छोट्या विमानाने सकाळी ११.३० ला पोहोचलो. ठरवल्या प्रमाणे आमचा मित्र रघु आम्हाला नेण्यासाठी आला होता. जवळ जवळ २६ तासाचा प्रवास आणि घड्याळ बदल त्यामुळे शरीर काहीतरी वेगळच बोलत होतं. मिनियापोलीस - सेंट पॉल विमानतळावरून आमची वरात घेऊन तो आम्हाला एका मस्त भारतीय Restaurant मध्ये घेऊन गेला. तेथे झकास पैकी जेवण करून आता हॉटेल वर जाऊन आराम करू असा आम्ही विचार करत होतो. रघु म्हणाला, तुमच्याकडे एकच Week end आहे तर आज Mall of America का पाहत नाही आणि ते विमानतळापासून अगदी जवळ आहे. क्षणात आम्ही निर्णय बदलला. आणि त्याला 'हो' म्हटले. पुढचे ५ तास Mall of America......
Mall of America हा अमेरिकेतील सगळ्यात मोठ्ठा माल असून अमेरिकन लोकांना त्याचा अपार अभिमान आहे. किंबहुना 'अमेरिके'बाहेर ही काही जग आहे आणि तेथेही काही छान, मोठ्ठे असू शकते हे त्यांना मान्यच नसते. असो. ४२ लाख चौरस फुट जागेवर २५ लाख चौरस फुट बांधकाम असलेला हा Mall साधारण आयताकृती आकाराचा आहे. ३ मजले आणि एका बाजूला ४ मजले बांधकाम असलेल्या या Mall मध्ये ५२० दुकाने आहेत. गमतीचा भाग असा की मिनीसोटा (Minisota) प्रांतामध्ये हिवाळ्यात नेहमीच शून्यापेक्षा खाली तापमान जात असूनही हा Mall Air Conditioned नाही. फक्त प्रवेश द्वार सोडल्यास बाकी सगळीकडे नैसर्गिक हवा संचारत असते. दिवे, इतर विजेची उपकरणे, येणारी माणसे आणि इथे काम करणारी मंडळी येथील हवामान योग्य पातळीत ठेवतात असा त्यांचा दावा आहे ! दर वर्षी ४ कोटी लोक या Mall ला भेट द्यायला येतात.
Ghermezian फमिली च्या Triple Five Group च्या मालकीचा हा असून १९९२ साली हा सर्वांसाठी खुला करण्यात आला. 7 मजली पार्किंग च्या जागेमध्ये साधारणपणे २०००० वाहने बसायची सोय केलेली आहे ! Phase II expansion मध्ये अजून ८००० पार्किंग वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. पण Phase II expansion चा खर्च २ अब्ज डॉलर असल्याने त्यांनी सध्या त्याचे काम सुरु केलेले नाही. पैशाची कमतरता आणि Recession याचा अमेरिकेवर फार परिणाम झाला आहे. आता प्रांतातील कर वाढवून पैसा गोळा करायचे प्रयत्न चालू आहेत.
Mall of America मध्ये Nickelodeon Universe indoor theme park हे Mall च्या मधे असलेले ठिकाण मस्त आहे. मुलांना आणि मोठ्यांनाही मजा करता येईल. तसेच Underwater Adventures Aquarium ची ही मजा घेता येते. भारतात Mall हा प्रकार येऊन ५-६ वर्ष झाली पण जगातील Malls ची मुहूर्तमेढ याने रोवली असे म्हणायला हरकत नसावी. टाचणी पासून टी वी पर्यंत आणि देशोदेशीच्या झेन्ड्यापासून कपड्यापर्यंत एका ठिकाणी सर्व काही मिळायची सोय येथे आहे. फार दमला तर बसायची आणि क्षुधा-शांती गृहाची पण सोय आहेच. मुलांना आवडणारे Nickelodeon Universe indoor theme park असल्याने पालक नेहमीच इकडे येतात. आज जगात सगळी कडेच Mall झाले असल्याने याचे फार काही कौतुक नाही पण "अमेरिकेतील सर्वात मोठ्ठा" हे विशेषण असलेले ठिकाण पहायची मजा काही औरच आहे. Mall of America मध्ये नुसते भटकणे हा सुद्धा एक अनुभव होता. वेगवेगळे Brands पाहणे, माहीती करून घेणे, निरनिराळे गिफ्ट शोप्स पाहणे हे सुद्धा भरपूर पाय दुखवायचं काम करतात.
Ressession मुळे अमेरिका काही प्रमाणत तरी जमिनीवर आली असे म्हणायला हरकत नाही. मला तेथे नवीन Road Construction चे असे बरेच Project पाहायला मिळाले की जे गेली ३-३ वर्ष चालू आहेत. पैशाअभावी काहींचे काम फारच हळू हळू चालू आहे किंवा पूर्ण पणे थांबले आहे. रस्ते दुरुस्ती सुद्धा काही काही ठिकाणी झालेली दिसत नाही किंवा ती वेळेत होत नाही. सर्व साधारणपणे रविवारी तेथे सुट्ट्या असल्याने रस्ता दुरुस्तीची कामे करतात पण या असा अनेत करणा मुळे ते काम पूर्ण होत नाही आणि सोमवारी तेथे भरपूर Traffic Jam असतात ! हीवाळ्यामध्ये अतिशीत हवामान असल्याने रस्ते Crack होण्याचे प्रमाण खूप आहे. पण पैशा अभावी ते सुद्धा वेळच्या वेळी दुरुस्त होत नाहीत.
अमेरिका या देशाबद्दल आजकाल सर्वांनाच खूप सारी माहीती असते. त्यामुळे त्या देशाबद्दल फार काही नवीन सांगावे असे काही नाही. इ स १६०० सालापासून ६ कोटी लोक अमेरिकेला गेले आणि तिथलेच झाले. युरोप, आफ्रिका, आशिया असा जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक कामासाठी अमेरिकेत पोहोचले. त्यामुळे अमेरिकेला स्वतःचा असा फारसा इतिहासच नाही. ज्या काही आहेत त्या Immigrants च्या गोष्टी. त्यामुळे अमेरिकेच्या मुख्य भाषा ३. इंग्लिश, स्पॅनिश आणि पोर्तुगीझ. आज अमेरिकेला स्वतःची भाषाच नाही. सगळीकडे इंग्लिश नसतील पण स्पॅनिश बोर्ड नक्की असतात. अमेरिकेत एकूण ४ Time Zones आहेत. Eastern time, Central time, Mountain time, Western time. त्यामुळे त्या देशातल्या देशात फोन करायचा म्हटला तरी वेळ (काळ) पाहून करावा लागतो. उदा. न्युयोर्कहून लॉस एंजलीस ला फोन करायचा तर ३ तासाचा फरक आहे. पलीकडल्या माणसाची वेळ पाहूनच फोन करणे इष्ट.
आपल्याकडे 'डबल हाड' म्हणजे साधारण पंजाबी लोक असतात. तेथील सगळेच लोक तसे. अंग पिंडाने मजबूत. उंची कमीत कमी ६ फुट. पण ह्या मजबुतीला ऐशा आरामाचे ग्रहण मात्र खूप लागले आहे. त्यामुळे फारसे कोणी मापात (!!!) नसते. ना पुरुष ना स्त्रिया. "Use and Throw" च्या जमान्यात वस्तूंसकट माणसांना सोडणारे लोक स्वतःच्या शरीराची काळजी घेताना दिसत नाहीत. "आजची जिंदगी-ऐश करो" हा जीवनाचा मुलभूत मंत्र घेऊन जन्माला आलेली मंडळी तो मंत्र आयुष्यभर न चुकता पाळतात. त्यामुळे अती खाणे, अती चरबी या गोष्टी तेथे कॉमन आहेत. त्यातल्यात्यात मिनियापोलीस मधील लोक अख्या अमेरिकेत सर्वात जास्त Health conscious आहेत असा म्हणतात आणि मला तसे दिसले सुद्धा. Over all पण मिनियापोलीस मधील लोकांना चांगला राहावं, चांगला दिसावं याची जाण असावी.
अमेरिकेत काही शब्द खूप नवीन समजले. Toilet ला Rest Room आणि पेट्रोलला गैस म्हणतात (Gasoline चा Shortform) आणि ते ही लिटर मध्ये ना मोजता गैलन मध्ये मोजतात. २.५ USD / गैलन असा तेथे सध्या भाव आहे. पेट्रोलच नव्हे तर पाणी, दुध किंवा काही द्रव पदार्थ तेथे गैलन मधेच मोजतात. जसे दुध २ USD / गैलन. पाणी १-२ USD / गैलन. तेथे मनुष्य बळ खूप महाग असल्याने जी कामे मशीन वर किवा आपोआप किवा स्वतः करणे शक्य आहे ती तशीच करावी लागतात. उदा.
१. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणे - इथे पेट्रोल भरायला माणूसच नसतो. आपण स्वतः गाडी पेट्रोल पंपावरील मशीन पाशी न्यायची. गाडीतून उतरून आधी कॅश किंवा क्रेडीट कार्ड ने पैसे ( डॉलर) भरायचे. आपले आपण पेट्रोल गाडीत भरून घ्यायचे. तेथील Wiper ने काचा साफ करून घ्यायच्या आणि मग गाडीत पुन्हा बसून पुढे जायचे.
२. कार पार्किंग - येथेही माणूस नाही. गाडी पार्किंग करायच्या वेळेला एक बटन दाबून एक कार्ड मिळवायचे. परत जाताना जेवढे पैसे झाले असतील तेवढे पैसे Swap करायचे आणि पुशे निघायचे.
३. वर्तमान पत्र - वर्तमान पत्र भरलेल्या पेट्या चौकामध्ये ठेवलेले असतात. आपण स्वतः पैसे टाकायचे आणि त्यातील पेपर मिळवायचा. बहुतेक ठिकाणी दुपारचे जेवळ (Lunch) Buffet च असते. एकतर दुपारी वेळ कमी असतो.
वेळ कमी असल्याने सगळेजण पटापट Buffet मध्ये घेतात आणि आपापल्या ऑफिसला परत जातात. काही ठिकाणी मात्र सर्विंग असते. इथेही कामाचा वेग मात्र खूप जास्त असतो. वेळेची किंमत काय असते ते इथे कळते. मिनियापोलीसमध्ये अजुनेक मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत बर्फ टाकून घेतात. अर्थात बियर सोडून !!! मिनियापोलीस येथील तापमान हिवाळ्यात शून्याच्या खालीच असते. कधी कधी तर उणे ३० ते उणे ४० अंश पर्यंत खाली जाते. त्यामुळे मुळातच येथील लोकांना थंडीची सवय असते. साहजिकच उन्हाळ्यात ते सारेजण प्रत्येक गोष्टीत बर्फ टाकून घेतात. कोक, ज्यूस , पाणी काहीही मागा. प्रथम ग्लास मध्ये भरपूर बर्फ टाकायचा आणि मग उरलेल्या जागेत पेय.
क्रमशः..........

2 comments:

  1. अभिनंदन!! चला नमन तर झालं आता पुढच्या प्रत्येक विकेन्डला कुठे कुठे जाल त्याची भर घालाल अशी आशा आहे.

    ReplyDelete
  2. Portuguese is #13 language in the US.

    http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_the_United_States

    ReplyDelete