दिवा
काल संध्याकाळची गोष्ट. नेहेमी
प्रमाणे दमून भागून घराच्या दारात आलो तर घराला कुलूप आणि आसपास सगळीकडे वीज गेलेली.
मोबाइलच्या प्रकाशात दार उघडले आणि आत आलो. काळ्या कुट्ट अंधाराचे साम्राज्य घरभर झालेले.
आता मेणबत्ती शोधण्यापासून सुरुवात. फारसे लाइट जात नसल्याने आठवणीचे नीट आणि जागेवर
मेणबत्ती ठेवायची सवयच मोडलेली. अंधारातच हात पाय धुवून पावले अलगद देवघराकडे वळली.
काडेपेटी आणि तेल यांची जागा नक्की ज्ञात असल्याने सरळ देवापाशी दिवाच लावावा असे मनोमन
ठरवून कार्यसिद्दी केली. एकदम मन 30 वर्षे मला मागे घेऊन गेले. पळस्पे सारख्या खेड्यात
राहत असताना वीज जाण्याचे प्रकार नेहेमीचेच. अशा वेळी सायंकाळी खेळून घरी आल्यावर आई
देवापुढे दिवा लावायची आणि मी शुभंकरोती, गणेश स्तोत्र, रामरक्षा आणि मारुती स्तोत्र
म्हणायचो. आजही काहीसं तसच वाटलं. एकटाच देवापुढे बसून दिव्याच्या मंद प्रकाशात ही
चारही स्तोत्रे मी मोठयाने म्हटली. रोज न म्हणताही सगळी स्तोत्रे अजूनही तोंडपाठ आहेत
याचा अभिमान आणि आश्चर्य वाटलं. आईची या वेळी प्रकर्षाने आठवण होते आहे. त्यावेळी एक
दिवा देवापाशी आणि दुसरा ओट्यावर ठेऊन तेवढ्याच अपुर्या प्रकाशात आई स्वयंपाक करायची
आणि नंतर गरम गरम जेवायला वाढायची.
तो मंद दिव्याचा प्रकाश,
त्याच्या उजेडात ट्यूब मधल्या रोजच्या उजेडापेक्षा जास्त आधार वाटत होता. पूर्वी रामरक्षा
म्हटल्यावर जसा आधार वाटायचा अगदी तसा. ते काही क्षण एकटेपणा वाटला पण यावेळी तो हवा
हवासा वाटत होता. अजून काही वेळ असाच देवासमोर बसून राहिलो. अगदी शांत.... आजच्या धावपळीच्या
जीवनात स्वत:साठी, देवासाठी आणि देवासमोर आज आपण किती वेळ देतो.... विचार
करूया....
-
मंदार कुलकर्णी
नोव्हेंबर
२०१४