Followers

Sunday, December 6, 2015

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट


ज्या दिवशी मला समजले कि सुबोध भावे कट्यार… हा चित्रपट करणार आहे तेव्हा पासूनच मला कमालीची उत्सुकता लागली. आणि दिवाळी च्या मुहूर्तावर ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट प्रदर्शित झाला.हे काही वर्तमान पत्रातील सिने परीक्षण नाही त्यामुळे त्याची कथा आणि नाटक , त्याचा इतिहास इथे लिहिण्याची गरज नाही.
एखाद्या गरुडाला त्याच्या पंखात बळ आल्यावर जसे अख्खे आकाश विहारायला मिळते तशी अवस्था सुबोधची झाली आहे. नाटकाचे ६० फुटाचे स्टेज पासून क्षितिजा पर्यंत पोहोचणारा कॅमेरा यातील फरक त्याने दिग्दर्शक म्हणून त्याच्या पहिल्याच सिनेमात उत्तम रीतीने ओळखला. आणि तिथूनच कथेचा मूळ गाभा न बिघडवता संपूर्ण चित्रपटासाठी नवीन कथा लेखन करून घेतले. पंडित भानू शंकर शास्त्री यांचे नाटकात केवळ फोटो मध्ये असेलेले स्थान बदलून त्याने पूर्णपणे एक चांगले कॅरक्टर तयार केले . विश्रामपूर चा दरबार, ताज महाल, हवेली, देऊळ आणि अशी अनेक आवश्यक ठिकाणे चित्रपटासाठी घेऊन एक भव्य चित्रपट निर्माण केला. त्या काळातील वेशभूषा, सजावट याचा खूप बारकाईने अभ्यास केलेला जाणवतो. चित्रपटाची लांबी ४ तास होवू नये म्हणून गीते पूर्ण न घेता १ किंवा २ कडवी घेणे हा ही विचार स्तुत्यच. कट्यारीला रीमा यांचा आवाज देवून कथा पुढे नेण्याची कल्पना ही छान.
आता थोडेसे कलाकार निवडी विषयी. सर्वच कलाकारांची निवड कथा योग्य आणि यथा योग्य आहे. मृण्मयी आणि अमृताची निवड कथेसाठी उत्तम त्याचबरोबर सदाशिव स्वतः सुबोधने स्वतः करणे हे त्याच्यातील कलाकाराला आणि दिग्दर्शकाला नक्कीच अवघड गेले असेल. त्याने केलेला सदाशिव चा गायन करतानाचा अभिनय थेट महेश काळे ची आठवण करुन देतो. सर्वात कुठे बाजी मारली आहे ती सचिनने केलेल्या खांसाहेब साठी. इतके वर्ष हा रोल त्याचीच वाट पाहत होता असे वाटते. त्याचे उर्दू उच्चार, त्याची अभिनयवरील पकड आणि कुठेही खांसाहेब उथळ न होवू देण्याचे कसब अप्रतिम. सचिन खांसाहेब यांचा रोल कसा करणार या बद्दल खूप लोकांच्या मनात शंका होत्या. किंबहुना "महागुरु" नावाखाली त्याची what’s app वर भरपूर चेष्टाही झाली. पण त्याच्या शिवाय हा रोल आजच्या काळात कोणी करूच शकणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. त्या रोलमध्ये त्यांनी भरलेले गहिरे रंग, त्याच्या वेगवेगळ्या छटा, सर्वच लाजवाब.
पंडित भानू शंकर शास्त्री यांच्या बाबतीत मात्र जरा गडबड झाली आहे. शंकर महादेवन याने गाण्याची आणि संगीताची बाजू उत्तम सांभाळली असली तरी पंडित भानू शंकर शास्त्री यांचे शब्दोच्चार…. मज़ा नहीं आया। एका अ मराठी गायकाला पंडित भानू शंकर शास्त्री यांचा रोल सुबोधने देणे हे फार आश्चर्य कारक आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात निदान डबिंग तरी चांगल्या मराठी माणसाकडून करून घ्यायला हवे होते. हे म्हणजे “अख्खा शर्ट कडक इस्त्री केलेला आणि खिशावर मात्र चुण्या ….”
संगीत म्हणजे या चित्रपटाचा प्राण. राहूल, महेश आणि शंकर यांनी त्यांच्या कसलेल्या आवाजाने गीते उच्च स्थानावर नेवून ठेवली आहेत.
एकंदरीतच "संपूर्ण जमून आलेली बिर्याणी" असे याचे वर्णन करता येईल. माझे परीक्षण वाचून कोणी हा चित्रपट पहावा अशी माझी मुळीच अपेक्षा नाही पण जर जाणारच असाल तर संपूर्ण मोकळ्या डोक्याने जा. वसंतराव देशपांडे, राहुल देशपांडे आणि चारुदत्त आफळे यांचे खांसाहेब अजरामर आहेतच; पं जितेंद्र अभिषेकी यांचा सुरेल स्वर आणि संगीत विसरणे शक्य नाहीच पण चित्रपटाचा मोठा कॅनवास मिळाल्यावर त्याचे कसे झगझगीत सोने होते हे पाहण्यासाठी हा चित्रपट एकदा पहायलाच हवा....

- मंदार कुलकर्णी
२२ नोव्हेंबर २०१५

 

No comments:

Post a Comment