नेवासे
नेवासे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य
ठिकाण आहे. हे शहर प्रवरा
नदीच्या काठावर वसलेले
आहे. मुळात हे गाव मुख्य रस्त्यावर
म्हणजे high
way वर नाहीये त्यामुळे येथे येताना नेवासा फाटा येथून आत वाकडी वाट
काढून यावे लागते. नगर आणि औरंगाबाद च्या मध्ये असूनही इतिहास आणि पर्यटन या बाबतीत
काहीसे मागे असलेले हे गाव आहे.
प्रवरा नदी हि येथे अमृतवाहिनी समजली जाते.
अगस्तीऋषींच्या तपोभूमितून उगम पावलेली प्रवरा नेवासा येथे संत श्री
ज्ञानेश्वरांच्या भक्तीसंवादाचा ठेवा सामावून घेत दक्षिण गंगा गोदावरी ला जाऊन मिळते. नेवासे तालुक्यातून या शिवाय गोदावरी आणि मुळा या दोन नद्यासुद्धा वाहतात. या तीन नद्या आणि त्यावरील धरणांतील पाणी यांमुळे या तालुका सुपीक बनला आहे. नेवासे तालुक्यात मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना हे दोन साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांच्या अनुषंगाने
येथे काही शिक्षणसंस्था निघाल्या आहेत. पाण्यासाठी खर्या
अर्थाने समृद्ध असलेल्या या गावाला राजकारणामुळे खुंटलेली प्रगती पहावी लागत आहे.
नेवासे आज प्रसिद्ध आहे ते ज्ञानेश्वरांनी
येथे ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली म्हणून. बहुसंख्यांना ज्ञानेश्वर म्हणजे आळंदी इतकेच माहिती असते त्यांच्या
ज्ञानात थोडी भर. या गावातील करवीरेश्वराच्या देवळात
राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या
शतकात म्हणजे 1291 साली भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ
लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो.
ॐ नमोजी आद्या |
वेद प्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या |
आत्मरुपा |
वेद प्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या |
आत्मरुपा |
देवा तूंचि गणेशु |
सकलमति प्रकाशु |
म्हणे निवृत्ति दासु |
अवधारिजो जी |
सकलमति प्रकाशु |
म्हणे निवृत्ति दासु |
अवधारिजो जी |
असे सांगून जगाचा उद्धार करणार्या ज्ञानेश्वरांनी ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून आपली
ज्ञानेश्वरी पहिल्यांदा
वाचली तो खांब अजूनही नेवासे या गावात आहे. त्याला पैस असे म्हणले जाते.
नेवासे येथे मोहिनीराजाचे 75 फुट उंच एक खूप जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे
भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध
झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर
अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर हेमाडपंती कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर
स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे. या ठिकाणी पुरातत्व खात्याने उत्खनण केले असून येथे
दगडी हत्यारे सापडली आहेत. त्यात हातकुर्हाडी
सापडल्या आहेत. 1773 साली 5 लाख रुपये खर्च करून गंगाधर यशवंत चंद्रचूड
यांनी या मंदिराचा जिणोद्धार केला आहे. शहाजी भोसले यांच्या वडिलांना वेरूळ ची जहागिरी
असताना शहाजी भोसले नेवासे येथे च राहत होते अशी इतिहासात नोंद आहे. त्यांनी मोहिनिराजाच्या
मंदिराला अनेक देणग्या दिल्याचे उल्लेख आढळतात. त्यानंतर पेशव्यांनी वार्षिक रु 1500
देणगी देवू केली होती जी इ स 1860 पर्यन्त चालू होती.
नेवासा येथे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या मदतीने
ज्ञानेश्वर पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरीचे कथन करीत असलेले एक मोठे शिल्प नुकतेच
नेवासे येथे मंदिराच्या मागे बसवण्यात आले आहे. त्या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचे
काम सध्या चालू आहे. मला आशा आहे, त्या निमित्ताने का होईना हे गाव आणि हा सर्व
परिसर भारताच्या नकाशावर येईल आणि आपल्या पुढील पिढ्यांना ज्ञानेश्वर महाराजांची आठवण
करून देत राहील.
-
- मंदार कुलकर्णी



