Followers

Monday, September 4, 2017

साहेबाच्या देशात...

श्री
 साहेबाच्या देशात...

आमच्या UK च्या सहलीनंतर अनेक जणांनी मला मागणी केली की या सहलीचे विस्तारपूर्वक वर्णन त्यांना वाचायला आहे. माझ्याही डोक्यात हा विचार घोळत होताच. पण याला शीर्षक काय द्यायचे याच्या विचारात मी थोडे दिवस पडलो होतो. शेवटी १५० वर्षे ज्या इंग्रज "साहेबांनी" आपल्या देशावर राज्य केलं आणि ज्या साहेबाच्या देशात एके काळी सूर्य मावळत नसे अशा 'साहेबाच्या देशात' जाण्याचा अनुभव त्याच शीर्षकाने लिहावा असे वाटले. असो.


अगदी खरं सांगायचं तर आम्ही गेली अनेक वर्षं UK ला जायचा नुसता विचारच करत होतो. योगेश आणि सौ.शाल्मली तर बोलवून बोलवून थकले होते. पण हा 'योग' जुळवून आणणे माझ्यासारख्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. माझी सुट्टी, मुलींच्या शाळेच्या सुट्ट्या अशा अनेक गोष्टींची सोय झाल्यावर 'आता मात्र माघार नाही' अशा स्थितीत आलो आणि धडाक्यात तयारीला सुरुवात केली. त्याच्या श्रीगणेशा मी स्वतः पु. लं. चे "अपूर्वाई" संपूर्ण वाचून केला. त्याच जोडीला व्हिसा, तिकीट याचे सोपस्कार. इथे मात्र मंदगतीने काम करायची शर्यत UK च्या व्हिसा ऑफिस ने जिंकली. आमचा 2 आठवड्यात अपेक्षित असलेला व्हिसा यायला ५ आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला. इतका काळ वाट पाहून व्हिसा आला नाही तर सगळं मुसळ केरात. पुरावर नियंत्रण आणण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे “पुररेषा” वरती घेणे, तद्वत UK व्हिसा ऑफिसने व्हिसा ला होणार्‍या विलंबवर नियंत्रण आणण्याचा सोपा मार्ग निवडला तो म्हणजे व्हिसा देण्याची तारीख पुढे ढकलली. दोन आठवड्याच्या जागी ते आठ आठवडे सांगू लागले. याचा परिणाम माझ्या सारख्या व्यक्तिश: फिरायला जाणार्‍या मंडळीपेक्षा पर्यटन व्यवसायातील संस्थांना जास्त भोगावा लागला. नेहमीप्रमाणे दोन आठवड्यात व्हिसा येईल असे गृहीत धरून ज्यांनी बूकिंग्ज केली त्यांची फारच पंचाईत झाली. व्हिसा वेळेत न आल्याने सहल तरी रद्द करावी लागली किंवा त्या ग्राहकांना पुढच्या सहलीत बसवून द्यावे लागले. काहींना ऐनवेळेच्या या बदलामुळे जास्त पैसे भरून महागडे विमान घ्यावे लागले अगर सहल रद्द करून घरात बसावे लागले.


 आम्हाला जितकं वर्णन केलं गेलं होतं तितकी काही वाईट 'एअर इंडिया' ही विमान कंपनी नाही. आम्ही काही अपेक्षा ठेऊन गेलोच नव्हतो त्यामुळे त्यांची 'सेवा' ही मलातरी चांगलीच वाटली. "अपेक्षा केली नाही की अपेक्षा भंगाचे दुखः होत नाही" हे मी अनुभवाने सांगू शकतो. पण खरोखरच 'एअर इंडिया' ही बाकी कुठल्याही इतर विमान कंपनीच्या तोडीस तोड सेवा देते. त्यामुळे दोन्ही वेळेचा प्रवास तसा सुखाचा, वेळेत आणि वेळेवर झाला. एअर इंडिया ही कंपनी सध्या कितीही तोट्यात असली तरी ‘सेवेमध्ये’ ते फार मागे नाहीत एवढेच मला म्हणयचे आहे.


हिथ्रो वर उतरण्यापूर्वी विमानातून सकाळी लंडन चे पहिले दर्शन मी कधीच विसरू शकणार नाही. थोडेसे ढगाळ वातावरण त्यामुळे ढगांच्या पुंजक्यातून लंडनचे थोडे थोडे दर्शन झाले. विमान लंडन वरती बर्‍याच वेळ घिरत्या घालत असल्याने लंडनची हार्ट लाइन “थेम्स नदी” नक्की ओळखू आली. बाकी सारे अगदी अनोळखी वाटत होते. येत्या काही दिवसात हेच लंडन “ओळखीचे” आम्ही करून घेणार होतो. ऊन पावसाचा खेळ पाहणार होतो.


 यूकेला येण्यापूर्वी मी कुठे चाललो आहे याचे उत्तर देताना माझी फार पंचाईत झाली. कधी मी इंग्लंड म्हणायचो तर कधी यूके, कधी लंडन म्हणायचो तर कधी ग्रेट ब्रिटन. साहजिकच मला या सार्‍या प्रकाराबद्दल फार उत्सुकता होतीच. यूके जाण्यापूर्वी यूके चा इतिहास आणि गमतीदार गुंतागुंत थोडी समजून घेणे आवश्यक आहे. आता बाजूचे चित्र नीट निरखून पहा.


 
 ‘ग्रेट ब्रिटन’ व ‘आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र’ उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश होता. इ.स. १८०१ साली ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र व आयर्लंडचे राजतंत्र मिळुन ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा नवीन देश स्थापन करण्यात आला. विसाव्या शतकात इ.स. १९१९ ते इ.स. १९२२ दरम्यान आयर्लंडच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर आयर्लंडने युनायटेड किंग्डमामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व इ.स. १९२२ साली आयर्लंड व युनायटेड किंग्डम हे दोन देश वेगळे झाले. इ.स. १९२२ ते इ.स. १९३७ सालांदरम्यान आयर्लंड देश ‘आयर्लंडचे स्वतंत्र राज्य’ ह्या नावाने ओळखला जात असे व इ.स. १९३७ साली आयर्लंडचे प्रजासत्ताक (सध्याचे नाव) हा देश निर्माण झाला. आयर्लंड वेगळा झाल्यानंतर इ.स. १९२७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नाव बदलून ‘ग्रेट ब्रिटन’ व ‘उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र’ (सध्याचे युनायटेड किंग्डम) हे नवीन नाव वापरात आले.



युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे. युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषद, जी-८, नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे. गमतीचा भाग असा की ‘युनायटेड किंग्डम’ हा असा देश आहे की ज्याची सीमा फक्त दुसर्‍या एकाच देशासोबत आहे. युनायटेड किंग्डमच्या उत्तर आयर्लंड देशाच्या नैऋत्येला आयर्लंड हा देश आहे व इतर सर्व बाजुंनी समुद्र आहे.

ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र:  ‘ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र’ हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश आहे. १७०७ साली इंग्लंडचे राजतंत्र व स्कॉटलंडचे राजतंत्र ह्या दोन राज्यांचे एकत्रीकरण करून ह्या देशाची निर्मिती करण्यात आली. ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र ह्या नवीन देशाने ग्रेट ब्रिटन बेटावर एकछत्री अंमल करण्यास सुरुवात केली. १८०१ साली आयर्लंडचे राजतंत्र ह्या राज्याने ग्रेट ब्रिटनसोबत एकत्रित येण्याचा निर्णय घेतला व त्यातुन ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र ह्या नवीन देशाची स्थापना झाली.


इंग्लंड
 ‘इंग्लंड’ युनायटेड किंग्डमचा एक घटकदेश आहे. युनायटेड किंग्डमची ८३% लोकसंख्या इंग्लंडमध्ये राहते; तर क्षेत्रफळानुसार इंग्लंड ग्रेट ब्रिटनचे दोन तृतीयांश क्षेत्रफळ व्यापतो. इंग्लंडच्या उत्तरेस स्कॉटलंड, पश्चिमेस वेल्स यांच्या भूसीमा असून इअतर सर्व बाजूंनी उत्तर समुद्र, आयरिश समुद्र, केल्टिक समुद्र, ब्रिस्टल खाडी व इंग्लिश खाडी यांनी इंग्लंडला वेढले आहे. इंग्लंडची राजधानी असलेले लंडन ग्रेट ब्रिटनमधील सर्वात मोठे महानगर असून अनेक मानकांनुसार युरोपीय संघातील सर्वात मोठे नागरी क्षेत्र आहे. 


इंग्लंड चा इतिहास: इंग्लंड या नावाचा अर्थ ‘लँड ऑफ अँजेल्स’. देवदूतांची भूमी असा होतो. इतिहासकारांच्या मते अँजेल्स नावाची उत्तर जर्मनी व डेन्मार्क मधील टोळी साधारणपणे ५व्या ते ६व्या शतकात या भागात वास्तव्य करू लागली व या टोळीपासून याचे नाव इंग्लंड असे पडले. मध्ययुगीन: रोमन साम्राज्याच्या पतना नंतर इंग्लंडमध्ये अँग्लो सॅक्सनी टोळ्या ज्या ब्रिटीश बेटांच्या दक्षिण भागात वास्तव्यास होत्या त्यांची राज्ये चालू झाली. साधारणपणे ५ शतकापासून अनेक लहान मोठी अँग्लो सॅक्सन राज्ये अस्तित्वात होती. या काळातील आर्थर राजाच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. इंग्लंडचे युरोपबरोबरच ख्रिस्तीकरण झाले. इ.स. ५०० मध्ये इंग्लंडमध्ये ७ लहान राज्ये अस्तित्वात होती. केंट इसेक्स ससेक्स इत्यादी. या राज्यांची एकमेकात भांडणे होत व एकमेकांवर चढाओढी चाले. १० व्या शतकात वेसेक्स राज्याने संपूर्ण इंग्लंडवर नियंत्रण मिळवले व एका सार्वभौम इंग्लंडची स्थापना इ.स. ९२७ मध्ये झाली. इ.स. १०१६ मध्ये डेन्मार्क चा राजा कनुटे याने इंग्लंडवर कब्जा मिळवला व थोड्या कालाकरीता इंग्लंडचा राज्याधिकारी बनला.


 १० व्या शतकात इंग्लंड हा तत्कालिन देश युरोपमधील इतर देशांपेक्षा आर्थिकदृष्ट्या बराच मागसलेला होता. साधनसामुग्रीची तसेच सुपीक प्रदेशाची कमतरता हे मागासण्याचे कारण होते. शेजारील फ्रान्स हा त्यामानाने खूपच सधन देश होता. इंग्लंडने या काळातच आक्रमक साम्राज्यवादी धोरण स्वीकारले. फ्रान्स बरोबरील अनेक युद्धात साधन सामुग्रीची कमतरता असूनही अनेक युद्धात फ्रान्सचा पाडाव केला व फ्रान्समधील बराच भाग व्यापला. याला इंग्लंड फ्रान्स शतकी युद्ध असे म्हणतात. रिचर्डच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने क्रुसेडमध्ये हिरीरीने सहभाग घेतला. क्रुसेडमध्ये वापरलेला ध्वज इंग्लंडचा अधिकृत ध्वज बनला.याच काळात इंग्लंड एक प्रबळ लष्करी देश म्हणून उदयास आला. अल्फ्रेडने इंग्लंडच्या भविष्यातील अत्यंत प्रबळ नौदलाची पायाभरणी केली. मध्ययुगात इंग्लंडचे तिरंदाज (Longbows) व नाईट्स (Knights)(सरदार) यांची संपूर्ण युरोपभर प्रबळ योद्धे म्हणून ख्याती होती. अनेक राजकिय स्थित्यंतरे झाली अनेक घराण्यांनी इंग्लंडचे राजेपद भूषावले. मध्ययुगाच्या अंताला संपूर्ण युरोपबरोबरच इंग्लंडलाही प्लेगचा तडाखा बसला. १५ व्या शतकातील प्लेग च्या साथीत २/३ नागरिक बळी पडले.
 इंग्लंडचे इ.स. ९२७ मध्ये एकत्रीकरण झाले त्या काळापासून त्याच्या सार्वभौमत्वाला कधीही तडे गेले नाहीत. इंग्लंड या देशाने संपूर्ण जगावर आपल्या लष्करी सामर्थ्यावर अनेक देशांवर राज्य केले, वसाहती स्थापन केल्या ज्या अगदी गेल्या ५० वर्षांपर्यंत ब्रिटनच्या ताब्यात होत्या. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी राज्य केले त्या त्या भागावर त्यांनी कधीही न पुसता येणारा प्रभाव निर्माण केला. आज बहुतेक देशांमध्ये कायदे, लष्करी रचना, शिक्षण पद्धती, शास्त्रीय पद्धती, संसदीय लोकशाही व सरकार रचना यात आजही इंग्रजी पद्धतींचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. इंग्रजांनी त्यांची इंग्रजी भाषा जगभरात नेल्यामुळे आज इंग्रजी ही अघोषितरित्या जगाची प्रमुख भाषा आहे.


ब्रिटिश साम्राज्य व वसाहतवाद:
 मध्ययुगाच्या अंतानंतर युरोपमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. रिनैसाँच्या क्रांतिकारक बदलांनंतर युरोपची विचार सरणी बदलू लागली. शास्त्रीय दृष्टीकोन वाढीस लागला. पोर्तुगाल, स्पेन यांच्याकडून नवे देश नवे मार्गांचा शोध लागला. इंग्लंडही या बदलांमध्ये मागे नव्हते. राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळात इंग्लंडने प्रोस्टेस्टंट पंथाचा स्वीकार केला. तिच्याच काळात इंग्लंडमधील धार्मिक दृष्टीकोन व राजकीय दृष्टीकोन हे वेगळे झाले. चर्च ऑफ इंग्लंड हे इंग्लंडमधील धार्मिक घडामोडींचे केंद्र बनले. याचाच परिणाम म्हणून इंग्लंडने या काळात झपाट्याने प्रगती करण्यास सुरुवात केली. अमेरिका खंडाच्या शोधानंतर त्यावर मक्तेदारी मिळवण्यात व भारताच्या मार्गावर नियंत्रण मिळवण्यात इंग्लंड क्रियाशील झाला.


लंडनचा इतिहास :
 एके काळी ब्रिटीशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. त्या काळी सर्व जगातील राजकीय आणि आर्थिक घडामोडीचे नियंत्रण लंडनहून होत असे. युद्धात जिंकलेली लूट, मांडलिक राजांच्याकडून घेतलेली खंडणी आणि व्यापारातला नफा अशा अनेक मार्गाने जगभरातल्या संपत्तीचा ओघ लंडनच्या दिशेने वहात होता. त्यामुळे आलेल्या सुबत्तेतला कांही भाग त्या नगरीच्या बांधणीमध्ये खर्च झाला आणि त्यातून तिथले विशाल प्रासाद आणि कलात्मक टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या असतील. राजधानीचे शहर म्हणून तर लंडनचा दिमाख होताच. जागतिक व्यापाराचे केंद्र असल्यामुळे जगभरातील व्यापारी त्या शहराला भेट देत होते. त्यांनी आपल्या कंपन्यांची ऑफिसे तिथे थाटली. उच्च शिक्षणासाठी जगभरातले विद्यार्थी तिथे येऊन रहात होते. मोठमोठे विचारवंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलाकार वगैरेंनी लंडन ही आपली कर्मभूमी बनवली आणि तिचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. शंभर वर्षांहून अधिक काळ लंडन ही जगातल्या सा-या महानगरींची महाराणी होती असे म्हणता येईल. 


लंडनचा इतिहास देखील रोमइतकाच जुनापुराणा आहे. पण प्राचीन काळात त्या शहराला विशेष महत्व नव्हते. रोम या शहराचे नांव कसे पडले याबद्दल दुमत नाही, पण लंडन शहराच्या नांवाची व्युत्पत्ती नेमकी कशी झाली याबद्दल दहा संशोधकांची दहा निरनिराळी मते दिसतात. जगभरात सगळीकडे प्राचीन कालापासून नद्यांच्या कांठावर वस्ती करून माणसे रहात आली आहेत. त्यांच्या आपसातील लढाया, लुटारूंचे हल्ले, रोगराई, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या वस्त्या उजाड झाल्या आणि नव्या वस्त्या वसवल्या गेल्या. थेम्स नदीच्या कांठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात मानवांनी वस्त्या निर्माण केल्या होत्या. आज लंडन शहर जेवढ्या विस्तृत भागात पसरले आहे त्यातल्या कित्येक जागी अशा प्रकारच्या पुरातन वस्त्यांचे अवशेष उत्खननात सापडले आहेत. ही प्रक्रिया शतकानुशतके चालू होती. त्याप्रमाणे अनेक खेडी या भागात वसवली गेली होती. लीड्स या छोट्या शहरातच पन्नासाहून अधिक जुन्या काळातली खेडी सामावलेली आहेत यावरून लंडन या महानगरात जुन्या गोष्टींची कल्पना करता येईल.

रोमन साम्राज्याने इंग्लंडचा भागसुद्धा जिंकून घेतला होता आणि लंडनच्या भागात आपली छावणी बांधली होती. दळणवळणाची आणि संपर्काची साधने अत्यंत तुटपुंजी असलेल्या त्या काळात राजधानीपासून दूरवरच्या प्रदेशात जाऊन आणि सतत चालू असलेल्या लढायांमध्ये टिकाव धरून राहणे कठीणच असते. रोमन साम्राज्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर व्हायकिंग, नॉर्मन आदि लोकांनी ब्रिटनवर आक्रमणे केली आणि सॅक्सन लोकांबरोबर त्यांच्या लढाया होत राहिल्या. त्यात विजयी झालेल्या जेत्यांनी आपापल्या जहागिरी, परगणे आणि राज्ये जागोजागी स्थापन केली होती. कांही शतकांचा काळ गेल्यावर या सर्वांचे एकत्रीकरण झाले आणि ब्रिटनवर एकछत्री अंमल सुरू झाला.

मध्ययुगाच्या काळात युरोपखंडातल्या सगळ्याच देशांचा झपाट्याने विकास झाला आणि या क्रांतिकारक प्रगतीमध्ये ब्रिटन आघाडीवर राहिला. त्या देशाने युरोपमधला कोठलाही दुसरा भाग जिंकून घेतला नाही, पण आशिया, आफ्रिका, अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंडांतले प्रचंड भूभाग आपल्या आधिपत्याखाली आणले. या सर्व कालखंडात ब्रिटनची राजधानी लंडन येथे असल्यामुळे ते जगातील अव्वल क्रमांकाचे शहर झाले. इतिहास आता आटोपता घेऊया आणि जरा वर्तमानात जाऊन मजा करूया.

लंडन:
 यूके मध्ये पाऊल ठेवले आणि ज्याने लंडन पाहिले नाही किंवा जो लंडनविषयी भरभरून बोलला नाही अशी व्यक्ती या जगात केवळ विरळाच. त्यामुळे आमचे बरेचसे दिवस हे लंडन मनसोक्त पाहण्यात आणि भटण्यात गेले. सर्वात प्रथम लंडन हे “Perfect Tourist City” आहे हे जाहीर करायला हवे. रोज लाखो लोक लंडन मध्ये नोकरी किंवा व्यवसाय करण्याबरोबरच लंडनमध्ये फिरायला आणि लंडन पाहायला येतात. आठवड्याच्या कोणत्याही दिवशी लोकांचे जथ्थेच्या जथ्थे दिवस रात्र हातात मॅप घेऊन फिरत असतात मग ते रस्ते असोत, ट्रेन असो बस असो किंवा ट्यूब असो. या सार्‍या पर्यटकांनाची गरज भागवायची संपूर्ण तयारी लंडन ने फार पूर्वीपासून केली आहे. 24 ते 26 डिसेंबर एवढेच दिवस येथे खर्‍या अर्थाने सुट्टी असते. बाकी संपूर्ण वर्षभर अवघे लंडन शहर पर्यटकांना खुश करण्यासाठी कष्ट उपसत असतं. खूप कमी ठिकाणे “सोमवार बंद” पद्धतीची आहेत. पण याच्या वेळा मात्र महाविचित्र. सगळं काम ऑफिस च्या वेळात. सकाळी 10 ते संध्याकाळी 6. फार प्रेक्षणीय स्थळे 10 च्या आधी उघडतात. उदा. मॅडम तुसर्द 9 ला उघडते. पुण्यासारखे दुपारी ‘एक ते चार बंद’ (पेशव्यांची वामकुक्षीची वेळ असते!) असला प्रकार नाही. प्रेक्षणीय स्थळ, ऑफिस, मॉल, दुकाने सगळ्यांना हीच वेळ. काही ठराविक मॉल आणि पेट्रोल पंपावरील दुकाने 24 तास उघडी असतात. येथे जीवनावश्यक खरेदी करायची तर फार काळजीपूर्वक करावी लागते नाहीतर उपाशी राहायची पाळी...


लंडनमध्ये पर्यटक मुख्यत: उन्हाळ्यात ओसंडून येतात. या काळात विमानाचे दर ही चढेच असतात. जिवो जोवस्य जीवनम.... तशातला  हा प्रकार. त्यामुळं साहेबाच्या देशात फिरायला जायचे तर पूर्ण नियोजन करूनच जावे लागते. इतर वेळेस जे तिकीट जाऊन येऊन 25-30 हजारला मिळते तेच तिकीट 60-90 हजारच्या घरात पोहोचते यावरून त्याची कल्पना येईल. (हे मी मुंबई ते लंडनचे दर सांगत आहे.) या व्यतिरिक्त व्हिसाचा खर्च, व्हिसा भेटीचा खर्च, पर्यटनाची तयारी ह्या गोष्टी छोट्या वाटतात पण बर्‍याच प्रमाणात खिसा रिकामा करतात. अनेक पर्यटक यू के बरोबर युरोप ही जोडून घेतात. यात मग तेथील व्हिसाचा खर्च आणि तेथील प्रवास याची भर पडते.

यू के मधील प्रवास हा खरतर अतिशय विस्ताराने लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. याचे विशेषत: म्हणजे तो युरोप मधील सर्वात महागडा आहे. मग ते तुम्ही कोणत्याही वाहनाने प्रवास करा स्वत:चे वाहन सोडून. बस, ट्रेन आणि टॅक्सी अशी चढत्या क्रमाने याची मांडणी करता येईल. माझ्या अभ्यासानुसार 25 मैलाच्या प्रवासाला घोबळ मानाने कमीत कमी 10 पौंड खर्चायला लागतात. रुपया मध्ये कितीही धर्मांतर करायचे नाही म्हटले तरी 74 रुपये आजचा पौंडचा विनिमय दर पकडून वट्ट 740 रुपये होतात. आज पुणे – मुंबई प्रवास 150 किमी चा बसने 200-250 रु तर ट्रेनने 100 रु. ला पडतो. हे एवढे विस्ताराने सांगायचं उद्देश एवढाच की या परदेशात येताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आर्थिक नियोजन बिघडणार नाही. काही बस जातानाच परतीचे तिकीट काढले तर (Return) तर स्वस्त देतात पण असे अपवादानेच पाहायला मिळाले. त्यात इंटरनेट वर तिकीट काढले तर स्वस्त आणि बस स्टॉप वर काढले तर किंवा चालकाकडे पैसे दिले महाग. प्रवासाच्या दिवशी तिकीट काढले तर महाग आणि काही दिवस आधी तिकीट काढले तर स्वस्त असाही मजेशीर प्रकार आहे. इंटरनेट वर तिकीट काढले तर प्लॅस्टिक मनी चालतो पण चालकाकडे नगद. बाकी बसचा प्रवास मात्र अतिशय सुखकर. रस्त्यात खड्डे नसल्याने बसच्या सनपेन्शनला काही काम नसते. बिचारे तसेच बसून असतात. मात्र चालकाला मात्र बस चालवण्याशिवाय बाकीचीशी बरीच कामे उपसावी लागतात. बस थांब्यावर आली की ‘चालक महाराज’ (क्षमा करा, येथे महाराण्याही भरपूर प्रमाणात बस चालक आहेत) सूरक्षिततेचे जॅकेट अंगावर परिधान करून बसमधून खाली उतरतात. बसच्या डाव्या बाजूला असलेल्या डिकी मधून उतरणारर्‍या प्रवाशांचे सामान स्वत: हाताने काढून देतात. नवीन प्रवाशांचे सामान डिकी मध्ये ठेवतात. त्यांना पैसे घेऊन तिकीट देतात आणि पुढचा प्रवास सुरू करतात. हे अनुभव कथन लांबच्या बसच्या प्रवासाच्या बाबतीत आहे ते चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. येथे एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे बस स्टॉप वर ट्रेन प्रमाणे पुढची बस कधी येणार याची माहिती display वऱ पाहायला मिळते. जेष्ठ नागरिकांना अतिशय स्वस्तात आणि काहींना फुकट बसने प्रवास करायची सोय आहे. साहजिकच अनेक जेष्ठ नागरिक ट्रेनचे धक्के खाण्यापेक्षा बसने प्रवास करणे पसंत करतात.

शहरी वाहतुकीसाठी लंडन अंडरग्राउंड ही जगातील सर्वात जुनी व दुसरी सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे सेवा कार्यरत आहे. २७० स्थानके जोडणार्‍या ह्या रेल्वेचा वापर दररोज ३० लाख प्रवासी करतात. जगातील सर्वोत्तम शहरी वाहतूक असलेले शहर हा किताब लंडनला मिळाला आहे. लंडन शहराच्या आगगाडीची संकल्पना अशी आहे की परगावहून येथे ट्रेन येतात आणि त्यांचे रूळ वेगवेगळ्या लंडनमधील टर्मिनसपाशी किंवा स्टेशनपाशी समाप्त होतात. उदा. युस्टन, विक्टोरिया इत्यादि. यांना लंडन युस्टन आणि लंडन विक्टोरिया असेही म्हणतात. याचा अर्थ तुम्ही लंडनमधील एका महत्वाच्या स्टेशनमध्ये पोहोचला आहात. या पुढील मार्गक्रमणा “ट्यूब” ने करायची आहे. लंडन मधील भुयारी रेल्वेला येथे “ट्यूब” किंवा “Under Ground” म्हणतात.

बाजूच्या चित्रात दाखविल्या प्रमाणे बोगद्याचा आकार ट्यूब सारखा असल्यानेच तिला ट्यूब म्हणतात. गमतीचा भाग म्हणजे ह्या भुयारी रेल्वेचा 55-60% भाग जमिनीवर आहे!!! या रेल्वेचा प्रवास फारच आरामदाई आणि सुखकर. पोटातले पाणी  हालत नाही आणि इत्छित स्थळी कधी पोहोचलो हे उद्घोषणा होईपर्यंत संकट नाही. जगात कुठेही ज्या प्रमाणे महिलांना सरसकट आरक्षण (अपवाद: अर्थातच भारत) नसते तसेच येथेही नाही. आरक्षण फक्त अपंग, जेष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना. अपंग व्यक्तींना जर अजिबात चालता येत नसेल आणि व्हील चेयरनेच प्रवास करता येत असला तरी त्यांचे काही अडत नाही. ज्या स्टेशन पासून ती व्यक्ती प्रवास करीत आहे त्यांनी फक्त उतरण्याच्या स्टेशनचे नाव सांगायचे. त्या स्टेशन वर एक व्यक्ती त्याला डब्यातून उतरवून घ्यायला उभा असते!

यू के तील ट्रेन चा प्रवास हा युरोपमधील कुठल्याही ट्रेन च्या प्रवासापेक्षा प्रचंड महाग आहे. तेथील एका वृत्तपत्राच्या सर्वेक्षणांनुसार पॅरिस मधील ट्रेन ही यू के पेक्षा 5 पट स्वस्त आहे. यावरून कल्पना येऊ शकेल. मध्यम वर्गीय आणि आणि त्यांच्या खालील लोकांच्या आवाक्याबाहेरील ही गोष्ट झाली आहे. एका बाजूला Public Transport ला पाठिंबा द्यायचा आणि दुसर्‍या बाजूला इतकी महाग की सामान्यांचे जिणे अवघड झाले आहे. आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरण याची की फळे आहेत. लंडन बाहेरून लंडन मध्ये ट्रेनने यायचे म्हटले तर कमीत कमी 15 ते 20 पौंडचा खर्च पडतो. Return तिकीट काढले तरच स्वस्त. मग ओस्टर कार्ड, डे कार्ड, दोन मोठ्यांच्या तिकीटावर 2 मुलांचा प्रवास फुकट असे मार्ग अभ्यास करून शोधावे लागतात. प्रश्न एवढाच आहे की 4 दिवसासाठी आलेल्या पर्यटकांना इतके मार्गदर्शन करणारे योगेश कुठे भेटणार?

जी कथा ट्रेनची तीच ट्यूबची. जगातील पहिली ट्यूब लंडन मध्ये सुरू झाली ते साधरान 150 वर्षांपूर्वी. त्यातही 1890 पासून पहिली वीजेवरची ट्यूब सुरू झाली. 270 स्टेशन आणि 402 किमी चे जाळे असलेली ट्यूब प्रचंड लोकप्रिय आहे. 2007 साली 1 अब्ज लोकांनी याचा वापर केला त्यावरून याची कल्पना येईल. या गर्दीमुळे युरोपमध्ये मॉस्को आणि पॅरिस याच्या नंतर लंडनचा क्रमांक लागतो. ट्यूबच्या जाळ्याचा नकाशा तर इतका अप्रतिम आहे की बस. जगातील अनेक रेल्वे प्रशासनांनी तो आधारभूत मानला आहे. बकरलू लाइन, सेंट्रल लाइन, सर्कल लाइन, डिस्ट्रिक्ट लाइन, हॅमरस्मिथ & सिटी लाइन, जुबिली लाइन, मेट्रोपॉलिटन लाइन, नॉरदन लाइन, पीकडली लाइन, विक्टोरिया लाइन, वॉटरलू & सिटि लाइन या लाइन्सने अक्खं लंडन पोखरून काढलं आहे. लंडनमधल्या सर्व लाइनी दाखवणारा एक सुबक व कल्पक रंगीत नकाशा मुक्तपणे सगळीकडे उपलब्ध असतो आणि प्रत्येक स्टेशनात रंगवलेला असतो. त्याची रचना इतकी सुंदर आहे की कोठलाही साक्षर माणूस तो नकाशा पाहून आपल्याला ज्या ठिकाणी जायचे असेल तिथे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग शोधून काढू शकतो. त्याला मदत करण्यासाठी अनेक यांत्रिक साधने देखील उपलब्ध असतात. स्टेशनात शिरल्याबरोबर कुठली लाईन कुठल्या प्लॅटफॉर्मवर मिळेल आणि ती ट्रेन कुठकुठल्या स्टेशनांना जाईल ही माहिती सुवाच्य अक्षरात आणि सहज दिसावी अशा ठिकाणी मिळते आणि ती पहात पहात प्रवाशाला इच्छित स्थळी पोचता येते. बटन दाबल्यावर तिकीट छापून देणारी यंत्रे लंडनला स्वयंचलित आहेत. त्यात मोठे नाणे टाकले तर उरलेले सुटे पैसे बाहेर येतात. आता बहुतेक लोक इंटरनेट व क्रेडिट कार्डाचाच वापर करत असल्याने पाहिजे ती तिकीटे इंटरनेटवर बुक करून क्रेडिट कार्ड वापरून त्याचा प्रिंटआउट घेता येतो. शहराच्या मध्यभागातले आंतले वर्तुळ किंवा बाह्य वर्तुळ यात सर्वत्र दिवसभर किंवा आठवडाभर चालू शकणारे पास काढायची सोय आहे.

लंडनची अंडरग्राउंड मेट्रो किंवा तिथल्या बोलीभाषेत 'ट्यूब' ची व्यवस्था ही एक अद्भुत वाटणारी गोष्ट आहे. मुंबईत वर्षानवर्षे राहणारे लोकसुद्धा इथल्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, तिची मेन लाईन , हार्बर लाईन वगैरेमध्ये गफलत करतांना दिसतात. लंडनला तब्बल डशनभर लाइनी आहेत. त्या प्रत्येक लाइनीला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यांना आपापली नांवे असली तरी त्या त्यांच्या रंगानेच जास्त ओळखल्या जातात. लंडनच्या मध्यवर्ती भागातून यातल्या बहुतेक सगळ्या लाइनी जातात. त्यामुळे अनेक स्टेशनात दोन किंवा तीन लाइनी मिळतात. अनंत जागी त्या एकमेकींना छेद देतात. पण त्यांचे रूळ जमीनीखाली वेगवेगळ्या स्तरांवर असल्यामुळे प्रत्यक्षात त्या एकमेकींना कुठेच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे सांधे जोडायची किंवा बदलायची गरज नसते. प्रत्येक रंगाच्या लाइनीवरून लोकल गाड्या एकापाठोपाठ धांवत असतात. त्यांना कसलाच अडथळा नसतो. ज्याला लंडनच्या ट्यूबचा नकाशा नीट वाचता आला त्याला लंडनमध्ये कुठेही अडणार नाही. सुरूवातीला नॉर्थ बाऊंड आणि साऊथ बाऊंड, नॉरदन लाइन वगैरे नावे गोंधळात टाकतात पण एकदा समजले की त्याच्यासारखी मजा नाही. ट्यूब पहिली की मुंबईच्या लोकलची आठवण होते. तीच गर्दी फक्त रेटारेटी किंवा ढकलाढकली नाही. तीच पायाची वेगवान हालचाल पण चेंगारा चेंगरी नाही. सकाळी 7.51 ची ट्यूब पकडून ऑफिसला जायची तीच धावपळ. महिन्याचा पास काढून पळत पळत ट्यूब पकडायची तीच घाई. गमतीचा भाग म्हणजे काही महाभाग सरकत्या जिन्यावरूनही धावत जातात. अशा ‘घाईला’ आलेल्या लोकांसाठी सरकत्या जिन्याची एक लेन मोकळी ठेवली लागते. ऑफिसच्या वेळेपूर्वी आणि ऑफिस सुटल्यावर (Peak Hours)तर ट्यूब मध्ये उभं राहायलाही जागा कशीबशी मिळते. Peak Hours मध्ये ट्यूब आणि ट्रेन चे भाडे ही Off Peak Hours पेक्षा जास्त असते. ट्यूब 15 मिनिटपेक्षा उशिरा आली तर प्रवाशांना नुकसान भरपाई देण्याची सोय केलेली आहे. दिवसाला 20 तास चालणार्‍या या ट्यूबमुळे लंडन च्या रस्त्यावरील रहदारीला मात्र काही प्रमाणात कमी करण्यास मदत केली आहे.

सध्या या ट्यूबच्या रूट मध्ये वाढ (Expantion) करायचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच अनेक स्टेशन मध्ये जुने जीने काढून सरकते जीने बसवणे, अपंग व्यक्तींसाठी रस्ते बनवणे ही कामे युद्ध पातळीवर चालू आहेत. 2020 पर्यन्त चे नियोजन झालेले आहे. ही सर्व कामे रात्री 11 नंतर आणि शनिवार - रविवार मध्ये केली जातात. याचा जोरदार फटका आम्हाला आम्ही विंबल्डन हून परत येताना बसला. एकतर तेथून आम्हाला निघायला आम्हाला 10 वाजले होते आणि विंबल्डन च्या मैदानापासून स्टेशन 2 मैल आहे. धावतपळत स्टेशन वर पोहोचतो तर वरील कारणासाठी ट्यूब बंद. योगेशने त्याचा सर्व अनुभव पणाला लावून अनेक combinations करत आम्हा रात्री 12 च्या आत शेवटच्या गाडीत बसवले आणि सर्वांना सुखरूप घरी आणले.

ट्रेन ची गर्दी कमी करायचे बरेच मार्ग अवलंबलेले आहेत. उदा. Peak Hours मध्ये Off Peak Hours ट्यूब आणि ट्रेन तिकीट चालतच नाही. त्यामुळे प्रयत्न केला तरी तसा प्रवास करता येत नाही. त्याशिवाय, गर्दीच्या वेळेला काही स्टेशन्स फक्त ट्रेन मधून उतरण्यासाठी तर काही ट्रेन मध्ये चढण्यासाठी नियोजित केलेली आहेत.

पुण्याप्रमाणे लंडन च्या PMT ला रस्ते खणून ठेवायची खोड आहे. फरक इतकाच की तेथे कोणीतरी खणलेल्या रस्त्यात काम करताना दिसते. रस्ते दुरूस्ती हा त्यांचा एक आवडीचा कार्यक्रम दिसतो. रस्त्यांचे डंबरीकरण ही थेट पावसात करताना मी या डोळ्यांनी पहिले आहे. (आपल्याकडून गोर्‍यांनी काही गोष्टी न्यायला नकोत का?)

फुटबॉल हा लंडनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लंडन परिसरात १४ व्यावसायिक फुटबॉल क्लब आहेत ज्यांपैकी आर्सेनल, चेल्सी, फुलहॅम, क्वीन्स पार्क रेंजर्स व टॉटेनहॅम हॉटस्पर हे पाच क्लब इंग्लिश प्रीमियर लीगचे सदस्य आहेत. १९२४ सालापासून इंग्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघाचे स्थान जुने वेंब्ली मैदान येथे राहिले आहे. २००७ साली हे स्टेडियम पाडून त्याच ठिकाणी ९०,००० प्रेक्षकक्षमता असलेले नवे वेंब्ली स्टेडियम उभारण्यात आले. रग्बी, क्रिकेट व टेनिस हे येथील इतर लोकप्रिय खेळ आहेत. लॉर्ड्स व ओव्हल ही क्रिकेट जगतातील दोन ऐतिहासिक व प्रतिष्ठेची मैदाने लंडन शहरातच स्थित आहेत. चार ग्रँड स्लॅममधील सर्वात मानाची मानली जाणारी विंबल्डन टेनिस स्पर्धा दरवर्षी जून-जुलै दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात खेळवली जाते.

लंडन शहर इंग्लंड व जगातील इतर शहरांसोबत हवाई, रेल्वे व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे. लंडन हीथ्रो विमानतळ हा युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठा विमानतळ व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. युरोस्टार ही चॅनल टनेलमधून धावणारी दृतगती रेल्वेसेवा लंडनला पॅरिस व ब्रसेल्स शहरांसोबत जोडते. लंडन शहरात एकूण १८ लांब पल्ल्याची रेल्वे स्थानके आहेत ज्यांद्वारे ब्रिटनमधील सर्व लहानमोठ्या शहरांचा रेल्वे प्रवास सुलभपणे शक्य होतो. 

लंडनने आजवर १९०८ व १९४८ ह्या दोन वेळा ऑलिंपिक खेळांचे आयोजन केले आहे. जुलै २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धा ऑलिंपिक मैदानात भरवल्या जातील. तीन वेळा ऑलिंपिक यजमानपदाचा बहुमान मिळवणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे. त्याचे Count down आम्ही असतानाच सुरू झाले.

लंडनचे हवामान हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. संपूर्ण अनिश्चितता या एकाच शब्दात याचे वर्णन करता येईल. येथे वर्षभर पाऊस पडतो. आणि दिवसाचे कोणत्याही वेळेला पडू शकतो. “श्रावण” महिन्यातील थोड्याफार हवामानाची आठवण करून देतो. पण एक मजा आहे. जर आपण दिवसभरासाठी घराबाहेर फिरणार असलो तर आपल्या तिन्ही ऋतूंचे कपडे बरोबर बाळगवे लागतात. पावसासाठी छत्री, उन्हासाठी टोपी आणि थंडीसाठी स्वेटर/जॅकेट. लंडन मध्ये दिवस दिवस फिरायची इच्छा असेल तर हे ओझे वागवायला शिकावे लागेल. इतक्या अनिश्चित हवामानावर मात करण्यासाठी UK वासी काही मागे नाहीत. हवामानाचा अत्यंत शास्त्रशुद्ध अभ्यास करून ही अनिश्चितता बर्‍याच प्रमाणात कमी करण्यात त्यांना यश आले आहे. वार्‍याची दिशा, वार्‍याचा वेग, ढग, पाऊस पडण्यायोग्य हवामान या सार्‍या गोष्टींचा त्यांनी इतका अभ्यास केला आहे की थक्क व्हायला होता. BBC पासून Metcheck अशा अनेक वेब साइट्स वर हवामानाची संपूर्ण माहिती प्रत्येक क्षणी दिली जाते. पुढच्या तासातील तापमान, वार्‍याची दिशा, वार्‍याचा वेग, वार्‍यामुळे कमी भासणारे तापमान, पावसाचे प्रमाण ही माहिती एरिया प्रमाणे दाखवली जाते. जवळ जवळ एक तासापासून 7 दिवसापर्यंतचा योग्य अंदाज येथे दिला जातो. लंडन मध्ये फिरायला जायचे तर या महितीचा अभ्यास करून जाणे केंव्हाही योग्यच. 7 दिवसाचे हवामान अंदाज साधारण 50-60 टक्के बरोबर असतात तर एक किंवा दोन दिवसाचे अंदाज 90 टक्के योग्य ठरले आहेत हे मी अनुभवाने सांगतो.

उन्हाळ्यात लंडनचे तापमान खूपच छान असते. कमाल तापमान 20 ते 25 च्या दरम्यान तर किमान 10 ते 15 मध्ये. अगदीच जर Sunny Day असेल तर कधीतरी 29 पर्यन्त पोहोचले आहे. अधून मधून पाऊस आणि अशी हवा मग अजून काय पाहिजे? जगातले अवघे पर्यटक या साठीच उन्हाळ्यात UK ला येतात. जून ते सप्टेंबर हा येथील खरा पर्यटनाचा काळ. तसेतर येथे वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. हिवाळ्यात मात्र येथील हवामान वाईट असते. बोचरी थंडी, झोंबणारे वारे, मधूनच होणारी हिमवृष्टी यामुळे हिवाळा नकोसा असतो. 2 मिनिटाकरता बाहेर पडायचा पण त्यासाठी अर्धा तास वेगवेगळे कपडे अंगावर चढवायची शिक्षा. त्यात पाऊस आला तर अजूनच त्रास. वाईट हवामानामुळे रस्त्यावरील वाहतूक हळू हळू असते कारण अपघात होण्याची भीती.

लंडन ओपन टॉप बस:
लंडन जर पहिल्यांदा जाणार असाल तर लंडन पाहण्यासाठी ओपन टॉप बस अतिशय उपयुक्त. “The Original Tour of London”, “The Big Bus Tour” अशा काही बस टूर आपल्याला लंडनची सहल घडवतात. नवीन व्यक्तींना एकतर गाव नवीन, त्यात रस्ते माहीत नसतात.



त्यांच्यासाठी ही खूपच चांगली सोय आहे. या बस चे तिकीट 24 तासांसाठी चालते आणि सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्या लंडन मध्ये फिरत असतात. लंडन शहरातल्या जुन्या व नव्या इमारती, रस्ते, चौक, मैदाने, नदीचे पात्र, किनारा, इत्यादींचे बसल्या जागेवरून सम्यक दर्शन घेत त्या वातावरणात विरघळून जाण्यासाठी तिथल्या ओपन टॉप बसेसची छान सोय आहे. दीड दोन तासाच्या प्रवासात वळसे घेत घेत त्या लंडनच्या मध्यवर्ती भागातून फिरत असतात. त्याचेही लाल, हिरवा, निळा, पिवळा अशा रंगांचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला प्रत्येक मार्ग हा क्लोज्ड लूप आहे. त्याला कोठे सुरुवात नाही आणि शेवट नाही. एकदा तिकीट काढले की त्या मार्गावरून जाणा-या कोठल्याही बसमध्ये कोठल्याही स्टॉपवर उतरता येते, त्याच किंवा दुस-या स्टॉपवर पुन्हा चढता येते किंवा एका जागेवर बसून राहता येते. याला “हॉप ऑन, हॉप ऑफ” म्हणतात. आपल्याला वाटेल त्या जागी उतरावे, तिथल्या परिसरात हिंडून फिरून घ्यावे, खावे प्यावे, खरेदी करावी आणि पुन्हा त्या थांब्यावर यावे. दर पंधरा वीस मिनिटात मागची बस येतेच. सगळीकडेच उतारू चढत व उतरत असल्यामुळे तिच्यात जागा मिळते. मात्र हा प्रवास एकाच दिशेने चालत असतो. मागच्या स्टॉपवर पुन्हा जावेसे वाटले तर उलट दिशेने जाणारी बस नसते. पहिल्यांदाच लंडनला गेलेल्या माणसाने ठिकणणाचे बसमधूनच दर्शन घेतले तर आपल्या आवडीची स्थळे कोणती आणि ती कुठे आहेत याचा अंदाज त्याला येतो आणि नंतर त्या जागी निवांतपणे जायला त्याचा उपयोग होतो.

या बसमध्ये चालत असलेली कॉमेंटरी खूपच मजेदार असते. आजूबाजूला दिसत असलेल्या दृष्यांची मनोरंजक माहिती ते निवेदक अगदी हंसत खेळत देतात. रुक्ष आंकडेवारी न सांगता गंमतीमध्ये ती सांगण्याचे एक उदाहरण अजून लक्षात राहिले आहे. सुप्रसिद्ध बिग बेन घड्याळाबद्दल तिने सांगितले, "या घड्याळाचा लहान कांटा आपल्या बसपेक्षा थोडा मोठा आहे." ट्राफल्गार स्क्वेअर, टॉवर ऑफ लंडन, वेस्टमिन्स्टर, बकिंगहॅम पॅलेस, हाईड पार्क, मार्बल आर्च आदि हत्वाच्या जागा दाखवता दाखवता त्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी चुरचुरीत शैलीमध्ये ती सांगत असते. काही रूट वर निवेदक असतात तर काही वर हेड फोन लावून माहिती रेकोर्डेड सांगितली जाते. लंडनला कडक ऊन असे कधी नसतेच. पावसाने कृपा करून विश्रांती घेतली असेल, पुरेसे कपडे अंगावर असतील आणि बोचरा वारा सहन करण्याची तयारी असेल तर नक्की डेकवरच बसावे म्हणजे दोन्ही बाजूंना छान दूरवर पाहता येते. खाली बसणा-या लोकांना फक्त खिडकीबाहेर जेवढे दिसेल तेवढेच दिसते. दोन्ही जागी कॉमेंटरी एकू येतेच. ज्यांना फ्रेंच, जर्मन असल्या युरोपियन भाषेतून कॉमेंटरी ऐकायची असते त्यांना खास हेडफोन दिले जातात, त्यावर टेप केलेली कॉमेंटरी ऐकू येते. आपण वेगवेगळ्या जागा निवांतपणे पाहिलेल्या असल्या तरी या कॉमेंटरीसाठी पुन्हा एकदा या ओपन टॉप बसने प्रवास करून पहावा.

इथे एक छोटासा सल्ला देतो. ओपन टॉप बस चे तिकीट काढताना नेहमी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान काढावे. याचे कारण हे तिकीट 24 तास चालत असल्याने दुसर्‍या दिवशी त्या वेळेपर्यंत चालते. पहिल्या दिवशी ट्राफल्गार स्क्वेअर आणि National Gallery अशी ठिकाणे सकाळच्या वेळात पाहून जेवण करून या बसमध्ये बसावे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फिरून घ्यावे. दुसर्‍या दिवशी परत 9 पासून बसमध्ये. दुपारी जेवायच्या वेळेला आपण न पाहिलेल्या एखाद्या नवीन ठिकाणी ती बस सोडायची आणि ते ठिकाण पाहून घ्यायचे !!! यात पहिल्या दिवशी लाल रूट तर दुसर्‍या दिवशी निळा आणि पिवळा रूट बसमधून फिरलात तर खूप मोठा परिसर एका तिकिटात पाहून घेता येईल.

विंबल्डन/ विंबल्डन टेनिस स्पर्धा:“द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन” ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची प्रतियोगिता आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा संपली की, वेध लागतात ते या स्पर्धेचे. अवघं टेनिसविश्व या स्पर्धेची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतं. प्रत्येक टेनिसपटूचे या स्पर्धेत खेळण्याचं आणि ठसा उमटविण्याचं स्वप्न असतं. यंदा विंबल्डन स्पर्धेचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष (125 वे वर्ष) असल्याने फारच विशेष. विंबल्डन ह्या लंडन शहराच्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही प्रतियोगिता १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजूनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.


मी जेव्हा UK जाण्याचे निश्चित केले तेव्हा खरं सांगतो, मी विंबल्डनच्या तारखा जुळतात का ते पाहत होतो आणि जुळल्या की... जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलै च्या पहिल्या आठवड्यात ही स्पर्धा गेली अनेक दशके खेळली जात आहे. अगदी लहानपणी दूरदर्शन वर “क्रीडाविश्व” नावाचा एक कार्यक्रम होता. (तेव्हा फक्त दूरदर्शनच होतं आणि आम्ही किलबिल पासून कामगार विश्व आणि छायागीत पासून बातम्या पर्यन्त सगळं पहायचो... असे दिवस) त्या कार्यक्रमात चंद्रशेखर संत यांनी एक प्रश्न विचारला होता. विंबल्डन आणि लंडन या गावांचा काही संबंध आहे का? तेव्हा दुसर्‍या व्यक्तीने “नाही” असे ठोकून उत्तर दिले होते !!! असो. तर विंबल्डन हे लंडन मधील एक छोटेसे गाव असून विंबल्डन नावाचे रेल्वे स्थानकही आहे. जसा सोलापूरला गड्याची जत्रा संक्रांतीच्या वेळेला भरते त्यावेळेला तो सगळा परिसर त्या दिवसात तयारीला लागतो आणि फुलून निघतो. तद्वत, जून आणि जुलै मध्ये विंबल्डन स्पर्धेदरम्यान फुलून जाते. या वर्षी विंबल्डनचे 125 वे वर्ष असल्याने फारच विशेष.


विंबल्डनला सामने पहायचे तर बरेच पर्याय आहेत. काही महाग तर काही स्वस्त. सर्वात महाग पर्याय म्हणजे आपल्याला हव्या त्या सामन्याचे तिकीट आधी काढून सामन्याच्या आधी रांगेत जाऊन उभे राहणे. येथे नमूद करायला हवे की विंबल्डनमध्ये एकूण 20 कोर्ट आहेत. त्यातील फक्त 4 कोर्ट ना त्या त्या कोर्टचे तिकीट असते. विंबल्डन परिसरात प्रवेश करण्यासाठी एक तिकीट असते ज्यामुळे आपण विंबल्डन सामन्यांच्या परिसरात हिंडू फिरू शकतो, तेथील म्युझियम, खाण्याची ठिकाणे आणि इतर ठिकाणी प्रवेश आहे. तसेच कोर्ट क्रमांक 4 पासून 19 पर्यन्त कोठेही जाऊन सामना पाहता येतो. या तिकीटाची किम्मत साधारण 20 पाउंड असते. संध्याकाळी 6 नंतर हेच तिकीट 14 पाउंड ला मिळते. सेंटर कोर्ट, कोर्ट क्रमांक 1, 2 आणि 3 या कोर्ट ना तिकीट साधारण 40 पाउंड ते 120 पाउंड असते. हे तिकीट जशी स्पर्धा सुरुवातीपासून शेवटाकडे जाते त्या गतीने वाढत जाते. हे सारे दर मी विंबल्डन च्या वेब साईट वरुन घेतलेले आहेत. काळ्या बाजारातील दर या पेक्षा फारच चढे असतात. 5 वर्षाखालील मुलांना कोर्ट मध्ये प्रवेश नाही हे जाता जाता सांगायला हवे.


आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की आम्ही विंबल्डनच्या प्रेमापोटी एवढे पैसे (पाउंड) खर्च केले का? तर मुळीच नाही. विंबल्डन मध्ये अजून एक पर्याय आहे तो म्हणजे Resale. मुळात विंबल्डनचे तिकीट हे एका सामन्यासाठी नसून संपूर्ण दिवसासाठी असते. म्हणजे रोज समजा सामने सकाळी 11 वाजता सुरू होत असतील तर संध्याकाळी सामने संपेपर्यंत त्या कोर्ट वरील सामने आपण पाहू शकतो. (थोडक्यात सिनेमाच्या तिकीटासारखे त्या त्या सामन्याचे तिकीट नसते.) अनेक मंडळी आपल्या आवडीच्या खेळाडूचा सामना पाहून परत जातात. अशा व्यक्तींची तिकिटे विंबल्डन पुन्हा नवीन प्रेक्षकांना कमी दरात विकते, त्याला Resale म्हणतात. या तिकीटाची किम्मत मात्र 5 पाउंड असते. आम्ही हाच पर्याय निवडला. सकाळी ट्रेनने विंबल्डन स्टेशन ला पोहोचलो. तेथून चालत चालत विंबल्डनच्या सामन्यांच्या ठिकाणी पोहोचलो. साधारण 12 वाजले असतील. आम्ही विंबल्डन परिसराचे तिकीट काढायच्या रांगेत उभे राहिलो. रांगेत उभे राहताना तेथील स्वयंसेवकांनी एक क्रमांक दिला. तो होता 11558. विचारलं तर म्हणाले, तुमच्या पुढे एवढी मंडळी आज उभी आहेत !!! विंबल्डन परिसरात एका वेळेस 8000 मंडळी सामावू शकतात. जशी जशी लोक तेथून बाहेर पडतात, तसे तसे या रांगेतील लोक आत सोडतात. या हिशोबाने आत प्रवेश करायला 7 वाजतील असा त्यांनी अंदाज दिला. आम्ही मग रांगेतच जेवण, आराम, वामकुक्षी, गप्पा, पेपर वाचन, विमाने पाहणे असा वेळ घालवत तेथील गवतावर पडून होतो. तेथून जवळच काही तंबू लावलेले होते. त्या तंबूतील मंडळी तर गुरुवार पासून तंबूमध्ये मुक्कामाला होती आणि त्यांना सोमवारच्या उप उपांत्य सामन्याची विंबल्डन परिसरातील प्रवेशाची तिकिटे हवी होती ! किती उत्साह पहा....

स्वयंसेवकांनी दिलेला अंदाज एकदम बरोबर ठरला. 11558 लोकांची असलेली ही भलीमोठी रांग अखेर संपली आणि 7 वाजता विंबल्डन परिसरात प्रवेश केला. Resale च्या तिकितीच्या रांगेत उभे राहून सेंटर कोर्ट आणि कोर्ट 1 ची 2-2 तिकिटे मिळवली आणि धावत पळत कोर्ट मध्ये प्रवेश मिळवला! सेंटर कोर्ट वर जोकोविच आणि बगदादिस यांच्यात सामना चालू होता. सेंटर कोर्ट वरील वातावरण म्हणजे खरीखर Electrifying..... शब्दात वर्णन करता येणे केवळ अशक्य. साधारण तुलना अगदी करायचीच झाली तर कोलकताच्या इडन गार्डनची किंवा मुंबई च्या वानखेडेला भारताच्या क्रिकेट सामन्याची देता येईल. एकतर कोर्ट वरती प्रवेश फक्त सेट मधील विश्रांतीच्या दरम्यान असतो. ‘कधीही या कधीही जा’ असा प्रकार नाही. तसेच फ्लॅश फोटोग्राफी करायला गेम चालू असताना परवानगी नाही. सेंटर कोर्ट वर आम्हाला वेडंच व्हायला झालं. ज्या खेळाडूंना फक्त दूरचित्रवाणी वर किंवा पेपर मध्ये पाहिले त्यांचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे.... गेम चालू असताना प्रेक्षागृहातील संपूर्ण शांतता, इंग्रजांची त्या बाबतीतील शिस्त वाखाडण्याजोगी. व्होली चालू असताना घुमणारा तो बॉलचा ‘टॉक’, ‘टॉक’ असा आवाज... खेळाडूंचे कोर्ट वरील पदलालित्य, नेट जवळ झोकून मारलेले शोट्स, ड्रॉप, पॉइंट जिंकताना वा हरतानाचा चित्कार आणि आवेश, सारे काही अनुभवायला मिळाले. सेंटर कोर्ट वरील रॉयल बॉक्स, तेथील प्रतिष्ठित मंडळी, प्रेक्षकांनी खेळाडूंचा वाढवलेला उत्साह. सारंच अलौकिक.
कोर्ट 1, 2 आणि 3 ही त्यामानाने कमी प्रेक्षक संख्या असलेली आहेत. सिडेड खेळाडू नसलेल्यांचे सामने या कोर्ट वर किंवा इतर कोर्ट वर होतात. काही वेळा अनेक सिडेड खेळाडूंचे सामने एकाच दिवशी असतील तर काही सिडेड खेळाडूंनाही कोर्ट 1 आणि 2 वर खेळावे लागते. अशा वेळेत तेथील प्रेक्षकांना लॉटरी च लागते. कमी तिकीटामद्धे चांगले सामने पाहायला मिळतात. बाकीची कोर्ट त्यामानणे फारच कमी प्रेक्षक संख्या असलेली असतात. फक्त 50 ते 100 प्रेक्षक बसतील एवढीच जागा असते. तेथे म्हणजे ”उरका पाडा” हा उद्देश आयोजकांचा असतो. खेळाडू, बॉल बॉइज, लाइनमन, स्कोअरर, अंपायर आणि थोडेफार प्रेक्षक एवढेच जण त्या सामन्यामध्ये भाग घेतात. (“पापी पेट का सवाल है, भाई”). प्रेक्षक असोत अगर नसोत, तेथील गिरणी कायम चालू असते. सिडेड खेळाडू नसलेल्यांचे सामने, जुनीयर चे सामने, डबल्स, अपंग खेळाडू असे अनेक सामने या कोर्टवर होतात. ज्यांना मनमुराद टेनिस पहायचे आहे त्यांनी या कोर्ट वरच मुक्काम करावा. सगळे नवीन आणि लहान खेळाडू हे अशाच प्रकारे वर आलेले आहेत.

सुदैवाने आम्ही विंबल्डनला होतो त्या दिवशी अजिबात पाऊस आला नाही. नाहीतर विंबल्डन आणि पाऊस यांचे फार जिव्हाळ्याचे नाते आहे. अगदी आतापर्यंत विंबल्डनच्या कोर्टना छत नव्हते. ते आताशी सेंटर कोर्टला आले आहे आणि तेही काढता येण्याजोगे. बाकी सारी कोर्ट विनाछतच आहेत. पाऊस आला की खेळ थांबवून खेळाडू पळत पळत ड्रेसिंग रूम गाठतात. एकाच सामन्यात हा प्रकार कितीही वेळा होऊ शकतो. सेंटर कोर्ट वर छत झाल्याने आता तसा प्रश्न नाही. मुख्य कल हा स्वच्छ सूर्यप्रकाशात खेळ होणे यावर असतो. दिवसाची सुरुवात तशाच पद्धतीने होते. जर पाऊस आलाच तर काही क्षण खेळ थांबवून छत ओढले जाते. त्यातही नियम असा की, एकदा छत ओढले की सामना संपेपर्यंत छत काढायचे नाही. अगदी ऊन पडले तरीही.

विंबल्डन ची हिरवळ ही काय जादू आहे हे तिथे गेल्यावरच कळते. अतिशय सुंदर सांभाळलेले कोर्ट्स, त्यावरील हिरवळ, सुंदर शिस्तबद्ध संयोजन, गेली 125 वर्षे पाळल्या जाणार्‍या परंपरा.

लंडन मधील प्रेक्षणीय स्थळे:
टॉवर ब्रिज: टॉवर ब्रिज हा लंडन शहरातील थेम्स नदीवरील एक ऐतिहासिक व प्रसिद्ध पुल आहे. ह्या पुलाच्या बांधकामाला १८८६ साली सुरुवात झाली व ३० जुन १८९४ रोजी पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
'टॉवर ब्रिज १९ व्या शतकाच्या अखेरीस थेम्स नदीतून चालणारी बोटींची ये जा अबाधित ठेवून रस्ते वाहतूक करण्यासाठी उभारण्यात आला. या पुलाचे बांधकाम सतत साठ वर्षे चालले. टॉवर ब्रिजचे उद्घाटन ३० जून १८९४ रोजी वेल्सच्या प्रिन्स व प्रिन्ससच्या शुभहस्ते झाले. आजमितीसही हा पुल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील तर, हा पूल मधून उघडून उभा केला जातो व बोट सुरळीतपणे निघून गेल्यावर



तो पुन्हा जोडला जाऊन त्यावरुन पुन्हा वाहतूक सुरु होते.  थेम्स नदीवरचा हा अनोखा पूल वर्षभरात साधारणपणे हजारवेळा उघड बंद केला जातो. हा पूल कधी उघडणार व कधी बंद होणार याची माहिती ४२ मीटर उंचीवरुन पूर्व व पश्चिम लंडनचे दृश्य पाहू शकतो तसेच, येथील व्हिक्टोरियन इंजिन रुमला भेट देऊ शकतो. पूल कसा उघडतो व बंद होतो हे येथेच समजते. या अजब पुलासाठी आजवर कधीही न वापरण्यात आलेल्या हायड्रॉलिक पॉवर क्षमतेचा वापर करण्यात आला आहे. हा पूल म्हणजे खरोखरंच मानवी चमत्कारच आहे.


टॉवर ऑफ लंडन:
थेम्स नदीच्या किनारी इ.स. १०७८ साली टॉवर ऑफ लंडन हा बऱ्याच छोट्या मोठ्या टॉवरनी बनलेला किल्ला बांधला आहे. हा किल्ला व्हाइट टॉवर म्हणूनही ओळखला जातो. ह्या किल्ल्याच्या अग्रभागी असणाऱ्या पांढऱ्या टॉवरवरून हि ओळख निर्माण झाली. हा किल्ला मुख्यत्त्वे तुरूंग म्हणून वापरला जायचा. इथे बऱ्य़ाच राजघराण्यातील व्यक्तिंना बंदिवान म्हणून ठेवल गेल, मृत्यूची शिक्षा दिली गेली, त्यांचा शिरच्छेद केला गेला. इथे छोटे मोठे एकूण २०-२१ टॉवर आहेत. तिथे सर्व किंमती दागिने ठेवले आहेत जे पूर्वीपासून राज्याभिषेकासाठी (कोरोनेशनसाठी) वापरले गेले आहेत. यामध्ये सर्व सोन्याचांदीची भांडी, हिऱ्य़ांचे दागिने, हिऱ्यामोत्यानी सजवलेली शाही तलवार असं बरंच काही.  ह्यामधे क्वीन मदरच्या क्राऊनमधे “कोहिनूर हिरा” आहे. मुकुटमणी असलेल्या या हि-याखेरीज
दोन हजार अन्य हिरे, माणके, पांचू आदि रत्नांनी हा मुकुट सजवलेला आहे. असे अनेक मुकुट या ठिकाणी आहेत, पण या मुकुटाची सर अन्य कोणाला नाही. जगातला पहिला सापडलेला सर्वात मोठा कलिनल १ हिरा ज्याला फर्स्ट स्टार ऑफ आफ्रिका म्हटलं जात आणि जो सध्या शाही सेप्टर मधे बंदिस्त आहे. अशा सगळ्या अगणित किंमती हिऱ्य़ांना बघून, आणि खरंतर आपल्या भारताच्या (जो आता भारताचा नाही राहिला) कोहिनूर मुळे खरेच एके काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता हे पटते.
 

लंडन आय: लंडन आय हा लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा (जायंट व्हील/फेरिस व्हील) आहे. थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय हे युनायटेड किंग्डममधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ व लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी सुमारे ३५ लाख पर्यटक भेट देतात. १३५ मीटर उंचीचा हा पाळणा ३१ डिसेंबर १९९९ रोजी खुला करण्यात आला. ह्याच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी पाउंड इतका खर्च आला.

लंडन आय नांवाच्या प्रचंड चक्रात बसून लंडन शहराचे विहंगम दृष्य पाहता येते. चाळीस मजली गगनचुंबी इमारतींपेक्षासुद्धा उंचवर झोका घेणारे हे चक्र हळू हळू फिरत अर्ध्या तासात एक आवर्तन पूर्ण करते. सायकलच्या चाकाच्या आकाराचे हे चक्र बनवण्यासाठी सतराशे टन एवढे लोखंड वापरले गेले आहे. त्याला बत्तीस कॅपसूल्स जोडली आहेत आणि प्रत्येक कॅपसूलमध्ये पंचवीस प्रवासी बसू शकतात. अशा प्रकारे एका वेळेस चारशे पर्यटकांना घेऊन हे चक्र फिरत असते. चक्र हळूहळू फिरत असल्यामुळे ते चालू असतांना प्रवाशांना कॅपसूलमध्ये उठून हिंडतफिरत हवे ते दृष्य पाहता येते आणि त्याचे फोटो काढता येतात.


बिग बेन घड्याळ:
इंग्लंड या देशातील राजधानीच्या शहरातील जगप्रसिध्द घडयाळाचा मनोरा सर्वानाच ऐकून परिचित आहे. लंडन येथील वेस्टमिनिस्टर भागातील पार्लामेंट इमारतीच्या ईशान्य दिशेला असणार्‍या मनोर्‍यामध्ये मोठे घडयाळ बसविले आहे. हा घडयाळ मनोरा 'बिग बेन' या नावाने प्रसिध्द आहे. परंतु गंमतीची गोष्ट म्हणजे या घडयाळाच्या मुख्य घंटेचे नाव 'बिग बेन' असे आहे. वेस्टमिनिस्टरच्या जुन्या राजवाडयास १८३४ मध्ये आग लागली. नंतर नवीन राजवाडा बांधतांना त्यामध्ये क्र्लॉक टॉवरची रचना केली गेली. व्हिक्टोरियन गॉथिक पध्दतीने या मनोर्‍याचे बांधकाम केले गेले असून, त्याची उंची ९६.३ मीटर्स आहे. ६१ मीटर उंचीपर्यंत असलेला मनोरा विटांनी बांधलेला असून, उर्वरित मनोरा लोखंडी चौकटीत केलेला आहे.
मनोरा १५ द १५ मीटर असून, त्याच्या भाषांतरांवरूनं भिंतीची जाडी ३ मीटर आहे. चारही बाजूंची घडयाळे ५५ मीटर उंचीवर असून, या घडयाळांची रचना १८५४ मध्ये केली गेली. मनोर्‍याचे बांधकाम १८५८ साली पूर्ण झाले व हे घडयाळ ७ सप्टेंबर १८५९ रोजी प्रत्यक्षात सुरु झाले.

या बिगबेन घडयाळातील तासकाटा ९ फूट लांब व मिनिटकाटा १४ फूट लांब आहे. बिगबेन ही मुख्य घंटा १३ टन एवढया वजनाची असून २.२ मीटर उंच आहे. अ‍ॅलेन ब्रॅडली या क्लॉक टॉवरचे बांधकाम होण्यापूर्वी लंडनमधील बिगबेन क्लॉक टॉवर हेच सर्वात मोठे घडयाळ होते. परंतु अ‍ॅलन ब्रॅडलीमध्ये घंटा बसविलेल्या नाहित आणि फक्त याच कारणामुळे आजही चारही दिशांना तोंड असणारे तसेच घंटानाद करणारे जगातील सर्वात मोठे घडयाळ म्हणून बिग बेन क्लॉकच ओळखली जाते. लंडनमधील हे आश्चर्यकारक घडयाळ पाहण्यास परदेशी पाहुण्यांची प्रचंड र्वदळ असते.
लंडनमधील वेटमिनिस्टर येथील पार्लमेंट इमारतीतील इशान्येला असणार्‍या मनोर्‍यामध्ये घडयाळ बसविले आहे. यालाच क्लॉक टॉवर म्हणूनही ओळखले जाते. हे क्लॉक टॉवर बिग बेन या नावानेही प्रसिद्ध आहे. पण प्रत्यक्षात या घडाळयाच्या मुख्य घंटेचे नाव बिग बेन आहे. काही वेळा याला सेंट स्टिफनचा मनोरा असेही संबोधले जाते. वेटमिनिस्टरच्या जुन्या राजवाडयाचे १६ ऑक्टोबर १८३४ च्या रात्री आग लागून अतिशय नुकसान झाले. नंतर नवीन राजवाडा बांधतांना त्यामध्ये क्लॉक टॉवरची रचना केली गेली. हा मनोरा व्हिक्टोरीयन गॉथिक पद्धतीने बांधलेला असून, त्याची उंची ९६.३ मीटर आहे. मनोर्‍याचे ६१.० मीटर उंचीपर्यंत वीट बांधकाम केलेले आहे आणि त्यावरील मनोरा लोखंडी चौकटीत केलेला आहे. मनोरा १५ मीटर बाय १५ मीटर असून याच्या ३.० मीटर जाडीच्या भिंती आहेत. चारही बाजूंची घडयाळ जमिनीपासून ५५.० मीटर उंचीवर आहेत. या घडयाळाची रचना इ.स. १८५४ मध्ये करून झाली होती. परतंु मनोर्‍याचे बांधकाम इ.स. १८५८ पर्यंत सुरू होते. हे घडयाळ ७ सप्टेंबर १८५९ रोजी सुरू झाले.

बकिंगहॅम पॅलेस :
 हे राणीचे निवासस्थान. बकिंगहॅम पॅलेसांत तब्बल सात आठशे खोल्या आहेत. त्यातल्या अत्यंत सुरक्षित आणि निवांत भागात राजपरिवाराचे वास्तव्य असते. त्यांना हवे ते तत्क्षणी आणून देण्यासाठी सेवकांचा ताफा सज्ज असतो. राजवाड्याच्या इतर भागांत वेगवेगळी कार्यालये आणि दिवाणखाने आहेत, तसेच पाहुण्यांची आणि नोकर चाकरांची व्यवस्था होते. निरनिराळ्या प्रसंगानुसार तिथे होणा-या मेजवान्यांमध्ये दर वर्षी पन्नास हजाराहून अधिक लोक सहभागी होतात. त्यातल्या अगदी खास प्रसंगी बोलावल्या गेलेल्या मोजक्या लोकांनाच प्रत्यक्ष राणीला पहायला मिळते.

बकिंगहॅम पॅलेसच्या एका गेटासमोर पुरातन वेषातले रखवालदार घोड्यावर स्वार होऊन बसलेले असतात. हे रॉयल गार्डस या ठिकाणी शोभेसाठी असले तरी ते खरोखरचे सैनिक असतात. नियमितपणे कवाईत करून त्यांनी उत्कृष्ट शरीरसंपदा कमावलेली आणि राखलेली असते. पण ते इतके निश्चल असतात की त्यांच्या डोळ्य़ाची पापणी देखील हलत नाही. अशा प्रकारची समाधी लावल्याने काय साध्य होत असेल? तिकडे मादाम तुसाद म्यूजियममध्ये सजीव माणसासारखे भासणारे मेणाचे पुतळे ठेवले आहेत आणि इथे तडफदार जीवंत सैनिक पुतळ्यासारखे स्तब्ध असतात. या साहेब लोकांचे आपल्याला तर कांही कळतच नाही! या गार्डांची पाळी ठरलेली असते. ठराविक वेळेस ते बदलले जातात. त्याचाही साग्रसंगीत समारंभ असतो. त्यात या सैनिकांची परेड पहायला मिळते. ती पाहण्यासाठी इथे खूप मोठी गर्दी जमते.

आम्ही त्या बाबतीत खूप नशीबवान ठरलो. बकिंगहॅम पॅलेसच्या गेटसमोर आम्ही थांबलेलो असताना अचानक राणीची गाडी आमच्यासमोरुन पॅलेसच्या आत गेली. खालील फोटो मध्ये पुढील गाडीत राणी आम्हाला पाहायला मिळाली !!! काही क्षणच पण इंग्लडच्या राणीचे ओझरते का होईना पण प्रत्यक्ष दर्शन घडले. इंग्लडवारी मधील तो एक पारमोच्च क्षण होता असे म्हणता येईल. त्यानंतर राणीबरोबर आम्ही मादाम तुसाद संग्रहालयात भरपूर फोटो काढले हा भाग वेगळा!

मादाम तुसाद लंडन:
मादाम तुसाद यांचे संग्रहालय हे लंडन शहराचे एक प्रमुख आकर्षण आहे. 'अनुपम', 'अद्वितीय' यासारखी विशेषणेसुद्धा त्याचे वर्णन करायला अपुरी पडतात. दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या मादाम तुसाद यांचे पूर्वीचे नांव मेरी ग्रोशोल्ज असे होते. मेणाचे मुखवटे आणि पुतळे तयार करण्याची कला त्यांनी डॉ.फिलिप कर्टियस यांच्याकडून शिकून घेतली. त्यांचे स्वतःचे कौशल्य आणि कल्पकता यांच्या जोरावर या कलेत त्या पारंगत झाल्या. अनेक तत्कालीन थोर व्यक्तींचे हुबेहूब मेणाचे पुतळे त्या दोघांनी मिळून बनवले आणि त्यांचे प्रदर्शन मांडले. त्या काळात सिनेमा व टेलिव्हिजन नसल्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींचे चेहेरे पाहण्याचे साधन नव्हते. ते कसे दिसतात याचे कुतुहल सर्वसाधारण लोकांच्या मनात असायचे, पण थोरामोठ्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध येऊ शकत नसे. यामुळे या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहाला भेट देऊन ते आपली औत्सुक्याची तहान भागवून घेत असत. मेरीच्या कौशल्याची कीर्ती फ्रान्सच्या राजवाड्यापर्यंत पोचली आणि राजघराण्यातील

व्यक्तींच्या प्रतिमा तयार करण्याचे काम तिला मिळाले. त्याच काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्यात ज्यांचा शिरच्छेद झाला होता अशा व्यक्तींच्या चेहे-यांचे मुखवटे बनवण्याचे काम तिला देण्यात आले. त्यासाठी मुडद्यांचे ढीग उपसून त्यातून ओळखीचे चेहेरे शोधून काढण्याचे भयानक काम तिला करावे लागले. राज्यक्रांतीनंतर सुरू झलेल्या अराजकाच्या काळात या दिव्यातून जात असतांना तिलाच अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. मेरीचाही गिलोटीनवर शिरच्छेद होणार होता. पण कोणा दयाळू माणसाच्या कृपेने ती कशीबशी तिथून निसटली. तुसाद नांवाच्या गृहस्थाबरोबर विवाह करून तिने संसार थाटला. त्यानंतरही तिच्या अंतरीची कलेची ओढ तिला नवनव्या कलाकृती बनवण्याला उद्युक्त करत होती आणि डॉ.कर्टिस यांच्या निधनानंतर त्यांचे सारे भांडार तिच्या ताब्यात आले होते.

फ्रान्समधील अस्थिर वातावरणापासून दूर ब्रिटनमध्ये जाऊन आपल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन करायचे तिने ठरवले. त्यासाठी ती तिथे गांवोगांव हिंडत होती. एवढ्यात फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात युद्ध जुंपल्यामुळे तिचा परतीचा मार्ग बंद झाला. अखेरीस ती लंडनमध्येच स्थाईक झाली आणि तिथे तिने कायम स्वरूपाचे प्रदर्शन भरवले. हे प्रदर्शन इतके लोकप्रिय झाले की मादाम तुसादच्या निधनानंतरदेखील नवे कलाकार तिथे येत राहिले, मेणाच्या बाहुल्या बनवण्याचे तंत्र शिकून त्या प्रदर्शनात भर घालत राहिले. मादाम तुसाद हयात असतांनाच एकदा त्यांच्या कलाकृतीसकट त्यांची बोट बुडाली होती. नंतरच्या काळात एकदा त्यातले अनेक पुतळे आगीत जळून खाक झाले होते आणि दुस-या महायुद्धात झालेल्या बॉंबहल्यात या प्रदर्शनाची इमारत उध्वस्त झाली होती. अशा प्रकारच्या संकटातून हे प्रदर्शन पुन्हा पुन्हा सावरले. नष्ट होऊन गेलेल्या पुतळ्यांच्या जागी त्यांच्या प्रतिकृती तयार करून उभ्या केल्या गेल्या आणि त्यांत नवी भर पडत राहिली.


या प्रदर्शनातले बहुतेक सर्व पुतळे मानवी आहेत आणि पूर्णाकृती आहेत. रस्त्यांमधल्य़ा चौकात उभे केले जाणारे पुतळे आकाराने जास्तच भव्य असतात तर घरात ठेवल्या जाणा-या प्रतिमा लहान असतात. या प्रदर्शनातले पुतळे मात्र अत्यंत प्रमाणबद्ध आणि बरोबर आकाराचे आहेत. त्यामुळे ती खरोखरची माणसेच वाटतात. दगड किंवा धातूंना आकार देण्यासाठी जितके परिश्रम करावे लागतात त्या मानाने मऊ मेणाला हवा तसा आकार देणे सोपे असेल, पण त्यावर हुबेहूब माणसाच्या त्वचेसारख्या रंगछटा चढवणे, चेहे-यावर भाव आणणे वगैरे गोष्टी करतांना सगळे कौशल्य कसाला लागत असेल. ते करणा-या कारागीरांना विशेष प्रसिद्धीसुद्धा मिळत नाही. या प्रदर्शनात ठेवले गेलेले पुतळे फक्त त्या माणसाचे दर्शन घडवीत नाहीत. त्याची वेषभूषा, केशभूषा, त्याच्या अंगावरले अलंकार इत्यादी प्रत्येक गोष्ट अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह सादर केलेली असते. ते पुतळे असले तरी नुसतेच 'अटेन्शन'च्या पोजमध्ये 'स्टॅच्यू' झालेले नसतात. रोजच्या जीवनातल्या सहजसुंदर असा वेगवेगळ्या मुद्रांमध्ये ते उभे केले आहेत.

प्रदर्शनात अनेक दालने आहेत. कोठे ऐतिहासिक व्यक्ती आहेत. आठव्या हेन्रीसारखे जुन्या काळातील राजे आहेत तर चर्चिल व हिटलरसारख्या मागल्या शतकातील प्रसिद्ध लोक आहेत. आजच्या राणीसाहेबा त्यांचे पतिदेव व मुलेबाळे, लेकीसुनांसह या जागी उपस्थित आहेत. कुठे जगप्रसिद्ध नटनट्या आहेत तर कुठे खेळातल्या छानशा पोजमध्ये खेळाडू उभे आहेत. मादाम तुसादच्या संग्रहालयात पुतळा असणे हाच आजकाल प्रसिद्धीचा मानदंड झाला आहे. या सर्व दालनांत फोटो काढायला पूर्ण मुभा आहे. आपल्याला हव्या त्या महान व्यक्तीसोबत आपण आपला स्वतःचा फोटो काढून घेऊ शकता.
या प्रदर्शनात जशा प्रसिद्ध व्यक्ती आहेत तसेच सर्वसामान्य लोकांचे पुतळेसुद्धा मोठ्या संख्येने या पुतळ्यांच्या गर्दीत दिसतात. ते पुतळे इतक्या खुबीने ठेवले असतात आणि सारखे इकडून तिकडे हलवले जात असतात की ते पुतळे आहेत की ती खरीच माणसे आहेत असा संभ्रम निर्माण होतो. एखाद्या बाकड्यावर कोणी म्हातारा पेपर वाचत बसला आहे, हांतात कॅमेरा धरून कोणी फोटो काढत उभा आहे अशा प्रकारचे हे पुतळे आहेत.

कांही खास दालनांमध्ये विविध प्रकारची दृष्ये उभी केली आहेत. त्यात चांगलीही आहेत आणि बीभत्स देखील आहेत. भयप्रद तसेच फक्त प्रौढासाठी राखीव विभाग आहेत. प्रसिद्ध घनघोर युद्धप्रसंग, भयानक दरोडेखोराचा हल्ला, तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणा-या शारीरिक यमयातना वगैरेंची भीतीदायक चित्रे आपण अंधारातून पुढे जात असतांना अचानक दत्त म्हणून समोर उभी राहतात आणि आपली गाळण उडवतात. त्यासोबत कानठळ्या बसवणारे संगीताचे सूर असतातच. ते वातावरण अधिकच भयाण बनवतात.
म्यूजियम च्या अखेरीस एक टाईमट्रॅव्हलचा प्रयोग असतो. वळणावळणाने जाणा-या एका गाडीच्या अगदी पिटुकल्या डब्यात प्रत्येकी दोन दोन प्रेक्षकांना बसवले. ती गाडी एका अंधा-या गुहेतून थेट व्हिक्टोरिया राणीच्या काळातल्या लंडनमध्ये घेऊन गेली. दहा पंधरा मिनिटे त्या काळातले रस्ते, दुकाने, माणसे, त्यांचे पेहराव, त्यांचे रोजमर्राचे जीवन यांचे दर्शन घडवून ती गाडी पुन्हा आजच्या युगात घेऊन आली.

लॉर्डस क्रिकेट ग्राऊंड
"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा. इंग्लिश संघ तेवढा भारी राहिला नाही आणि गेल्या दशकात भारतीय संघ व बोर्ड सर्वात बलाढ्य झाले. १९९६ मधे शतक मारल्यावर रिची बेनॉला मुलाखत देताना अत्यंत बुजरा असलेला गांगुली २००२ मधे नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यावर तेथील व्हिझिटर्स गॅलरी मधे स्वतःचा शर्ट गरागरा फिरवत नाचला तेव्हा हा बदल सर्वात जास्त जाणवला. नेटवेस्ट ट्रॉफी भारताने जिंकली तेव्हा आधीच्या वर्षी मुंबईत फ्लिंटॉफने फिरवलेला शर्ट गांगुलीच्या डोक्यात असावा. पण तरीही "तुम्ही आमच्याकडे असे वागलात तर आम्हीही तुमच्याकडे असेच वागू" दाखवायला गांगुलीची हिंमत हवी.

पण तरीही लॉर्ड्सचे आकर्षण तसेच राहिले. मागच्या वीस पंचवीस वर्षातील बर्याच इमेजेस समोर येतात.. ८३ चा विजय, ८६ मधे वेंगसरकरने तेथील शतकाची केलेली हॅटट्रिक, ९० मधे गूचच्या त्रिशतकानंतर अझर चे सुंदर शतक व फॉलोऑन टाळायला २४ रन्स व दुसर्‍या बाजूला फक्त हिरवानी बाकी असताना कपिल ने मारलेल्या चार सिक्स, मग ९६ सालचे गांगुलीचे झालेले व द्रविडचे हुकलेले शतक हे भारतच्या मॅचेसमधले व मॅग्राथच्या २००५ मधल्या पहिल्या पाच विकेट्स यासारख्या इतरांच्याही. तसेच महत्त्व वाटते ते गावसकर ने नाकारलेल्या एमसीसीच्या मेम्बरशिपचे. सध्याच्या काळात एखाद्याने नाकारली तर त्याचे विशेष काही वाटणार नाही. पण ही गोष्ट आहे साधारण ८७-८८ च्या वेळची. टूरच्या वेळेस तो गाईडच सांगतो की ती मेम्बरशिप एवढी अवघड आहे की एखादा माणूस कॉलेजमधून बाहेर पडल्यावर प्रचंड पैसे खर्च करून मेम्बरशिप साठी अर्ज करतो आणि त्याच्या मुलाच्या लग्नाच्या सुमारास त्याला एमसीसी कडून पहिले उत्तर येते. वीस बावीस वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सगळी सूत्रे त्यांच्याकडे असताना गावसकर ने ते नाकारण्याचेही तेवढेच महत्त्व आहे. आपल्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांच्या विरूद्ध असे फार क्वचित केले जाते.

टूर संपल्यावर आपल्याला तेथील स्टोअर मधे जाऊन लॉर्ड्सचा लोगो असलेल्या गोष्टी घेता येतात. तसेच तेथील म्युझियम मधे फिरता येते. तेथे असलेल्या एका गोष्टीने लक्ष वेधून घेतले. भारताने जिंकलेला १९८३ चा प्रुडेन्शियल कप! मला इथे एक प्रश्न पडला. "१९८३ चा प्रुडेन्शियल कप या म्युझियम मधे आहे. तो येथे कसा? भारताने कधी तो मागितलाच नाही?"

टूरमधे तो गाईड बरेच मजेदार, माहितीपूर्ण किस्से सांगतो. तेथील ड्रेसिंग रूम्स मधे तेथे शतक झळकवणार्‍यांची नावे लिहीलेली आहेत त्यात असलेले अजित आगरकरचे नाव तो आवर्जून दाखवतो, तसेच सचिन, गावसकर, लारा, पॉण्टिंग ही नावे तेथे नाहीत हे ही दाखवतो.

अॅशेसबद्दल बरेच असते त्यात पण इतरही खूप माहिती देतात. गाईड हलकेफुलके बोलून वातावरण जास्त गंभीर होउ देत नाहीत. स्टेडियम मधली ठराविक महत्त्वाची ठिकाणे, होम टीम व व्हिजिटर टीम ची ड्रेसिंग रूम्स, पॅव्हिलियन्स, लॉर्ड्सची ती प्रसिद्ध "लॉन्ग रूम" दाखवतात, पण या ठिकाणी फोटो काढू देत नाहीत. बाकी मग प्रेक्षकांच्या भागातून फिरताना फोटो काढता येतात. तसेच त्या मीडिया सेंटरमधे ही.
सेंट जॉन्सवूड (लंडन) येथे थॉमस लॉर्ड यांनी या मैदानाचा शोध लावला. त्यांचेच नाव पुढे या मैदानाला देण्यात आले. १७८७ ते १८१४ यादरम्यान थॉमस लॉर्ड यांनी तीन मैदाने उभी केली. या तीनपैकी तिसरे मैदान सध्या वापरले जात आहे. पहिले मैदान सध्या लॉर्डस ओल्ड ग्राउंड म्हणून ओळखले जाते. आता तेथे प्रेक्षक गॅलरी आहे. दुसरे मैदान १८११ ते १८१३ या कालावधीत वापरले गेले. त्यानंतर १८१४ पासून आजपर्यंत तिसरे मैदान वापरण्यात येत तब्बल १९७ वर्षांचा इतिहास असलेले इंग्लंडमधील हे मैदान "क्रिकेटची पंढरी" म्हणून ओळखले जाते. या मैदानाची मालकी "मेरिलीबोन क्रिकेट क्‍लब" कडे आहे.
             
लॉर्डसचे ऐतिहासिक स्टेडियम आणि तो माहोल याने सारेच भारावून जातात. लॉर्डस ही क्रिकेटची पंढरी, या पंढरीत खेळण्यासाठी खेळाडू जीवाचे रान करतात. लॉर्डसवर खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते तसेच अशा या ऐतिहासिक लॉर्डसवर शतक झळकावण्याची प्रत्येक खेळाडूची तमन्ना असते. लॉर्डसवर शतक ठोकणारा खेळाडू हा भाग्यवानच समजला जातो, त्याचप्रमाणे या मैदानावर जाऊन सामना पहायला मिळणे, ही क्रिकेट चाहत्याच्या दृष्टीनेही सर्वोच्च आनंदाची गोष्ट असते.


"लॉर्ड ऑफ द लॉर्डस" दिलीप वेंगसरकर यांची लॉर्डसवर शतकांची हॅटट्रिक जॅक हॉब्ज, लेन हटन, डेनिस कॉम्प्टन, जॉन एड्रिच, जेफ बॉयकॉट या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी लॉर्डस या क्रिकेटच्या मक्केत तीन शतकं झळकावण्याचा पराक्रम केला असून इंग्लंडच्या या दिग्गज क्रिकेटपटूंच्या पंक्तीत बसण्याचा मान पटकावणारे दिलीप वेंगसरकर हे एकमेव ब्रिटीशेतर खेळाडू आहेत.

१९८७ मध्ये सुनील गावस्कर यांनी लॉर्डसवर १८८ धावा फटकावल्या त्या एमसीसी द्विशताब्दी महोत्सवी सामन्यात. तर सचिनने "डायना मेमोरियल" एक दिवसीय सामन्यामध्ये शतक नोंदवले! पण लॉर्डसवर टेस्ट क्रिकेट मधल्या शतकापासून ते वंचित राहिले! भल्याभल्या खेळाडूंना लॉर्डसवरील शतकाने हुलकावणी दिलीय; डॉन ब्रॅडमन, व्हिव्ह रिचर्डस यांना टेस्ट क्रिकेट मध्ये लॉर्डसवर शतकाची किमया जमली नाही. इतकेच काय भारताचा अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर आपल्या कारकिर्दीतील एकमेव शतक लॉर्डस वर करू शकला पण भारताचे सुनील गावस्कर, सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड आणि लक्ष्मण यांनी अनेक विक्रम केले पण लॉर्डसवर त्यांना शतकाची किमया जमलेली नाही. सचिन तेंडूलकर आंतरराष्ट्रीय शतकांच्या शतकापासून केवळ एकाच शतक दूर आहे आणि लॉर्डसवर शतक फटकावण्याची त्याची दीर्घ काळाची मनीषा पूर्ण करण्याची त्याला सुवर्णसंधी आहे. तसेच राहुल द्रविड आणि लक्ष्मण यांची सुद्धा ही अखेरची लॉर्डस वारी गणली जात आहे!                
जेव्हा मॅच चालू असते तेव्हा ही टूर नसते. तेव्हा तुम्ही जाणार असाल तर खात्री करून जा. या स्टेडियमला मीडिया सेन्टरच्या पुढच्या बाजूला उतार आहे. दोन्ही बाजूंमधे ८ फुटांचा फरक आहे. त्यामुळे पॅव्हिलियन च्या बाजूने बोलिंग करणे व नर्सरी एण्ड (मीडिया सेन्टर) च्या बाजूने करणे यात फरक पडतो.

ग्रीनिच:
 ग्रीनिच हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ग्रीनिच ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्व आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनविच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते. रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. लंडन शहराजवळील ग्रीनविच  ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणार्‍या आणि पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ०० ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ०० ते १८०° पश्चिम रेखांशांवर आहेत, असे मानले गेले आहे. १८०० पूर्व आणि १८०० पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.


मी जेव्हा लंडनला आलो तेंव्हा दोन ठिकाणे पहायचे नक्की होते. एक ग्रीनिच आणि दुसरे विंबल्डन. शून्य रेखांश हे ठिकाण पाहणे, तेथे थांबणे आणि त्या रेषेच्या दोन्ही बाजूस पाय ठेऊन उभे राहणे यात जो काही आनंद आहे तो माझ्यासारख्या इतिहास आणि विशेषत: भूगोल आवडीचे असलेल्या व्यक्तींना नक्कीच भावेल. उत्तर ध्रुवावर किंवा दक्षिण ध्रुवावर पोहोचणार्‍या व्यक्तींच्या मनात ज्या भावना असतील त्याच भावना माझ्या तिथे होत्या. आपण नेहमीच 5:30 च्या GMT च्या पुढे असतो, म्हणजे नक्की काय? अवघ्या जगाला आपल्या घडाळ्यावर चालायला लावणारे ब्रिटिश आणि जिथून प्रमाणवेळ सुरू होते ते ठिकाण म्हणजे ग्रीनिच. आता शून्य रेखांश तेथूनच का सुरू झाले? भारतातून किंवा जगाच्या इतर भागातून का नाही सुरू केले? असले शास्त्रीय प्रश्नात मला पडायचे नाही. पण ही जागा खरच अलौकिक आहे. फूट, दोन फूट, यार्ड यांची प्रमाण लांबी येथे आहे. वेधशाला आहे. मोठ्या दुर्बिणी आहेत. खूप जुनी जुनी घड्याळे आहेत. पण सर्वात आकर्षित करते तो प्रमाण रेषा (The Prime Meridian of World) आणि त्याच्या बरोबर असलेला हिरवा लेजर चा किरण.

ट्रॅफल्गार स्क्वेअर
ट्रॅफल्गार स्क्वेअर हा एक छानसा चौक आहे. अनेक कारंजे आणि पुतळे यांनी सजवलेल्या याचौकात एक दीडशे फूट उंच खांब असून तच्याच्या माथ्यावर अठरा फूट उंच असा नौसेनानी नेलसन याचा पुतळा आहे. ट्रॅफल्गारच्या युद्धात इंग्लंडने मिळलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून हा विजयस्तंभ उभा केलेला आहे. या चौकात शेकडो कबूतरे पहायला मिळतात हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.


सेंट पॉल कॅथेड्रल - हे लंडन मधील एक सुप्रसिद्ध चर्च आहे.





पिकॅडेली सर्कस
पु.लं. च्या अपूर्वाई पासून “हरिश्चंद्राची फॅक्टरी” मधील दादासाहेब फाळके यांच्या पर्यन्त सर्वांनी जी गोष्ट पाहिली आणि अनुभवली असे ठिकाण म्हणजे पिकॅडेली सर्कस. जिथे कुठलीही सर्कस भरत नाही किंवा सर्कशीतले प्राणी न जमता फक्त माणसांचे जथ्थे दिवस रात्र असतात असे ठिकाण. दिवसा तसेच रात्रीचे लंडन जागवणार्‍या अनेक ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. पिकॅडेली सर्कस हा एक चौक आहे आणि हा कायम गजबजलेला असतो.


केम्ब्रिज :
काही नावं, काही गावं यांचं  मनात एक आकर्षण असते. केम्ब्रिज हे टुमदार गाव प्रसिद्ध पावलं, ते तिथल्या विद्यापीठामुळं. या विद्यापीठात न्यूटनपासून ते रुदरफोर्डपर्यंत आणि जवाहरलाल नेहरूंपासून ते राजीव गांधींपर्यंत अनेकानेक नामवंतांनी आपली धुळाक्षरं गिरवली. नारळीकर बंधूंचं शिक्षणही इथंच झालं आणि आता इथल्याच ट्रिनिटी कॉलेजात अर्मत्य सेन काम करतात. स्टिफन हॉकिंगही इथल्याच किंग्ज कॉलेजात अध्यापन आणि मार्गदर्शन करतात. याच गावातल्या कॅहेनडिश लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉन , प्रोटॉन , डीएनए यांचा शोध लागला. प्रज्ञावंत विद्यार्थी आणि मूलभूत संशोधन म्हणजे केम्ब्रिज असं समीकरणच बनून गेलं आहे.


सुरूवातीला एक गोष्ट इथं नमूद करायला पाहिजे की, विद्यापीठ म्हंटलं की आपल्याला आठवते ती पुणे विद्यापीठ किंवा मुंबई विद्यापीठ यांची इमारत. केम्ब्रिज हे वेगळे प्रकरण आहे. इथे विद्यापीठ म्हणून एक इमारत नाही. तर तो परिसरच विद्यापीठ आहे. तेथे अनेक इमारती आहेत, अनेक महाविद्यालयं आहेत. प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या इमारती आहेत आणि त्या दूर दूर पर्यन्त पसरलेल्या आहेत.
खरं तर केम्ब्रिज हे गाव आणि शहर याच्यामध्ये बसणारं. पण विद्यापीठाच्या च्या पेक्षा खूप जुनं. एक हजार वर्षापूर्वीच्या अनेक इमारती येथे सहज पाहायला मिळतात. 1200 वर्षे तर नक्कीच या गावाला झाली आहेत. पूर्वीच्या काळी केम्ब्रिज हे व्यापारचे एक महत्वाचे ठिकाण होते. केम्ब्रिज गावातून वाहणारी कॅम नदी त्याकाळी खूप मोठी होती आणि त्या नदीतून मोठ्या प्रमाणात मालाची ने आण केली जात असे. ती नदी म्हणे पुढे जाऊन पूर्वेच्या समुद्राला जेथे मिळते त्या मार्गाने इंग्लंड मध्ये व्यापार चालत असे. काळाच्या ओघात केम्ब्रिजचा भूगोलही बदलत गेला आणि कॅम नदी आकसत आकसत लहान होत गेली.  केम्ब्रिजला यायचा तर दोन्ही कारणासाठी, केम्ब्रिज गाव पाहण्यासाठी आणि केम्ब्रिज विद्यापीठ सुद्धा.

केम्ब्रिज विद्यापीठाच्या परिसरात गावाचा असणारा चेहरा मार्केटच्या परिसरात मात्र आधुनिक शहराचा बनतो. कोणत्याही दिवशी माकेर्टमध्ये माणसांची भरपूर वर्दळ दिसते. आठवडेबाजार असावा , तशी लावलेली फळांची , कपड्यांची , गोळ्या- बिस्किटांची, केक-ब्रेडची , खाद्यपदार्थांची- फळांची आणि भाज्यांची दुकानं मांडलेली दिसतात. वेगवेगळी चित्रं, मूर्ती विकणारे स्टॉल्स दिसतात. त्यातच एक दुकान जुन्या पुस्तकांचं असतं. त्या दुकानाला विविध वयोगटातल्या माणसांचा कायमच वेढा पडलेला असतो. त्यांच्यावर दुकान सोडून विक्रेता आपल्या शेजाऱ्याशी गप्पा हाणत असतो. या माकेर्टमध्ये माणसांची गर्दी असली , तरीही तिलाही आवाज असा नसतोच. बोलण्याचा कलकलाट, जोरजोरानं चालणारी घासाघीस , गिऱ्हाईकांचे आणि विक्रेत्यांचे चढलेले आवाज असं काहीच दिसत नाही. सगळेच व्यवहार हलक्या आवाजात. दबक्या सुरात. देवाण-घेवाण मऊ स्वरात. पाच वाजता सर्व दुकानं बंद होतात. रस्त्यावरच बसणारा बाजार तर साडेचार वाजल्यापासूनच आवरतं घ्यायला लागतो. मोजकी मोठी दुकानं मात्र उघडी असतात. पण तीसुद्धा जास्तीतजास्त सातपर्यंतच! नंतर तिथला गजबजाट संपतो. मात्र दिवसा तिथं माणसांच्या गर्दीचे , खरेदी आणि विक्रीचं चक्र सतत चालू असतं , तेव्हाही त्यालगतचा भाग अगदी अलिप्त असतो. म्हणजे असं की एरवी दिवसाच्या या गजबजाटाला खेटूनच किंग्ज कॉलेज , ट्रिनिटी कॉलेज , क्विन्स कॉलेज अशी प्रासादतुल्य कॉलेजं आहेत.
 
हा भाग आणि माकेर्टचा परिसर यांच्यात जणू एक अदृश्य भिंत असावी , इतका फरक दोन्ही ठिकाणी जाणवतो. माकेर्टपरिसरातून चार पावलं चाललं की आपण जणू वेगळ्याच सृष्टीमध्ये येतो. एखाद्या राजवाड्यासारख्याच भासणाऱ्या या कॉलेजांच्या आवारात इतकी निरव शांतता असते की आत काही व्यवहार चालू आहेत की नाही , अशी शंका यावी. काही शतकांचा झळाळता इतिहास असणारी, वर्तमान सजगपणे जगणारी आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तत्पर असणारी ही कॉलेजं कायमच शांतता पांघरून बसलेली असतात. ही कॉलेजं हेच खरं तर केम्ब्रिजचं वैभव. या कॉलेजांनी आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची किर्ती जगभर नेली.


अर्थात सगळीच कॉलंजं काही अशी काही शतकांच्या परंपरेचा इतिहास सांगणारी नाहीत. किंग्ज किंवा ट्रिनिटीपासून दूर अंतरावरचे आणि सेल्विन कॉलेजजवळ असणारे वुल्फसन हे अगदीच नवीन. गेल्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात झालेलं. त्याची बांधणी आधुनिक पद्धतीची असली , तरी आवार तसंच विस्तिर्ण. त्यात सुंदर बाग. बाहेरच्या रस्त्यावरील माफक वाहतुकीचा त्रास होणार नाही , अशा अंतरावर मुख्य इमारत. आजच्या आधुनिक वास्तुरचेनची साक्ष देणारं असं हे वुल्फसन. तर सेल्विन मात्र एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातलं. सेल्विन कॉलेजसमोर आपण उभं राहिलो , की दिसतो भला मोठ्ठा दरवाजा. ग्रीक अक्षरांनी सजलेला. त्या दिंडी दरवाज्यातून आत पाऊल टाकलं की लगेच डावीकडे पोर्टर्स लॉज. ते ओलांडून आत गेलं की समोरच दिसतं कॉलेजचं चॅपेल. डावीकडे आणि त्याच्या काटकोनातही याच कॉलेजची तीन मजली उंच इमारत. उजवीकडेही तशीच इमारत. मात्र तिच्या काटकोनाच्या कोपऱ्यावर कॉलेजचा पब! त्यापलीकडे डायनिंग हॉल. आणि या साऱ्याच्या मध्ये हिरवंगार लॉन. नीटसपणं कापलेलं. त्यावर जाण्याचा हक्क फक्त फेलोज्ना. इतर विद्यार्थ्यांनी तिथं जायचं नाही. त्यांना तशी परवानगीच नाही. हा नियम कटाक्षाने पाळला जातो. लॉनवर जाण्याचा आनंद हा मागून मिळत नाही ; श्रम करून आणि स्वत:चं प्रावीण्य सिद्ध करून तो मिळवावा लागतो , हे जणू तिथल्या विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठीच हे नियम. त्या नियमाचा चुकून जरी भंग झाला , तरी त्या विद्यार्थ्याला स्पष्ट शब्द वापरून तिथून बाहेर काढलं जातं.

केम्ब्रिजच्या कीतीर्मुळं तिथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच आहे. असं म्हणतात की वर्षभरात जवळपास पस्तीस लाख लोक तरी या गावाला भेट देतात. ही गर्दी साहजिकच क्विन्स कॉलेजपासून जाणवायला लागते आणि किंग्ज , ट्रिनिटी इथं माणसांचे घोळकेच्या घोळके दिसतात. क्विन्स कॉलेजच्या जवळूनच कॅम नदीत पंटिंग (बोटिंग) करण्याची रीत आहे. किंबहुना पंटिंग हा तिथल्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे. क्विन्स कॉलेज ओलांडून निमुळत्या होत जाणाऱ्या रस्त्यावरच कॅमवरचा पूल आहे. क्विन्स कॉलेज डाव्या हाताला ठेवलं की त्या पुलावरून एक लाकडी पूल दिसतो. तो मॅथेमॅटिकल ब्रिज.


या नदीतून पंटिंग करताना केंब्रिजमधल्या कॉलेजं दिसतात. ब्रिज ऑफ साय , क्लेअर ब्रिज यासारखे दोन्ही किनाऱ्यांना जोडणारे पूल लागतात. पंटिंग करताना दिसणारी कॉलेजांपैकी काही दूरवर असली, तरी त्यांची बाग किंवा लॉन मात्र नदीपर्यंत भिडलेलं असतं. पंटिंग करणारा त्या कॉलेजांचा इतिहास सांगतो. लागणाऱ्या विविध पुलांची नावं आणि त्यांची ख्याती सांगतो. क्षणाक्षणाला विस्मयचकित करणाऱ्या त्या बोटिंगचा अनुभव पर्यटकाचं मन श्रीमंत करून जातो. कित्येक शतकं इंग्रजांनी जगावर राज्य का केलं , याचा उलगडाच जणू तो इतिहास ऐकताना होत जातो. केंब्रिज विद्यापीठाच्या लायब्ररीत 65 लाख ग्रंथ आहेत आणि दरवर्षी त्यात दहा ते पंधरा हजारांची भर पडत असते, हेसुद्धा बोटिंग करणारा अभिमानानं सांगतो. हे बोटिंग करणारेसुद्धा अनेकवेळा विद्यार्थी असतात किंवा नुकतेच पदवीधर होऊन नोकरी शोधणारे असतात. जून ते ऑक्टोबर या काळात पर्यटकांची संख्या बरीच असते. त्यावेळी पंटिंग करून चार पैसे गाठीला मारण्यासाठीच ते हे कष्टाचं काम करत असतात.

चिरोल खटल्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले असताना ते जून महिन्यात केम्ब्रिजला गेले होते. बरोबर तात्यासाहेब केळकर होते. त्यावेळी ट्रिनिटी कॉलेजात एन. एम. शहा नावाचे एक विद्याथीर् ट्रॉयपॉस परीक्षेचा अभ्यास करत होते. लोकमान्य ट्रिनिटी कॉलेजात गेले. त्यांना कळलं की शहा दुसऱ्या मजल्यावर आहेत. त्यावेळी लोकमान्यांचे गुडघे धरले होते. जिना चढणं कठीण होतं. त्यामुळं त्यांनी केळकरांना वर पाठवलं आणि शहा यांना खाली घेऊन यायला सांगितलं. त्याप्रमाणे केळकर शहा यांना घेऊन आले. ते आल्यावर लोकमान्यांनी अभ्यासात व्यत्यय आणल्याबद्दल आणि खाली यायला लावल्याबद्दल त्यांची माफी मागितली. नंतर ते आणि शहा केळकरांसमवेत कॅम नदीच्या किनाऱ्यावर गेले. तिथे त्यांच्या दोन तास गप्पा झाल्या. त्या भेटीविषयी शहा म्हणतात , लोकमान्यांशी बोलल्यानंतर हा माणूस इतर भारतीय नेत्यांच्या मानाने किती मोठा आहे , याचा साक्षात्कार मला झाला. कॅम नदीतून पंटिंग करताना ही आठवण मनामध्ये घोळत राहते आणि त्यावेळी केम्ब्रिज कसं असेल, याचा अंदाज आपण करू शकतो.

केम्ब्रिजमध्ये काही रस्ते इतके चिंचोळे आहेत की आपण भारतातल्याच एखाद्या खेड्यात आहोत की काय असं वाटावं. अर्थात तसं वाटत नाही; कारण रस्ते निमुळते असले , तरी कमालीचे स्वच्छ असतात. खाचखळगे नसलेले ते रस्ते आणि त्याला लगटून असणाऱ्या भिंती या आपलं मन अलवारपणं भूतकाळात घेऊन जातात. काळाचा पडदा भेदण्याचं काम तिथली काही दुकानंही करतात. म्हणजे असं की तिथल्या ट्रम्पिंग्टन स्ट्रीटवरच एक केमिस्टचं दुकान आहे. त्या छोटेखानी दुकानाच्या बाहेरच एक प्लाक आहे. तो सांगतो की हे दुकान 1856 साली सुरू झालं. गेली दीडशे वर्षांहून अधिक काळ चालू असलेल्या त्या दुकानाच्या आत गेल्यावर मात्र ते इतकं जुनं असेल, असे अजिबातच वाटत नाही. त्या दुकानाच्या अलीकडे असलेल्या प्रेमब्रूक स्ट्रीट वरून सरळ चालत गेलं की डावीकडं एक लहानसा बोळ दिसतो. फ्री स्कूल लेन. किंचित बाकदारसं वळण घेणारा तो रस्ता पांथस्ताला जणू निमंत्रणच देतो. त्या बोळात दिवसाच्या कोणत्याही प्रहराला माणसं अभावानंच दिसतात. डावीकडे काळ्या दगडांची भिंत आणि उजवीकडे पिवळसर रंगाची लांबलचक टोलेजंग इमारत. भुरभुरता पाऊस पडत असेल किंवा संध्याकाळच्या सावल्या गडद होत असतील, तर तो शांत बोळ म्हणजे एकाद्या गूढकथेतलाच रस्ता वाटतो. मात्र तरीही हृदयाचा ठोका चुकत नाही किंवा मनात भयही दाटून येत नाही. त्या रस्त्याला खेटूनच लांबच लांब पसरलेल्या त्या पिवळसर इमारतीत विद्यापीठाचे केमिस्ट्री आणि अन्य विभाग आहेत. ते ओलांडून आणखी पुढं गेलं की पुन्हा एक जुन्या काळाची आठवण करून देणारा दिंडी दरवाजा लागतो. त्याच्या अलीकडेच एक फलक आहे. कॅव्हेडिंश लॅबोरेटरी इथं होती हे सांगणारा. त्यापलीकडच्या फलकावर इथंच 1953 साली फ्रान्सिस क्रिक आणि जेम्स वॉटसन यांनी डीएनएचा शोध लावला असं सांगणारा फलक आहे. ते दोन्ही फलक वाचणाऱ्याची मान तात्काळ आदरानं लवते. मात्र आता ही लॅबोरेटरी तिथं नाही. आता ती गावाच्या एका टोकाला , नवीन पसरट इमारतीत गेली आहे. तरीही ज्या ठिकाणी विज्ञानातले मूलभूत संशोधन झालं , जिथं संशोधकांनी एक ध्यास घेऊन आपल्या स्वप्नाचं रोपटं लावलं आणि ते फुलवलं त्या स्थानापासून कोणाचीच पावलं सहजपणं हलत नाहीत. अर्थात ही स्वप्नं सहजपणं साकार झाली नाहीत. त्यासाठी केम्ब्रिजच्या परंपरेनुसार या संशोधकांनी स्वत:ला आपल्या विषयात गाडून घेतलं आणि अनेक प्रलोभनांना निग्रहानं दूर ठेवलं...

आपली बुद्धीच नव्हे , तर सारं आयुष्यच आपल्या स्वप्नासाठी वेचणाऱ्या त्या संशोधकांना मनोमन प्रणाम करून आणखी पुढे गेलं की एका छोटासा आडवा रस्ता लागतो. त्या रस्त्यावर पाऊल टाकताच वातावरण एकदम पालटतं. इथंही जणू आपण एक न दिसणारी भिंत पार करून आल्यासारखं भासतं. रंगीत, सजलेली दुकानं दिसू लागतात. माणसांची वर्दळ जाणवायला लागते. केम्ब्रिजमध्ये अशा अदृश्य भिंती अनेक ठिकाणी आहेत. कॉलेजे आणि म्युझियम्सच्या परिसरात तर त्या अधिकच तीव्रतेनं जाणवतात. एरवी तिथं कमालीची शांतता असते. काळेभोर डांबरी रस्ते , त्यावर किंवा त्याच्या फूटपाथवर आखलेले सायकलस्वारांसाठीचे ' मार्ग ', हिरवी झाडी आणि माफक वाहतूक. मात्र शनिवारी आणि रविवारी तिथे पर्यटकांची गदीर् दिसते. दुकानं भरलेली दिसतात. या दोन दिवशी पबसमोरील मोकळ्या जागा कौटुंबिक माणसांनी भरलेल्या दिसतात. अगदी दुपारीसुद्धा सारी माणसं खानपानाचा आनंद लुटताना दिसतात. असा आनंद मिळवण्याचा हक्क त्यांनी आवडाभर मानापासून भरपूर काम केल्यानंतर मिळवलेला असतो. मात्र या दोन दिवशीसुद्धा सेल्विन कॉलेजचा परिसर , म्हणजे गानेर्ज रोड , सेजविक अॅव्हेन्यू आणि त्यालगतच्या मार्गांचा भाग कमालीचा शांत असतो. एरवीच्या दिवसांतसुद्धा कोणत्याही प्रहरी तिथल्या रस्त्यांवर गर्दी दिसत नाही. सकाळच्या प्रहरी आपल्याच नादात चालणारी किंवा सायकलसाठी आखलेल्या मार्गावरून झपाट्यानं जाणारी माणसं , मोजकी वाहनं , पायी जाणारी थोडकी माणसं यांनी त्या परिसराला जाग येते. तिची अशी स्वतंत्र गती असलेल्या या वाहतुकीला कोणताही आवाज नसतो. रस्त्याच्या दोन्ही अंगाला बंगले आहेत. दारं आणि खिडक्या बंद असलेल्या त्या घरांमधून कोणी राहतं की नाही , अशी शंका यावी , इतकी नि:स्तब्धता. समोरचं निगुतीनं राखलेलं लॉन , व्यवस्थितपणं कापलेली हेज आणि दारासमोरच्या मोटारीमुळं इथं कोणाचा तरी रहिवास आहे , हे समजतं. संध्याकाळी घराकडं लगबगीनं परतणाऱ्यांची गर्दी दिसते , तेवढीच.

दिवस लांबलचक असताना संध्याकाळच्या वेळेस फिरणं हा एक वेगळाच अनुभव असतो. रस्त्यावरची रहदारी ओसरलेली असते. काही भागातले रस्ते तर पार निर्मनुष्य असतात. वर निळंभोर आकाश , मऊमुलायम सोनेरी ऊन. स्वच्छ हवा आणि हिरव्यागार झाडीची सोबत. त्या झाडांची पानं उन्हामुळं चमकत राहतात. वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर हलकेच डोलणारी झाडं , पलीकडच्या गवताच्या प्रचंड कुरणांमध्ये चरणाऱ्या गायी , मधूनच जाणाऱ्या मोटारीचा भर्र असा येणारा आवाज या साऱ्यामध्ये चालणाऱ्याची समाधी लागते. चुकून तो सायकलच्या आखीव मार्गावरून चालू लागतो. अचानक एका क्षणी त्याला पाठीमागे कोणी असल्याचं जाणवतं. तो वळून पाहतो. सायकलस्वार उभा असतो. चेहऱ्यावरची नाराजी प्रयत्नपूर्वक पुसत चेहरा हसतमुख करतो ; पण वाटेत आलेल्या माणसानं दूर व्हवं म्हणून तो सायकलची घंटा वाजवत नाही. कारण ती नसतेच.

किंग्स कॉलेज च्या जवळील चौकात एक नवीन घड्याळ 2008 साली बसवलेले आहे. (The Corpus Clock in Cambridge) “पा” चित्रपटात केम्ब्रिजचे बरेच चित्रण आहे. त्यात हे
घड्याळ आहे. 1 मिलियन पाउंड खर्च आलेल्या या घडल्यामद्धे काटे नाहीत. ह्या घड्याळातील गोल म्हणजे कालचक्र आणि त्यावरील किडा दर सेकंदाला हा काल मागे टाकत चालला आहे अशी कल्पना आहे. किडयाला वेळ खाणारा असे म्हटले आहे. मधली वर्तुळे तास, मिनिटे निळ्या रंगाने दाखवतात. क्रोनोमीटर च शोध लावणार्‍या जॉन हरिसन च्या उत्कृष्ट कार्यासाठी हे घड्याळ येथे लावण्यात आले आहे. cordless kettle चा शोध लावणार्‍या डॉक्टर जॉन टेलर यांनी याचे डिझाईन केले आहे.
या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथलं रेल्वे स्टेशन. किंग्ज कॉलेजपासून रेल्वे स्टेशनवर पायी जायचं म्हटलं, तर साधारण चालीनं चाळीस मिनिटं लागतात. गावाच्या एका टोकाला असलेल्या या स्टेशनची बसकी इमारत अगदीच साधी आहे. महत्त्वाचं म्हणजे स्टेशनवर सहा प्लॅटफॉर्म असले , तरी फलाट मात्र एकच आहे. त्या लांबलचक फलाटाचेच पाच भाग केले आहेत. ते दाखविणारे फलक लावले आहेत. सहाव्या फलाटासाठी मात्र अलीकडच्या काळात एक जास्तीचा फलाट बांधला आहे. असं सांगतात की केम्ब्रिजला रेल्वे आणण्याचं ठरलं तेव्हा म्हणे विद्यापीठानं सरकारला विनंती केली की आमच्या कॉलेजांपासून रेल्वे स्टेशन दूरच ठेवा ; म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना शनिवारी- रविवारी लंडनला जाण्याचा मोह सहजपणं पडणार नाही. विद्यापीठानं केलेली ही विनंती सरकारनं मान्य केली!

केम्ब्रिज चे अजून महत्व म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणार्‍या न्यूटनचे शिक्षण येथेच झाले. ज्या सफरचंदामुळे गुरुत्वाकर्शनाचा शोध लागला त्या झाडाची एक वंशवेल येथे लावलेली आहे. तशील एक वंशवेल पुणे विद्यापीठाच्या “आयुका” मध्ये सुद्धा आहे.

ज्ञानदान आणि ज्ञानार्जन यालाच महत्त्व देणाऱ्या केम्ब्रिज विद्यापीठानं सातत्यानं विज्ञान आणि गणित यामध्ये मोठं काम केलं. तसं करण्याची क्षमता असणारी माणसं तयार केली. संशोधक तयार केले. समाजजीवनातला एक उच्चभ्रू वर्ग तयार केला. सामान्य वर्गातल्या बुद्धिमान मुलानंही गुणवत्तेवर इथं प्रवेश करावा आणि विद्येच्या जोरावर आपलं सामाजिक स्थान उंचवावं , अशी व्यवस्था बांधून साऱ्या समाजाचाच पोत बदलून टाकण्याचा प्रयत्न केला. तसा तो अजूनही केला जातो. तर ऑक्सफर्ड विद्यापीठानं समाजाला धुरंधर राजकारणी , उद्योगपती , अर्थ आणि समाजशास्त्रज्ञ दिले. या दोन्ही विद्यापीठांनीच इंग्लंडला त्याचं असं झळाळतं वैभव मिळवून दिलं. त्या वैभवाच्या खुणा आजही तिथं अतिशय ठळकपणं जाणवतात.

लंडन मध्ये शेकडो म्यूजियम आहेत. सगळी पाहायची म्हटलं अवघा जन्म कमी पडेल. व्हिक्टोरिया आणि आल्बर्ट म्यूजियम, सायन्स म्यूजियम, नॅशनल हिस्टरी म्यूजियम अशी अनेक म्यूजियम आपल्या ज्ञानात भर घालत असतात. काही फ्री आहेत तर काहींना भरपूर तिकीट आहे. आपण आपली आवड, वेळ आणि खिसा पाहून ठरवायचे काय पहायचे ते. जशी म्यूजियम तसे पार्क ही भरपूर आहेत. हाइड पार्क, ग्रीन पार्क, रेजण्ट्स पार्क, बॅटर्सी पार्क, साऊथवार्क पार्क, विक्टोरिया पार्क, हॉलंड पार्क, गनर्सबरी पार्क, वोर्न्वूड स्क्रब्स पार्क अशी अनेक पार्क लंडनच्या हिरवाई मध्ये भर घालतात. लंडन ची मंडळी तर अभिमानाने सांगतात, की लंडनच्या एकूण लोकसंख्येच्या पेक्षा जास्त वृक्ष त्यांच्या गावात आहेत. आणि हे पटतं सुद्धा.

स्कॉटलंड
इंग्लंडला जायचे ठरवलं तेव्हाच स्कॉटलंडला जायचं विचार पक्का केला होता. “मिनी स्वीझर्लंड” असे सामान्यपणे स्कॉटलंडला म्हंटलं जातं. आमच्या या ट्रिपमध्ये युरोप आम्ही मुद्दामूनच समाविष्ट केलं  नव्हतं, नाहीतर आम्ही कशालाच पूर्ण न्याय देऊ शकलो नसतो. असो.
 इंग्लंडच्या उत्तरेला आणि निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेला देश म्हणजे स्कॉटलंड. आम्ही गाडी करून थेट गाठले ते “फोर्ट विल्यम” हे हेमेल हेंपस्टेड हे 600 मैल अंतरावरील एक नयन रम्य ठिकाण. “फोर्ट विल्यम” ला “The Outdoor Capital of UK” असे म्हणतात.



4 दिवस मस्त पैकी ‘कॅरवन’ मध्ये (स्वदेस चित्रपतातील कॅरवन आठवते का?) मध्ये राहिलो. आता आम्ही एवढे 8 जण कॅरवन मध्ये कसे मावलो तर तर आमची कॅरवन ही 3 BHK फ्लॅटच होता म्हणा ना. 3 बेडरूम्स, हॉल कम डायनिंग आणि किचन. सगळं अगदी कमीत कमी जागेत झकास बसवलं होतं. कॅरवन मध्ये दोन प्रकार असतात. एक चालती (Moving) कॅरवन आणि दुसरी एका ठिकाणी स्थिर असलेली (Non moving) कॅरवन. आम्ही दुसर्‍या प्रकारामद्धे राहिलो. खर्‍या अर्थाने स्वयंपूर्ण असे या कॅरवन असे त्याचे वर्णन करता येईल.
इंग्लंडच्या बर्‍याच उत्तरेला स्कॉटलंड आणि त्यात फोर्ट विल्यम स्कॉटलंडच्या बर्‍यापैकी उत्तरेला, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात थंडी मी मी म्हणत होती. त्यासाठी कॅरवन मध्ये रूम हीटर, सगळीकडे गरम पाणी अशा

सर्व सुखसोयी केलेल्या असतात. आम्ही 4 दिवसाचा बर्‍यापैकी शिधा बरोबर नेला असल्याने जेवायची मस्त सोय होती. “लॉक इल” च्या काठावर वसवलेले रिसॉर्ट फारच छान होतं. कारवण मधून लांबवर दिसणारे लॉक लिन्हे चे निळं  आणि शांत पाणी, त्या तळ्यात शांतपणे पोहणारे बदक, सायंकाळी मुक्कामाला आलेल्या छोट्या छोट्या होड्या, काही हौशी मंडळींनी कार वर टाकून आणलेल्या बोटी आणि संध्याकाळी 9.35 वाजता(!) डोळ्यात साठवून ठेवता येण्यासारखा तेथील सूर्यास्त..... या सार्‍या गोष्टींमुळे मी तर वेडाच झालो होतो.


स्कॉटलंड मध्ये उन्हाळ्यात सूर्यास्त उशिरा, साहजिकच अंधार पडायला मध्यरात्रच होत असे. बरं पूर्ण मिट्ट काळोख पडावा तर तसेही नाही. काही प्रमाणात संधिप्रकाश रात्रभर दिसायचा. परत पहाटे 4 वाजता सूर्य महाराज ड्युटीला उत्साहाने हजर ! नोर्वे, स्वीडन आणि उत्तर / दक्षिण ध्रुवावर काय मजा येत असेल याची एक झळकच पहायला इथे मिळते.

स्कॉटलंड मध्ये काही मुख्य शब्द समजून घ्यायला हवेत. लॉक म्हणजे लेक अर्थात तळे. बेन म्हणजे पर्वत. ग्लेन म्हणजे दरी. एकदा या गोष्टी कळल्या की मग बाकी सारे सोपे जाते. (बेन नेविस आणि ग्लेंको व्हॅली .... किती सोपं ना... ) स्कॉटलंड मध्ये चलन पाउंड असले तरी तरी इंग्लंडचे पाउंड ते सरसकट वापरत नाहीत. स्कॉटिश पाउंड हे त्यांचे चलन. ब्रिटिश पाउंड तसे स्कॉटिश पाउंड. स्कॉटलंड मधील 3 मोठ्या बँक स्कॉटिश पाउंड छापतात. किंबहुना स्कॉटलंड मधील लोकांना चुकून जारी ब्रिटिश म्हटले तरी त्यांना फार राग येतो. स्कॉटिश असण्याचा त्यांना जेवढा अभिमान तेवढाच ब्रिटिश मंडळींचा तिरस्कार. स्कॉटिश पाउंड आणि ब्रिटिश पाउंड तसा पाहिलं तर एकच पण त्यातही विविधता. इंग्लंड मध्ये स्कॉटिश पाउंड चालतो पण सरसकट चालेलच असे नाही. ब्रिटिश 1 अभिमानी तर हे 7 अभिमानी.
स्कॉटलंड चा आजवरचा थोडा इतिहास पहिला तर असे ध्यानात येते की, स्कॉटलंड या नावाचा सगळ्यात जुना उल्लेख इ.स.च्या दहाव्या शतकातील अँग्लो-सॅक्सन बखरीवजा पुस्तकात सापडतो. हा शब्द लॅटिन भाषेतील स्कॉटी यावरुन आल्याचे समजले जाते. स्कॉटी हा शब्द गेल वंशीय लोकांसाठी वापरला जात असे. त्यावरून लॅटिनमध्ये स्कॉटिया (गेल वंशीयांची भूमी) हा शब्द वापरला जाऊ लागला. स्कॉटियाचे पुढे स्कॉटलंड झाले.


मध्ययुगीन दंतकथेप्रमाणे स्कॉटलंडचे नाव इजिप्तच्या स्कॉटा या राजकुमारीच्या नावावरून आले आहे. या दंतकथेत स्कॉटाला गेल वंशीय प्रजेची आद्य माता समजले आहे. मे १, इ.स. १७०७ पर्यंत स्कॉटलंड एक सार्वभौम देश होता. या दिवशी झालेल्या युतीने तो युनायटेड किंग्डमचा घटक देश बनला. स्कॉटलंड ग्रेट ब्रिटनच्या बेटाच्या उत्तर भागात आहे. याच्या दक्षिणेला ईंग्लंड, उत्तर व पश्चिमेस अटलांटिक समुद्र व पूर्वेस उत्तर समुद्र आहेत. ग्लासगो स्कॉटलंडचे सगळ्यात मोठे शहर आहे. स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग हे युरोपमधील एक मोठे आर्थिक केन्द्र आहे. चर्च ऑफ स्कॉटलंड हे स्कॉटलंडमधील सगळ्यात मोठे व राष्ट्रीय चर्च आहे. या चर्चचा उल्लेख द कर्क असाही केला जातो. पश्चिम स्कॉटलंडमध्ये कॅथोलिकपंथीय वस्ती आहे. स्कॉटिश शिक्षणव्यवस्था युनायटेड किंग्डममधील व्यवस्थेपेक्षा निराळी आहे. येथे विस्तृत शिक्षणावर भर दिला जातो. तीन व चार वर्षाच्या बालकांना शिक्षण फुकट असते. स्कॉटलंडमध्ये विपुल प्रमाणात खनिज तेल आढळून येते. खर्‍या अर्थाने समृद्ध प्रदेश म्हणजे स्कॉटलंड.
स्कॉटलंड मध्ये पाहायची ठिकाणे भरपूर आहेत. लॉक इल, लॉक लिन्हे, लॉक नेस, लोक लोकी या सारखे मोठी तळी आहेत. “बेन नेविस” नावाचा ब्रिटिश बेटांवरील सर्वात उंच पर्वत आहे. ऊंची आहे – 4409 फूट.


स्विंग ब्रिज:
स्कॉटलंड मध्ये  सर्वात प्रेक्षणीय गोष्ट म्हणजे स्विंग ब्रिज. येथे जलवाहतूक (शाळेत “भूगोल” नावाच्या विषयात असे काहीतरी वाचल्याचे आठवते का?) मोठ्या प्रमान्त केली जाते. जेथे जेथे रास्ते या नदी किंवा कालव्यांना पार करतात तेथे छोटे छोटे सेंग ब्रिज बसवले आहेत. या ब्रिज ची रचना अशी असते की एखादी बोट किंवा जहाज कालव्यातून जात असेल तेंव्हा 5 मिनिटांसाठी रस्ता बंद करतात. आणि स्विंग ब्रिज 90 अंशामध्ये उजवीकडे फिरवतात. बोट पार झाल्यावर परत मूळ ठिकाणी ब्रिज आणून वाहतुन चालू. असे स्विंग ब्रिज स्कॉटलंड मध्ये गल्लो गल्ली आहेत.

स्कॉटलंड मध्ये अजून एक अजब प्रकार पाहायला मिळाला. कालवे किंवा नद्या ज्या वेळेस मोठ्या नदीला किंवा मोठ्या तलावाला येऊन मिळतात तेथे काही प्रमाणात उतार असल्याने जल वाहतुकीत प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी येथे कालव्यांना लेव्हल मॅनेजमेंट केली आहे. यात विशिष्ट अंतरावर कालव्यांमध्ये पाणी अडवण्यासाठी दारे केली आहेत. सर्व प्रथम जहाज कालव्यात आल्यावर पुढील दरवाज्याच्या खालून पाणी पुढे सोडून देण्यात येते. त्यामुळे त्या भागातील पाण्याची पातळी खाली जाते. आपोआपच जहाजही पाण्याच्या पटलीप्रमाणे खाली सरकते. पुढील गेट उघडून जहाज पुढच्या भगत घेण्यात येते. अशा तर्‍हेने टप्याटप्याने जहाजाची पातळी खाली खाली आणली जाते.


ओईक नदी आणि असंख्य कालवे पुढे येऊन मिळतात ते “लॉक नेस” ह्या तळ्यामध्ये. आता “लॉक नेस” ला तळे का म्हणायचे हा तिथे पोहोचल्यावर पहिला प्रश्न पडतो. भोपाळच्या “बडा झील” पेक्षा प्रचंड मोठे, क्षितिजापर्यंत पाणीच पाणी आणि तेही कित्येक मैल अंतरापर्यंत म्हणजे हा गोड्या पाण्याचा छोटा समुद्रच म्हणूया ना. “लॉक नेस” पहाण्यासाठी आम्ही 2 तासाची छोटीशी टूर घेतली, त्यावरून याची कल्पना येईल! 56 चोरस किमी क्षेत्रफळ असलेल्या याची जास्तीतजास्त खोली 230 मीटर (755 फुट) असून UK मधील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा साठा आहे. समुद्र सपाटीपासून 15 मीटर उंच असलेल्या या तळ्यात 7.4 घन किमी पाणी मावते आणि उरलेले पुढे समुद्राला मिळते.
“लॉक नेस” प्रसिद्ध आहे ते दोन मुख्य गोष्टींसाठी. तिथले अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि दुसरे त्या तळ्यात दिसलेल्या अवाढव्य प्राण्यासाठी (Loch Ness Monster). हा प्राणी सर्वात आधी पाहिल्याचा उल्लेख 6 व्या शतकात सापडतो. त्या नंतर 1933 साली जॉर्ज स्पाईसार यांनी पाहिला. साधारण 1 मीटर उंच आणि 25 फुट लॅम्ब असा हा प्राणी त्यांना त्यांना रस्त्यावर आडवा गेला होता. त्यानंतर अनेक लोकांनी तो  पाहिल्याचा उल्लेख सापडतो. पण शास्त्रीय दृष्ट्या तो असेलच किंवा आहे हे अजून सिद्ध झालेले नाही.


काही जण त्याला पाण्यामधील नक्षी असे मानतात तर काही जण भास झाला असेल असे गृहीत धरतात. काही उत्साही मंडळींनी त्याचे फोटो काढायचा प्रयत्न केला पण त्यावरून तो प्राणी आहेच हे सिद्ध झाले नाही. 2003 मध्ये BBC ने एक मोठी शोध मोहीम प्रायोजित केली. पण त्यांनाही हा प्राणी सापडली नाही. शेवटी “हा कल्पनेतील प्राणी” (myth) असे जाहीर करून त्यांनी यातून आंघोळ केली.

लॉक नेस हून परत येताना Urquhart Castle पहिला. सध्या अतिशय भग्नावस्थेत असलेला हा Urquhart Castle इतिहासाच्या अनेक आठवणी जाग्या करतो. दिवस मोठा असल्याने एकाच दिवसात अनेक गोष्टी पहाता येतात. “लॉक नेस” नव्हे तर सारे स्कॉटलंड चे अप्रतिम निसर्ग सौंदर्य


किती डोळ्यात समौन घेऊ असे होते. फोटोग्राफी चा आनंद आणि कौशल्य ज्यांना पुरेपूर अनुभवायचे असेल तर स्कॉटलंड ला अवश्य भेट दिली पाहिजे. आम्ही स्कॉटलंड च्या निसर्ग सान्निध्यात अनेक फोटो सेशन केले. कधी स्टँड लावून तर तर कधी जोडी जोडीने. कधी पोरांना उठवून तर कधी फक्त मुलांचे. 

 आमचा पुढचा टप्पा होता अर्थातच “आईल ऑफ स्काय” आणि Dunvegan Castle. “आईल ऑफ स्काय” हा स्कॉटलंडच्या वायव्य दिशेला असलेला अतिसुंदर बेटांचा समूह आहे.तेथे जाण्याचे दोन मार्ग आहेत फोर्ट विल्याम वरुण पश्चिमेला मलाईग पर्यन्त रस्त्याने प्रवास करायचा. तेथून पुढे आपले वाहन बोटीमध्ये घालून बोटीने आर्मदाल गाठायचे आणि तेथून परत आपल्या वाहनाने पुढे जायचे. हे करताना फक्त बोटीच्या वेळा पाहून प्रवास करणे श्रेयस्कर नाहीतर खोळंबा होण्याची भीती. दूसरा मार्ग म्हणजे फोर्ट विल्यम कडून इनवरनेस कडे जायला लागायचे. फोर्ट अगस्तस च्या अलीकडे डावीकडे वळायचे आणि सरळ आईल ऑफ स्काय गाठायचे. या वाटेने प्रसिद्ध स्काय पूल लागतो. हा आईल ऑफ स्कायला इतर स्कॉटलंड पासून जोडतो. हा अतिशय सुंदर पूल असून दोन्ही बाजूस समुद्राचे पाणी आणि समोर आईल ऑफ स्काय असे दर्शन होते.


आईल ऑफ स्काय चा लंब वर्तुळाकार परिसर आहे त्याला समुद्राच्या काठाने तितकाच सुंदर रस्ता आहे. आम्ही त्या रस्त्यानेच आमची सफर केली. डावीकडे अति दूरवर Western Isles पाहायला मिळतात. क्षितिज निरभ्र असेल तर ही मंडळी फार छान दिसतात. वाटेत उईग नावाच्या ठिकाणी फार सुंदर बंदर आहे. तेथे काही क्षण विसावा घेऊन अटलांटिक महासागराच्या पाण्यात काही मिनिटे पाय बुडवून घेतले. कानयकुमारीला असलेल्या त्रिसमुद्र संगमाची आठवण झाली. फक्त येथील पाणी जरा जास्तच थंड होते. दोन थेंब डोळ्याला लावून पुढील प्रवास चालू केला.

आईल ऑफ स्काय मध्ये सर्वात प्रसिद्ध काय असेल तर अर्थातच Dunvegan Castle. आईल ऑफ स्काय च्या अगदी पश्चिमेला हा कॅसल स्कॉटलंड मधील सर्वात जुना कॅसल असून 800 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. अतिशय चांगल्या स्थितीत असलेला हा कॅसल 1933 मध्ये पर्यटकांसाठी खुला केला गेला. इंग्लंडच्या राणी पासून अनेक मान्यवर मंडळींनी या कॅसलला भेट दिली आहे. विशेष म्हणजे या सगळ्या मंडळींचे फोटो, पत्र आणि इतर गोष्टी त्यांनी जपून ठेवल्या आहेत. काही शे वर्षापूर्वीची पुस्तके, त्यांची हत्यारे त्यांची विशेष दालने याची माहिती तेथे दिली जाते. कैद्यांसाठी येथे एक अंधार कोठडी आहे. हे कैदी म्हणजे काही मोठे चोर, लुटारू किंवा गुन्हेगार नसत. मासेमारी करताना सापडलेले परप्रांतातील मंडळी येथे कैदी म्हणून ठेवत असत! त्यांना या कॅसलमध्ये एका खोल ख्द्यत बनवलेल्या खोलीत बंदिस्त करून जड तोफगोळ्यांनी बांधलेले असायचे. एवढी शिक्षा कमी म्हणून त्यांना कॅसल मध्ये तयार होणार्‍या जेवणाचा फक्त वास एका छोट्या खिडकीतून दिला जात असे आणि प्रत्यक्षात मात्र उपासमार केली जात असे!

ह्या कॅसल च्या परिसरात आता सुंदर बाग तयार करण्यात आली आहे. कॅसल मधील काही वाटा थेट मागील समुद्राला जाऊन मिळतात. अतिशय सुस्थितीत असलेला हा कॅसल साधारण एक तासात पाहून होतो. त्यांना बोटिंग करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मागील समुद्रात सोय केली आहे. काही उत्साही मंडळी लगेच बोट ओढून त्यांचा आनंद घेऊ लागतात.

एक संध्याकाळ खास Shopping साथी आम्ही स्कॉटलंड मध्ये राखून ठेवली. स्कॉटलंड प्रसिद्ध आहे ते तेथील वूल साठी अर्थात गरम कपड्यांसाठी. जॅकेट पासून सर्व तर्‍हेचे गरम कपडे, त्याच्या अणुशांघाने येणार्‍या असंख्य गोष्टी जसे स्कार्फ, पर्स, स्कॉटलंड च्या पारंपरिक वेश आणि बरेच काही. किती घेऊ आणि किती नको असे होतं. एडिंबरा वुलन मिल ही त्यातलीच एक खास. तिच्या स्कॉटलंड मध्ये असंख्य शाखा आहेत.

स्कॉटलंड मध्ये असताना लहानपणी शिकलेली Ba ba black sheep.... ही कविता आठवल्यावचून राहत नाही. कारण भरपूर Sheep (मेंढया) पाहायला मिळतात. सुरूवातीला Black Sheep काही दिसायला तयार नव्हत्या, फक्त White च दिसायच्या. त्यामुळे ही कविता बदलायला हवी काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती ! पण तसे काही झाले नाही. काही अंतर पार पडल्यावर Black Sheep चे जथ्थे च्या जथ्थे पाहायला मिळाले. White Sheep तर भरपूर आणि थोड्या वेळाने Combination! उईग च्या पुढे तर ओंजळ भरून वूल मिळाले. आता त्याच वूल ची खेळण्यातली sheep बनवायचा प्लॅन आहे.

एडिंबरा:
आमचा शेवटचा टप्पा अर्थात एडिंबरा. स्कॉटलंडची राजधानी पण हे स्कोटलंड मधील सर्वात मोठे शहर नाही, त्याचा मान मिळतो ग्लासगोला. स्कॉटलंड ची आर्थिक राजधानी आहे ग्लासगो आणि मुख्य राजधानी आहे एडिंबरा. आपल्या मुंबई आणि दिल्ली सारखं. दोन्ही शहरे पाहण्यासाठी खरेतर आठवडा ही पुरणार नाहीत इतकी मोठी ही शहरे आहेत. पण वेळेच्या अभावी अगदी काही तास मिळाल्यामुळे थोडीफार नजर टाकता आली. एडिंबरा चा spelling Edinburgh असे असून स्कॉटिश उच्चार जरा ‘बरा’ आहे म्हणून ‘एडिंबरा’. (हा पु लं चा विनोद बरं का, परत म्हणायला नको... ) राजधानी जे लावण्या आहे ते ओतप्रोत भरलेले हे शहर पण लंडन पेक्षा अगदी वेगळे. येथे Old City आणि New City असे शहराचे दोन विभाग आहेत. आपल्याकडे जसा जुनं आणि नवे गाव अगदी तस्सच. फरक इतकाच की इथले नवे गाव हे फक्त 400 वर्षापूर्वीचे. म्हणजे जुने गाव किती जुने असेल याची कल्पना केलेली बारी. अगदी उदाहरणादाखल – बँक ऑफ स्कॉटलंड इ. स. 1695 मध्ये सुरू झाली,

त्यालाही आता 416 वर्ष होऊन गेली. जगातील ही दोन क्रमांकाची जुनी बँक. बँक ऑफ स्कॉटलंड ही स्वत:च्या नोटा चपणारी जगातील पहिली बँक. पहिला क्रमांक अर्थात बँक ऑफ इंग्लंड. कारण ती एक वर्ष आधी सुरू झाली! इंग्रजांनी जगावर का राज्य केलं याची थोडी थोडी उत्तरे इथे मिळू लागतात. 

स्कॉटलंड Listed Building – नोंदविलेल्या इमारती 47400 आहेत. यूके मधील हा एक खास प्रकार आहे. विशिष्ट डिझाईन किंवा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या अनेक इमारती येथे नोंदविल्या गेल्या आहेत. त्यांची खास जपणूक केली जाते. ह्या इमारतींना पाडण्यासाठी, वाढवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी खास परवानगी घ्यावी लागते. या इमारतींना बाहेरून काहीही बदल करता येत नाही. स्कॉटलंड मध्ये अशा अनेक इमारती पाहायला मिळाल्या. टीव्ही ची डिश सुद्धा बाहेर लावायला परवानगी नाही. इमारतींच्या किंवा शहराच्या सौंदर्याला कोठेही बाधा येणारे कृत्य येथे करू दिले जात नाही. 

एडिंबरा प्रसिद्ध आहे ते अनेक गोष्टींसाठी. स्कॉटलंड ची राजधानी म्हणून तर आहेच पण त्याशिवाय एडिंबरा कॅसल, दरवर्षी ऑगस्ट मध्ये भरणारा एडिंबरा फेस्टिवल. या फेस्टिवल ची तयारी तयारी दोन महिने आधी चालू होते. या राजधानीच्या एकूण लोकसंख्ये एवढे लोक (@5 लाख) या फेस्टिवलला जगभरातून येतात. कॅसलच्या बाहेर पटांगणात हा फेस्टिवल साजरा होतो.

(सर्वात महत्वाचे) हेमेल हॅमस्टेड:
आमचं घर म्हणून या ठिकाणाचा उल्लेख अनिवार्य आहे. हेमेल हॅमस्टेड हे गाव हार्टफोर्डशायर मध्ये असून लंडन पासून साधारण 24 मैल अंतरावर आहे. याची लोकसंख्या एक लहापेक्षा कमी असून दुसर्‍या महायुद्धानंतर लौकिकाला आलेला गाव आहे. अगदी टिपिकल उतरत्या छपराची घरे, चढ-उताराचे रस्ते, स्वछ आणि सुंदर परिसर, अजिबात गर्दी नसलेले आणि शांत गाव म्हणजे हेमेल हॅमस्टेड. ‘मारलोवेस’ शॉपिंग सेंटर आणि त्याच्या आसपासचा परिसर तेवढा दिवसा थोडीफार गर्दी करणारा, तेही सकाळी 10 ते 5 या वेळातच. इतर वेळेस नीरव शांतता, एखादी गाडी पास झाली तरच आवाज येईल इतकी शांतता.

गजबजलेले लंडन आणि शांत हेमेल हॅमस्टेड. ‘मारलोवेस’ शॉपिंग सेंटर येथे जगातले सर्व ब्रँडचे कपडे आणि वस्तु मिळतात. 24 तास उघडे असणारे TESCO तेथून जवळच आहे. या TESCO जवळ एक थिएटर तेथे अनेक स्क्रीन आहेत. त्यालाच चिकटून एक वॉटर पार्क आहे आणि तंबोला सुद्धा. हेमेल हॅमस्टेड एस टी स्टँड पासून दर 20 मिनिटांनी TESCO ला बसची मोफत सोय आहे. एस टी स्टँड पासून जवळच एक कॅनोल असून तेथे अनेक बदके मुक्तपणे विहार करत असतात. लहानच नव्हे तर मोठ्यांनाही लहान करायला लावणारे हे ठिकाण आहे. लंडनला जायला साधारण 1 तास लागतो. लंडन हयुस्टन हे त्या मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक. तेथून पुढे मेट्रो किंवा अन्य मार्गाने लंडन मध्ये फिरायचे. रेल्वे आणि बस यांनी इतर अनेक मोठ्या शहरांना चांगल्या पद्धतीने जोडलेले गाव आहे.

एकूण काय, अनेक संस्कृती, इतिहास आणि भूगोल याचा अपूर्व संगम म्हणजे हा ‘साहेबाचा देश’ अनेक जन्म पुरणार नाहीत इतक्या गोष्टी येथे पाहण्यासारख्या आहेत. आपल्याला दिलेल्या या छोट्याचा आयुष्यात मिळालेले 4 मोकळे क्षण ही ठिकाणे पाहण्यात घालवायचे दुसरं काय....
संस्कृती जन्माला येते आणि वाढते ती नदीकाठी. विविध भाषा, संस्कृती यांचा सुंदर मिलाफ यूके मध्ये थेम्सच्या काठी होतो. लंडन आहे खास ते या मुळेच. तरीही आपले वेगळे अस्तित्व हे शहर जपून आहे.

विलियम वर्डस्वर्थने "Composed upon Westminster Bridge, September 3, 1802" या कवितेत लंडनविषयी अगदी योग्यच म्हटले आहे -

Earth hath not anything to show more fair:
Dull would he be of soul who could pass by
A sight so touching in its majesty:
This City now doth, like a garment, wear
The beauty of the morning; silent, bare,
Ships, towers, domes, theatres and temples lie
Open unto the fields, and to the sky;
All bright and glittering in the smokeless air.

Never did sun more beautifully steep
In his first splendor, valley, rock, or hill;
Ne'er saw I, never felt, a calm so deep!
The river glideth at his own sweet will:
Dear God! The very houses seem asleep;
And all that mighty heart is lying still!


- मंदार कुलकर्णी आणि सौ. गौरी कुलकर्णी
July 2011

No comments:

Post a Comment