Followers

Saturday, February 14, 2015

व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल….



व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल….
काल सर्व जगाने व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला. दिवसभरात गम्मत म्हणून मी काही क्षण टिपण्याचा प्रयत्न केला. 

1.   फर्ग्युसन रोड वर दर वर्षी प्रमाणे तरुणांची ही गर्दी. फुलं, फुगे यांची रेलचेल. महागड्या गाडीवरून आपल्या व्हॅलेंटाइन्स ला घट्ट पकडून गाड्या उडवायची चढाओढ. सामान्य लोकांना रोड वरून चालायला जागा नाही आणि तरुणांच्या त्यांच्या वरील नजरा अशा की ...

2.   Camp मध्ये ही थोडेफार असेच दृश्य. फक्त तिथला तरुण वर्ग अजून Cosmopolitan. तीच गर्दी... तीच चढाओढ.

3.   पुण्यातला कोणताही चौक – आज 5 रुपयाचे गुलाबाचे फूल 20 रूपायला. गेले 15 दिवस Cold Storage मध्ये ठेवलेली फुले आज चौका चौकात ताजी फुले म्हणून विकायला. काही फुलांच्या पाकळ्या कोमेजून पडायच्या बेतात पण बाजूने प्लॅस्टिकचा आधार लावल्याने त्याही आतील कळ्यांशी जोडल्या गेलेल्या. बरीचशी फुले पाणी मारून मारून जीवंत ठेवलेली. हीच तर्‍हा पुष्पगुच्छाची. एरवी 50 रूपायला मिळणारे आज मात्र 200 ला .

4.   दुपारची वेळ. चौकात गुलाबाची फुले हातात घेऊन So Called फूल विकणार्‍या लहान मुली उभ्या. एक तरुण सांगतो एक चांगले फूल द्या. ती त्यातल्या त्यात एक बरे फूल पटकन काढून देते आणि म्हणते 30 रुपये. तरुण पाकिटात गेलेला हात तसाच बाहेर कडून म्हणतो “काही कमी नाही का होणार?”…. “असू दे”. थोडासा Confused, थोडासा नाराज होऊन तो तरुण पुढे निघून जातो.

       आज खरेदी झालेल्या वस्तूंची यादी – गुलाबाची फुले, बदामाच्या आकाराच्या उश्या, टेडी, थोडीफार ग्रीटिंग कार्ड आणि फक्त होटेलिंग. वैयक्तिक मला व्हॅलेंटाइन्स डे हा प्रकार मुळीच पटलेला आणि रुचलेला नाही. कॅथोलिक माहितीकोशानुसार म्हणे तीन व्हॅलेंटाइन्स होते. एका व्हॅलेंटाइन्स ला सन २६९ मध्ये देहदंडाची शिक्षा झाली होती. कैदेत असताना तो जेलरच्या मुलीच्या प्रेमात पडला. तिला मरण्याआधी चिट्ठी लिहिली. त्यात लिहील होते - From your व्हॅलेंटाइन्स ! तो व्हॅलेंटाइन्स मेला तो दिवस व्हॅलेंटाइन्स डे !!! थोडक्यात दंतकथेतील एका व्यक्तीच्या पुण्यतिथीचा दिवस.... त्या महाशयांच्या भारताच्या इतिहासाचा काही संबंध नाही. कुणाला त्याच नावही माहित नव्हत. भारतीय इतिहासात एकापेक्षा एक दिग्गज असताना याची काही गरज नव्हती. फक्त स्त्री आणि पुरुष याचं प्रेम ही संकुचित, संधिसाधू वृत्ती भारतात कधीच नव्हती. भारतात पहिल प्रेम मातापित्यावर, गुरुवर, मित्रावावर, गावकर्यांवर आणि जनावरांवरही करतात. नदीला माता मानणाऱ्या या देशाने "दिसला आणि प्रेमात पडला " अश्या वरवरच्या प्रेमाला मानले नाही. शत्रूवरसुध्दा प्रेम करणारा हा देश आता व्हॅलेंटाइन्स ला फक्त स्त्री आणि पुरुष यांच्या प्रेमात अडकवण्यात येत आहे. विदेशी कंपन्या एड्स ची भीती दाखवून कंडोम विकतात. पण अनैतिक संबंध ठेवू नका अस सांगत नाहीत. जी गोष्ट व्हॅलेंटाइन्स डे तीच आजकाल गरबा आणि दसर्‍याला. काहीही करून आजच्या तरुण तरुण आणि तरुणींना घरा  बाहेर काढणं हेच यांचं उद्दीष्ट झालं आहे. त्यांना यात वाहवत नेणे आणि आपला धंदा करणे हेच यांचं काम...
       आता हा इतिहास जरा नीट समजून घेऊया. तसे पाहायला गेल्यास ज्या व्हॅलेंटाइनच्या नावावर हा दिवस आहे, त्याच्या एकूण अस्तित्वाबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात॰ गुढतेचे वलय असणा-या अशा एक नव्हे तीन व्हॅलेंटाइन नावाच्या संतांना कॅथलिक चर्चची मान्यता आहे. त्यापैकी रोमन सम्राट क्लॉडियसच्या काळातील संत व्हॅलेंटाइन याचा या प्रेमदिनाशी संबंध लावता येईल. कारण सम्राट क्लॉडियसनेसैन्यातील शिपायांनी लग्न करू नये’, असा फतवा काढला होता. अर्थात त्यामागे काही कारणेही होती. सम्राटाच्या मते, ज्यांचे लग्न झालेले असते, ते जीवावर उदार होऊन लढत नाहीत.’, परंतु या व्हॅलेंटाइनने राजाच्या या धोरणाविरोधात जाऊन या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून देण्याचा धडाका लावला होता. राजाला व्हॅलेंटाइनच्या त्या कृतीचा खूप राग आला. त्यामुळे चिडून जाऊन त्याने व्हॅलेंटाइनला देहदंड दिला. ज्या दिवशी व्हॅलेंटाइन यांना मरण आले, तो दिवस व्हॅलेंटाइन्स डेम्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीय देशात सुरू झाली. पण ती प्रेमीकजनांनी एकमेकांना फुले, चॉकलेट आदी भेटी देण्यापुरतीच मर्यादित होती. गेल्या ५० वर्षात अमेरिकेतील काही हुशार व्यावसायिकांनी व्हॅलेंटाइन्स डेहा एक मोठा इव्हेंटआहे, त्यामध्ये बौद्धिक आणि आर्थिकदृष्टय़ा सबळ व स्वतंत्र असणारी तरुणाई गुंतू शकते, असा अंदाज बांधला आणि हळूहळू या दिवसाला प्रेम उत्सव दिनबनवण्यासाठी वातावरणनिर्मिती केली. अमेरिकेपाठोपाठ गेल्या दोन दशकांत व्हॅलेंटाइन्स डे सर्व खंडात पोहोचलाय. भलेही स्थानिक संस्कृतीशी त्याचे काहीही नाते नसले तरी जागतिकीकरण आणि बाजारीकरणाचा प्रभाव इतका जबरदस्त की व्हॅलेंटाइन्स डे आता जगभरातील प्रेमीजनांना आपला वाटू लागलाय.
       गमतीचा भाग असा की भारतात प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी वसंतपंचमी हा भारतीय तरुणाईसाठी प्रेमदिवस होता. वसंत ऋतु ची सुरुवात आणि नवीन ऋतूचे आगमन. प्राचीन वाङ्मयात, ऐतिहासिक कथा-कवितांमध्ये वसंतपंचमीच्या दिवशी तरुण, मुले-मुली कशाप्रकारे एकत्र येत, नाचणा-यांमध्ये रंगून जात असत त्याचे अनेक उल्लेख येतात. वसंतपंचमीला प्रेमाचा दिवस मानण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे भारतीय वाङ्मयात ज्याचा उल्लेख प्रीतीदेवता असा केला जातो, त्या कामदेवाचा जन्म वसंतपंचमीचा, म्हणून आजही अनेक ठिकाणी रती-मदनाची पूजा केली जाते. खास करून आपले वैवाहिक आयुष्य सुखी राहावे यासाठी ही पूजा करण्याचा भारतात प्रघात होता. एकूण काय तर पाश्चिमात्य बाजारपेठेतून आयात केलेला व्हॅलेंटाइन्स डेमाध्यमांच्या प्रभावामुळे सर्वदूर पोहोचला. त्यातही कडव्या हिंदू संघटनांनी त्याला अकारण विरोध केल्यामुळे तर तो अधिक प्रकाशात आला आणि वसंतपंचमीच्या जागी व्हॅलेंटाइन्स डे प्रेमदिनम्हणून कधी स्थानापन्न झाला, हे लोकांना कळलेही नाही.
 
       आता आपण ठरवायचे की आपण काय करायचे .... विचार करूया.... 

-           -  मंदार कुलकर्णी
15 फेब्रुवारी 2015

No comments:

Post a Comment