Followers

Tuesday, August 4, 2015

गरज, चैन आणि पात्रता


 

आज बरेच दिवसांनी लिहावेसे वाटत आहे. गरज, चैन आणि पात्रता याची जरा गुंतागुंत झाली आहे. माझ्या लहानपणी मला पुलं म्हणतात तसे कधी वारावर जेवावे लागले नाही की कधी फुटपाथ च्या दिव्याखाली अभ्यास करावा लागला नाही. पण आई वडिलांनी कोणतीही गोष्ट 'गरज' असल्याशिवाय घेऊन दिली नाही. मग ते नवीन शाळेचे दप्तर असो, कंपासपेटी नाहीतर रेनकोट किंवा छत्री असो. पुस्तके - वह्या दरवर्षी मला नवीन मिळाली पण जेवढी पाहिजे तेवढीच. कॉलेज मधे गेल्यावर तेही १८ वर्षे पूर्ण झाल्यावर एकदाच स्वयंचलित वाहनाची मागणी केली होती पण 'आधी पेट्रोलचे पैसे मिळवायला लाग, मग पाहू' असे स्पष्ट उत्तर मिळाले होते. तेव्हा गरज, चैन आणि पात्रता यातला फरक चांगला कळत होता आणि आमच्या मागण्याही त्या प्रमाणेच होत्या. एकही अनावश्यक वस्तू किंवा गोष्ट घरात आल्याचे मला आठवत नाही. अगदी TV सुद्धा आला ते आमच्यापेक्षा चाळीतल्या लोकांनी जास्त तगादा लावला म्हणून. तीच गोष्ट फ्रिज ची.

आज जेव्हा मी याची तुलना आजच्या काळाशी करतो तेव्हा मती गुंग होते. आज मुलांना स्वतंत्र खोल्या तर आहेतच पण त्याच बरोबर स्वतंत्र कपाटे, असंख्य पुस्तके, खेळणी तर विचारुच नका. बर, एकदा एका खेळण्याला हात लावला की परत तेच कोणी खेळत नाही. दरवेळी नविनच हवे. खेळण्याच्या दुकानातील सर्वात मोठ्ठा ट्रक हवा, सर्वात मोठ्ठी डॉल किंवा बार्बी हवी, सर्वात मोठ्ठी पिगी बँक हवी आणि बरेच काही. आजचे पालकही 'लाड' नावाखाली हे सर्व घेऊन देतात. हे झाले केजी पर्यन्त.

शाळेत जाणारी आजची पिढी अजून पुढे आहे. तिसरी मधे पालक मुलांना टॅब हातात देत आहेत आणि चौथी मधे मोबाईल. माझा मुलगा या क्लासला जातो संध्याकाळी, काळजी वाटते, म्हणून आपला दिला आहे मोबाईल त्याच्याकडे." "त्याच्या सगळ्या फ्रेंड्स कडे आहे मोबाईल, मग तोच खूप मागे लागला. काय करणार? घ्यावाच लागला." "ट्रेस करायला बरे पडते गं तिला… आज आहे शक्य आम्हाला म्हणून घेतला मोबाईल. आमच्या लहानपणी फोन सुद्धा नव्हते…” असे असंख्य डायलॉग ऐकायला मिळतात आणि मती गुंग होते. ही गोष्ट वाटते तितकी साधी आणि सरळ नाही. मुलांना या वयात मोबाईल घेऊन देणे गरज ही नाही; चैन त्याहून नाही; पात्रता तर नाहीच नाही. ज्या वयात त्यांनी केवळ पेन्सिलने लिहिणे अपेक्षित आहे, ज्या वयात त्यांनी फक्त अभ्यास, मैदानी खेळ खेळायला पाहिजेत त्या वयात मुलांना २४ तास हाताशी मोबाईल आणि गेम्स देवून आपण काय योग्य करतो? मोबाईल आणि कॉम्पुटर वर गेम्स खेळून मुलांची ताकद आणि स्टॅमीना वाढणार आहे का? आज अनेक चौथी-पाचवीच्या मुलांचे whatsapp ग्रुप आहेत. ते या ग्रुप वर काय वाचतात, काय लिहितात, काय चर्चा करतात हे पाहायला पालकांना वेळ नाही. पालक या मुलांना स्पष्टपणे का सांगू शकत नाहीत की "तुझे हे वय नाही त्यामुळे तुला या वस्तू मिळणार नाहीत…."

२ व्हीलर ची हीच तऱ्हा. ११ - १२ वर्षाची मुले बिनधास्त २ व्हीलर घेऊन फिरतात, क्लासला जातात. सरकारने १६ वर्षाच्या आत २ व्हीलर नाही चालवायची हे सांगितले असतानासुद्धा? केवळ आपल्याला तोशिश नको यासाठी पालक मुलांना २ व्हीलर का देतात? ह्या गोष्टी मुलांची पात्रता आणि वय नसताना देणे अयोग्य नाही का?
 
विचार करू या….

- मंदार कुलकर्णी
४ ऑगस्ट २०१५

 

No comments:

Post a Comment