Followers

Monday, July 17, 2017

पुन्हा अमेरिका – २०१७



श्री
पुन्हा अमेरिका – २०१७

विनम्र सूचना: माझे लिखाण वाचून बऱ्याच वाचकांना (विशेषत: काही ठिकाणी मी अमेरिकेचे केलेले कौतुक वाचून) अशी शक्यता वाटू शकते की मी माझा सर्व गाशा गुंडाळून पुढच्याच विमानाने कायमचा तेथेच राहायला जाणार आहे. पण तसे अजिबात नाही. पु ल नी शिकवल्या प्रमाणे जेथे जाऊ तेथे डोळे आणि कान नीट उघड़े ठेवले तर खूप गोष्टी नवीन पहायला आणि शिकायला मिळतात. आणि त्यातूनच आपल्या बरोबर दुसऱ्या मंडळींना ही पर्यटनाचा आनंद देता यावा हा या मागिल साधा आणि सरळ उद्देश आहे. समर्थ रामदास स्वामी ही हेच म्हणतात... “केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार । शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार ।।“ येथे सांगीतलेली काही निरिक्षणे ही भविष्यात भारतात ही सोई सुविधा मिळतील या साठी माझा निश्चित प्रयत्न असेल.
 

२०१० चे दशक जसे सरायला लागले तसे अमेरिकेच्या १० वर्षाच्या व्हिसावर परत जायला मिळेल का ही एक मला पडलेली इच्छा होती. इथे २०१० चे दशक का २०२० चे हा गहन चर्चेचा विषय होवू शकतो पण मला त्यात पडायचे नाही. तर २०१७ सुरु होतानाच व्हिसा वर परत एकदा अमेरिकेचा शिक्का बसेल अशी शक्यता निर्माण झाली. माझ्या कंपनीने ही "जा वत्सा, दिले तुला १५ दिवस, अब जी ले अपनी जिंदगी" असे काहीही न सांगता १५ दिवसाचा अजेंडा बनवा आणि काय काय दिवे ऑफिसमध्ये तिथे लावणार आहात याचे Justification द्या अशी भाषा वापरून मला २ महिने आधी कामाला लावले होते. मल्टीपल एन्ट्री विसा असल्याने कंपनीला परत विसा काढायचा खर्च आणि मला कष्ट नव्हते पण बाकी सगळी तयारी आलीच की. हा पहिलाच परदेश गमनाचा माझा प्रसंग नसल्याने मीही या वेळी जरा निवांतच (हा निवांत खास सोलापुरी style घ्यायचा बर का) आणि अगदी एक आठवडा आधी पर्यंत कुठली bag घ्यायची हे सुद्धा ठरले नव्हते. Air India असल्याने वजनाची बाजू भक्कम होती. ४६ + ८ किलो पण मुळात इतके ओझे का न्यायचे आणि का आणायचे हाच मुख्य प्रश्न होता. या वेळी कमीत कमी सामान न्यायचे ठरवले आणि १ जून ला विमानात बसलो. अति उत्साहाच्या भरात अस्सल रत्नागिरी हापूस आंबे भरले आणि दिल्ली ला पोहोचल्यावर साक्षाकार झाला की ते अमेरिकेला चालत नाहीत. डॉलर मधे भरपूर दंड आणि अपमान दोन्ही ची मानसिक तयारी ठेवून शिकागोला उतरलो. पहिले ९० मिनिटे माझे सामानच आले नाही. बहुतेक Airport अधिकाऱ्यांनी आंब्याचा घमघमाट अनुभवून एक्सरे मधेच ते काढून घेतले असे वाटले. या शिवाय सामानाच्या बेल्ट जवळ प्रशिक्षित कुत्री त्यांच्या पोलीस मालकासोबत तेथील सामान हुंगतच होती. भारतातून अनेक जण खायचे पदार्थ घेऊन आलेले होते त्यामुळे ते कुत्रे पटापट bags पकडत होते. मी तर आंब्यांची आशा जवळपास सोडली होती. आंबे नाही निदान माझ्या bags तरी मिळाव्या अशी माफक अपेक्षा आता राहिली होती. शेवटी तेथील अधिकाऱ्यांना तसे विचारले देखील. “bags ची वाट पहा” असे त्रोटक उत्तर मिळाले आणि मी परत एकदा माझा संयम वाढवून वाट पाहू लागलो. इतक्यात उरेका झाले आणि माझे सामान आले. सुदैवाने कुत्रे ५० मी लांब दुसऱ्या पट्यावर दुसऱ्या bags काढण्यात मग्न होते. मी अत्यंत शिताफीने अतिशय लांबून पळ काढत कस्टम अधिकाऱ्यापुढे सामान घेऊन उभा. माझा एकंदर (पडेल) चेहरा पाहून त्याने मला काहीही न विचारता सोडले आणि मी माझा अडकलेला श्वास सोडला आणि विजेच्या चपळाईने विमानाच्या बाहेर जायचे दार हुडकून तेथे पुढील काही सेकंदात पोहोचलो आणि हुश्श केले. ज्यांच्या साठी ते आणले होते त्यांनी ही त्यांचा आस्वाद घेत हळूच त्याचे facebook चक्क फोटो टाकून आमचे अज्ञान उघड केले !!!

शिकागो गेल्या वेळेला पाहिले होते पण अमेरिकेच्या दुपारी जागे राहायचे असल्याने लगबगीने मी घर सोडले आणि ट्रेन ने युनियन स्टेशन गाठले. शिकागो ट्रेन आणि इतर व्यवस्थेने चांगले जोडले गेलेले आहे. तुमच्याकडे जर एक नकाशा आणि गरज असेल तेव्हा तोंड उघडायची तयारी असेल येथे कुठेही अडत नाही. पुढील ५ तास शिकागो मधे भटकलो. पुन:प्रत्ययाचा मनसोक्त आनंद घेतला. Willis Tower, Union Station, Millennium Park, Art Institute of Chicago, Buckingham Fountan, Navy Pier, Grant Park, Lake Michigan. सर्वात महत्वाचे म्हणजे Fullerton Hall पाहिला. स्वामी विवेकानंद यांनी “Brothers and Sisters of America...” दिनांक ११ सप्टें १८९३ रोजी याच ठिकाणी म्हणून सगळ्या जगाला हिंदुत्व म्हणजे काय ते शिकवले. चतुर मंडळींच्या लक्षात आलेच असेल की त्या दिवशी तारीख ९/११ च होती !!! त्यांच्याच नावाने स्वामी विवेकानंद रस्ता असे तेथील रस्त्याचे नामकरण झाले आहे. ते Palmar House मधे राहत होते. आज तेथे एक त्याच नावाचे हॉटेल झाले आहे. Shedd Aquarium, Field Museum of Natural History आणि Skydeck Chicago ही ठिकाणे गेल्यावेळी पाहिली होती त्यामुळे त्यात वेळ घालवला नाही. शिकागो च्या रम्य आठवणी मनात घोळवत पुढच्या प्रवासाला लागलो. जाता येता होणारे शिकागो डाऊन टाऊन चे विमानातून होणारे दर्शन तर फारच रम्य.

पुढील प्रवास म्हणजे इंडियानापोलीस आणि मग कोलंबस. कोलंबस ला कमिन्स चा कारखाना आहे आणि मुख्य ऑफिस (Head Quarter) या जुजबी माहिती व्यतिरिक्त इतक्या वर्षात काहीही माहिती मला कोणी दिली नव्हती आणि मी ही कधी घेण्याच्या फंदात पडलो नाही. ज्या गावच्या वाटेला जायचे नाही त्या गावचा पत्ता का विचारा? असा साधा सरळ हिशोब होता. पण कर्म-धर्म संयोगाने हा पत्ता विचारायची वेळ आली आणि म्हणता म्हणता मी त्या गावी येवून पोहोचलो सुद्धा! पुण्यातून अनेक जुने मित्र कोलंबस ला कामानिमित्त आले आणि इथेच स्थायिक झाले. त्या मंडळींचे फोन नंबर बरोबर होते.

कोलंबस हे कमिन्स च्या लोकांनी आणि कारखान्यांनी व्यापलेले साधारण ४५००० लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. एकूण गावाचा आवाका पाहता अगदी कोथरूड पेक्षा छोटे आणि आखीव रेखीव आहे. Flatrock and Driftwood rivers या गावातून वाहतात, पुढे याची white river होते. पुण्याच्या मुळा मुठे इतकी मोठी नसली तरी “नदीकाठी वसलेले गाव” ही ओळख करून घेण्यासाठी पुरेशी आहे. याच नद्यांनी २००८ च्या पुरामध्ये कोलंबस गाव पाण्याखाली गेले होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक फुट पाणी गावामध्ये आणि घरामध्ये आले होते. काही ठिकाणी तर एक एक दोन दोन मजले पाण्याखाली गेले होते. अमेरिकेने केलेल्या या सुटका मोहिमेमधे फक्त २ लोकांना प्राण गमवावे लागले होते.

कोलंबस ची सर्वात महत्वाची ओळख म्हणजे अर्थातच कमिन्स. कमिन्स कंपनी ९७ वर्षापूर्वी १९१९ साली येथे जन्माला आली आणि गेल्या १०० वर्षांमध्ये तिचा जगभर विस्तार झाला आहे. कोलंबस मधे कुठेही नजर टाकली तरी क्षितिजावर २-४ तर तरी कमिन्स च्या इमारती किंवा तेवढेच कमिन्स मधे नोकरी करणारे लोक (रस्त्यावर लोक असले तर) दिसतील. जसे किर्लोस्कर वाडी, जमशेदपूर तसे कोलंबस. कोलंबस गाव वाढवण्यात आणि मोठे करण्यात कमिन्सचाच वाटा आहे. कमिन्सचा इंजिन प्लांट, technical centre, commons building, head Quarters आणि असंख्य इमारती. मी जेथे काम करीत होतो तेथील plant मधे अनेक इमारती आहेत. साधारणपणे जगात इमारतींना नाव असते किंवा क्रमांक असतात. येथे इमारतींना क्रमांक आहेत पण ते ही विचित्र. उदा. ७२, ४४, ६०, ७, ६५, ४० वगैरे. विशेष म्हणजे या प्लांट च्या गेट चे क्रमांक आहेत त्यातही काहीही sequence नाही. उदा. ९६, ७३, ९६N, ९, ५, ६५. उत्सुकता म्हणून अनेक जणांना विचारले पण बऱ्याच जणांना काही कल्पना नाही. गमतीचा भाग म्हणजे एवढ्या वर्षात त्यांनाही कधी हा प्रश्न पडला नाही. मी ही हट्ट सोडला नाही. शेवटी उत्तर मिळाले. ह्या इमारती आणि गेट ज्या सालात बांधले गेले आहेत म्हणून ते नंबर दिले आहेत. बिल्डिंग ४० म्हणजे १९४० साली बांधून पूर्ण झाली!!!

एकंदरीतच अमेरिकेमध्ये नियोजनाला फार महत्व आहे. मग ते रस्त्याचे नियोजन असो किंवा गावाचे. मला तर आता असे वाटते की जे काही करायचे ते सगळे ‘गुगल’ ला सांगून आणि विचारून करीत असावेत. सर्व अमेरिकेत घर क्रमांक, गल्ली आणि गाव या (जास्तीत जास्त ३ गोष्टी) वरून जगातून कुठूनही त्या घरापर्यंत पोहोचायची ताकद गुगल मुळे आपल्यात आली आहे. GPS, गुगल maps ने आता हे जग व्यापून टाकले आहे. मग ते घर, हॉटेल किंवा कुठलाही पत्ता शोधणे किंवा जवळचा रस्ता शोधून दिशा दाखवणे असो.

अमेरिकेत घरे बांधणे या मधेसुद्धा त्यांच्या नियोजनाचा मोठ्ठा वाटा आहे. अमेरिकेत एखादा भूखंड develop करायचा असेल तर निविदा काढून एका कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात येते. तो भूखंड develop करताना असणारी जागा, तेथे होणारे बांधकाम, आजूबाजूचे रस्ते, आतील पाण्याची तळी, शाळा, बागा याचे सर्व नियोजन आधी करण्यात येते. त्यासाठी लागणारे पाईप लाईन्स आणि सर्व गोष्टी या आधी पूर्ण केल्या जातात आणि मग घरे बांधायला सुरुवात केली जाते. हे सारे वाचताना “यात विशेष ते काय? हे तर माहितीच आहे.” ही स्वाभाविक reaction झाली असेल. पण येथे या सर्व गोष्टी १००% पाळल्या जातात. इथे बहुतेक घरे लाकडाची असतात. बांधायला वेळही कमी लागतो. घराचा कमीत कमी साईझ २५०० sq ft. त्यात कारसाठी गरेज, बाग, पुढे मागे मोकळी जागा या सर्व गोष्टी आल्याच. या शिवाय काही भागात बहुमजली अपार्टमेंट आहेत. सर्व मंडळी येथे थोडे पैसे गाठीशी जमा झाल्यावर घर विकत घेतात. अपार्टमेंट साधारणपणे भाड्याची असतात तर घरे स्वत:ची. अपार्टमेंटचे भाडे आणि घराचा हप्ता हा जवळ जवळ सारखाच असतो, बऱ्याच वेळेला भाडे जास्त असते. अमेरिकेत घराच्या कर्जावरील व्याजाचा दर हा भारतापेक्षा खूपच कमी आहे त्यामुळे हप्ता कमी बसतो.

इथे घर घेतल्यावर ते मेंटेन करणे हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. अनेकांशी या विषयावर चर्चा केल्यावर असे लक्षात आले की ते फार कष्टकर आहे. भारतासारखे तेथे झाडू, फरशी पुसायला लोक मिळत नाहीत, बागकाम सुद्धा वरचेवर स्वत: करावे लागते. दर आठवड्याला गवत कापणे, त्याची स्वच्छता, कापणी, पाणी घालणे आणि झाडांची निगा या साठी भरपूर वेळ द्यावाच लागतो. ते जर नाही केले तर सरकार स्वखर्चाने ही कामे करते आणि एक मोठे बिल घरी पाठवून देते.

स्वच्छता, नीटनेटकेपणा हा तेथील हवेचा गुणधर्म आहे. जसे महाराष्ट्रातील कुठल्याही गावाहून मुंबईमधे विशेषत: ट्रेन स्टेशन वर उतरले की पावले पटापट चालायला लागतात तसा हा प्रकार. जी मंडळी भारतात अतिशय अस्वचछ आणि बेशिस्त वागत होती ती अमेरिकेमधे गेल्यावर मात्र एकदम सुतासारखी सरळ झाली आहेत. शिवाय येथे पोलिसांचा बडगा असतोच.

माझा या visit मधील सर्वात सरप्राइज आयटम म्हणजे माझे कार ड्रायविंग. कोलंबस मधे Taxi मिळणे अतिशय अवघड आणि खूप महाग. किंबहुना जेथे जेथे services आहेत ते सर्वच कमालीचे महाग. त्यामुळे एकतर स्वत:चे वाहन हवे किंवा मग कुठे जायचे असेल तर भाड्याची गाडी घेणे. भारतात हा विषय येवू घातला आहे पण त्याला सर्वमान्यता मिळायला अजून वेळ आहे. आपले driving license दाखवले की लगेच पाहिजे ती गाडी मिळते. आपण फक्त गाडी परत देताना पेट्रोल भरायचे. शिवाय आपण गाडी कुठेही घेवू शकतो आणि कुठेही सोडू शकतो. माझा गाडी चालवायचा अजिबात प्लान नव्हता, त्यात आमच्या अनेक मित्रांनी मला मी चालवण्यापासून कसा लांब राहीन यासाठी अनेक प्रयत्न करून पहिले पण अखेर “गाडी चालव” असे म्हणणाऱ्यांची संख्या आणि माझा धीर यांचे वजन जास्त झाले आणि मी अखेर गाडी रेंट केली. सुरुवातीचे २ दिवस सगळे नियम आणि हात बसण्यात गेला पण नंतर सर्व सुरळीत झाले. एकतर सर्व गाड्या Automatic gear त्यामुळे क्लच दाबा, गियर बदला ही भानगड नाही आणि दुसरे म्हणजे कोणी नियम मोडत नाही त्यामुळे मस्त GPS चालू करायचे आणि ‘तिच्या’ आदेशाप्रमाणे आणि सांगितलेल्या रस्त्याने आणि बरोबर त्या वेळेला पोहोचायचे.

                  

कोलंबस ला पोहोचलो त्या दिवशी माझ्याकडे थोडा मोकळा वेळ होता म्हणून मी “Columbus Architecture Tour” ला हजेरी लावली. कोलंबस हे आधुनिक Architecture साठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक सुंदर सुंदर चर्च आणि इमारती आहेत. त्याचा इतिहास आणि इतर माहिती या टूर मधे मिळाली. कोलंबस मधे कमिन्स च्या अनेक इमारती आणि कारखाने आहेत.

 

पण मला सर्वात आवडली ती कमिंस ची मुख्य इमारत अर्थात Head Quarters…. स्थापत्याचा एक सुंदर नमुना असे याचे वर्णन करता येईल. कमिन्सचे संस्थापक अर्विन मिलर याचे घर ही येथे आवर्जून दाखवले जाते.

ख्रिस्तोफर कोलंबस च्या नावाने गणले जाणारे हे गाव काही एकमेव नाही. नुसते विकिपीडिया वर धुंडाळली तर फक्त अमेरिकेत २० “कोलंबस” सापडतील, आपल्याकडे जसे अनेक ‘जळगाव’ आणि अनेक ‘औरंगाबाद’ आहेत अगदी तसेच. त्यामुळे नुसते कोलंबस म्हटले तर कोणीही तुम्हाला बरोबर पत्ता सांगू शकणार नाहीत. कोलंबस बरोबर त्या राज्याचे नाव जसे इंडियाना, ओहियो हे माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर तुमची पंचाईत होणार हे नक्की. मी जेव्हा इंडियानापोलीस विमानतळावर उतरून Taxi मधे बसलो तेव्हा मला एक पाकिस्तानी चालक भेटला. मी येथे पहिल्यांदाच आलो आहे हे त्याने माझ्या देहबोली वरून लगेच ताडले. वास्तविक इंडियानापोलीस हून कोलंबस फक्त ५० मैल आहे. मी कोलंबसला जायचे हे सांगितल्यावर ‘कुठल्या कोलंबसला?’ असा प्रश्न त्याने विचारला. इंडियाना का ओहियो? त्याला असे वाटले की चुकीच्या रस्त्याला नेवून जरा जास्त पैसे कमावता येतील. मग मीच कोलंबस इंडियाना सांगून गूगल map चालू केले आणि त्याला दाखवले तेव्हा स्वारी नीट गाडी चालवायला लागली. मग सुरु झाल्या थेट हिंदी भाषेत गप्पा. एकंदरीत हे महाशय फाळणी च्या खूपच विरुद्ध वाटले.

कोलंबस शहराचा इतिहास पाहण्यासाठी आपल्याला साधारण २०० वर्षे मागे जावे लागेल. जनरल जॉन टिप्तन आणि लूक बोनेस्टील यांनी आज जेथे कोलंबस गाव वसलेले आहे ती जागा विकत घेतली. मोउंट टीपटन ही टेकडी आणि दोन्ही नद्यांच्या मधील हा भूभाग सपाट आणि गर्द झाडीने बहरलेला होता या गावाचे नाव त्या वरून Tiptonia असे ठेवण्यात आले. २० मार्च १८२१ रोजी अचानक याचे नाव कोलंबस असे बदलण्यात आले. जनरलना हा प्रकार काही आवडला नाही आणि त्यांनी तातडीने ते गाव सोडले. पुढे या जनरल महाराजांना इंडियाना राज्यातर्फे रस्ते बनवण्याचे काम देण्यात आले. इंडियानापोलीस हून दक्षिणेला जो रस्ता सिमूर कडे जातो त्याचे काम चालू असताना तो कोलंबस या गावातून जातो असे लक्षात आल्यावर त्यांनी कोलंबस गावातील रस्त्यावर मोठा पूल बांधून तो रस्ता पूर्ण केला आणि त्या रस्त्यात कोलंबस मधे चौक बनवला नाही.

या गावात रेल्वे ही आली ती खूप पूर्वी म्हणजे १८४४ साली. Reeves गाड्या वाहून नेण्यासाठी येथील रेल्वे चा मुख्य उपयोग होत असे. आज टीपटन लेक हा कोलंबस मधील एक अत्यंत उच्चभ्रू, महागडा आणि समृद्ध भूभाग बनला आहे. पुण्यात प्रभात रोड वगैरे तसे. या परिसरात एक घर/बंगला आता त्याचे देवळामधे रुपांतर करण्यात आले आहे. अनेक हिंदू आणि श्रद्धाळू मंडळी जेथे जाऊन पूजा, स्तोत्र पठण करीत असतात. बाकी अनेक गावाप्रमाणे येथेही महाराष्ट्र मंडळ आहे. गणेशोत्सव आणि अनेक सण ते उत्साहाने साजरे करतात.

कोलंबस मधे जी मंडळी नोकरी करतात ती बरीचशी त्याच जवळपासच राहतात. बरीचशी मंडळी ग्रीन वूड किंवा इंडियानापोलीस येथून रोज जा ये करतात. कोलंबसमधे अनेक हॉटेल्स आणि रेस्टोरंट आहेत. इटालियन, मेक्सिकन, चायनिस असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय जेवणाची मात्र जरा वानवाच आहे. ‘अपना किचन’ नावाचे एकमेव ठिकाण मला सापडले. तेथे भारतीय आणि विशेषत: पंजाबी जेवण चांगले मिळते. अभक्ष-भक्षण करणाऱ्या मंडळीना भरपूर पर्याय आहेत. असो. याशिवाय पिझ्झा, बर्गर यांची चंगळ आहेच. कोलंबस मधे एक वीक एंड असल्याने जवळपास असलेली काही ठिकाणे पाहायचा योग आला. त्याची थोडक्यात माहिती पुढे देत आहे.

एडिनबर्ग:

कोलंबस पासून १० मैलावर वसलेले हे एक छोटेसे गाव. हे गाव वसवले गेले ते १८२२ साली. हे गाव वसवणारा मुळचा स्कॉटलंड चा असल्याने त्याने हे नाव सुचवले असे म्हणतात. या गावची लोकसंख्या जेमतेम ५००० च्या आसपास. स्कॉटलंड ची राजधानी एडिनबर्ग वरून या गावचे नाव पडले आणि पुढील अनेक वर्षे ते याच नावाने (एडिनबरा/किंवा एडिनबरो) याच नावाने ओळखले जात होते. येथे मुख्यत: Camp Atterbury, a National Guard training facility आहेत. Highway ५६ वर असलेले हे गाव branded कपडे आणि वस्तू यांच्या factory outlets साठी प्रसिद्ध आहे. Nike, Van Heusen पासून अनेक Brands येथे नांदत आहेत. विशेषत: लहान मुलांचे कपडे येथे छान मिळतात.

ब्राऊन कौंटी स्टेट पार्क:

इंडियाना राज्यात एकूण २४ स्टेट पार्क आहेत. त्यातील सर्वात मोठे स्टेट पार्क ते हेच. १५,७७६ एकर परिसरामध्ये वसलेले हे पार्क ब्लुमिंगटन पासून अगदी जवळ आहे. वर्षाला १३ लाखावर पर्यटक या पार्कला भेट देतात. स्टेट पार्क हे इतके मोठे तर National Park किती मोठी असतील असा मनात विचार आला. जनरल जेकब ब्राऊन यांच्या नावाने या पार्कला नाव देण्यात आले. १९२९ साली हे पार्क प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. गर्द वनराई, त्यात फिरण्यासाठी आणि वाहन नेण्यासाठी बनवलेले सुंदर रस्ते, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी ठीक ठिकाणी बनवलेले Observation Desk. मी उन्हाळ्यात गेलो असल्याने मला फक्त गर्द हिरवी वनराई पाहायला मिळाली. येथे खरा यायचा सीजन म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर. त्याला येथे falls म्हणतात. थंडीच्या सुरुवातीला पानातील हरितद्रव्य संपत जाते आणि ते रंग पालटू लागतात आणि सुरु होते येथे रंगांची उधळण. प्रत्येक झाडाच्या पानाचा रंग वेगळा, आकार वेगळा आणि सौंदर्य वेगळे. अख्खे अमेरिका या काळात येथे लोटते. (मी जो फोटो येथे दाखवला आहे तो मी काढलेला नसून fall चे सौंदर्य दाखवण्यासाठी दिला आहे) काही दिवसात बर्फ पडायला लागते आणि ही सारी पाने गळून जातात आणि शिल्लक राहतात फक्त फांद्या, हिवाळा संपून जाण्याची वाट पाहात, पुन्हा नाविन्याची प्रतीक्षा करत, नवीन पालवीला जन्म देण्यासाठी...

 

येथे अनेक नेचर ट्रेल्स आहेत. चालत, घोडेस्वारी, सायकल, मोटर सायकल. हे नेचर ट्रेल्स अतिशय अचूकपणे मांडलेले आहेत आणि त्याचे चांगले नकाशे ही बनवलेले आहेत. कुठला ट्रेल कुणासाठी हे चित्रांकित केलेले असते. त्या ट्रेलचे अंतर, सुरुवात आणि शेवट हे नकाशात पाहून आपण ठरवू शकतो. एवढे करूनही आम्ही ट्रेल घेताना चुकलोच चालत जायचा ट्रेल घ्यायचा सोडून सायकलचा घेतला आणि आम्हाला चांगला ६ मैलाचा फेरा पडला !!! साधारण २ तास मनसोक्त चालून झाल्यावर आमची गाडी दिसल्यावर जरा जीवात जीव आला.

अनेक कुटुंबे एक दिवसाच्या किंवा दोन दिवसाच्या सहलीला या पार्क मधे येतात. काही जण तंबू घेवून येतात आणि तर काही जण karavan. पार्क मधे बार्बेक्यू अनेक जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. जेवण करायला लाकडी बाक आणि बार्बेक्यू साठी लोखंडी जागा. मंडळी कोळसे, रॉकेल आणि आणि आपले आवडीचे साहित्य घेवून येतात आणि निवांत दिवस व्यतीत करतात. जागोजागी लहान मुलांना खेळायला घसरगुंडी, सीसॉ, झोके आहेत. संपूर्ण कुटुंबासोबत सामान सुमान घेवून दिवस घालवायला हे मस्त ठिकाण आहे. काही जण तर कपडे धुवून, तेथेच दोन झाडांना दोरी लावून कपडे वाळत घालतात. अमेरिकन लोकांना ते कुटुंबाबरोबर आले की हवी असते येथे privacy. मग ते कोणाला ओळख दाखवत नाहीत. काही उत्साही कारच्या वर बोट लावून येतात आणि दिवसभर बोटिंग आणि मासेमारी करतात.

या पार्क मधे “ओगल” नावाचे एक अप्रतिम तळे आहे. नैनिताल किंवा भीमताल ची आठवण होईल इतके मोठे आणि नयन रम्य ठिकाण आहे. या तळ्याच्या परीघावर एक नेचर ट्रेल बनवला आहे, तोही सुंदर. विशेष म्हणजे हे तळे अतिशय स्वच्छ ठेवले आहे. सभोवार गर्द झाडी आणि पाण्यात आपले प्रतिबिंब पाहात मासेमारी करायची, किती सुंदर.... काही जण दिवसभर बोट पाण्यात घालून हळू आवाजात मस्त गप्पा मारतात आणि आपल्या मित्रा  बरोबर दिवस व्यतीत करतात. काही चित्रकार आपल्या बरोबर कागद घेवून येतात आणि त्यात निसर्गाचे रंग दिवस दिवस भरतात. प्रत्येकाच्या आनंदाच्या कल्पना निराळ्या....

 

ब्लुमिन्गटन:

१८१८ साली वसलेल्या या गावाला “a heaven of blooms” असे म्हणतात. येथे इंडियाना विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ १८२० साली वसले. येथे आज ४२ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. विद्यापीठाच्या असंख्य इमारती असलेल्या या गावाला २०१५ मधे ट्री सिटी हा किताब ही मिळाला आहे. या गावाला भरपूर पाणी नसल्यामुळे काहीसा दुष्काळी भाग म्हणून हा भाग जवळ जवळ १०० वर्षे गणला जात होता. १९२० साली ग्रिफी लेक खोडून/ बांधून पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. हे गाव पाहून केम्ब्रिज किंवा Oxford विद्यापीठांची आठवण झाल्यावाचून राहात नाही.

      मैक कोर्मिक क्रीक स्टेट पार्क:

ब्राऊन कौंटी सारखेच अजून एक स्टेट पार्क ब्लुमिंगटन पासून अवघ्या १५ मैलावर आहे. येथी ही वेगवेगळे ट्रेल्स आहे आणि चक्क एक १० फूट उंचीचा (मोठा?) धबधबा आहे. इंडियाना राज्यात सपाट भूप्रदेश जास्त असल्याने येथे फारसे धबधबे नाहीत. त्यामुळे अशा धबधब्यावर पर्यटकांना समाधान मानावे लागते. येथे पण  त्यांनी केलेली जाहिरात बाजी पाहून घ्यावी.

  

      ही माझी कोलंबस ची भेट लक्षात राहील ती अजून एका कारणामुळे. भारतातून (कमिन्स) मधून माझे अनेक मित्र गेल्या काही वर्षात कोलंबसला येवून स्थायिक झाले आहेत. त्यांना भेटून त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या. त्यांच्याबरोबरच्या चर्चेत अमेरिकेतील बऱ्याच नवीन आणि मनोरंजक गोष्टी समजल्या. सध्या येथे उन्हाळा असल्याने बऱ्याच जणांचे आई वडील या मोसमात अमेरिकेत येतात. दसरा दिवाळी साजरी करून परत मायदेशी परततात. आजकाल तर अमेरिकन मंडळी ही या सिझनला “इंडियन पेरेंट्स सिझन” असे म्हणतात !!! तेवढाच लहान मुलांना आजी आजोबांचा सहवास. पण एकंदरीत जेष्ठ नागरिकांना येथे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. तसा तर प्रश्न जगातील प्रत्येक ठिकाणी लागू पडतो पण येथे जरा जास्तच प्रकर्षाने पडतो. कोलंबस हे अमेरिकेतील बाकी अनेक गावांपेक्षा अधिक सुरक्षित आहे. लहान मुले, जेष्ठ नागरिक कधीही येथे मोकळेपणाने फिरू शकतात. तरी सुद्धा रस्ते माहितीला मर्यादा असल्याने फारसे लांब कुठे जाता येत नाही. गाडी चालवणेही तेवढे त्यांच्यासाठी सोपे नाही, अशाने फिरण्याला खूप मर्यादा येतात आणि मग वेळ जात नाही. “आपुला गावच प्यारा” असे म्हणत भारतात परत येतात.

      अमेरिकेमध्ये कार नंबर हा एक अजब प्रकार आहे. त्याचा नक्की काय सेक्वेंस आहे हे मला अजून पर्यंत कळलेले नाही. त्यापेक्षा भारतातील आकडे मोड फारच सोप्पी आणि सरळ. MH12 म्हणजे पुणे, MH01 म्हणजे मुंबई असा सोपा मामला येथे नाही. या वर हद्द म्हणजे केवळ ११० डॉलर भरून आपण पाहिजे त्या नावाची प्लेट कारवर लावू शकतो. काही राज्यात फक्त गाडीच्या मागे प्लेट आवश्यक तर काही राज्यात गाडीच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे प्लेट आवश्यक असते. नोकरी व्यवसाया निमित्त जर जास्त काळासाठी राज्य बदलणे आवश्यक असेल तर आपल्या सारखे त्या राज्याची नवीन प्लेट घ्यावी लागते. सगळेच मजेशीर...

इंडियानापोलीस:

“अमेरिकेतील अनेक गावाच्या नावात पोलीस काय करतो?” हा माझ्यापुढे पडलेला कायम प्रश्न होता. इंडियानापोलीस, मिनियापोलीस, अस्त्रोपोलीस, मेट्रोपोलीस.... पण पोलिसाशी फार संबंध नसावा म्हणजे नाहीये. विकिपीडिया शोधल्यावर हा पोलीस सापडला. पोलीस म्हणजे गाव. प्राचीन ग्रीक गाव दर्शविण्यासाठी पोलीस हा शब्द वापरला जायचा. आपल्याकडे नाही का वडगाव, जळगाव, चाळीसगाव या नावात कसे गाव शब्द आहे तसलाच प्रकार...

इंडियानापोलीस हे एक अमेरिकेतील महत्वाचे राज्य इंडियाना त्याची राजधानी आहे. इंडियाना राज्यातील महत्वाचे गाव/पोलीस (आता शहर) म्हणून नाव इंडियानापोलीस. १८२१ साली नियोजन बद्ध पद्धतीने उभे केलेले हे शहर आहे १८१६ साली इंडियाना ला राज्याचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर नवीन राजधानी उभी करण्याच्या हालचाली १७२१ मधे सुरु झाल्या. युरोप मधून आलेले अनेक लोक येथेच स्थायिक झाले आणि गेल्या २०० वर्षात बघता बघता मोठा विकास झाला.

येथे पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. Soldiers' and Sailors' Monument, Indianapolis Zoo,  The Chilren’s museum of Indianapolis, White Rive State Park, Fort Harrison State Park, Indiana World War Memorial, White Riev Gardens, Indiana Medical History Museum, Eagle Creek Park , Indianapolis Motor Speedway Museum, Indiana Central Canal आणि अनेक ठिकाणे. रात्र थोडी आणि सोंग फार तद्वत ठिकाणे खूप आणि वेळ कमी अशी माझी  अवस्था होती. तरी वेळात वेळ काढून बाहेरून का होईना बरीच ठिकाणे पाहायला मिळाली. इंडियाना सेन्ट्रल कॅनॉल walk ही घेतला. कॅनॉलच्या दोन्ही बाजूला इमारती, त्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसतंय, कोणी व्यायाम करायला इथे आलाय, कोणी नुसतेच भटकायला अशा नानाविध तऱ्हेची मंडळी पाहायला मिळाली. त्याच्याच बाजूला ट्वीन टोवर ची दोन खांब आणून उभे केले आहेत आणि ९/११ चा घटनाक्रम आणि त्याची छायाचित्रे बनवली आहेत.

   इतर कुठ्ल्याशी डाऊन टावून असतात तशाच इमारती, गर्दी आणि गजबज इथेही आहेत. त्यांच्या विधानभवनाची इमारत प्रेक्षणीय आहे. डाऊन टाउन मधे इंडियाना विद्यापीठाच्या काही इमारती आहेत. केली स्कूल इथलेच बर का! इंडियाना आणि पर्ड्यू विद्यापीठ एकत्र येवून काही कोर्स चालवतात, ते इथेच भरतात.

इंडियानापोलीस पासून ग्रीन वूड १५ मैल तर कोलंबस ५० मैल आहे. नोकरदार मंडळी आपापल्या सोयीने या तीन पैकी एका गावात राहतात आणि दुसऱ्या गावी रोज जा ये करतात. इंटरस्टेट ६५ या गावामधून जात असल्याने प्रवासाचा वेळ खूप वाचतो. मुळात सर्वच जण नियम कसोशीने पाळतात आणि हाय वे वर वेग ही ६० ते ७ मैल असतो. अमेरिकेमध्ये ७० स्पीड लिमिट याचा अर्थ असा की सर्वजण जास्तीत जास्त ८० मैल वेगाने जावू शकतात. याचा दुसराही अर्थ असा की कमीतकमी वेग ६० मैल असायला हवा. तुम्ही नवीन चालक आहात म्हणून पहिली (slow) लेन पकडून २० च्या वेगाने तुम्ही जाऊ लागलात तर लगेच खरा पोलीस येवून तुम्हाला पकडून तंबी देणारच. अमेरिकेमध्ये या गोष्टी सांभाळल्या तर गाडी चालवण्यासारखे सुख नाही. शिवाय पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त आहे. $२ एका gallon ला म्हणजे जवळ जवळ ३.८ लिटर म्हणजे अंदाजे ३३ रु लिटर. एकदा टाकी फुल केली ही जवळ जवळ ४८० मैल गाडी जाते.

Marengo caves:

कोलंबस पासून ९० मैल दक्षिणेला इंडियाना राज्यात या केव्ह आहेत. आमच्या एका मित्राच्या आशीर्वादाने ही लेणी पहायचा योग आला. साधारण आपल्याकडे लेणी म्हटले की डोळ्यासमोर येते ती मनुष्य निर्मित आणि कोरलेली अजिंठा आणि वेरूळची लेणी. निसर्ग निर्मित तयार झालेले लावणस्तंभ हे शब्द ७वी च्या भूगोलात वाचले होते आणि नंतर विसरून गेलो होतो. Marengo caves मुळे या गोष्टी परत पाहायला मिळाल्या.

१८८३ साली दोन शाळकरी मुलांनी याचा शोध लावला. टेकडी वरती खेळत असताना त्यांना जमिनीला एक मोठे भोक सापडले. दोरीने अंधारात खाली उतरले तर पाण्याचे जोरदार प्रवाहामुळे तयार झालेला एक मोठे जागा मेणबत्याच्या प्रकाशात त्यांना सापडली. येथे सुंदर सुंदर मिलरल चे forms येथे पाहायला मिळतात. जमिनीखाली साधारण १५० ते २०० फुट गेल्यावर हा निसर्गाचा खजिना पाहायला मिळतो. येथे २ टूर आहेत. The Dripstone Trail tour १ मैलाची टूर आणि Crystal Palace tour ही थोडी छोटी टूर आहे. हे forms अनेक शतकांनी तयार झाले असून ते अजून ही तयार होत आहेत. ह्या केव्स मधे लाईट आणि टूर गाईड ची सोय केलेली असून एक तासामध्ये सफर घडवतात. संपूर्ण caves जमिनीखाली आणि पाण्याच्या जवळ असल्याने येथे प्रचंड थंडी वाजते.  

      माझ्या अमेरिकेतील शेवटच्या टप्यात मी मिनियापोलीस ला गेलो होतो. तेथे दोनच दिवस होतो आणि गेल्या वेळेला भरपूर फिरणे झाल्यामुळे त्याची द्विरुक्ती येथे करत नाही. शेवटच्या दिवशी थोडा वेळ होता म्हणून मिनेहाहा पार्क ला जाऊन आलो. येथे ही एक छोटासा धबधबा आहे. याची पण एक गमतीदार गोष्ट मला प्रख्यात समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचेकडून समजली. एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिनियापोलीस ला आले होते आणि त्यांना या मिनेहाहा पार्क ला भेट द्यायची इच्छा झाली. त्या वेळी दुष्काळ असेल म्हणा किंवा काही कारणास्तव या धबधब्याला पाणी नव्हते. तेथील प्रसासनाने तातडीने Tanker आणून त्या धबधब्यात पाणी ओतले आणि वेळ साजरी केली. विशेष तर पुढेच आहे. राष्ट्राध्यक्ष महोदयांच्या भेटीत ही गोष्ट तेथील अधिकाऱ्यांनी न संकोच करता त्यांना सांगितली आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपर मधे ती मोठी बातमी झाली !!

अमेरिकन लोकांचे हे एक महत्वाचे वैशिठ्य नोंद घेण्यासारखे आहे. कुठेही आड पडदा ठेवणे, लपवा छपवी, खोटेपणा, थापा मारणे सहसा ते करीत नाहीत. जे आहे ते सगळे स्वच्छ आणि खुल्लमखुल्ला. जाहिरात बाजीत यांचा हात कोणी धरू शकणार नाही. बऱ्याच वेळा अगदी फालतू गोष्ट सुद्धा अगदी वाढवून (बढा चढाके) सांगतील.

मिनिसोटा राज्याच्या १०००० तळ्याच्या यादीतील एक तळे Langton Lake पहायचा योग आला. जवळच होते म्हणून गेलो. अगदी छोटे आणि बर्यापैकी अस्वच्छ असे याचे वर्णन करता येईल. तेथील बदके सुद्धा तळ्यात टाईमपास करण्यापेक्षा काठावर येवूनच वेळ घालवत होती आणि त्यांची पिल्ले सुद्धा.

 

      माझ्या परतीच्या प्रवासात भेटलेला Taxi चालक ही पाकिस्तानीच होता. त्याचे नाव सोहेल अहमद. Taxi मधे बसल्या बसल्याच माझ्या लक्षात आले की हा गप्पिष्ट आणि चांगला माणूस आहे. याची कहाणी वेगळीच. याचे बालपण गेले उत्तर प्रदेश मधील एका खेड्यात. आई वडील, अनेक काका काकू, आजी आजोबा असे एकत्र कुटुंब. सर्व काही सुख समाधानाने चालले होते. १९४७ साली इंग्रज भारत सोडून गेले आणि अनेक कुटुंबाना निर्णय घ्यायची वेळ आली की कुठे राहायचे? भारतात की पाकिस्तान मधे. त्याच्या आईचे माहेर कराचीचे होते त्यामुळे तिने पाकिस्तान मधे जायचा हट्ट धरला. शेवटी मोठ्या मनाने सोहेल च्या आजोबांनी त्यांना पाकिस्तान मधे जायला परवानगी दिली आणि याचे आई वडील मुलांना घेवून नेसत्या वस्त्रानिशी पाकिस्तान मधे कराचीला आले. उत्तर प्रदेश मधे पिढ्यान पिढ्या वसलेले हे कुटुंब एका दिवसात एकमेकांना परके झाले आणि दोन देशात राहू लागले. पुढील अनेक वर्षे या कुटुंबांनी वेळोवेळी एकमेकांना भेटायचा प्रयत्न केला. कधी यश आले कधी नाही. पाकिस्तानातील एकंदर परिस्थिती पाहून या महाशयांनी ३० वर्षापूर्वी अमेरिका गाठली आणि येथे शून्यातून सुरुवात केली. थोडा थोडा पैसा जोडून न्यू यॉर्क मधे एक छोटेसे दुकान चालू केले. पण काळाने झडप घातली आणि एका पुरामध्ये सगळे वाहून गेले. Insurence कंपन्या ही लबाड. त्यांनी याने मागितले तेवढे पैसे दिले नाहीत आणि यांच्या गरिबीचा आणि अगतिकतेचा फायदा घेऊन कार्यालयातून हाकलून लावले. त्यानंतर अनेक वर्षे मिळेल ते काम आणि मिळेल तेवढा पैसा असे करीत दिवस काढले. न्यू यॉर्क ची महागाई आणि खर्चाचा ताळमेळ अजिबात लागेना शेवटी कंटाळून एक दिवस मिनियापोलीस गाठले आणि गेले ३ वर्षे Taxi Driver म्हणून काम करतो आहे. देशाच्या फाळणी मधे असे किती लोक भरडले गेले असतील आणि त्यांच्या किती कहाण्या असतील.... असो.

      माझा परतीचा प्रवास अपेक्षेपेक्षा सुंदर झाला. विमानात गर्दी नव्हती. सहज समोरील स्क्रीन वर नकाशा पाहात असताना लक्षात आले की माझे विमान Greenland वरून जात आहे. Greenland, ध्रुवीय प्रदेश या गोष्टींचे मला लहान पासून आकर्षण आहे. सहज खिडकीची काच उघडून पाहिली तर सूर्यास्त होत होता. झटकन फोटो काढला आणि काही क्षणात सूर्य क्षितिजाच्या खाली गेला. एक गर्द नारिंगी किनार ढगाच्या वरती दिसू लागली. आणि काय आश्चर्य!! काही मिनिटात परत सूर्योदय झाला, त्याच क्षितिजावर. घड्याळात पहिले तर लोकल वेळ रात्रीचे १२ वाजले होते. मध्यरात्रीचा सूर्य हा चमत्कार नार्वे, स्वीडन आणि ध्रुवीय प्रदेशात पाहायला मिळतो आणि तोही २१ जून च्या आसपास असे कुठेतरी वाचल्याचे आठवले. माझे विमान आणि तारीख हे सारेच अगदी जुळून आले आणि मला ही निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला....

      

  बाकी सारे प्रवासी भविष्यातील स्वप्ने रंगवत गाढ निद्रादेवीच्या अधीन झाले होते आणि मी मात्र एकमेव नशीबवान निसर्गाचे हे असामान्य रूप डोळ्यात आणि कॅमेरा मधे साठवून ठेवण्यात व्यग्र होतो...

-    मंदार कुलकर्णी

१५ जुलै २०१७