श्रीक्षेत्र कारंजा
श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव म्हणजे कारंजा हे क्षेत्र आहे. याचा शोध वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावला. विदर्भामध्ये वाशीम जिल्ह्य़ामध्ये लाडाचे कारंजा या नावाचे हे स्थान असून मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकापासून २५ कि.मी. वर आहे. या ठिकाणी १९३४ साली ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी श्रीगुरुमंदिर बांधले. श्रींच्या जन्मस्थानावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच तेथे श्रीदत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली आहे.
वऱ्हाडात कारंजा नगरातील (हल्ली लाडाचे कारंजे) अंबाभवानी आणि माधव या दाम्पत्याच्या पोटी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हेच ‘श्रीनृसिंह सरस्वतीस्वामी’ होत. जन्माला आल्याबरोबर या बालकाच्या मुखातून ‘ॐ’काराचा उच्चार बाहेर पडू लागला अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशा प्रकारे श्रीदत्तात्रेयांच्या द्वितीय अवताराने जन्म घेतला, असे मानले जाते.
कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणातील पाताळखंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख आहे. आदिमन्वंतरात विंध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या करंज क्षेत्रात व त्याच्या आसमंतात पाण्याची फार दुर्मीळता होती. ऋषिमुनींना पिण्यापुरते देखील पाणी नव्हते. म्हणून वसिष्ठ ऋषींचे शिष्य करंजमुनी यानी एक तलाव खोदण्यास प्रारंभ केला. इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला. रेणुकादेवी करंजमुनींच्या पुढे प्रकट झाली. तिने करंज क्षेत्राचे माहात्म्य वर्णन केले. वसिष्ठ-शक्ति-संवादातून यमुना-महात्म्य वर्णन केले. गंगा व यमुना बिंदूमती कुंडात आहेत. (बेंबळपार नाव्याने सध्या हे कुंड प्रसिद्ध आहे.) गंगा व यमुना कुंडात गुप्त होऊन बिंदुमती (बेंबळानदी) या नावाने वाहतात. ती काही ठिकाणी गुप्त आहे व काही ठिकाणी प्रकट आहे. यमुना-महात्म्य सांगून रेणुका देवी गुप्त झाली. नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली. सर्व ऋषींनी आपल्या तप:सामर्थ्यांने सर्व नद्या व तीर्थे यांचे आकर्षण केले. त्यामुळे तो तलाव ताबडतोब भरला. करंज ऋषींना आश्रम करण्याची आज्ञा करून सर्व तीर्थ व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या अशी श्रद्धा आहे.
करंजमुनींच्या कृपा प्रसादाने शेषराज आपल्या कुळासह आपले गरुडापासून संरक्षण व्हावे म्हणून या क्षेत्रात वस्तीला आले. म्हणून करंज क्षेत्राला ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव पडले आहे, असे सांगितले जाते.
कारंजा येथील गुरूमंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती, पूजा, अभिषेक वगैरे झाल्यावर श्रींच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन करण्यात येते. बरोबर आठ वाजता शंखनाद होतो. त्यावेळी निर्गुण पादुका जेथे नेहमी ठेवण्यात येत असतात, तेथून त्या उचलून घेऊन डब्यांची झाकणे काढण्यात येतात. पादुकांवर अत्तरमिश्रित चंदनाचा लेप देण्यात येतो. नंतर त्या पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेविलेल्या चौरंगावर उघडय़ा डब्यात ठेवण्यात येतात. त्यावेळी भक्तमंडळींना त्याचे दर्शन घेता येते. श्रींची पूजा आटोपल्यावर त्या श्रींजवळ ठेवण्यात येतात. साधारणपणे नैवेद्य समर्पण करे तोपर्यंत त्या उघडय़ा ठेवतात. नंतर त्या पादुका डब्यात ठेवून डबे बंद करण्यात येतात. नंतर ते डबे, ठेवण्याकरिता केलेल्या खास सिंहासनावर नेऊन ठेवण्यात येतात. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे.
छान लेख, keep it up !
ReplyDeleteनुकतीच एक website पाहण्यात आली www.sahityadarbar.com
एकदा भेट देऊन बघा.. चांगली आहे. आपल्यासारख्या अमोल साहित्यिकांसाठी ... आल the बेस्ट