पाऊस
मंदार कुलकर्णी
27 सप्टेंबर 2018
27 सप्टेंबर 2018
पुण्यातील आजची संध्याकाळ. शाळा ऑफिस सुटायची वेळ. दुपारी चार पासूनच अंधारून यायला सुरुवात झाली. आणि बरोब्बर 6 च्या ठोक्याला पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर इतका होता की 10 फुटावरचे काही दिसेना. त्यात भरपूर झाडे पडली आणि अनेक रस्त्यावर वाहतूक थांबली. चाकरनामी मंडळी मग मिळेल तिथून आणि मिळेल तसा रस्ता शोधत आपले घर गाठत होती.
कर्वेनगर मधील भरतकुंज सोसायटी समोरील रस्त्याची हीच अवस्था. तेथील ओढ्यावरील पुलावर दोन मोठी झाडे आडवी पडली होती. जवळ जवळ 70 टक्के रस्ता त्यामुळे बंद. विशेष म्हणजे सर्व वाहन चालक जोरजोरात हॉर्न वाजवत आपले वाहन पुढे रेटत होती. हळूहळू गर्दी वाढतच होती. पाऊस चालूच होता आणि लोकांचा पेशन्स संपत चालला होता. मी ही त्या गर्दीचा एक भाग होतो. साधारण अर्ध्या तासाने त्या चिंचोळ्या जागेतून माझी सुटला झाली आणि विजयी विरासारखे मनात हास्य निर्माण झाले आणि तिथून निघणार एवढ्यात मनात विचार आला. मला आज विशेष घाई नाही पण ज्यांना खरच घाई आहे, कुठेतरी वेळेत पोहोचायचे आहे, मुलांना क्लासहून घ्यायचे आहे, त्यांची काय अवस्था झाली असेल?
सरळ गाडी बाजूला लावली आणि झाडाच्या फांद्या बाजूला करायला सुरुवात केली. म्हटलं तर अशक्य काम पण कुणीतरी सुरुवात करायला हवी ना... मोठी फांदी हलेचना, मग आजूबाजूच्या छोट्या फांद्या तोडायला सुरुवात केली. थोडं थोडं करत 10 टक्के रस्ता मोकळा झाला. लोक अत्यंत निर्विकारपणे माझ्या बाजूने निघून जात होते. कोणाला मी करत असलेल्या कामाची पर्वा आणि फिकीर नव्हती. भर पावसात कोणीतरी रस्ता मोकळा करायचं काम करतंय हे दिसत असूनही "आपल्याला काय त्याचं" असा आविर्भाव दर्शवत लोक मलाच हॉर्न वाजवत निघून जात होते.
साधारण 15 मिनिटांनी एक जण माझ्या जवळ आला आणि काही न बोलता फांद्या बाजूला करू लागला. पुन्हा अंगात बळ आलं, नवा उत्साह आला. इतक्यात अजून एक गाडी बाजूला घेऊन आमच्यात आला. आता ठरलं, काम फत्ते होणारच. आणि म्हणता म्हणता आम्ही तिघांनी पूर्ण रस्ता मोकळा केला. झाडाबरोबर आलेल्या केबल बाजूला करणे अजून जिकिरीचे काम पण तोही गुंता हळूहळू सोडवला. रस्ता वाहता झाला....
एवढ्या गदारोळात ज्यांनी मला न बोलता मदत केली त्यांची नावंच विचारायची राहून गेली... आपण पुण्याचे सुजाण नागरिक म्हणवतो मग इतकं काम आपण करायला नको का? वाईट अजून एक गोष्टीचं वाटलं. केवळ 50 मीटर वर असलेल्या अलंकार पोलीस चौकीला याची गंधवार्ता नव्हती. पोलीस मित्र म्हणायला जीभ जड जाते ती याच साठी....



No comments:
Post a Comment