Followers

Friday, May 31, 2019

महाराष्ट्रात युतीचे (कसेतरी) जमलेले गणित



लोकसभेचे निकाल 23 मे लागले आणि मोदी लाटेमध्ये सगळे विरोधी पक्ष वाहून गेले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA ला 353 जागा मिळाल्या आणि मोदीच पुढील 5 वर्षे पंतप्रधान राहणार हे नक्की झाले. मोदींऐवजी कोण ह्या अनेक महिने चाललेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आणि आता मंत्रिमंडळात कोण याची चर्चा सुरू झाली. पण ह्या सगळ्या प्रकारात महाराष्ट्रात युतीला 41 जागा आणि आघाडीला 5 जागा का मिळाल्या हे पाहायला कोणाला वेळ झालेला दिसत नाही.

मुळात एकतर 7 फेऱ्यात लांबलेली निवडणूक, त्यात महाराष्ट्रात 4 फेऱ्या आणि मतदान झाल्यानंतर 3 आठवड्याने लागलेले निकाल यामुळे सगळ्या गोष्टी अतिशय संथपणे चालू होत्या. 2 पक्षांनी आघाडी आणि दोन पक्षांनी युती करायचे आधीच ठरलेले असल्याने बाकी पक्षांना फारसे कोणी विचारात घेतले नाही. त्यात मनसे, वंचित आघाडी आणि इतर अनेक छोटे छोटे पक्ष आले. या सर्वांचा बारकाईने विचार केला तर काही गोष्टी लक्षात येतात.

1. राष्ट्रवादीची इच्छा असूनही काँग्रेसला नको असल्याने मनसे आघाडी मध्ये येऊ शकली नाही. याचा त्यांना बऱ्याच प्रमाणात फटका बसला. जर या 3 पक्षांनी खरंच आघाडी केली असती आणि राज ठाकरे यांनी हक्काने मतं मागितली असती तर आजचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते. मनसेने स्वतः लोकसभा निवडणुकीत भाग न घेता फक्त प्रचारसभा घेऊन आघाडी साठी मतं मागितली पण त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही. त्यांनी एकूण 10 प्रचार सभा घेतल्या त्यातील 7 ठिकाणी आघाडीचे उमेदवार सपशेल पडले. ज्या 3 ठिकाणी जिंकले त्या ठिकाणी आघाडीचे उमेदवार हे स्वतःच्या जीवावर जिंकून येण्याच्या ताकदीचे होते. उदा भोसले, सुळे आणि तटकरे. यांना जिंकण्यासाठी मनसेची मदत लागली हे म्हणणे जरा धाडसाचे ठरेल.

2. एकूणच राज ठाकरेंच्या सभांनी गर्दी केली पण 'लाव रे तो व्हिडीओ' ने मनोरंजनच जास्त झाले. आणीबाणीच्या काळात पु ल नी अशाच सभा घेऊन इंदिरा गांधी यांना पायउतार केले पण ती गोष्ट राजना जमली नाही. मुळात सभा गाजवणे आणि त्याचे मतपेटीत परिवर्तन होणे ह्या गोष्टी त्यांना आतापर्यंत जमल्या नाहीत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 220 उमेदवार उभे करून फक्त 1 जागा मिळाली. यातच आपली काहीतरी गडबड होते आहे हे त्यांनी अजून लक्षात घेतले नाही. शिवाय 'कमरेखालची भाषा' ही शिट्या मारायला चांगली दिसत असली तरी बहुसंख्य मतदार अशा वाक्यांना मतपेटीत परावर्तित करत नाही. 

3. वंचित आघाडीला एकूण 41 लाख मते मिळाली आणि त्यांनी आघाडीची बरेच मते खाल्ली. एका अभ्यासानुसार जवळपास 9 जागी युतीला याचा फायदा झाला. मुळात वंचित आघाडीला मिळालेली मते ही बहुसंख्य एका जातीची किंवा पोटजातीची अशीच मिळाली आहेत. त्यांचा फार फटका युतीला झालेला दिसत नाहीये. पण विधानसभेची गणितं या मुळे नक्की बदलणार आहेत.

4. युतीला 41 आणि विशेषतः शिवसेनेला इतक्या जागा मिळायचे एकमेव कारण म्हणजे मोदी लाट. त्यातही लोकसभेच्या प्रत्येक जागी जणूकाही स्वतः मोदीच उभे आहेत असे मनात धरून लोकांनी मतदान केले. कांचन कुल यांना 5.5 लाख मते मिळणे किंवा तटकरे थोडक्यात जिंकणे हे त्याचेच लक्षण आहे. काही ठिकाणी तर आघाडीचा चांगला आणि शिकला सवरलेला उमेदवार असतानाही जनतेने युतीला डोळे झाकून मते दिली. शिवसेनेने यामुळे परत एकदा शेफारून जायची आणि गेली 5 वर्षे ज्या पद्धतीने भाजपा ला पाण्यात पाहिले आणि पाणउतारा केला तसे आतातरी करायची गरज नाही. एकट्याने निवडणूक लढवली की काय अवस्था होते हे त्यांच्या 2014 विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून एव्हाना लक्षात यायला हवे.

5. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकूण निकालाकडे पाहून आतातरी मनःशांती केंद्रात जाऊन ध्यान करून यायला हवे. ज्या अतिरेकी पद्धतीने चुकीचा आणि खोटेपणा करीत त्यांनी 5 वर्ष tv गाजवला आणि ऐन निवडणुकीत 'लाज कशी वाटत नाही' असली तद्दन शिट्या मारी जाहिराती केल्या त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मुळात विरोधी पक्षांकडे मुद्देच नव्हते आणि विरोधी पक्षात असूनही आपल्याला आपल्या मतदारसंघात किंवा राज्यात काही विधायक काम करता येते हेच ही मंडळी विसरून गेली. फक्त कर्ज माफी करा असा धोशा लावून लोकांना तुम्ही खुश करू शकत नाही, त्यासाठी कामही करावं लागतं. काँग्रेसला तर विधानसभा नेताच स्वतःकडे टिकवता आला नाही, या पेक्षा दुर्दैव ते काय... अंतर्गत कुरघडी, राहुलचे शून्य संघटन कौशक्य आणि आपसातील हेवेदावे या मुळे आघाडीची कमालीची वाट लागली. यातून ते कधी सावरतील असे वाटत नाही.

एकूण काय, तर संपत चाललेला विरोधी पक्ष म्हणजे आघाडी, रसातळाला गेलेली मनसे आणि मत खाण्यासाठी वापरली गेलेली वंचित आघाडी यामुळे युतीचे काम अगदीच सोपे झाले. यातून प्रत्येक पक्षाने आपल्याला योग्य तो मेसेज घेतला म्हणजे मिळवली... नाही का.
- मंदार कुलकर्णी
30 मे 2019

Thursday, May 30, 2019

आता लढाई विधानसभा...


२०१९ च्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यात भा ज पा ने शिवसेनेची युती केली आणि त्यांना अपेक्षेप्रमाणे घवघवीत यश मिळाले. या आकड्यांमुळे सर्व सेना आणि भाजपा नेते सध्या सुखावले आहेत पण त्यांना इतकी मते आणि इतक्या जागा का मिळाल्या याचा अभ्यास करायला वेळ झालेला दिसत नाही.


१. मुळात युतीला एवढ्या जागा मिळाल्या ते एकूणच जास्त झालेलं मतदान हे आहे. या निवडणुकीत सर्वाधिक ६८% टक्के मतदान झाले.
२. मोदी आणि मोदी सरकारची स्वच्छ प्रतिमा आणि कुठेलेले भ्रष्टाचार न केलेले सरकार त्यामुळे मतदान त्यांच्या बाजूने झाले.
३. वंचित आघाडीने महाराष्ट्रात एकूण ४१ लाख मते मिळवली किंबहुना तेवढी काँग्रेस आघाडीची मतं कापली. एका अभ्यासानुसार वंचित आघाडी नसती तर युतीच्या कमीत कमी ९ जागा आघाडी कडे गेल्या असत्या!!
४. म न से ने लोकसभा निवडणुकीत भाग घेतला नाही. त्यांनीही युतीची काही मते खाल्ली असती तर युतीच्या जागा अजून कमी झाल्या असत्या.
५. मुळातच जराजर्जर झालेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात मते कशी मागायची हे कळलेच नाही. त्यामुळे उगाच टीव्ही वर आरडाओरडा करत स्वतःचे त्यांनी हसे करून घेतले.
अजून बरीच कारणे असतील पण येणाऱ्या विधानसभेचा विचार करता भाजपाने जर युती पुढे चालू ठेवली आणि आधी ठरलेल्या फॉरमूल्याप्रमाने ५०% च जागा जर लढवल्या तर भाजपाचा मुख्यमंत्री परत होणे केवळ अवघड आहे. त्यातच युतीला त्यांच्या मित्र पक्षांसाठी १५-२० जागा सोडायला लागणार आहेत. याचा अर्थ त्यांच्या जिंकायच्या जागा अजून कमी होणार.
काल अशी चर्चा जोर धरू लागली आहे की आदित्य ठाकरे विधानसभा लढवायची शक्यता आहे. तसे जर झाले तर ज्या पद्धतीने मोदी वाराणसी मध्ये लढल्यामुळे भाजपाला उत्तर प्रदेश मध्ये 73 जागा गेल्या निवडणुकीत मिळाल्या, तशाच जागा सेनेला महाराष्ट्र राज्यात मिळू शकतात. त्या परिस्थितीत जर सेनेच्या विजयी जागा भाजपा पेक्षा जास्त भरल्या तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार हे नक्की.
लोकांनी आणि पक्षाने फडणवीस यांचे कितीही कौतुक केले तरी त्यांच्या एकट्याच्या जीवावर भाजपा विधानसभा जिंकू शकत नाही आणि मुख्यमंत्री पद मिळवू शकत नाही. मोदींचे निवडणुका जिंकायचे कसब त्यांना साध्य करायला अजून खूप वेळ जायला हवा आहे.
त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कारभार ही इतका काही डोळ्यात भरणारा नाही. मराठा आरक्षण प्रश्न, शेतकरी कर्ज माफी अशा अनेक विषयात त्यांची फडणवीसगिरी पेपर मध्ये दिसत असली तरी आरक्षण नको म्हणणारा एक मोठा समाज त्यांच्यापासून दूर जात आहे हे नक्की. त्याच प्रमाणे आपला हक्काचा कररूपी भरलेला पैसा विकास कामांना न जाता फक्त सरसकट करमाफी मध्ये ओतला जात असेल तर कर भरणारे ही नक्कीच त्यांच्यावर नाराज होणार. टोल कमी करणे किंवा संपवणे, राज्य स्तरावर पाण्याचा प्रश्न, नाणार प्रकल्पामधील माघार, राज्य स्तरावरील रखडलेली विकासकामे अशा अनेक विषयात सध्याच्या सरकारने फारसे दिवे लावले नाहीत.
मी गेल्या लेखात लिहिल्याप्रमाणे भाजपा ला पक्ष म्हणून महाराष्ट्रात वाढायची सुवर्णसंधी लोकसभा निवडणुकीत युती करून गमावली. पण त्याची भविष्यातील फळं त्यांना भोगावी लागतील हे नक्की.
- मंदार कुलकर्णी
२८ मे २०१९

Friday, May 17, 2019

सोशल मीडिया की मृत्यूचा सापळा



सोशल मीडियावर आणि त्या बद्दल गेले 10 वर्ष बरेच बोलले गेले आहे आणि या पुढेही यावर चर्चा होत राहील. पण आज या सोशल मीडियाने जे रौद्र रूप धारण केले आहे याची फारशी कोणाला कल्पना नसेल. त्यासाठी गेल्या काही महिन्यातील घटना पाहिल्यास लगेच लक्षात येईल.
फेसबुक आणि तत्सम कोणत्याही साईट वर आपले फेक प्रोफाइल बनवून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार आपल्याला नित्य नेमाने पाहायला मिळतात. प्रोफाइल वर अतिशय सुंदर अशा व्यक्तीचे चित्र डकवून किंवा चुकीची माहिती दाखवून एखाद्याला किंवा एखादीला आकर्षित करण्याचे प्रकार कमी नाहीत. याच माध्यमातून ओळख काढून, मग वाढवून आणि नंतर लग्नापर्यंत गोष्टी पुढे गेलेल्या आहेत.
दिवसाचे काम धंदे सोडून तासं तास फेसबुक व्हाट्सएपच्या नादी लागणारे काही कमी नाहीत. दिवसातून काही तास रोज सोशल साईट्स वर फॉरवर्ड चा रतीब घालणाऱ्यात नुसते रिकामटेकडे लोक नसून अतिशय मोठ्या पदावरील व्यक्ती ही असतात. पूर्वी निदान या साऱ्या
गोष्टी कंप्युटरवर करता यायच्या, पण जेव्हा पासून मोबाइल आले, तेव्हापासून सगळंच काम सोपे आणि अति झालं आहे.
प्रश्न पडतो, फेसबुक लाईव्ह करून विळे आणि कोयते हातात घेऊन आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणारे कशाचे निदर्शक आहेत? सोशल मीडिया वर क्रूर आणि अश्लील फोटो आणि बातम्या पसरवणारे लोक हे कुठल्या मुशीतून जन्माला आहे आहेत?
आज तर हद्दच झाली. एका 16 वर्षाच्या मुलीने इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोवरना विचारले की तिने जगावं की नाही? एकूण 69 टक्के लोकांनी 'मृत्यू' असे मत दिले. त्यांचे ऐकून त्या मुलीने चक्क आत्महत्या केली... तिला 'जिवंत रहा किंवा मृत्यूला कवटाळ' हे सांगायचा आणि मत द्यायचा अधिकार लोकांना कोणी दिला? आणि त्या पुढची गोष्ट त्या मुलीने तरी या मूर्खांचे ऐकून आपला जीव का गमवावा?
सोशल मिडीया हा राक्षस असून तो आपल्या मानगुटीवर बसलेलाच आहे. त्याचा उपयोग कमी आणि नुकसान जास्त अशी आत्ताची स्थिती आहे. सगळेच जण आभासी जगात इतके व्यग्र आहेत की बाजूला बसलेल्या आणि खऱ्या व्यक्तींशी बोलायला लोकांकडे आज वेळ नाही. वाढदिवसाला प्रेमाने भेटून शुभेच्छा देण्यापेक्षा ग्रूप वर हॅपी बर्थडे चे कर्तव्य पार पाडले म्हणजे झालं अशी आजची स्थिती आहे. प्रत्यक्ष बोलण्यातून भाषा, भावना, काळजी, आनंद अशा अनेक गोष्टी कळतात पण सोशल मीडियाच्या मागे लपून तेच टाळणे चालू आहे. वाद, संवाद आणि सुसंवाद ह्या गोष्टी चढत्या क्रमाने होतात पण त्याच टाळायची वृत्ती बळावली आहे आणि मग उरते काय तर एक आभासी फुलांचा गुच्छ आणि ओलावा नसलेले फॉरवर्ड केलेले मेसेजेस...
आज पुढच्या पिढीला वाचवण्यापेक्षा आपण स्वतः या गर्तेतून कसे बाहेर पडू याचा विचार करायची वेळ आली आहे. रोज काहींना काही घटना घडणारच. कुठे मारहाण, कुठे दंगा, कुठे उपासमार, मग या सगळ्या गोष्टी रिअल टाइम सोशल मीडिया तर्फे आपल्याला तत्क्षणी काळायलाच हव्यात का? एक दिवस उशिरा पेपर मध्ये वाचले तर नाही चालणार का?
सोशल मीडियाची प्रायव्हसी हा तसाच एक स्वतंत्र आणि संशोधनाचा विषय आहे. आपण जे तेथे सारखे फोटो टाकतो याचा कुठे आणि किती ठिकाणी गैरवापर होतो याची कल्पना आहे का? अमेरिकन कोर्टातही त्यांनी हे मान्य केले आहे की याचा दुरुपयोग होतो तरी पण आपण ते कमी करतो का? 'दिल्ली ला जातोय' असे फेसबुक वर सांगून आपण चोरांना घर फोडायला आयतेच आमंत्रण देतो का देतो? जिथे जाऊ तिथल्या ठिकाणचे फोटो आणि टॅग करून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला नकळत संकटात टाकतो ना?
हे न थांबायचं एकंच कारण ते म्हणजे याचे लागलेले व्यसन... पूर्वी दारू, सिगरेट वगैरे व्यसनं म्हणायचे. आता सोशल मीडियावर पडी हे जगातील सर्वात मोठे व्यसन बनले आहे. जे कोणत्याही वयात लागते आणि ते सोडवणारा आणि त्यासाठी मदत करणारा कोणी उरलाच नाही कारण मदत करणाराही अधिकाधिक गर्तेत अडकत चालला आहे.
संपूर्ण तरुण पिढीच नव्हे तर आबालवृद्ध या सोशल मीडियाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. मीही त्याचा एक भाग आहे आणि त्यातून बाहेर पडणे अभिमन्यू सारखेच अत्यंत कठीण आणि अशक्य कोटीतील आहे....

मंदार कुलकर्णी
16 मे 2019