Followers

Friday, May 17, 2019

सोशल मीडिया की मृत्यूचा सापळा



सोशल मीडियावर आणि त्या बद्दल गेले 10 वर्ष बरेच बोलले गेले आहे आणि या पुढेही यावर चर्चा होत राहील. पण आज या सोशल मीडियाने जे रौद्र रूप धारण केले आहे याची फारशी कोणाला कल्पना नसेल. त्यासाठी गेल्या काही महिन्यातील घटना पाहिल्यास लगेच लक्षात येईल.
फेसबुक आणि तत्सम कोणत्याही साईट वर आपले फेक प्रोफाइल बनवून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार आपल्याला नित्य नेमाने पाहायला मिळतात. प्रोफाइल वर अतिशय सुंदर अशा व्यक्तीचे चित्र डकवून किंवा चुकीची माहिती दाखवून एखाद्याला किंवा एखादीला आकर्षित करण्याचे प्रकार कमी नाहीत. याच माध्यमातून ओळख काढून, मग वाढवून आणि नंतर लग्नापर्यंत गोष्टी पुढे गेलेल्या आहेत.
दिवसाचे काम धंदे सोडून तासं तास फेसबुक व्हाट्सएपच्या नादी लागणारे काही कमी नाहीत. दिवसातून काही तास रोज सोशल साईट्स वर फॉरवर्ड चा रतीब घालणाऱ्यात नुसते रिकामटेकडे लोक नसून अतिशय मोठ्या पदावरील व्यक्ती ही असतात. पूर्वी निदान या साऱ्या
गोष्टी कंप्युटरवर करता यायच्या, पण जेव्हा पासून मोबाइल आले, तेव्हापासून सगळंच काम सोपे आणि अति झालं आहे.
प्रश्न पडतो, फेसबुक लाईव्ह करून विळे आणि कोयते हातात घेऊन आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणारे कशाचे निदर्शक आहेत? सोशल मीडिया वर क्रूर आणि अश्लील फोटो आणि बातम्या पसरवणारे लोक हे कुठल्या मुशीतून जन्माला आहे आहेत?
आज तर हद्दच झाली. एका 16 वर्षाच्या मुलीने इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोवरना विचारले की तिने जगावं की नाही? एकूण 69 टक्के लोकांनी 'मृत्यू' असे मत दिले. त्यांचे ऐकून त्या मुलीने चक्क आत्महत्या केली... तिला 'जिवंत रहा किंवा मृत्यूला कवटाळ' हे सांगायचा आणि मत द्यायचा अधिकार लोकांना कोणी दिला? आणि त्या पुढची गोष्ट त्या मुलीने तरी या मूर्खांचे ऐकून आपला जीव का गमवावा?
सोशल मिडीया हा राक्षस असून तो आपल्या मानगुटीवर बसलेलाच आहे. त्याचा उपयोग कमी आणि नुकसान जास्त अशी आत्ताची स्थिती आहे. सगळेच जण आभासी जगात इतके व्यग्र आहेत की बाजूला बसलेल्या आणि खऱ्या व्यक्तींशी बोलायला लोकांकडे आज वेळ नाही. वाढदिवसाला प्रेमाने भेटून शुभेच्छा देण्यापेक्षा ग्रूप वर हॅपी बर्थडे चे कर्तव्य पार पाडले म्हणजे झालं अशी आजची स्थिती आहे. प्रत्यक्ष बोलण्यातून भाषा, भावना, काळजी, आनंद अशा अनेक गोष्टी कळतात पण सोशल मीडियाच्या मागे लपून तेच टाळणे चालू आहे. वाद, संवाद आणि सुसंवाद ह्या गोष्टी चढत्या क्रमाने होतात पण त्याच टाळायची वृत्ती बळावली आहे आणि मग उरते काय तर एक आभासी फुलांचा गुच्छ आणि ओलावा नसलेले फॉरवर्ड केलेले मेसेजेस...
आज पुढच्या पिढीला वाचवण्यापेक्षा आपण स्वतः या गर्तेतून कसे बाहेर पडू याचा विचार करायची वेळ आली आहे. रोज काहींना काही घटना घडणारच. कुठे मारहाण, कुठे दंगा, कुठे उपासमार, मग या सगळ्या गोष्टी रिअल टाइम सोशल मीडिया तर्फे आपल्याला तत्क्षणी काळायलाच हव्यात का? एक दिवस उशिरा पेपर मध्ये वाचले तर नाही चालणार का?
सोशल मीडियाची प्रायव्हसी हा तसाच एक स्वतंत्र आणि संशोधनाचा विषय आहे. आपण जे तेथे सारखे फोटो टाकतो याचा कुठे आणि किती ठिकाणी गैरवापर होतो याची कल्पना आहे का? अमेरिकन कोर्टातही त्यांनी हे मान्य केले आहे की याचा दुरुपयोग होतो तरी पण आपण ते कमी करतो का? 'दिल्ली ला जातोय' असे फेसबुक वर सांगून आपण चोरांना घर फोडायला आयतेच आमंत्रण देतो का देतो? जिथे जाऊ तिथल्या ठिकाणचे फोटो आणि टॅग करून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला नकळत संकटात टाकतो ना?
हे न थांबायचं एकंच कारण ते म्हणजे याचे लागलेले व्यसन... पूर्वी दारू, सिगरेट वगैरे व्यसनं म्हणायचे. आता सोशल मीडियावर पडी हे जगातील सर्वात मोठे व्यसन बनले आहे. जे कोणत्याही वयात लागते आणि ते सोडवणारा आणि त्यासाठी मदत करणारा कोणी उरलाच नाही कारण मदत करणाराही अधिकाधिक गर्तेत अडकत चालला आहे.
संपूर्ण तरुण पिढीच नव्हे तर आबालवृद्ध या सोशल मीडियाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. मीही त्याचा एक भाग आहे आणि त्यातून बाहेर पडणे अभिमन्यू सारखेच अत्यंत कठीण आणि अशक्य कोटीतील आहे....

मंदार कुलकर्णी
16 मे 2019

No comments:

Post a Comment