माझ्या आर्मी मधील लेफ्ट. कर्नल या पदावर असलेल्या भावाच्या कृपेने नुकतेच राष्ट्रपती भवन पहायचा योग आला. बहुतेक सर्व पर्यटक इंडिया गेट, राजपथ इत्यादी ठिकाणे पाहतात. राष्ट्रपती भवन पहाण्यासाठी एकतर पूर्व परवानगी घ्यावी लागते आणि तीही खूप मर्यादित संख्येने लोकांना मिळते. साधारण 10 ते 30 जणांचा ग्रुप बनवतात आणि प्रत्येक ग्रुप बरोबर एक मार्गदर्शक राष्ट्रपती भवनाचा काही भाग पर्यटकांना दाखवतात. या सफरी विषयी अधिक लिहिण्यापुर्वी ‘राष्ट्रपती भवन’ आणि त्याचा जुजबी इतिहास सांगतो.
राष्ट्रपती भवन म्हणजे आपले आदरणीय राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांचे घर आणि कार्यालय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या व्यक्तीचे घर आणि कार्यालय एकच? तर हे ठिकाण 320 एकर मध्ये उभे केलेले असून त्यात 340 खोल्या आहेत. मुळात याचे पूर्वीचे नाव ‘व्हॉईसरॉय हाऊस’ असे आहे. 1910 साली इंग्रजांनी (ब्रिटिश) भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे हलवायचे ठरवले. नवीन शहराचे नियोजन करायचे काम एडविन लुतेन याने केले. जुन्या दिल्लीजवळ साधारण 4000 एकर जागा मोकळी करून तेथे नवीन शहर वसवायचे ठरले. तेच आजचे ‘नवी दिल्ली’. त्यासाठी रायसिना आणि मलचा ही खेडी पुर्णपणे विस्थापित करण्यात आली आणि जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. एडविनच्या डिजाइन चे वैशिठ्यच हे की जे करेल ते सारे भव्यदिव्य. जवळ जवळ 20 वर्षे याचे बांधकाम चालू होते. असंख्य वेळा दिल्ली आणि इंग्लंड अशा वार्या त्याने केल्या. 1929 साली अखेर ते पूर्ण झाले.
4 मजले, 340 खोल्या, 19000 वर्ग मिटर क्षेत्रफळ, बांधकामासाठी लागलेल्या 70 कोटी विटा आणि 85000 वर्ग मी चे दगड यावरुन भवनाच्या भव्यतेची कल्पना येईल.
राष्ट्रपती भवनामधील मुघल गार्डन आणि इतर गोष्टी ही तितक्याच प्रेक्षणीय. त्यात काही मुझियम आहेत. राष्ट्रपतीना वेगवेगळ्या देशाच्या भेटीत मिळालेल्या भेटवस्तू आहेत, अगदी काटा चमच्या पासून ते किचन सेट पर्यन्त. भवनाच्या प्रांगणात मोर मनसोक्त फिरत असतात. कडेकोट सुरक्षा आणि थोडेसे दहशतीचे वातावरण यात काही तास निघून जातात.
ही वास्तू पाहताना माझ्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत होते. आज जरी ते आपल्या राष्ट्रपतीचे निवासस्थान असलं तरी एकेकाळी ते इंग्रजांच्या ‘व्हॉईसरॉयचे घर’ होते. ‘व्हॉईसरॉय ऑफ इंडिया’ असे ते पद होते. नाही म्हटले या पदावरील व्यक्ती इंग्लंडच्या राणीला सलाम करणार आणि तिने दिलेल्या पगारावर जगणार. अशा व्यक्तीचे घर आपल्या देशाच्या सर्वोच्च व्यक्तीने का घ्यावे आणि वापरावे? व्हॉईसरॉय हा शेवटी राणीचा नोकरच ना...
राष्ट्रपती भवनात आम्ही जे कक्ष पाहिले त्यात सर्व इंग्रजांच्या काळातील आठवणी जपल्या होत्या. 19 व्या शतकातील इंग्लंडचे राजे, राण्या, व्हॉईसरॉय आणि अनेक जणांची तैलचित्रे. संगमरवरचे पुतळे, त्याचा मनमरातब हेच सर्व काही. यात ‘भारतीय’ असे काहीच नव्हते. इंग्रजांचे राजे आणि राण्या यांचे कौतुक पाहायचे तर मी इंग्लंडला जाऊन पाहीन. राष्ट्रपती भवन हे त्याचे ठिकाण असू शकत नाही. उगाचच गुलामगिरीत परत गेल्यासारखे वाटले.
दुसरा मुद्दा. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आज लाखो लोक फुटपाथ वर, रस्त्यावर झोपतात तर खरेच महामाहीम राष्ट्रपती यांना 320 एकर जागेतले घर कशाला पाहिजे? गेल्या वर्षी पर्यन्त हेच राष्ट्रपती भवन हे जागेच्या क्षेत्रफळांनुसार ‘जगातील सर्वात मोठे राहण्याचे ठिकाण’ होते !!! लहान घरात राष्ट्रपती यांनी का राहू नये? व्हॉईसरॉयच्या राहण्याच्या सोयीसाठी बनवलेली वास्तू संग्रहालयात रूपांतरित करून, त्यातून स्वदेशी आणि विदेशी पर्यटक आकर्षित करून परकीय गंगाजळी मिळवायला हवी. राष्ट्रपती यांची अशी अनेक घरे आज भारतात आहेत. उदा. ‘राष्ट्रपती नीलायम’, हैदराबाद. कशासाठी? आपल्या घटनेप्रमाणे राष्ट्रपती ही सर्वोच्च व्यक्ती असली तरी त्यांचे सर्व महत्वाचे अधिकार हे पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ हे घटनेप्रमाणेच वापरतात. मग आजच्या काळात एवढा बडेजाव खरच हवा का?
एकंदरीत ही वास्तू मनापासून आनंद आणि अभिमान वाटण्यापेक्षा जास्तीचे प्रश्न निर्माण करून गेली.....
- मंदार कुलकर्णी
3 जाने 2016
मंदार,
ReplyDeleteतुम्ही वर व्यक्त केलेले विचार अगदी पटले.
योगायोग म्हणजे मलापण काही दिवसांपूर्वी असाच विचार आला होता. संसद भवन, राष्ट्रपती भवन या वास्तूंचे संग्रहालयच बनवायला हवे. जगातील महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताला इंग्रजी गुलामगिरीच्या प्रतिक असणार्या वास्तू मध्ये आपली लोकशाही चालवावी हा विरोधाभासच आहे.