पार्किंग
आज जगात लोकसंख्येपाठोपाठ जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यात पार्किंग चा क्रमांक खूप वर लागतो. म्हटलं तर *त्यात काय एवढं?* असं वाटणारा विषय नुसताच साधा सोपा नाही तर बराच गुंतागुंतीचा आहे. पुणे मुंबई सारख्या शहरात पार्किंगला जागा मिळणं हे अवघड गोष्ट झाली आहे. कार घेऊन बाजीराव रोड, लक्ष्मी रोड वर येणे हे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. रस्त्यावर पार्किंग सोडा, पार्किंग स्टेशन (अड्डा) मध्ये ही जागा मिळत नाही. पेठेतील कार मालकांनी तर वर्षासाठी पार्किंग भाड्याने घेतली आहेत. हाच त्रास दिल्ली, बंगलोर आणि भारतातील बहुतेक मोठ्या शहरात आहे. आबुधानी आणि दुबई ला तर पार्किंग मिळणे दुरापास्त झाले आहे. तेथील पेड पार्किंग भारतातील घरभाड्यापेक्षा महाग आहे. तेथे तर रस्त्याच्या मध्ये (दुभाजक) पार्किंगची सोय केली गेली होती, ती पण संपली.
हेच चित्र आता परदेशातही दिसते. लंडन, न्यू यॉर्क, शिकागो, इंडियानापोलीस, म्युनिच कुठलेही गाव असो, सगळीकडे आता पेड पार्किंग असते. आपणच रस्त्याच्या कडेला असलेल्या बॉक्स मध्ये वेळ आणि पैसे भरायचे.
पब्लिक प्लेसेस मध्ये टुरिस्ट बसेस आता पार्क करू दिल्या जात नाहीत. पिसाचा मनोरा, अजिंठा येथेही वेगळी बस पर्यटकांना घेऊन जाते.
प्रश्न एवढाच आहे, एका बाजूला ऑटोमोबाईल इंडस्ट्री 20-30% या गतीने दरवर्षी वाढत आहे. लोकसंख्या प्रचंड वाढते आहे, तर रस्ते आणि मोकळी जागा दिवसे दिवस कमी होत आहे. नुसतं पी1 पी2 करून किंवा पेड पार्किंग/ नो पार्किंग करून काही होणार नाही. मग हा पार्किंगचा प्रश्न कधी सुटणार की नाही?
मंदार कुलकर्णी
15 मे 2018







