Followers

Friday, May 25, 2018

सौर शेती !!!


सौर शेती !!!

सध्या मी युरोपच्या सहलीला आहे. अनेक देश अनेक प्रांत मजेत पाहत पाहत पुढे जात आहोत. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथे होत असलेला सौर ऊर्जेचा मुक्त वापर. बऱ्याच घरांच्या कौलावरती, छतावर सोलर पॅनल लावलेले आहेत. 

वास्तविक या प्रदेशात सलग काही दिवस सूर्य दर्शन होणे हीच अवघड गोष्ट, त्यात हिवाळ्यात पडणारे प्रचंड बर्फ आणि थंडी. त्यामुळे येथे सौरऊर्जा किती प्रभावीपणे वापरली जात असेल या बद्दल मनात अजूनही शंका आहे. कधीही जमा होणारे ढग, काही तासात लखलखीत ऊन पडत असलेला भाग पावसाने चिंब होऊन जातो. बोचरे आणि थंड वारे यांनी बनणारे निरुत्साही वातावरण. हे सगळे निगेटिव्ह मुद्दे असून येथील लोकांचा सोलर पॅनेल लावायचा उत्साह दांडगा आहे. काही ठिकाणी तर अख्या शेतावर सोलर पॅनल लावली आहेत. आणि विचार मनात आला, अशीच किमया आपण भारतात का नाही करू शकत?

भारतात पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर बाकी वर्षभर तोबा ऊन असते. आजकाल उन्हाळ्यात 45 ते 48 डिग्री पर्यंत तापमान पोहोचते. यातून किती वीज निर्माण करता येईल? ज्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत, त्या जमिनीवर सोलर पॅनल लावली आणि तर वर्षभर त्यांना वीज मंडळाला वीज पुरवता येईल आणि त्यांना वर्षभर त्यातून उत्पन्न मिळेल. सोलर पॅनेल पुसण्याशिवाय काही काम नाही. यातून आपली विजेची गरजही भागवता येईल आणि एक कायमचे उत्पन्नाचे साधनही होईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता सौर शेती करून स्वयंपूर्ण व्हायला काय हरकत आहे?

मंदार कुलकर्णी
13 मे 2018





No comments:

Post a Comment