सध्या सगळीकडे दोनच बातम्या पहायला, वाचायला आणि चर्चेला दिसतात. निवडणूक आणि उन्हाळा... विशेषतः लोकसभा निवडणूक तर हटकून उन्हाळ्यात येते. ग्लोबल वोर्मिंग मुळे म्हणा, झाडं कमी झाली, वृक्षतोड झाली म्हणा पण आजकाल उठलं की सकाळ नसतेच, डायरेक्ट दुपारच येते आणि सूर्यास्त झाला तरी टिकून राहते. जळगाव आणि सोलापूर सारख्या कडक उन्हाळ्याच्या ठिकाणी राहिलेला असूनही मला या वर्षीचा उन्हाळा जास्त वाटतो आहे.
आज भर दुपारी काही कारण नसताना बायकोने बाहेर पिटाळले होते. तर कामे पटापट उरकून घर गाठण्यापूर्वी पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोल भरली की हवा भरणे आलेच. तिथला मुलगा मला इतरांपेक्षा जरा वेगळा वाटला. इमाने इतबारे भर उन्हात खाली वाकून चाकात हवा भरायचे काम करत होता. वाहनचालक मंडळी स्वतः गाडीत बसून काच खालीही न करता त्याच्यावर रुबाब करत होती. कोणी पैसे द्यायचे, कोणी नाही.
मी माझ्या सवयीप्रमाणे गाडीतून उतरून त्याला हवा भरायची विनंती केली. इतका वेळ गाडीत ए सी लावल्यामुळे बाहेर किती भाजते आहे याचा अनुभव गाडीतून बाहेर आल्यावर मिळाला. सहज त्याला हवा भरताना विचारले, "तुला ऊन लागत नाही का रे?" तर म्हणाला, "लागतं की, पण... पण आता सवय झाली..." मला नाही पटलं मनातून.
पटकन गाडीतून एक नवीन उन्हाची टोपी काढली आणि त्याच्या डोक्यावर घातली. नको म्हणाला. "असू दे, ऊन सगळ्यांना सारखंच लागतं. तू ही टोपी रोज वापर बाबा..." त्यानं पण माझा मान राखत मंद स्मित करत टोपी घातली आणि thank you म्हणाला... आणि मी निघालो.
एखाद्याच्या आयुष्यात गार वाऱ्याची झुळूक आणली नसली तरी उन्हाळा थोडा कमी शकलो मी....
मंदार कुलकर्णी
No comments:
Post a Comment