Followers

Tuesday, September 17, 2019

गिरनार (श्री दत्तस्थान)




श्री दत्त महाराज यांनी १२००० वर्षे तपश्चर्या केली आणि ते अजूनही तिथे आहेत आणि त्यांचे अस्तित्व दाखवतात अशा अतिशय पवित्र ठिकाणाची अगदी वेगळी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. याची धार्मिक माहिती तुम्हाला या लिंक वर मिळेल. ती अतिशय योग्य तर आहेच पण प्रथम जाणाऱ्या भक्तांना उत्तम मार्गदर्शक आहे. 


दत्त महाराजांची अनेक स्थाने आपल्याला माहिती आहेत. औदुंबर, नरसोबाची वाडी, कुरवपूर, पिठापुर, गाणगापूर आणि अनेक. अनेक दत्त भक्त या ठिकाणी दर वर्षी, काही दर पौर्णिमेला जात असतात. गिरनार हे स्थान इतके वर्षे फारसे कोणाला माहीत नव्हते आणि आंतरजालावर त्याची माहिती ही फारशी मिळत नव्हती. गिरनार म्हटले की अगदी विकिपीडियावर सुद्धा जैन मंदिरांचा समूह असेच येते. मला इथे जैन समुदायाबद्दल काहीही वाईट लिहायचे नाहीये पण त्यांनी सर्व प्रथम गिरीशिखरांवरील दत्त पादुकावर दावा सांगितला. त्यांनी त्यांचे २२वे तीर्थांकर नेमिनाथ यांच्या पादुका आहेत असा आक्षेप घेऊन ती जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. आम्ही या विषयी तेथील गजानन बापू यांच्याशी विस्तृत चर्चा केली. 

सनातन हिंदू धर्मावर केलेला एक मोठा आघातच होता. त्यावर उपाय म्हणून हिंदूंनी तेथे गिरीशिखरावर काही वर्षांपूर्वी श्री दत्ताची एक मूर्ती आणली आणि तेथे स्थापित केली. आपण दत्तमहाराजांचे कुठलेही स्थान पाहिले तर तेथे मूर्ती नसते तर कायम चरण पादुका असतात. येथे मात्र ह्या झालेल्या धर्म आघातामुळे ही मूर्ती आणावी लागली.विशेष म्हणजे ही दत्त मूर्ती गफार नावाच्या एका मुसलमान दत्तभक्ताने १०००० पायऱ्या चढून रात्री ३ वाजता तेथे आणली आहे!!!


चरण पादुका गुलाबाच्या फुलांनी झाकलेल्या असतात. जैन समुदायाने आम्हाला नेमिनाथ यांच्या पादुका दाखवत नाहीत असा खोटा प्रचार केला. त्याला विरोध करून प्रकटन कोर्टात नेले आणि असंख्य दावे लावले. 

३८०० फूट उंचीवर नेमिनाथ यांच्या मंदिरांचा समूह आहे आणि अजूनही त्यांचे तेथे मंदिराचे काम करणे चालू आहे. मंदिराचे दगड डोली करून चार चार लोक रोज वरती नेत असतात. या डोंगरावर जैन समुदायाची बरीच मंदिरे आहेत आणि धर्म प्रसारासाठी त्यांचे तेथे हर प्रकारे प्रयत्न चालू असतात. मुळात नेमिनाथ आधी का दत्त आधी हा प्रश्न म्हणजे राम आधी का बाबर आधी असा विचारण्यासारखा आहे. आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करताना दुसऱ्याची जागा बळकावणे योग्य नाही.

कोर्टाच्या आदेशानुसार तेथे आता पोलीस बंदोबस्त असतो. हिंदू साधू आणि जैन समुदाय यांच्यात आजही खटके उडत असतात. जेव्हा सनातन हिंदू धर्माचा प्रश्न येतो तेव्हा हिंदू जागृत होतात. आज अनेक बापू आणि गुरू यांवर तेथे कोर्टात दावे लागले आहेत. अनेक बापूंनी त्यासाठी तुरूंगवास ही भोगला आहे.

गुरूशिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे. 
श्रीदत्तगुरुंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान श्रीदत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. १० X १२ चौ.फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे. बाजूलाच प्राचीन गणेश अन् हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. १०००० पायऱ्या सुरू करण्यापूर्वी पहिल्या पायरीवर डोके टेकवून दत्त महाराजांना शरण जायचे.

पहिल्या पायरीवर साष्टांग नमस्कार घालून दत्त गुरूंना प्रार्थना करायची की माझ्याकडून दर्शन करून घ्या. पुढच्या ९९९९ पायऱ्या दत्त महाराज आपल्याकडून करून घेतात. शारीरिक दृष्ट्या अधू लोकही केवळ मानसिक बळावर या १०००० पायऱ्या चढून जातात. काही मंडळी गिरनार ची ३८ किलोमीटर ची परिक्रमा करून गिरनार शिखरावर जातात. बाकी कशाला आम्ही तर ६ महिन्याच्या प्रेग्नंट बाईला हे शिखर सर करताना पाहिलं. मानसिक भाव, भक्तीभाव या जोरावर हे सहज शक्य होतं. अगदीच शक्य नसेल तर डोलीची व्यवस्था आहेच. थोडे दिवसांनी रोप वे पण होणार आहे.

गिरीशिखराच्या थोडे खाली असलेल्या कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते. मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते. महंत श्री मुक्तानंदगिरी बापू तेथील सध्याचे प्रमुख आहेत. इतर काहीजण तेथे सेवेसाठी आहेत त्यात योगेशबापू हे एक प्रमुख आहेत. आश्रमाच्या वतीने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अखंड अन्नदान चालू असते. चहा सुद्धा आश्रमातर्फेच करून देतात. १०००० पायऱ्यावर चहा, पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे. प्रचंड वारा, कडक ऊन, धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विनामोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात. अनेकजणांच्या देणगीवर ही सेवा अखंड चालू आहे. सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे. पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कापून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून माणसांकडून वर आणले जाते. प्रसादासाठी लागणारे सर्व धान्य, चहा, साखर हे वर आणण्यासाठी बराच पैसा लागतो. आज देवस्थान साधारण १० रु किलो या प्रमाणे वर आणायचा मोबदला देतात. १०००० पायऱ्या चढून तेथे अन्नदान किंवा प्रसाद अखंड देणे सोपे काम नव्हे. आपणही कधी गिरनारवर गेलात तर सढळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करा. 

अजून एक गोष्ट करायला पाहिजे. गिरनार हे दत्त देवस्थान असून हिंदू धर्माचे स्थान म्हणूनच इतिहासात राहायला हवे. त्यासाठी जे जे करावे लागेल ते सर्व करू या. आज आंतरजालावर फक्त जैन मंदिर असाच उल्लेख आहे. बाकी कशाला, जुनागड रेल्वे स्टेशन वर सुद्धा दत्त स्थान म्हणून उल्लेख नाहीये. सर्व जगाला ज्ञान देणाऱ्या दत्त महाराजांचे स्थान सध्या धोक्यात आले आहे. तेथे जाऊन आपण त्याचा अनुभव तर घ्याच पण ते टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. 

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ते अति आवश्यक आहे... जय गुरुदेव !!!

मंदार कुलकर्णी
१४ सप्टेंबर २०१९

Monday, September 9, 2019

शाळा, मॉल आणि आयटी पार्क


रेडिओ वर सध्या जाहिराती इतक्या असतात की २ गाण्याच्या मध्ये जाहिराती असतात का अनेक जाहिरातीच्या मध्ये एखादे गाणे हेच समजत नाही. त्यात पुन्हा हिंजेवडी, तलवडे, लोहेगाव वगैरे अशुद्ध शब्दांचा भरणा असतोच. घरांच्या जाहिराती मात्र खूप आकर्षक असतात. हायवे टच, विमानतळापासून ५ मिनिटांवर, ह्या मॉल च्या अगदी जवळ किंवा अगदी भर वस्तीत अशा अनेक पकड घेणाऱ्या ओळी त्यात असतात.

आजकाल बऱ्याच जाहिरातीत एक गोष्ट समान दिसते ती म्हणजे शाळा, मॉल आणि आयटी पार्क. पुण्यात घर कुठंही असलं तरी जवळच शाळा, मॉल आणि आयटी पार्क आहेत हे मात्र आवर्जून सांगितले जाते. जणू काही मानवाच्या मुलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या आता पुर्णपणे बदलल्या असून त्या आता अनुक्रमे शाळा, मॉल आणि आयटी पार्क अशा बनल्या आहेत.

खरंच या गरजा एखाद्याला घर घेण्यासाठी किंवा राहण्यासाठी आवश्यक आणि पुरेशा आहेत का? आजच्या जगात या ३ गोष्टी सोडून बाकी काहीच लागत नाही का? गेल्या शतकात गावाकडून/ खेड्याकडून शहराकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले. गावाची शहरे झाली, शहराची महानगरे झाली. लोकांच्या गरजा आणि जगायची साधने बदलली. पूर्वी गावात एखादा वैद्य असायचा. आज कितीही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असली तरी लगेच बेड मिळत नाही. पूर्वी प्रत्यक्ष घरात अंगण, तुळशी वृंदावन असे, आज त्याची जागा छोट्या छोट्या घरांच्या खुराड्यानी घेतली.

मुद्दा हा आहे की काळाच्या ओघात गरजा बदलल्या पण म्हणून काय शाळा, मॉल आणि आयटी पार्क इतकंच पाहायचं? हॉस्पिटल, भाजी बाजार, बस/ रेल्वे स्थानक, नाट्यगृह, खेळाचे मैदान, संस्कार वर्ग, व्यायामशाळा (म्हणजे मराठीत जिम), पोहण्याचा तलाव, देवालय, चालण्यासाठी चांगले रस्ते किंवा बागा ह्या गोष्टी यांच्या यादीत कधी येणार? २१ च्या शतकात या सुद्धा गरजेच्या गोष्टी आहेत हे या जाहीरात करणाऱ्यांना कळत नाहीत का? कोणाला विचारून हे लोक अशी जाहिरात करतात? का आपलीच टेस्ट आता बदलली आहे?
विचार करूया...


मंदार कुलकर्णी
७ सप्टेंबर २०१९

Thursday, September 5, 2019

कायझन



आम्हाला कंपनीमध्ये कायम काही ना काही सुधारणा करण्याविषयी आग्रह करण्यात येतो. छोट्या छोट्या सुधारणांना कायझन असा शब्द आहे. थेंबे थेंबे तळे साचे या संकल्पनेवर आधारित सुधारणा म्हणजे कायझन.

परवा असाच असाच एक कायझनचा प्रकार पाहायला मिळाला. स्थळ पुणे, सोसायटीचे नाव सांगत नाही पण आजकाल बहुतेक सोसायट्यांमध्ये पार्किंग हा ज्वलंत विषय होत चालला आहे. विशेषतः जिथे बैठी घरे आहेत किंवा बंगले आहेत अशा सोसायट्यांमध्ये कार पार्क करायला फारशी जागाच नसते. बंगला बांधला तेव्हा घर मालकाने त्याच्या आवडीच्या कारसाठी पार्किंगची सोय बंगल्याच्या आवारात केलेली असते. काळाच्या ओघात एकाच्या जागी अजून एक चार चाकी वाहन आले की खरी गंमत सुरू होते. मग नवीन कार आत लावू, जुनी बाहेर असुदे किंवा रस्त्यावर असू दे अशा चर्चा घरात सुरू होतात. आणि मग ओघानेच दुसरी कार सोसायटीच्या रस्त्यावर उभी राहायला लागते.

आता प्रश्न असा आहे की कार रस्त्याच्या या बाजूला लावायची का पलीकडच्या बाजूला? एकतर सोसायटीचे अंतर्गत रस्ते अगदीच चिंचोळे असतात त्यात कार जर अस्ताव्यस्त रीतीने लावल्या असल्या तर विचारूच नका. मग सोसायटीची एक मिटींग होते आणि कार रस्त्याच्या कोणत्या बाजूस लावायची या विषयी जरा 'बाचाबाची' होते. कोणीतरी पिल्लू सोडते, पुण्यात सगळीकडे आता पी1 पी2 आहे, तसेच सोसायटी मध्ये करा म्हणजे एकाच्याच बाजूला गाडी नको. पण आता रोज उठून कार पी1 मधून काढून पी2 मध्ये कोण लावणार? शेवटी तो पण एक उद्योगच झाला ना? दोन्ही बाजू मागे हटायला तयार नाहीत.

शेवटी एकाने युक्ती काढली. रोज कार हलवण्यापेक्षा 15 दिवसातून एकदा हलवावी. म्हणजे रोज कार हलवायची कटकट नाही. विशेष म्हणजे सर्व सभासदांना ही कल्पना मान्य झाली आणि तातडीनं पी1 पी2 सारखे बोर्ड बनवून ते 2 दिवसात सोसायटीत बसले सुद्धा !!!

आणि अशा प्रकारे त्या सोसायटीतील सर्व सभासद गुण्यागोविंदाने नांदू लागले...


मंदार कुलकर्णी
५ सप्टेंबर २०१९

Wednesday, September 4, 2019

काँग्रेस युक्त भाजपा



गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे राहण्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षातून अनेक नेते भाजपामध्ये येऊ लागले. लोकसभेत भाजपाला 303 जागा मिळाल्यावर तर अनेकांची खात्रीच पटली की भविष्यात काँग्रेस पक्ष निवडून येणे अशक्य आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांचा पक्ष सोडून भाजपामध्ये गेले. काही जणांनी शिवसेनाही गाठली आहे पण त्याचे प्रमाण नगण्य आहे.

मूळ मुद्दा हा आहे की काँग्रेस मध्ये अख्खी हयात गेलेले लोकही बिनदिक्कत आज भाजपा मध्ये येत आहेत, बाकी कशाला नारायण राणे ही आधी भाजपा च्या जीवावर विधान परिषदेवर गेले आणि आता लवकरच आपला पक्ष अधिकृतपणे भाजपामध्ये विलीन करणार आहेत. ज्यांनी सिंधुदुर्गमध्येही काही केलं नाही, ज्यांचे चिरंजीव आमदार असताना सरकारी अधिकाऱ्यावर हात चालवतात, शिवीगाळ करतात अशा लोकांनाही भाजपाची दारे खुली आहेत. नारायण राणे त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात आणि मुलाखतीत बिनदिक्कत म्हणतात, काँग्रेसने मला 6 महिन्यात मुख्यमंत्री करायचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला नाही म्हणून ते काँग्रेस बरोबर नाहीत. उद्या भाजपामध्ये आल्यावर कुठल्या समितीवर घेण्याचा आग्रह त्यांनी धरला तर?

प्रश्न आहे की भाजपा मध्ये प्रवेश देताना काही निवड प्रक्रिया नाही का? ज्याला वाटेल त्यांना भाजपा मध्ये प्रवेश देणे योग्य आहे का? आज ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी गेले 40 वर्षे दिवस रात्र एक करून भाजपा स्थापनेपासून मोठा केला; ज्या पक्षाला 2 खासदारांचा पक्ष म्हणून हिणवले जात होते त्या पक्षाने मित्र पक्षांच्या मदतीने लोकसभेत 353 म्हणजे 2/3 जागा मिळवल्या आहेत. अनेक पक्षांशी युती आणि सामंजस्य दाखवले आहे. 

भाजपा कार्यकर्ता हा कितीही निस्वार्थी असला तरी जेव्हा सत्ता मिळत असतांना त्यांनी कायम सतरंज्याच उचलायच्या का? आणि हे आयत्या बिळावर नागोबा झालेले बाहेरचे लोक नंतर महत्वाची पदे आणि खाती मिळवणार. हे अजिबात योग्य नाही.

आज ज्या पध्दतीने भाजपा मध्ये incoming चालू आहे ते पहाता थोड्या दिवसात काँग्रेस युक्त भाजपा असा नवीन पक्ष तयार होईल असे चित्र आता दिसते आहे. आता incoming करणारे गोड बोलतील, पक्षात आम्हाला काही नको म्हणतील आणि निवडणुका आल्या की यांनाच उमेदवारी हवी. नाही मिळाली तर परत बंडखोरी करायला मोकळे. त्यांना ना भाजपा कधी कळला, ना त्याची संस्कृती.

अशाने खरा भाजपा संपायला वेळ लागणार नाही आणि खरे भाजपाप्रेमी कायमचा पक्षापासून दूर जाईल आणि हे भविष्यात पक्षासाठी अवघड जाईल.


मंदार कुलकर्णी
31 ऑगस्ट 2019