Followers

Sunday, March 15, 2020

यशाचे नवीन मॉडेल - अरविंद केजरीवाल

यशाचे नवीन मॉडेल - अरविंद केजरीवाल




समजायला अतिशय अवघड, प्रचंड हुशार, चलाख बुद्धी, जिभेवर सरस्वती आणि अचाट संघटन कौशल्य असे काही शब्दांनी अरविंद केजरीवाल यांचे अगदी थोडक्यात वर्णन करता येईल.

अरविंद केजरीवाल यांचा जन्म हिस्सार या हरियाणा राज्यात १६ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. केजरीवाल बालपणी हिस्सार, सोनेपत, मथुरा यासारख्या उत्तरी भारतातील गावांत राहिले. त्यांचे शालेय शिक्षण कँपस हायस्कूल, हिस्सार येथे झाले.  इ.स. १९८९ साली त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. ह्या नोकरीमध्ये असताना त्यांनी टाटा स्टीलमधील सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी बदली मागितली परंतु त्यांची अभियांत्रिकी पदवी असल्याकारणाने त्यांना सदर विभागामध्ये बदली नाकारण्यात आली. म्हणून त्यांनी टाटा स्टीलची नोकरी १९९२ मध्ये सोडली आणि ते कोलकाता येथील मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी, ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशन आणि नेहरू युवा केंद्र येथे काम करू लागले.  

अरविंद केजरीवाल यांचे वडील गोविंदराम हे मेसराच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता होते. १९९२ मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यावर ते भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) नोकरीला लागले. फेब्रुवारी २००६ मध्ये त्यांनी आयकर विभागाच्या जॉइंट कमिशनर पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली.
आणि त्यांनी दिल्ली येथे परिवर्तन नावाच्या नागरिकांची चळवळ चालवणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या काळात केजरीवाल यांनी अमेरिकेच्या फोर्ड फौंडेशनच्या पासून भारतातील अनेक सहकारी संस्था यांच्याशी चांगली जवळीक साधली.

इ.स. २००६ साली त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी डिसेंबर २००६ मध्ये त्यांनी, मनीष सिसोदिया आणि अभिनंदन सेखरी यांच्या बरोबर पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन सुरू केले. केजरीवाल आणि सिसोदिया यांची कबीर नावाची एक एनजीओ होती ज्याला फोर्ड फाउंडेशन ने प्रचंड पैसा पुरवला असे मानले जाते. तिस्ता सेटलवाड, योगेंद्र यादव, मीरा सान्याल, मल्लिका साराभाई, अमर्त्य सेन, मेधा पाटकर, या सगळ्यांना फोर्ड फाउंडेशन ने लाखो करोडो डॉलर्सची मदत केली आहे आणि काहींना मॅगसेसे अवॉर्ड पण मिळाले आहेत ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 

२००६ ला भारत परत एकदा द्विपक्षीय राजनीतिकडे चालला होता. भाजप हरली तरी काँग्रेस जिंकली होती आणि सत्तेचा खेळ या दोन राष्ट्रीय पक्षात खेळला जाऊ लागला होता. दोन्ही पक्षांच्या इकॉनॉमिक पोलिसीज जवळपास सारख्याच होत्या आणि त्यामुळे भारत झपाट्याने विकसित होऊ लागला होता. त्या काळात १०℅ जीडीपी ग्रोथ आपल्या आवाक्यात आली होती. भारत पाकिस्तान संबंध चांगले होऊ लागले होते. त्यामुळेच अमेरिकेच्या पोटात दुखणे सहाजिकच होते. त्याचसाठी अमेरिकेकडून अशा मंडळींना पैसा पुरवून भारतात अशांतता निर्माण करायचा प्रयत्न सुरू झाला. 

लोकपाल आंदोलन करताना अरविंद केजरीवाल यांना एक म्होरक्याची गरज होती आणि ती शोधत असताना त्यांना अचानकपणे महाराष्ट्रामध्ये एक माणूस सापडला त्याचे नाव अण्णा हजारे. अण्णा हजारे यांचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना महाराष्ट्रामध्ये मानणारा एक मोठा वर्ग होता किंबहुना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा नेहेमी अण्णा हजारेंना भेटून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत होते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अण्णा हजारे यांचे उपोषण करायची ताकद. अनेक दिवस उपाशी राहून उपोषण चालू ठेवण्याची क्षमता ही अरविंद केजरीवालांनी बरोबर ओळखले. त्यांना त्यांच्या गावी म्हणजे राळेगण सिद्धी येथे भेटून या मंडळींनी लोकपाल विधेयकाच्या विरोधात तुम्ही कसे नेतृत्व करावे या संदर्भात त्यांना त्यांना साधारण कल्पना दिली आणि त्यांना एकदम राळेगणसिद्धी येथून उसळून दिल्ली येथे जंतर मंतर येथे नेऊन ठेवले. स्टेज वर हे सगळे फोर्ड फाउंडेशन ची इतर मंडळी होतीच, मीडिया ला अमाप पैसा वाटला गेला आणि २८ न्यूज चॅनल त्या अण्णा आंदोलनाचे लाईव्ह प्रक्षेपण १५ दिवस करत होते. यात अरविंद केजरीवाल आणि गँगला देशभर प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनकर्त्यांनी परदेशातून आणि इथे आंदोलनाला जमणाऱ्या लोकांच्या कडून जे पैसे जमा केले होते त्या पैशावरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात भांडणे झाली. सर्वात महत्वाचे की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया जेव्हा परदेशात फंड गोळा करायला गेलेत तेव्हा ते खलिस्तान चळवळीच्या लोकांच्या घरात राहिले आहेत. या खलिस्तानी आणि मिशनरी च्या पाठिंब्यावर आप पंजाब आणि गोव्यात पसरली. मिशनरी लोकांबरोबर अरविंद केजरीवाल यांनी चांगला संपर्क साधला होता. मदर तेरेसा ना सेंट हा सन्मान दिला गेला तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज उपस्थित होत्या पण तिथे बोलावले गेलेल्यांमध्ये बंगालचे मुख्यमंत्री आणि केजरीवाल होते.

लोकपाल आंदोलन झाल्यानंतर अर्थातच अरविंद केजरीवाल आणि टीम यांना सत्तेची स्वप्ना दिसू लागली. हे करत असताना अर्थातच अण्णा हजारे यांनी त्यांना विरोध केला. कारण अण्णा हजारे यांना राजकारणामध्ये काडीचाही रस नव्हता. परंतु सुरुवातीला अण्णांची गोड बोलून आणि त्यानंतर अगदी पद्धतशीरपणे त्यांचा काटा बाजूला करून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या फौजेने राजकारणामध्ये प्रवेश केला आणि आम आदमी पार्टी या पक्षाचा जन्म झाला. या पार्टीमध्ये अर्थातच आशुतोष सारखे पत्रकार आणि विविध क्षेत्रातले लोक घेण्यात आले आणि ही कोणतीही राजकीय संघटना नसताना केवळ जबरदस्तीने राजकारणात आलेले लोक असा एकंदर भाव निर्माण करण्यात आला आणि आमचा उद्देश कसा स्वच्छ आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल ह्यांच्या आम आदमी पार्टीने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.  केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २५,८६४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला ३४ जागा मिळाल्या. अर्थात दोन जागा बहुमतासाठी कमी पडल्या. निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बहुमत करणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती परंतु बहुमताला जागा कमी पडल्यामुळे त्यांना भाजप किंवा काँग्रेस या पैकी कोणत्या तरी पक्षाची मदत घेणे आवश्यक होते. पण एकदम काँग्रेसकडे कसे जायचे यासाठी त्यांनी मग एक महिना वेगवेगळ्या लोकांशी बोलण्यामध्ये वेळ काढला आणि फायनली काँग्रेसची मदत घेऊन सरकार स्थापन केले. काही दिवसातच काँग्रेसची मतभेद झाल्यानंतर हे आघाडीचे सरकार पडले.

मधल्या काळामध्ये २०१४ लोकसभा निवडणुका आल्या होत्या. त्यावेळेला एकंदर आम आदमी पक्षाचा विस्तार केवळ दिल्लीतच नव्हे तर दिल्लीच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये करायचा प्रयत्न झाला. आपल्याला मिळालेली प्रसिद्धी याचा फायदा घेत त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीमध्ये वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात उभे राहून आव्हान दिले. अर्थातच नरेंद्र मोदी यांच्यापुढे त्यांचा टिकाव काही लागला नाही पण त्याव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये जसेकी पंजाब, गोवा, महाराष्ट्र याठिकाणी आम आदमी पक्षाचे बस्तान बसवायला त्याने सुरुवात केली. तेथे होणाऱ्या अनेक प्रकारच्या निवडणुकांमध्ये त्यांनी चक्क पैसे घेऊन आपले उमेदवार उभे केले पण अर्थातच बाकी राष्ट्रीय पक्ष आणि इतर प्रादेशिक  पक्षांपुढे त्यांचा फारसा टिकाव लागला नाही आणि अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीवर आपले लक्ष केंद्रित केले.

२०१५ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकूण ७० पैकी ६७ जागा जिंकून विधानसभेत बहुमत मिळवले. भारतीय जनता पक्षाला फक्त ३ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला शून्य.
या निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशामुळे अरविंद केजरीवाल यांना धुंदी चढली नसती तर नवलच त्यांनी त्यांच्या मर्जीतले अनेक सहकारी आपल्या मंत्रिमंडळात घेतले. सुरुवातीच्या काही काळ, त्यांचे एलजी बरोबर प्रचंड प्रमाणात मतभेद झाले त्याचप्रमाणे केंद्र सरकार बरोबरही काही ना काही खुसपट काढून तेथे त्यांचा पाणउतारा करायचा प्रयत्न केला. रोजच्या कुठल्यातरी भाषणामधून किंवा ट्विटमधून कायम नरेंद्र मोदींना लक्ष्य करणे किंवा केंद्र सरकारच्या योजनांना विरोध करणे असा रतीब त्यांनी चालू ठेवला . २०१७ मध्ये कुणा हितचिंतकाने त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही मोदींवर टीका करण्यापेक्षा आपल्या दिल्ली राज्यांमध्ये चांगली काम करा त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगला उपयोग होईल आणि तुमची पुढची मतं  नक्की होण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल. 

त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पूर्ण कामाची पद्धत आणि स्ट्रॅटजी बदलली आणि लोकाभिमुख काम करायला सुरुवात केली. दिल्लीतील पोलुशन कमी करण्यासाठी मग odd even योजना किंवा दिल्लीतील गरीब लोकांसाठी मोहल्ला क्लिनिक त्याचप्रमाणे रस्ते दुरुस्ती अशी अनेक प्रकारची शहरांमधले काम त्यांनी करणाऱ्या सुरुवात केली. 

सरकारी शाळांच्या दर्जात केजरीवाल सरकारने प्रचंड सुधारणा केली. शिक्षकांना गैर शिक्षकी कामांना जुंपणे थांबवले. सामान्य पालकांच्या मुलांना सुद्धा सरकारी शाळात खाजगी शाळांच्या तोडीचे शिक्षण मिळेल याची सोय केली. सरकारी शाळा म्हणजे अत्यल्प फीस त्यामुळे सामान्य लोक सुखावले. इतकेच नाही तर खाजगी शाळांच्या मनमानी फी लादण्यावर पूर्ण नियंत्रण आणले. शाळेचा दर्जा तेथील सुविधा आणि कोणत्या वर्गाच्या साठी किती फीस घेतली जावी याचे निरपेक्ष मापदंड बनवले आणि त्याचे पालन करणे खाजगी शाळांना भाग पाडले. परिणाम पालकांच्या खिशाला बसणारा प्रचंड भुर्दंड वाचला.

केंद्राच्या अनेक योजना त्यांनी दिल्लीमध्ये अंमलात आणू न देता स्वतःच्या सरकारच्या योजना अगदी जाणीवपूर्वक त्यांनी अमलात आणल्या आणि लोकांची मर्जी संपादन केली. प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये इतर राज्यात दरवर्षी कोट्यावधी रुपयाची औषधे कागदावर घेतली जातात आणि वाटली गेल्याचे दाखवले जाते वास्तवात डॉक्टर , मंत्री , अधिकारी सगळे पैसे खाऊन हे अनुदान हडप करतात. केजरीवाल यांनी हे अनुदान खरेच खर्च केले. मोफत आरोग्य तपासणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा अशा अनेक गोष्टी केजरीवाल यांनी यशस्वीरित्या अंमलात आणल्या. अन्न , वस्त्र, निवारा, चांगले शिक्षण आणि आरोग्य सेवा या पाच गोष्टीच कोणत्याही राज्य पातळीवरील ज्या निवडणुकीचे भवितव्य ठरवतात त्या सर्वच पातळीवर केजरीवाल यांनी इतर पक्षांना मात दिली.

यात त्यांची सर्वात यशस्वी योजना म्हणजे दोनशे युनिटपर्यंत विजेचे बिल त्यांनी माफ केले. या योजनेमुळे गरीब नव्हे तर अगदी मध्यम वर्गापर्यंतच्या लोकांनाही आम आदमी पक्षाबद्दल विश्वास निर्माण झाला कारण दर महिन्याला जे साधारणपणे दोन हजार ते अडीच हजार रुपये वीज बिल यायचे ते आम आदमी पक्षाच्या या निर्णयामुळे शून्य झाले. अशा अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या. हे करण्यासाठी २०१५ मध्ये त्यांनी रक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे जो टॅक्स दिल्ली सरकारला मिळत होता तो एकदम वाढवून दुप्पट केला. दिल्ली सरकारला साधारणपणे दरवर्षी तीस हजार कोटी रुपये टॅक्समधून मिळायचे ते आता साठ हजार कोटी झाले. पहिले साडेचार वर्षे कायम एलजी बरोबर असलेले खटके आणि केंद्र सरकारकडून आपल्याला मिळत नसलेली मदत यावर भर देणारे अरविंद केजरीवाल यांनी २०२० च्या निवडणुकांसाठी मात्र अगदी आधीपासून जोरदार तयारी केली. शेवटच्या सहा महिन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देऊन, मीडियाला, चॅनेल्सना विश्वासात घेऊन गेल्या पाच वर्षांमध्ये कशी चांगली कामे झाली आणि कोणत्याही काँग्रेस किंवा भाजप सरकारपेक्षा आम आदमी पक्षाने कसे पाच वर्षामध्ये भरीव काम केले याचे विस्तृत वर्णन त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. निवडणुकीच्या काळात यथेच्छ चिखलफेक होत असताना भाजपनेही त्यांना 'अतिरेकी' अशा प्रकारचे संबोधले आणि त्याच संधीचा त्यांनी फायदा घेत आपली आणि आपल्या पक्षाची प्रतिमा अजून उजळ केली आणि याच संधीचा फायदा घेत  ७० पैकी ६२ जागा त्यांनी पदरात पाडल्या. निवडणूक प्रचारामध्ये अनेकदा मीडियाने त्यांना खोटी आश्वासने देण्याबद्दल विचारले पण त्यावरही त्यांनी हसून अतिशय प्रामाणिकपणे सांगितले काही आश्वासने निवडणूक काळामध्येच असतात आणि ती खोटी असतात पण त्या व्यतिरिक्त मी जे काही काम केलं आहे ते तुम्ही पाहा आणि मला मतदान करा अशा प्रकारे त्यांनी लोकांना आवाहन केले. 

अमित शहा, जेपी नड्डा आणि भारतातील भाजपच्या राज्यांमध्ये असलेल्या अकरा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे सुद्धा भाजपला दिल्लीच्या निवडणुकीत फायदा झाला नाही आणि अरविंद केजरीवाल यांनी याही वेळी त्यावर कडी केली आणि मुख्यमंत्रिपद मिळवले.

दिल्लीच्या या निवडणुकीमध्ये मिळविलेल्या घवघवीत यशामुळे अरविंद केजरीवाल यांच्या कल्पनांना आता नवीन पंख फुटू लागले आहेत आणि त्यांचे लक्ष पुन्हा एकदा बाकीच्या राज्यांकडे आता जायला लागले आहे आपल्या पक्षाचा विस्तार हा आता दिल्लीच्या बाहेर बाकी राज्यांमध्येही करायचा आणि आपली राष्ट्रीय प्रतिमा तयार करायचा आता त्यांचा मानस आहे.


@ मंदार कुलकर्णी
१६ फेब्रुवारी २०२०

No comments:

Post a Comment