Followers

Sunday, January 27, 2019

नॉर्दन लाईट्स

नॉर्दन लाईट्स
©मंदार कुलकर्णी
27 जानेवारी 2019
विश्वातील अनेक आश्चर्ये आपल्याला गेल्या 400 वर्षांपासून समजत आहेत. अगदी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे इथपासूनचा प्रवास हा आज सूर्याचे पृथ्वीपर्यंतचे अचूक अंतर देतेच शिवाय आपल्या सुर्यमालेच्या बाहेरही आज पोहोचला आहे. हा संपूर्ण प्रवास जितका मनोरंजक आहे तितकाच आधीचे गृहीत रोजच्या रोज दुरुस्त करायला लावणारा आहे. मानवाचे चंद्रावरील पहिले पाऊल किंवा मंगळावर पाठवलेली पहिली बग्गी हे तर या शोधमोहिमेतील अत्यंत महत्वाचे टप्पे मानले जातात. विज्ञानातील काही आश्चर्ये आपण पृथ्वीवरही पाहू शकतो, यातलाच एक आश्चर्यकारक प्रकार म्हणजे नॉर्दन लाईट्स.
Image may contain: sky
नॉर्दन लाईट्स मुख्यतः उत्तर ध्रुवाच्या जवळच्या प्रदेशात दिसतात पण त्यासाठी आपल्याला नार्वे स्वीडन अशा अति उत्तरेकडील देशामध्ये जावे लागेल. नॉर्दन लाईट्स साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात बऱ्याच वेळा दिसतात असे म्हणतात. या काळात येथे कडक हिवाळा तर असतोच पण त्या शिवाय सूर्य दर्शन ही अत्यंत दुर्लभ असते. सूर्याचा मुक्काम मुख्यतः दक्षिण गोलार्धात असल्याने या प्रदेशात सूर्य मुख्यतः क्षितिजाखालून संक्रमण करतो आणि अगदीच जमलं तर फार थोडा वेळ दर्शन देतो. हे दर्शन सुद्धा केवळ हजेरी लावली या सदरात मोडते.

तर नॉर्दन लाईट्स हे सूर्याचे चुंबकीय वारे पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण झाल्याने मुख्यतः तयार होतात. हे चुंबकीय कण जेव्हा वातावरणात येतात तेव्हा त्यातील मुख्यतः हिरवा रंग आकाशामध्ये वेगवेगळ्या छटा घेऊन पसरतो तोच हा नॉर्दन लाईट्स.
Image may contain: night and outdoor
नॉर्दन लाईट्स पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक नॉर्वे आणि स्वीडनमध्ये या काळात प्रवास करतात. मध्यरात्रीच्या सूर्याला पाहण्यासाठी हेच पर्यटक उन्हाळ्यामध्ये या देशास भेटी देतात. आता ही निसर्गाची आश्चर्ये प्रत्यक्ष पाहणे यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन तर करावे लागतेच पण या शिवाय भरपूर पैसेही खर्च करायची तयारी हवी. आपण ते पाहण्यासाठी तेथे कधी जावो अथवा न जावो पण इंटरनेट च्या जगात अप्रत्यक्ष रित्या तर पाहता येते का याचा शोध सुरू केला आणि Aurora Borealis Observatory या Observatory ची ओळख झाली. त्यांची वेबसाईट आहे शिवाय फेसबुक पेज ही आहे. यातील मंडळी इतकी उत्साही आहेत की जेव्हा जेव्हा निसर्गातील अशी काही आश्चर्ये दिसतात त्या वेळेस ते सरळ फेसबुक लाईव्ह करून जगातील आपल्या सारख्या असंख्य उत्साही लोकांना त्याचा आनंद देतात. नॉर्दन लाईट्स चा अनुभव मला त्यांच्यामुळेच मिळाला.

आकाशातील नॉर्दन लाईट्स च्या वेगवेगळ्या छटा, संपूर्ण आकाशाचा कॅनव्हास वर त्यांनी केलेली रंगांची उधळण. मिनिटा मिनिटाला त्यांच्या बदलणाऱ्या शेड्स, रोजच्या निळ्या आकाशापेक्षा असलेली ही वेगळी, वेधक आणि काहीशी अपरिचित रंगसंगती पाहून थक्क व्हायला होते. या हिरव्या रंगात झाडांच्या पानांचा किंवा गवताचा शितलपणा नाहीये तर चुंबकीय कणांमुळे तयार झालेले आकर्षक आणि काहीसे भीतीदायक रंगांचे फटकारे आहेत. त्याचा विशिष्ट अर्थ शोधे पर्यंत त्याचे रूप आणि स्थान बदललेले असते. शक्यतो हिरव्या रंगाचे लाईट्स बऱ्याचदा लाल आणि जांभळ्या रंगांचीही उधळण करतात.
नॉर्वे स्वीडन ह्या देशात नोर्दन लाईट्स बघायला फेब्रुवारी पर्यन्त पूर लोटतो, पण स्कॉटलंड च्या ग्लासगो शहरापासून 100 km अंतरावर एका गावाजवळच्या पर्वतावर नोव्हेंबर च्या शेवटी आणि डिसेंम्बर च्या मध्यात काही रात्री हा खेळ पाहता येतो.
पण ह्या जागेची जास्त माहिती नसल्याने तिथे खूप कमी लोकं जातात.
Image may contain: night
या लेखासोबत Aurora Borealis Observatory ने मला दाखवलेले हे नॉर्दन लाईट्स आहेत. निसर्गाची ही अनवट रूपे घरबसल्या पाहून आश्चर्य करावं तेवढं थोडंच....

Tuesday, January 15, 2019

खरी मकर संक्रांत कधी?

खरी मकर संक्रांत कधी?

© मंदार कुलकर्णी
15 जानेवारी 2019

सर्वांना या वर्षीच्या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!!!

मुळात संक्रांतीचा अर्थ संक्रमण म्हणजे सूर्याचे एक राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण. आपले सगळे सण हिंदू कालमापन पद्धतीने आणि संक्रांत हा एकच तेवढा 14 जानेवारीला , फार तर 15 जाने ला. या गोष्टीचे अनेक वर्षे कुतूहल होते. आंतरजालावर बरीच माहिती शोधली पण सामान्य माणसांना समजेल असे कुठेच लिहिलेले नाही. बाकी सणाबाबत घसा फाडून बोलणारे आणि लिहिणारे आहेत पण हेच लोक संक्रांतीपासून जरा दोन हात लांबच आहेत असे दिसते. चला तर आपण माझ्याबरोबर या संक्रांत या सणाची आणि त्याच्या कालमापनाची माहिती घेऊया.

हिंदू कालमापन पद्धतीमध्ये नवीन वर्ष चैत्र पाडवा म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सुरू होते आणि फाल्गुन महिन्यापर्यंत अनेक सणवार पार करत वर्ष संपते. ही कालमापन पद्धती चंद्राच्या परिवलनाशी जोडलेली असल्याने अमावास्येला चालू महिना संपतो आणि पुढील दिवसापासून नवीन महिना सुरू होतो. ही कालमापन पद्धत पृथ्वीच्या सूर्याभोवती लागणाऱ्या 365.24 दिवसापेक्षा बरीच मागे पडत असल्याने त्यात दर 3 वर्षांनी 'अधिक महिना' घालून ती गाडी एकदम रुळावर आणली आहे. किंबहुना सूर्य आणि चंद्र यांच्या परिवलनाला जोडणारी ही जगातील सर्वात अचूक कालमापन पद्धत आहे. असो.

आपल्या आकाशात 12 राशी आहेत आणि या आभासी जगात सूर्य 12 राशीमध्ये वर्षभर फिरतो म्हणजेच तो एका राशीत एक महिना राहतो. ग्रेगोरियन कालमापनपद्धती प्रमाणे 14 जाने ला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दर एक महिन्याला एक एक रास पुढे जातो. या घटनेचा आपल्या सणांशी काही संबंध नाही.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या पृथ्वीचा अक्ष हा सूर्याच्या परिवलन पातळीही 23.5° कललेला आहे. त्यामुळे सूर्य कायम विषुववृत्तावर फिरत न राहता कधी वरच्या बाजूला तर कधी खालच्या बाजूस भासमान भ्रमण करतो. पुथ्वीच्या परिवलनाच्या नियमाप्रमाणे उत्तर गोलार्धात सूर्य 21 मार्च ते 23 सप्टेंबर आणि उरलेल्या काळात दक्षिण गोलार्धात भासमान भ्रमण करतो. हे भासमान भ्रमण 0 ते 23.5° या अक्षांश या मधेच असते.

21 डिसेंबर ला सूर्य 23.5° दक्षिणेकडे असलेल्या काल्पनिक रेषेला स्पर्श करतो आणि आपला परतीचा मार्ग सुरू करतो. याच काल्पनिक रेषेला वृत्त असे म्हणतात. हीच घटना 21जूनला घडते. सूर्य उत्तर गोलार्धात 23.5° जाऊन एका काल्पनिक रेषेला म्हणजेच वृत्ताला स्पर्श करून परतीचा मार्ग स्वीकारतो. कालमापन पद्धती प्रमाणे 21 जून ला सूर्य हा कर्क राशीत असतो. (मगाशी आपण एक महिना एक रास पाहिले) आणि 21 डिसेंबर ला मकर राशीत असतो. सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे भासमान भ्रमण करतो त्याला दक्षिणायन आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होणाऱ्या भासमान भ्रमणाला उत्तरायण असे नाव पडले.

कालमापन पद्धतीच्या सोयीसाठी त्या वृत्तांना त्याच राशींची नावे देण्यात आली आणि म्हणूनच उत्तरेकडील संक्रमणाच्या शेवटच्या स्पर्श रेषेला कर्क वृत्त तर दक्षिणेकडील शेवटच्या स्पर्श रेषेला मकर वृत्त असे म्हटले जाते. यामुळे एक समज मात्र जनमानसात पक्का झाला की मकर संक्रांतीपर्यंत थंडी असते आणि त्यानंतर कमी होते. इथेच सारी गडबड आहे.

वरील गणितावरून अगदी सहज लक्षात येते, थंडीचा परमोच्च बिंदू उत्तर गोलार्धात 21 डिसेंबर तर दक्षिण गोलार्धात 21 जून हाच आहे. भारत देश उत्तर गोलार्धात असल्याने आपल्याकडे उत्तरायण 21 डिसेंबरला सुरू होते म्हणजे 21 डिसेंबर नंतर थंडी थोडी थोडी कमी व्हायला लागते. उन्हाळ्याचेही तसेच. भारतात पावसाळा असतो म्हणून नाहीतर भारतातही 21 जूनला कडक उन्हाळा झाल्यावर हळूहळू त्याची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होते.
थंडीचा कडाका आणि वरील गणित नीट तपासल्यावर अगदी सहज लक्षात येईल की थंडीच्या काळात शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ जसे गूळ, बाजरी, तीळ याचे सेवन केले जाते. याचाच अर्थ अशा पदार्थांचे सेवन 21 डिसेंबरच्या आधी आणि नंतर काही दिवस करणे आवश्यक आहे. गमतीचा भाग असा की मकर शब्दाच्या नामसाधर्म्यामुळे जो तिळगुळ आपण 21 डिसेंबर च्या आगे मागे खायचा तो 14 जाने आणि नंतर खायला सुरुवात करतो !!

गेली काही वर्षे जर हवामान आपण पाहिले तर थंडीचा कडाका डिसेंबरमध्ये बराच असतो पण जानेवारीपासून कमी होतो. बऱ्याच वर्षी तर मकर संक्रांतीला थंडी नसतेच आणि आपण मात्र तिळगूळ आणि तिळाच्या वड्यांचे यथेच्छ सेवन करतो. ग्लोबल वॉर्मिंगही याला तितकेच जबाबदार आहे. पूर्वी भारतात ऑक्टो ते जाने फेब्रुवारी पर्यंत चांगली थंडी असायची पण आता कमी झाली आहे.

मकर संक्रांत म्हणजे (भारतीय) मकर राशीत सूर्याचा प्रवेश. भारतीय राशी ह्या पाश्चात्य राशींहून वेगळ्या आहेत. पाश्चात्य राशीचक्र वसंत संपात बिंदूपासून सुरू होते. आणि पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा बिंदू आयनिक वृत्तावर सरकत असतो आणि त्यामुळे पाश्चात्य राशीचे आकार सुद्धा बदलतात. भारतीय राशीचक्राची सुरुवात मात्र एका ठरलेल्या बिंदू पासून होते, त्यामुळे भारतीय राशींचे आकार बदलत नाहीत. पृथ्वीच्या परांचन गती मुळे सूर्याला परत त्याच ताऱ्यापाशी/राशी पाशी पोचायला दर वर्षी 20 मिनिटं अधिक वेळ लागतो. म्हणजेच साधारण 72 वर्षानी सूर्याला त्याच ताऱ्यापाशी पोचायला एक दिवस अधिक लागेल. आणि म्हणूनच हळू हळू मकर संक्रांतीची तारीख एक एक दिवस पुढे जाईल..आता 14 आहे , मग 15 असेल..आणि मग 16.

आता उलटे गणित करू... सध्या उत्तरायण 21 डिसेंबर ला सुरू होते...आणि संक्रांत 14 जानेवारी ला आहे... म्हणजे 24 दिवसांचा फरक....आणि वर सांगितले तसे संक्रांत दर 72 वर्षानी एक दिवस पुढे जाते...म्हणजेच 24 x 72 = 1728 वर्षांपूर्वी मकर संक्रांत आणि उत्तरायण एकाच वेळी येत होती. कदाचित त्याच वेळो ही प्रथा/उत्सव सुरू झाला असावा..

भारतात मकर संक्रांती ला प्रदेशात वेगवेगळे सण आणि उत्सव सुरू झाले. मग कुणीकडे पतंगाचा उत्सव सुरू झाला तर काही ठिकाणी गडड्याची जत्रा सुरू झाली. काही ठिकाणी नवीन धान्याची पूजा सुरू झाली तर काही ठिकाणी सुर्योपासनेचा पोंगल उत्सव सुरू झाला. माणूस तसाही अत्यंत उत्सव प्रिय असल्याने त्याने आपली कामे सणांशी जोडली. त्याला जोडून भोगी आली, किंक्रांत आली. बाकी कधीही न घातले जाणारे काळ्या कपड्यांना या दिवशी महत्व आले.

मुळात आधी सांगितल्या प्रमाणे एका सिझन मधून दुसऱ्या मध्ये जायचा हा एक दरवाजा आहे. या पुढे थंडीचे कपडे घालायची फारशी गरज पडणार नाही, आता कपाटात वरच्या कप्यात आपण ते ठेवून द्यायला मोकळे, असा निरोप यातून मिळतो. कालमानानुसार आचार, विचार, विहार आणि उपचार याला आपल्या आयुर्वेदात सांगितलेलेच आहे. त्याप्रमाणे आपणच डोळे उघडे ठेवून याचा विचार करायचा.

आता आपल्याला मकर संक्रांतीची तारीख भारतभर बदलणे शक्य नाही पण निदान सारासार आणि शास्त्रोक्त विचार करून आपण ठरवू शकतो की गुळाची पोळी कधीपासून खायची, नाही का?
😊😊

Monday, January 14, 2019

माझे बाबा



माझे बाबा


माझे बाबा, एक गणितज्ञ
कुठलेही क्लिष्ट गणित यांनी सोडवावे

माझे बाबा, एक आदर्श शिक्षक
दगडाला देव यांनीच बनवावे

माझे बाबा, एक प्रामाणिक अधिकारी
भ्रष्टाचार मुक्त सरकारी नोकरी केली

माझे बाबा, एक संस्कृत तज्ञ
अति कठीण श्लोक यांनीच शिकवावे

माझे बाबा, एक संघ कार्यकर्ता
रोज सकाळी संघ स्थान यांनीच झाडावे

माझे बाबा, एक उत्तम हिशोबनिस
पै अन पै चा हिशोब एकदम अचूक ठेवणारे

माझे बाबा, एक अजब चित्रकार
भूमिती सोपी यांनीच करून देणे

माझे बाबा, मराठी भाषा तज्ञ
अफाट व्यासंग आणि वाचन करणारे

माझे बाबा, एक आदर्श व्यवस्थापक
सगळे प्रकल्प आणि कामे चोख पार पाडणारे

माझे बाबा, मराठी शब्द भंडार
शब्द कोडी पूर्ण आणि अचूक सोडवणारे

माझे बाबा, एक आदर्श पिता
उत्तम शिक्षण आणि संस्कार करणारे

माझे बाबा, आण्णा सुधाकर आणि विश्वनाथ
सर्वांना बरोबर नेणारे, सर्वांसाठी झटणारे

- मंदार कुलकर्णी
14 जानेवारी 2019

The accidental prime minister - एक लाचार कारकीर्द (Review)

The accidental prime minister - 
एक लाचार कारकीर्द



हा चित्रपट पाहायला मी मोठ्या अपेक्षेने गेलो होतो पण थोडीशी निराशाच झाली. त्याची मल्लीनाथी करण्यापूर्वी काय चांगलं ते आधी पाहूया.

हा चित्रपट संजया बारु नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट आहे. संजया हा pm चा मीडिया adviser या पदावर अनेक वर्षे काम करत होता आणि त्यामुळे अर्थातच त्याला pmo ऑफिस मधील बऱ्याच आतल्या गोष्टी आणि खाचाखोचा माहीत असणारच. याचाच एक संग्रह म्हणजे हा चित्रपट.

भारतीय राजकारणात अनेक घटना घडतात तेव्हा त्यामागची खरी गोष्ट किंवा त्याच्या मागचे खरे राजकारण कळत नाही आणि पत्रकार त्यांच्या त्यांच्या ज्ञाना प्रमाणे आणि बुद्धिप्रमाणे त्याचे आकलन करतात. पेड मीडिया असेल तर त्यांच्या साहेबाच्या मनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे मत व्यक्त करतात आणि अनेक वेळा तसेच आणि तेच तेच सांगितल्यामुळे ते सर्वांना खरेच वाटते. 

उदा. सोनिया गांधी यांनी 2004 मध्ये महान त्याग केला हे मीडिया ने इतके पटवून सांगितले आहे पण खरी आतली गोष्ट जोवर स्वामी सांगत नाहीत तोवर कळत नाही.

या चित्रपटात अशा अनेक घटना आहेत ज्या मनमोहनसिंग यांना बाहुले केलेले दाखवतात आणि त्याची खात्रीच पटते. इतके दिवस कुठून कुठून मिळालेल्या माहितीची या चित्रपटामुळे सत्यता कळते. मनमोहन सिंग यांनी निवड इथपासून ते NAC ने केलेला उच्छाद, नरसिंह राव यांच्या मृत्यूनंतर ही त्यांच्यावर झालेला अन्याय, जिवंत पणीच डावलले गेलेले प्रणव मुखर्जी अशा अनेक प्रसंगातून हा चित्रपट पुढे जातो.

मुळात मनमोहनसिंग यांचा मृदू स्वभाव, राजकारण कशाही खातात याचा अजिबात अनुभव नसताना त्यांना 25 वर्षे मिळालेली विविध पदे आणि सोनिया गांधी यांनी कठपुतली म्हणून केलेला मुक्त वापर या गोष्टी परत पाहायला मिळतात.

चित्रपटात उगाचच त्यांना भीष्माची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे पण सोनिया आणि राहुल याच्या दबावाखाली आयुष्यभर जीवन कंठणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था होते हे प्रकर्षाने दिसते. काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारण, सोनिया गांधी यांची पक्षातील प्रचंड पकड या गोष्टी मनमोहन सिंग यांना अजून हतबल करतात.

अनुपम खेर यांचा मनमोहन सिंग एकदम छान, त्यांनी उत्तमच काम केले आहे मात्र काही ठिकाणी डबिंग मध्ये गडबड झाली आहे. संजया बारु चे काम अक्षय खन्ना ने मस्त केले आहे. चित्रपटभर त्याचा मुक्त वावर आणि मनमोहन सिंग यांना वेळोवेळी केलेली मदत आणि सल्ले पाहण्यासारखी आहेत. या व्यतिरिक्त निवडलेली बहुतेक पात्रांची निवड छानच आहे पण...

पण हा चित्रपट 'रंजक चित्रपट' न बनता मनमोहन सिंग यांची documentry जास्त झाला आहे. दिग्दर्शक विजय गुत्ती यांचे हे अपयश आहे. यांच्या जागी राजकुमार संतोषी किंवा तत्सम दिग्दर्शक असता तर या सगळ्या कथेला चांगली धार आली असती. किंबहुना नुसतेच 2004 पासून 2014 पर्यंत चा काळ एका डायरी सारखा एक मागोमाग एक दाखवण्यापेक्षा फ्लॅश बॅक मध्ये काही घटना घालून अजून खिळवून ठेवता आला असते

यात कोणतीच घटना नवीन नाही, दिसते ते बहुतेक सगळे माहिती असते पण मग तरी हा चित्रपट का पहावा याचे उत्तर ज्यांना राजकारणाची आवड आहे पण रोजचा पेपर किंवा राजकारणावरील अग्रलेख अथवा पुस्तक वाचायला जाम कंटाळा आहे त्यांना हा चित्रपट पाहून गेल्या 15 वर्षातील राजकारणाची कल्पना येऊ शकते. मनमोहन सिंग सारख्या एका नोकरदार सदरातील व्यक्तीला RBI गव्हर्नर पाहून, अर्थमंत्री आणि पुढे पंतप्रधान पद आणि तेही 10 वर्षासाठी मिळणे हे देशाचे दुर्दैवच. देशाला घोटाळे करून काळाच्या मागे नेणाऱ्या काँग्रेस चे खरे दात यात दिसतात.

अर्थात निर्माते मंडळींनी ही 2019 च्या आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित केला आहे हे ओघाने आलेच. प्रत्येकाला शेवटी आपला व्यवसाय पाहायला हवा ना...

माझ्या कडून या चित्रपटाला 10 पैकी 6 मार्क. चित्रपट पाहून काँग्रेस चे लोक नाराज होतील पण त्यांनी आंदोलने वगैरे करायची स्क्रीन फाडायची काही गरज नाही.

@मंदार कुलकर्णी
12 जानेवारी 2019

Friday, January 11, 2019

नेताजी - एक वादळ

नेताजी - एक वादळ
@मंदार कुलकर्णी
6 जाने 2019

गेले काही दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल वाचन करत आहे. गुगल, विकिपीडिया यांचे वाचन करताना खूप नवीन गोष्टी समजल्या. आपल्याला फक्त नेताजी मुसलमानांचा वेष परिधान करून कलकत्त्याहून घरातून गायब होतात आणि आझाद हिंद सेना स्थापन करून इंग्रजांना विरोध करतात इतकेच इतिहासामध्ये शिकवले जाते. अशा त्रोटक इतिहासातून हा माणूस किती ग्रेट आहे याची सुतराम शक्यता नवीन पिढीला पोहोचत नाही आणि तीच तर खरी शोकांतिका आहे. नेताजी, सावरकर अशा स्वातंत्र्य सैनिकांना इतकं कमी लेखायचं की गांधी नेहरूंपुढे ते खुजे वाटलेच पाहिजेत. गेली अनेक दशके हा आणि असाच अपुरा इतिहास आपल्या डोक्यावर थापला जात आहे.

नेताजी या सर्वांपेक्षा वेगळे कसे याची काही महत्वाची उदाहरणे सांगितली की लक्षात येईल.
केम्ब्रिज मध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर 1919 साली नेताजी ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्विसेस च्या परिक्षेमध्ये 4 थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले पण केवळ इंग्रजांच्या हाताखाली नोकरी करायची नाही हे त्यांनी आधीच ठरवले होते. मनात आणलं असतं तर गलेलठ्ठ पगाराची सरकारी नोकरी त्यांना सहज मिळू शकली असती.

1921 साली म्हणजे वयाच्या 24 व्या वर्षी 'स्वराज' नावाचे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले आणि आणि आपले विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. चित्तरंजन दास यांच्या 'फॉरवर्ड' या वर्तमानपत्राचें ते संपादक होते आणि कलकत्ता म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये ते मुख्य आणि मग मेयर होते.

देशविरोधी कारवायासाठी 1925 आली त्यांना इंग्रजांनी दूर मंडाले च्या तुरुंगात पाठविले, हा त्यांचा पहिला तुरुंगवास.

1927 साली सुटका झाल्यावर ते काँग्रेस चे जनरल सेक्रेटरी झाले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक कॅम्प पूर्ण गणवेशात आयोजित केला होता. कलकत्त्यातील एक ब्रिटिश टेलरला हाताशी धरून त्यांनी गणवेश बनवून घेतले होते. इंग्रजांना आरे ला कारे करायची ही त्यांची खरी सुरुवात होती. ही कल्पना सूत काढणाऱ्या गांधींना अजिबात पसंत पडली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यानंतर युरोप मध्ये गेले आणि तेथील संघटना, कम्युनिस्ट विचारसरणी याचा अभ्यास करू लागले. याच काळात त्यांनी 1920 ते 1934 या काळातील घटनांवरती The Indian Struggle नावाचा एक ग्रंथ लिहिला. अर्थातच त्याच्यावर इंग्रजांनी लगेच बंदी घातली आणि 1948 पर्यंत तो लोकांसमोर येऊ दिला नाही.

भारतात परत आल्यावर त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि 1938 साली काँग्रेसचे अध्यक्ष झाले (त्या वेळची काँग्रेस बरं का) पुढे नेहरू आणि गांधी यांच्या कारस्थानामुळे त्यांनी हे अध्यक्ष पद सोडले आणि आपली पूर्ण वेगळी वाट घ्यायची ठरवले.

पुढे नेताजींना इंग्रजांनी कलकत्त्याच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवलेले असताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या पद्धतीने तेथून प्रस्थान केले आणि थेट पेशावर आणि मग काबूल गाठले. घरी नेताजी आधी मौन घेऊन बसले आहेत आणि नंतर हिमालयात निघून गेले अशी बेमालून बटावणी करीत इंग्रजांना झुलवत ठेवले. इथे मात्र त्यांनी भारत देश सोडला तो कायमचाच आणि निश्चय केला तो स्वतंत्र भारतातच येण्याचा. पुढे मॉस्को मध्ये जाऊन रशियाची मदत घेण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यात यश न आल्याने त्यांनी जर्मनी गाठले आणि हिटलरशी संधान बांधून आझाद हिंद सेनेची बीजे तिथे रोवली. इंग्रजांसाठी आफ्रिकेमध्ये लढणाऱ्या आणि जर्मनीने बंदी बनवलेल्या युद्धकैद्यांची थोडी थोडकी नवे तर 4500 ची पहिली फळी त्यांनी उभारली.

पुढील 2 वर्षे जर्मनी मध्ये संघटना वाढवत असताना हिटलर बरोबर झालेल्या मतभेदामुळे त्यांनी जर्मनी ते मादागास्कर ते जपान असा प्रवास 90 दिवसात पाणबुडीने केला! पुढे सिंगापूर मध्ये जवळ जवळ 45000 सैन्य आझाद हिंद सेनेकडे होते. नोव्हेंबर 1943 मध्ये नेताजी बोस यांनी सिंगापूर येथे स्वतंत्र भारताच्या सरकारची स्थापना केली. या सरकारला जपान, जर्मनी, इटली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. स्वतः नेताजी या सरकारचे पाहिले पंतप्रधान होते. येथे आझाद हिंद सेनेची जमवाजमव करून ब्रिटिशांपासून सिंगापूर, अंदमान, निकोबार आणि म्यानमार चा भाग जिंकत त्यांनी खूप मोठी आघाडी मारली होती पण जपानी सैन्याच्या नाकर्तेपणामुळे आणि म्यानमार मधील पाऊस आणि जंगल यामुळे त्यांना काही ठिकाणी माघार घ्यावी लागली. बोस यांनी ज्या ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्यांनी त्यांना कायम धोकाच दिला.

ऑगस्ट 1945 मध्ये जपान वर अणुबॉम्ब टाकल्यावर खऱ्या अर्थाने दुसरे महायुद्ध संपले पण नेताजींनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. त्यानंतर 8च दिवसांत सिंगापूर हुन जपानकडे जाणाऱ्या त्यांच्या विमानाला दुर्दैवी अपघात झाला आणि त्यांचे निधन झाले.

आता काही जण म्हणतात की 1945 साली गेलेच नाहीत, काही म्हणतात, ते हिमालयात निघून गेले वगैरे वगैरे. पण ते पटत नाही. इतके प्रचंड आणि अतर्क्य पराक्रम करणारे नेताजी अशाप्रकारे स्वतंत्र लढा सोडून हिमालयात जातील अशी अजिबात शक्यता नाही. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी भारत देश नक्कीच स्वतंत्र केला असता. आझाद हिंद सेनेच्या प्रत्येक सैनिकांचा पूर्ण पगार त्यांनी दिला आणि कोणाचे काही देणे ठेवले नाही. अफाट संघटन कौशल्य, कुशाग्र बुद्धी, कल्पनेच्या बाहेर काहीतरी करून दाखवायची त्यांची इच्छाशक्ती आणि सहकाऱ्यांच्या मदतीने आपले ध्येय साध्य करायची अफाट सचोटी. केवळ 48 वर्षाच्या छोट्याशा आयुष्यात या माणसाने इतके चढ उतार पाहिले ते पाहून थक्क व्हायला होते.

त्यांचे संघटन कौशल्य इतके चांगले होते की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आझाद हिंद सेनेच्या अनेक अधिकाऱ्यांना नेहरूंनी सरकारी उच्च पदावर घेतले विशेषतः विदेश नीती संदर्भात.

या अशा बहुआयामी आणि प्रतिभावंत स्वातंत्र्य सैनिकाला माझा हा मानाचा मुजरा ...


________________________________________________________________________

मित्रांनो, माझ्या लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व प्रथम धन्यवाद !!!

मला इथे कुठलाही वाद घालायचा नाही पण कुठल्याही चरित्र नायकाबद्दल जेव्हा लिहिले जाते, तेव्हा त्याच्या संदर्भात येणारे विषय, लोक आणि त्यातील वैचारिक आंदोलने यांचा उल्लेख प्रकर्षाने करण्यात येतात. इथे गांधी आणि नेहरू यांना शिव्या घालणे हा मुद्दा मुळीच नाहीये. बोस, गांधी आणि नेहरू यांच्या संबंधांवर एक स्वतंत्र प्रबंध लिहिता येईल. 

प्रचंड लोकप्रियता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा असताना केवळ 6 महिन्यात काँग्रेसचे अध्यक्षपद सोडायला लागणे यात किती राजकारण झाले असेल याची नुसती कल्पना आपण करू शकतो.

प्रश्न एवढाच आहे की आपण हे सत्य पचवू शकतो की नाही... 

आता या विषयावर पुन्हा चिरफाड न झाल्यास उत्तम...



श्रीधर

श्रीधर


देवांनी दिलेल्या आणि आपल्याला लाभलेल्या या छोट्याशा आयुष्यात आपल्याला किती आणि किती तर्‍हेची माणसे भेटतात! काही जण पहिल्याच भेटीत जिवाभावाचे मित्र होऊन जातात, काही जण अकारण शत्रूसारखे वागतात. काही नीट ओळख झाल्यावर त्याच्याविना जगणे अशक्य करून टाकतात. यामध्ये वयाचा, मानाचा कसलाही मुलाहिजा नसतो. एखादा लहानगाही त्याच्या मोजक्या शब्दांनी आपल्याला विचारात पडतो, तर कधी वृद्धांचे कातरलेले शब्द काळजाला घर करून जातात. ह्या सगळ्यात कधी आपली अपंग, मतिमंद, अंध किंवा काही व्यंग असलेली व्यक्ती जर समोर आली, तर आपण सहसा टाळायचा प्रयत्न करतो. माशी झटकल्यासारखे किंवा तुच्छतेने कटाक्ष टाकून आपण दुसरी वाट घेतो. ‘कशाला ही ब्याद आली आहे आपल्यापाठी?’ असे कधी मनात, तर कधी चारचौघात विचार व्यक्त करतो. अशा व्यक्तींचे गुण पाहण्यापेक्षा आपण त्यांचे व्यंगच पाहतो आणि जमलीच तर दया दाखवतो. एखादा आंधळा उत्तम चित्रकार असू शकतो, एखादा हात गमावलेला पायाने उत्तम कलाकृती करू शकतो अगर उत्तम गायन करू शकतो. पाय गमवलेली एखादी व्यक्ती सायकलरिक्षाच नव्हे, तर आपले घरही चालवू शकते, ह्याचा कधी आपण विचार करत नाही. हीच माणसे जेव्हा आपल्या मदतीला येतात आणि मग त्यांचा हेवा वाटायला लागतो. देवाने दिलेल्या धडधाकट शरीराचा, चांगल्या वाणीचा उगीचच मत्सर वाटायला लागतो.
असाच एक मनुष्य माझ्या आयुष्यात आला. त्याला आता वीस वर्षे झाली. आम्ही काही मित्रांनी एक वाद्यवृंद बनवला होता आणि त्याचे गणेशोत्सवामध्ये कार्यक्रम करायचे होते. आम्ही मित्राच्या घरी त्याची गाण्याची तयारी आणि तालीम करायचो. रोज संध्याकाळी ६ ते ८-८.३० पर्यंत सराव चालायचा. अचानक एक दिवस ‘श्रीधर कुलकर्णी’ आमच्या मैफलीत अवतरला. साधारण ५ फूट उंची, वर्ण आडनावाला साजेसा, शरीरयष्टी अगदी किरकोळ. अंगात स्वत:च्या वर्णापेक्षा स्वच्छ सदरा आणि पायात जुनेसे वाटणारे बूट. सुरुवातीला हा येण्याचे प्रयोजन कळले नाही. बरे, अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्व नसल्याने विशेष लक्ष वेधून घेईल असेही नाही. नुसताच इकडे तिकडे पाहत होता. थोड्या वेळाने त्याला वाद्य आणायला कोणीतरी सांगितले आणि हा तडकाफडकी उठला आणि सगळी वाद्ये घेऊन आला. पाच मजले वाद्य अंगावर टाकून आल्याने घामाघूम झाला होता. ‘आण ते इकडे’ अशी कोणीतरी खूण केली आणि त्याने त्याचे कर्तव्य पार पाडले. मी आपला उगीचच तोंडदेखले Thanks म्हटले आणि त्याचे उत्तर आले. सुरुवातीला मला काहीच कळले नाही, म्हणून मी परत त्याच्याकडे पहिले आणि परत तो काहीतरी बोलला आणि मला ते कळले नाही. त्याची जीभ जड होती. त्याचा कुठलाही शब्द किंवा वाक्य ‘अ’च्या बाराखडीत उच्चारले जायचे. उदा. ‘तू कसा आहेस?’ असे त्याने विचारले तर याचे ‘उ अआ आएअ?’ असले काहीतरी ऐकू येते. सुरुवातीला आम्हा कोणालाच काही अर्थबोध होईना. मग हा काहीतरी हातवारे करून (पूर्वी दूरदर्शनवर रविवारी दुपारी विशेष बातम्या लागायच्या, तसे) आम्हाला समजायला मदत करायचा. याचे हे व्यंग म्हटले तरी फार विशेष नव्हते, पण समोरच्याशी संवाद साधण्यासाठी मोठा अटकाव निश्चित होते.
पहिल्याच भेटीत त्याने हॅलो, गुड इव्हनिंग असे बोलून सुरुवात केली. सुरुवातीला प्रत्येक वाक्याला आम्ही आं आं करायचो. पण नंतर हळूहळू सवय होत गेली. हा सारखा कुठेतरी आणि कोणासाठीतरी धावत असायचा. कोणीही काहीही काम सांगितले की हा ते काम करायला अतिशय तत्पर असायचा. क्षणाचाही विलंब न लावता हा निघालाच त्या वाटेवर. कोणाचे गॅस सिलेंडर घेऊन ये, कुणाच्या मुलाला शाळेत सायकलवर सोडून ये, कुठल्यातरी आजींची औषधे मेडिकलच्या दुकानातून घेऊन ये, तर कधी कोणाचातरी गाडीत पेट्रोल भरून आण. एखाद्याच्या किराणा मालाचा जड सामान आणायचा आहे, की हा पठ्ठ्या निघाला मोहिमेवर. पूर्ण सोसायटीचा ‘नारायण’च म्हणा हवे तर. कधीही तयार आणि तत्पर. मागे एकदा सोसायटीमधील एका वयस्क व्यक्तींना त्रास व्हायला लागला, तातडीने दवाखान्यात नेणे आवश्यक होते. श्रीधर हातातली कामे सोडून लगेच रिक्षा घेऊन आला. त्यांना रिक्षात घालून रुग्ण योग्य डॉक्टरच्या हवाली पोहोचेपर्यंतची सर्व कामे त्याने यथासांग पार पडली. किंबहुना तेथील रहिवाश्यांनी त्याला गृहीतच धरले होते की हा आहेच. पूर्वी फोन, मोबाइल वगैरे नव्हते. कधी कोणाला निरोप द्यायचा असला तरी ‘श्रीधर.कॉम.’ कोणाला बोलावून आण, कोणाचा निरोप पोचवून दे, हा माणूस सायकल वर टांग मारून काही क्षणात पुढच्या गल्लीत अदृश्य झालेला असायचा. त्याला एका क्षणाची उसंत नसे.
आमचा वाद्यवृंदाचा जाहीर कार्यक्रम असो किंवा आकाशवाणीवर गाण्याचे रेकॉर्डिंग असो, श्रीधर वेळेपूर्वी एक तास हजर असायचा. मग कोण आले आहे, कोण आले नाही, याची गणती करायचा. आमच्यापेक्षा त्यालाच कार्यक्रमाची जास्त काळजी. एखाददुसर्‍या व्यक्तीला उशीर झाला असेल वा उशीर होणार असेल, तर तो फार अस्वस्थ व्हायचा. सरळ गाडीवर जायचा आणि त्या व्यक्तीला गाडीवर घालून घेऊनच येणार. कार्यक्रमाची वाद्ये गाडीमध्ये नीट ठेवणे, त्यांचा हिशोब ठेवणे, वाद्ये गाडीतून काढून स्टेजपर्यंत आणून देणे, इतकेच काय, तो कार्यक्रमात तालवाद्यांची साथही करायचा. कार्यक्रम झाल्यावर वाद्ये आणि माणसे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवायची जबाबदारीही त्याचीच.
पु.लं.च्या ‘नारायण’प्रमाणे त्याला कुठल्याही घरात आणि कोणत्याही खोलीत शिरायचा अलिखित परवाना होता. दार ढकलून स्वयंपाकघरातील ओट्याच्या खाली असलेली गॅस सिलेंडर ठेवायची जागा त्यालाच माहीत असायची. कोणाला विचारावे लागत नसे. नवीन सिलेंडर घेऊन, त्याचा रेग्युलेटर लावून गॅस चालू करून काम फत्ते. त्याच्या बोलण्यावरून सुरुवातीला आम्ही त्याची फार चेष्टा करायचो. त्याच्यासमोर त्याच्यासारखे बोलायचो, त्याची नक्कल करायचो. त्याला चिडवायचो. एकाच्या घरी जाऊन त्याच्या माळ्यावरील डफ आणायला सांगितला होता, तर श्रीधरने दुसर्‍या खोलीतील ढोलकी चुकून आणली होती. त्या वेळी तर इतकी टर उडवली होती की बस! बिचारा निमूटपणे परत गेला आणि डफ घेऊन आला. त्याची कितीही खेचा, पण श्रीधर एकदम स्थितप्रज्ञ. कधीच चिडायचा नाही. कधीच रुसून बसायचा नाही. त्याचे व्यंग त्याने ‘स्वीकारले’ होते. त्याच्यावर मात करून पुढे कसे जायचे, हे त्याने ठरवले होते.
हा मुलगा अनाथालयात वाढला. तिथेच शिकला, दहावी, बारावी करत बी.कॉमसुद्धा झाला. ह्याचे अक्षर अगदी मोत्यासारखे. कोणी अनोळखी व्यक्ती भेटली की त्यांना श्रीधरचे बोलणे समजायचे नाही. हा सरळ त्याच्या सुवाच्य अक्षरात कागदावर लिहून द्यायचा.
कधीकधी त्याची दया यायची. मग त्याला घरी थोडावेळ बसवून चहा द्यायचो. जेवायची वेळ असेल तर जेवू घालायचो. त्याच्याशी चार गोष्टी बोलल्या तरी खूश होऊन जायचा. हा मनुष्य पोटापाण्यासाठी काय उद्योग करतो, हा मला अनेक दिवस प्रश्न पडला होता. हळूहळू तो उलगडत गेला. तो एका गॅरेजमध्ये काम करतो, एका ट्रकचा क्लीनर म्हणूनही काम करतो. फावल्या वेळात पूजा सांगायला ब्राह्मण म्हणून जातो. आणि शिवाय बाकीचे हे सारे उद्योग!
आता त्याचे लग्न झाले आहे. मराठवाड्यातील मुलगी केली म्हणे. आम्हाला त्याच्याइतकी त्या मुलीची काळजी वाटत होती. पुढे हे सगळे कसे निभावणार... त्यानंतर काही गाठ पडली नाही. सुखाचा संसार करतो आहे, इतपत मित्रांकडून खबर लागली. त्याच्या आयुष्याची गाडी नीट मार्गावर लागली, यात आनंदच नाही का?
- मंदार कुलकर्णी

https://www.misalpav.com/node/26006