नेताजी - एक वादळ
@मंदार कुलकर्णी
6 जाने 2019
6 जाने 2019
गेले काही दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल वाचन करत आहे. गुगल, विकिपीडिया यांचे वाचन करताना खूप नवीन गोष्टी समजल्या. आपल्याला फक्त नेताजी मुसलमानांचा वेष परिधान करून कलकत्त्याहून घरातून गायब होतात आणि आझाद हिंद सेना स्थापन करून इंग्रजांना विरोध करतात इतकेच इतिहासामध्ये शिकवले जाते. अशा त्रोटक इतिहासातून हा माणूस किती ग्रेट आहे याची सुतराम शक्यता नवीन पिढीला पोहोचत नाही आणि तीच तर खरी शोकांतिका आहे. नेताजी, सावरकर अशा स्वातंत्र्य सैनिकांना इतकं कमी लेखायचं की गांधी नेहरूंपुढे ते खुजे वाटलेच पाहिजेत. गेली अनेक दशके हा आणि असाच अपुरा इतिहास आपल्या डोक्यावर थापला जात आहे.
नेताजी या सर्वांपेक्षा वेगळे कसे याची काही महत्वाची उदाहरणे सांगितली की लक्षात येईल.
केम्ब्रिज मध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर 1919 साली नेताजी ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्विसेस च्या परिक्षेमध्ये 4 थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले पण केवळ इंग्रजांच्या हाताखाली नोकरी करायची नाही हे त्यांनी आधीच ठरवले होते. मनात आणलं असतं तर गलेलठ्ठ पगाराची सरकारी नोकरी त्यांना सहज मिळू शकली असती.
1921 साली म्हणजे वयाच्या 24 व्या वर्षी 'स्वराज' नावाचे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले आणि आणि आपले विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. चित्तरंजन दास यांच्या 'फॉरवर्ड' या वर्तमानपत्राचें ते संपादक होते आणि कलकत्ता म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये ते मुख्य आणि मग मेयर होते.
देशविरोधी कारवायासाठी 1925 आली त्यांना इंग्रजांनी दूर मंडाले च्या तुरुंगात पाठविले, हा त्यांचा पहिला तुरुंगवास.
1927 साली सुटका झाल्यावर ते काँग्रेस चे जनरल सेक्रेटरी झाले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक कॅम्प पूर्ण गणवेशात आयोजित केला होता. कलकत्त्यातील एक ब्रिटिश टेलरला हाताशी धरून त्यांनी गणवेश बनवून घेतले होते. इंग्रजांना आरे ला कारे करायची ही त्यांची खरी सुरुवात होती. ही कल्पना सूत काढणाऱ्या गांधींना अजिबात पसंत पडली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यानंतर युरोप मध्ये गेले आणि तेथील संघटना, कम्युनिस्ट विचारसरणी याचा अभ्यास करू लागले. याच काळात त्यांनी 1920 ते 1934 या काळातील घटनांवरती The Indian Struggle नावाचा एक ग्रंथ लिहिला. अर्थातच त्याच्यावर इंग्रजांनी लगेच बंदी घातली आणि 1948 पर्यंत तो लोकांसमोर येऊ दिला नाही.
भारतात परत आल्यावर त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि 1938 साली काँग्रेसचे अध्यक्ष झाले (त्या वेळची काँग्रेस बरं का) पुढे नेहरू आणि गांधी यांच्या कारस्थानामुळे त्यांनी हे अध्यक्ष पद सोडले आणि आपली पूर्ण वेगळी वाट घ्यायची ठरवले.
पुढे नेताजींना इंग्रजांनी कलकत्त्याच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवलेले असताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या पद्धतीने तेथून प्रस्थान केले आणि थेट पेशावर आणि मग काबूल गाठले. घरी नेताजी आधी मौन घेऊन बसले आहेत आणि नंतर हिमालयात निघून गेले अशी बेमालून बटावणी करीत इंग्रजांना झुलवत ठेवले. इथे मात्र त्यांनी भारत देश सोडला तो कायमचाच आणि निश्चय केला तो स्वतंत्र भारतातच येण्याचा. पुढे मॉस्को मध्ये जाऊन रशियाची मदत घेण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यात यश न आल्याने त्यांनी जर्मनी गाठले आणि हिटलरशी संधान बांधून आझाद हिंद सेनेची बीजे तिथे रोवली. इंग्रजांसाठी आफ्रिकेमध्ये लढणाऱ्या आणि जर्मनीने बंदी बनवलेल्या युद्धकैद्यांची थोडी थोडकी नवे तर 4500 ची पहिली फळी त्यांनी उभारली.
पुढील 2 वर्षे जर्मनी मध्ये संघटना वाढवत असताना हिटलर बरोबर झालेल्या मतभेदामुळे त्यांनी जर्मनी ते मादागास्कर ते जपान असा प्रवास 90 दिवसात पाणबुडीने केला! पुढे सिंगापूर मध्ये जवळ जवळ 45000 सैन्य आझाद हिंद सेनेकडे होते. नोव्हेंबर 1943 मध्ये नेताजी बोस यांनी सिंगापूर येथे स्वतंत्र भारताच्या सरकारची स्थापना केली. या सरकारला जपान, जर्मनी, इटली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. स्वतः नेताजी या सरकारचे पाहिले पंतप्रधान होते. येथे आझाद हिंद सेनेची जमवाजमव करून ब्रिटिशांपासून सिंगापूर, अंदमान, निकोबार आणि म्यानमार चा भाग जिंकत त्यांनी खूप मोठी आघाडी मारली होती पण जपानी सैन्याच्या नाकर्तेपणामुळे आणि म्यानमार मधील पाऊस आणि जंगल यामुळे त्यांना काही ठिकाणी माघार घ्यावी लागली. बोस यांनी ज्या ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्यांनी त्यांना कायम धोकाच दिला.
ऑगस्ट 1945 मध्ये जपान वर अणुबॉम्ब टाकल्यावर खऱ्या अर्थाने दुसरे महायुद्ध संपले पण नेताजींनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. त्यानंतर 8च दिवसांत सिंगापूर हुन जपानकडे जाणाऱ्या त्यांच्या विमानाला दुर्दैवी अपघात झाला आणि त्यांचे निधन झाले.
आता काही जण म्हणतात की 1945 साली गेलेच नाहीत, काही म्हणतात, ते हिमालयात निघून गेले वगैरे वगैरे. पण ते पटत नाही. इतके प्रचंड आणि अतर्क्य पराक्रम करणारे नेताजी अशाप्रकारे स्वतंत्र लढा सोडून हिमालयात जातील अशी अजिबात शक्यता नाही. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी भारत देश नक्कीच स्वतंत्र केला असता. आझाद हिंद सेनेच्या प्रत्येक सैनिकांचा पूर्ण पगार त्यांनी दिला आणि कोणाचे काही देणे ठेवले नाही. अफाट संघटन कौशल्य, कुशाग्र बुद्धी, कल्पनेच्या बाहेर काहीतरी करून दाखवायची त्यांची इच्छाशक्ती आणि सहकाऱ्यांच्या मदतीने आपले ध्येय साध्य करायची अफाट सचोटी. केवळ 48 वर्षाच्या छोट्याशा आयुष्यात या माणसाने इतके चढ उतार पाहिले ते पाहून थक्क व्हायला होते.
त्यांचे संघटन कौशल्य इतके चांगले होते की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आझाद हिंद सेनेच्या अनेक अधिकाऱ्यांना नेहरूंनी सरकारी उच्च पदावर घेतले विशेषतः विदेश नीती संदर्भात.
________________________________________________________________________
मित्रांनो, माझ्या लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व प्रथम धन्यवाद !!!
मला इथे कुठलाही वाद घालायचा नाही पण कुठल्याही चरित्र नायकाबद्दल जेव्हा लिहिले जाते, तेव्हा त्याच्या संदर्भात येणारे विषय, लोक आणि त्यातील वैचारिक आंदोलने यांचा उल्लेख प्रकर्षाने करण्यात येतात. इथे गांधी आणि नेहरू यांना शिव्या घालणे हा मुद्दा मुळीच नाहीये. बोस, गांधी आणि नेहरू यांच्या संबंधांवर एक स्वतंत्र प्रबंध लिहिता येईल.
प्रचंड लोकप्रियता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा असताना केवळ 6 महिन्यात काँग्रेसचे अध्यक्षपद सोडायला लागणे यात किती राजकारण झाले असेल याची नुसती कल्पना आपण करू शकतो.
प्रश्न एवढाच आहे की आपण हे सत्य पचवू शकतो की नाही...
आता या विषयावर पुन्हा चिरफाड न झाल्यास उत्तम...


No comments:
Post a Comment