Followers

Monday, January 14, 2019

The accidental prime minister - एक लाचार कारकीर्द (Review)

The accidental prime minister - 
एक लाचार कारकीर्द



हा चित्रपट पाहायला मी मोठ्या अपेक्षेने गेलो होतो पण थोडीशी निराशाच झाली. त्याची मल्लीनाथी करण्यापूर्वी काय चांगलं ते आधी पाहूया.

हा चित्रपट संजया बारु नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट आहे. संजया हा pm चा मीडिया adviser या पदावर अनेक वर्षे काम करत होता आणि त्यामुळे अर्थातच त्याला pmo ऑफिस मधील बऱ्याच आतल्या गोष्टी आणि खाचाखोचा माहीत असणारच. याचाच एक संग्रह म्हणजे हा चित्रपट.

भारतीय राजकारणात अनेक घटना घडतात तेव्हा त्यामागची खरी गोष्ट किंवा त्याच्या मागचे खरे राजकारण कळत नाही आणि पत्रकार त्यांच्या त्यांच्या ज्ञाना प्रमाणे आणि बुद्धिप्रमाणे त्याचे आकलन करतात. पेड मीडिया असेल तर त्यांच्या साहेबाच्या मनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे मत व्यक्त करतात आणि अनेक वेळा तसेच आणि तेच तेच सांगितल्यामुळे ते सर्वांना खरेच वाटते. 

उदा. सोनिया गांधी यांनी 2004 मध्ये महान त्याग केला हे मीडिया ने इतके पटवून सांगितले आहे पण खरी आतली गोष्ट जोवर स्वामी सांगत नाहीत तोवर कळत नाही.

या चित्रपटात अशा अनेक घटना आहेत ज्या मनमोहनसिंग यांना बाहुले केलेले दाखवतात आणि त्याची खात्रीच पटते. इतके दिवस कुठून कुठून मिळालेल्या माहितीची या चित्रपटामुळे सत्यता कळते. मनमोहन सिंग यांनी निवड इथपासून ते NAC ने केलेला उच्छाद, नरसिंह राव यांच्या मृत्यूनंतर ही त्यांच्यावर झालेला अन्याय, जिवंत पणीच डावलले गेलेले प्रणव मुखर्जी अशा अनेक प्रसंगातून हा चित्रपट पुढे जातो.

मुळात मनमोहनसिंग यांचा मृदू स्वभाव, राजकारण कशाही खातात याचा अजिबात अनुभव नसताना त्यांना 25 वर्षे मिळालेली विविध पदे आणि सोनिया गांधी यांनी कठपुतली म्हणून केलेला मुक्त वापर या गोष्टी परत पाहायला मिळतात.

चित्रपटात उगाचच त्यांना भीष्माची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे पण सोनिया आणि राहुल याच्या दबावाखाली आयुष्यभर जीवन कंठणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था होते हे प्रकर्षाने दिसते. काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारण, सोनिया गांधी यांची पक्षातील प्रचंड पकड या गोष्टी मनमोहन सिंग यांना अजून हतबल करतात.

अनुपम खेर यांचा मनमोहन सिंग एकदम छान, त्यांनी उत्तमच काम केले आहे मात्र काही ठिकाणी डबिंग मध्ये गडबड झाली आहे. संजया बारु चे काम अक्षय खन्ना ने मस्त केले आहे. चित्रपटभर त्याचा मुक्त वावर आणि मनमोहन सिंग यांना वेळोवेळी केलेली मदत आणि सल्ले पाहण्यासारखी आहेत. या व्यतिरिक्त निवडलेली बहुतेक पात्रांची निवड छानच आहे पण...

पण हा चित्रपट 'रंजक चित्रपट' न बनता मनमोहन सिंग यांची documentry जास्त झाला आहे. दिग्दर्शक विजय गुत्ती यांचे हे अपयश आहे. यांच्या जागी राजकुमार संतोषी किंवा तत्सम दिग्दर्शक असता तर या सगळ्या कथेला चांगली धार आली असती. किंबहुना नुसतेच 2004 पासून 2014 पर्यंत चा काळ एका डायरी सारखा एक मागोमाग एक दाखवण्यापेक्षा फ्लॅश बॅक मध्ये काही घटना घालून अजून खिळवून ठेवता आला असते

यात कोणतीच घटना नवीन नाही, दिसते ते बहुतेक सगळे माहिती असते पण मग तरी हा चित्रपट का पहावा याचे उत्तर ज्यांना राजकारणाची आवड आहे पण रोजचा पेपर किंवा राजकारणावरील अग्रलेख अथवा पुस्तक वाचायला जाम कंटाळा आहे त्यांना हा चित्रपट पाहून गेल्या 15 वर्षातील राजकारणाची कल्पना येऊ शकते. मनमोहन सिंग सारख्या एका नोकरदार सदरातील व्यक्तीला RBI गव्हर्नर पाहून, अर्थमंत्री आणि पुढे पंतप्रधान पद आणि तेही 10 वर्षासाठी मिळणे हे देशाचे दुर्दैवच. देशाला घोटाळे करून काळाच्या मागे नेणाऱ्या काँग्रेस चे खरे दात यात दिसतात.

अर्थात निर्माते मंडळींनी ही 2019 च्या आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित केला आहे हे ओघाने आलेच. प्रत्येकाला शेवटी आपला व्यवसाय पाहायला हवा ना...

माझ्या कडून या चित्रपटाला 10 पैकी 6 मार्क. चित्रपट पाहून काँग्रेस चे लोक नाराज होतील पण त्यांनी आंदोलने वगैरे करायची स्क्रीन फाडायची काही गरज नाही.

@मंदार कुलकर्णी
12 जानेवारी 2019

No comments:

Post a Comment