Followers

Tuesday, January 15, 2019

खरी मकर संक्रांत कधी?

खरी मकर संक्रांत कधी?

© मंदार कुलकर्णी
15 जानेवारी 2019

सर्वांना या वर्षीच्या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!!!

मुळात संक्रांतीचा अर्थ संक्रमण म्हणजे सूर्याचे एक राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण. आपले सगळे सण हिंदू कालमापन पद्धतीने आणि संक्रांत हा एकच तेवढा 14 जानेवारीला , फार तर 15 जाने ला. या गोष्टीचे अनेक वर्षे कुतूहल होते. आंतरजालावर बरीच माहिती शोधली पण सामान्य माणसांना समजेल असे कुठेच लिहिलेले नाही. बाकी सणाबाबत घसा फाडून बोलणारे आणि लिहिणारे आहेत पण हेच लोक संक्रांतीपासून जरा दोन हात लांबच आहेत असे दिसते. चला तर आपण माझ्याबरोबर या संक्रांत या सणाची आणि त्याच्या कालमापनाची माहिती घेऊया.

हिंदू कालमापन पद्धतीमध्ये नवीन वर्ष चैत्र पाडवा म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सुरू होते आणि फाल्गुन महिन्यापर्यंत अनेक सणवार पार करत वर्ष संपते. ही कालमापन पद्धती चंद्राच्या परिवलनाशी जोडलेली असल्याने अमावास्येला चालू महिना संपतो आणि पुढील दिवसापासून नवीन महिना सुरू होतो. ही कालमापन पद्धत पृथ्वीच्या सूर्याभोवती लागणाऱ्या 365.24 दिवसापेक्षा बरीच मागे पडत असल्याने त्यात दर 3 वर्षांनी 'अधिक महिना' घालून ती गाडी एकदम रुळावर आणली आहे. किंबहुना सूर्य आणि चंद्र यांच्या परिवलनाला जोडणारी ही जगातील सर्वात अचूक कालमापन पद्धत आहे. असो.

आपल्या आकाशात 12 राशी आहेत आणि या आभासी जगात सूर्य 12 राशीमध्ये वर्षभर फिरतो म्हणजेच तो एका राशीत एक महिना राहतो. ग्रेगोरियन कालमापनपद्धती प्रमाणे 14 जाने ला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दर एक महिन्याला एक एक रास पुढे जातो. या घटनेचा आपल्या सणांशी काही संबंध नाही.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या पृथ्वीचा अक्ष हा सूर्याच्या परिवलन पातळीही 23.5° कललेला आहे. त्यामुळे सूर्य कायम विषुववृत्तावर फिरत न राहता कधी वरच्या बाजूला तर कधी खालच्या बाजूस भासमान भ्रमण करतो. पुथ्वीच्या परिवलनाच्या नियमाप्रमाणे उत्तर गोलार्धात सूर्य 21 मार्च ते 23 सप्टेंबर आणि उरलेल्या काळात दक्षिण गोलार्धात भासमान भ्रमण करतो. हे भासमान भ्रमण 0 ते 23.5° या अक्षांश या मधेच असते.

21 डिसेंबर ला सूर्य 23.5° दक्षिणेकडे असलेल्या काल्पनिक रेषेला स्पर्श करतो आणि आपला परतीचा मार्ग सुरू करतो. याच काल्पनिक रेषेला वृत्त असे म्हणतात. हीच घटना 21जूनला घडते. सूर्य उत्तर गोलार्धात 23.5° जाऊन एका काल्पनिक रेषेला म्हणजेच वृत्ताला स्पर्श करून परतीचा मार्ग स्वीकारतो. कालमापन पद्धती प्रमाणे 21 जून ला सूर्य हा कर्क राशीत असतो. (मगाशी आपण एक महिना एक रास पाहिले) आणि 21 डिसेंबर ला मकर राशीत असतो. सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे भासमान भ्रमण करतो त्याला दक्षिणायन आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होणाऱ्या भासमान भ्रमणाला उत्तरायण असे नाव पडले.

कालमापन पद्धतीच्या सोयीसाठी त्या वृत्तांना त्याच राशींची नावे देण्यात आली आणि म्हणूनच उत्तरेकडील संक्रमणाच्या शेवटच्या स्पर्श रेषेला कर्क वृत्त तर दक्षिणेकडील शेवटच्या स्पर्श रेषेला मकर वृत्त असे म्हटले जाते. यामुळे एक समज मात्र जनमानसात पक्का झाला की मकर संक्रांतीपर्यंत थंडी असते आणि त्यानंतर कमी होते. इथेच सारी गडबड आहे.

वरील गणितावरून अगदी सहज लक्षात येते, थंडीचा परमोच्च बिंदू उत्तर गोलार्धात 21 डिसेंबर तर दक्षिण गोलार्धात 21 जून हाच आहे. भारत देश उत्तर गोलार्धात असल्याने आपल्याकडे उत्तरायण 21 डिसेंबरला सुरू होते म्हणजे 21 डिसेंबर नंतर थंडी थोडी थोडी कमी व्हायला लागते. उन्हाळ्याचेही तसेच. भारतात पावसाळा असतो म्हणून नाहीतर भारतातही 21 जूनला कडक उन्हाळा झाल्यावर हळूहळू त्याची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होते.
थंडीचा कडाका आणि वरील गणित नीट तपासल्यावर अगदी सहज लक्षात येईल की थंडीच्या काळात शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ जसे गूळ, बाजरी, तीळ याचे सेवन केले जाते. याचाच अर्थ अशा पदार्थांचे सेवन 21 डिसेंबरच्या आधी आणि नंतर काही दिवस करणे आवश्यक आहे. गमतीचा भाग असा की मकर शब्दाच्या नामसाधर्म्यामुळे जो तिळगुळ आपण 21 डिसेंबर च्या आगे मागे खायचा तो 14 जाने आणि नंतर खायला सुरुवात करतो !!

गेली काही वर्षे जर हवामान आपण पाहिले तर थंडीचा कडाका डिसेंबरमध्ये बराच असतो पण जानेवारीपासून कमी होतो. बऱ्याच वर्षी तर मकर संक्रांतीला थंडी नसतेच आणि आपण मात्र तिळगूळ आणि तिळाच्या वड्यांचे यथेच्छ सेवन करतो. ग्लोबल वॉर्मिंगही याला तितकेच जबाबदार आहे. पूर्वी भारतात ऑक्टो ते जाने फेब्रुवारी पर्यंत चांगली थंडी असायची पण आता कमी झाली आहे.

मकर संक्रांत म्हणजे (भारतीय) मकर राशीत सूर्याचा प्रवेश. भारतीय राशी ह्या पाश्चात्य राशींहून वेगळ्या आहेत. पाश्चात्य राशीचक्र वसंत संपात बिंदूपासून सुरू होते. आणि पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा बिंदू आयनिक वृत्तावर सरकत असतो आणि त्यामुळे पाश्चात्य राशीचे आकार सुद्धा बदलतात. भारतीय राशीचक्राची सुरुवात मात्र एका ठरलेल्या बिंदू पासून होते, त्यामुळे भारतीय राशींचे आकार बदलत नाहीत. पृथ्वीच्या परांचन गती मुळे सूर्याला परत त्याच ताऱ्यापाशी/राशी पाशी पोचायला दर वर्षी 20 मिनिटं अधिक वेळ लागतो. म्हणजेच साधारण 72 वर्षानी सूर्याला त्याच ताऱ्यापाशी पोचायला एक दिवस अधिक लागेल. आणि म्हणूनच हळू हळू मकर संक्रांतीची तारीख एक एक दिवस पुढे जाईल..आता 14 आहे , मग 15 असेल..आणि मग 16.

आता उलटे गणित करू... सध्या उत्तरायण 21 डिसेंबर ला सुरू होते...आणि संक्रांत 14 जानेवारी ला आहे... म्हणजे 24 दिवसांचा फरक....आणि वर सांगितले तसे संक्रांत दर 72 वर्षानी एक दिवस पुढे जाते...म्हणजेच 24 x 72 = 1728 वर्षांपूर्वी मकर संक्रांत आणि उत्तरायण एकाच वेळी येत होती. कदाचित त्याच वेळो ही प्रथा/उत्सव सुरू झाला असावा..

भारतात मकर संक्रांती ला प्रदेशात वेगवेगळे सण आणि उत्सव सुरू झाले. मग कुणीकडे पतंगाचा उत्सव सुरू झाला तर काही ठिकाणी गडड्याची जत्रा सुरू झाली. काही ठिकाणी नवीन धान्याची पूजा सुरू झाली तर काही ठिकाणी सुर्योपासनेचा पोंगल उत्सव सुरू झाला. माणूस तसाही अत्यंत उत्सव प्रिय असल्याने त्याने आपली कामे सणांशी जोडली. त्याला जोडून भोगी आली, किंक्रांत आली. बाकी कधीही न घातले जाणारे काळ्या कपड्यांना या दिवशी महत्व आले.

मुळात आधी सांगितल्या प्रमाणे एका सिझन मधून दुसऱ्या मध्ये जायचा हा एक दरवाजा आहे. या पुढे थंडीचे कपडे घालायची फारशी गरज पडणार नाही, आता कपाटात वरच्या कप्यात आपण ते ठेवून द्यायला मोकळे, असा निरोप यातून मिळतो. कालमानानुसार आचार, विचार, विहार आणि उपचार याला आपल्या आयुर्वेदात सांगितलेलेच आहे. त्याप्रमाणे आपणच डोळे उघडे ठेवून याचा विचार करायचा.

आता आपल्याला मकर संक्रांतीची तारीख भारतभर बदलणे शक्य नाही पण निदान सारासार आणि शास्त्रोक्त विचार करून आपण ठरवू शकतो की गुळाची पोळी कधीपासून खायची, नाही का?
😊😊

No comments:

Post a Comment