काल भारत आणि वेस्ट इंडिज चा सामना पाहिला आणि वेस्ट इंडिज संघाची कीव करावीशी वाटली. भारताने कशाबशा 258 धावा बनवल्या त्या कोहली, धोनी यांच्या प्रयत्नाने आणि वेस्ट इंडिज कशा पद्धतीने हे आव्हान पेलेल हे पाहायचे होते. पण विराट च्या सेनेने आणि विशेषतः गोलंदाजांच्या मदतीने वेस्ट इंडिजचा एक एक बुरुज ढासळला, केवळ 143 धावात सर्व संघ गारद झाला आणि भारताने हा हा म्हणता विजय साकार केला.
या भारताच्या विजयाने मला एकदम 1970 आणि 80 च्या दशकात नेले. त्या वेळेस वेस्ट इंडिजचा संघ कालिव्ह लॉइडच्या नेतृत्वाखाली असंख्य विजय मिळवत होता. गॉर्डन ग्रीनिज आणि हेन्स या सलामीची जोडी कशी फोडायची हे कोडे भल्याभल्यांना सुटले नव्हते. त्यानंतर येणारे रिचर्ड्स, लॉइड असे जबरदस्त फलंदाज आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवणारे माल्कम मार्शल, होल्डिंग असे कर्दनकाळ. त्यांची गोलंदाजी खेळणे म्हणण्यापेक्षा आपला जीव वाचवणे हेच जास्त योग्य वाक्य होते. भारतीय फलंदाज शिरीष कणेकर म्हणतात त्या प्रमाणे "शास्त्र" म्हणून केवळ पिचवर फलंदाजी करायला जायचे आणि काही वेळातच पेव्हेलीयन मध्ये परत येत असत.
आधीच्या पिढीतील गारनर, ग्रीफिथ आणि नंतरच्या पिढीतील वोल्श, अँम्ब्रॉस त्यांचेच भाऊ. लॉइडच्या कर्णधारपदाच्या काळात रिचर्ड्स रिचर्डसन आणि त्यानंतर लारा असे अनेक विक्रमादित्य फलंदाज जन्माला आले.
खरंच, त्या काळात वेस्ट इंडिजने क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलं. टेस्ट क्रिकेट असो किंवा एक दिवसीय सामने असोत, बहुतेक सामन्यात त्यांचाच विजय असे. विश्वकरंडक स्पर्धेत 1975 आणि 1979 साली त्यांनी विजय मिळवलाच पण 1983 च्या अंत्य फेरीपर्यंत त्यांचे राज्य होते आणि तेच जिंकणार हे जवळजवळ ठरले होते.
भारतीय संघाची स्थिती त्या काळी याच्या अगदी विरुद्ध होती. मगाशी म्हटले त्याप्रमाणे विंडीजच्या तोफखान्यापुढे कोणाचीच डाळ शिजत नव्हती. पहिल्या डावात समजा दुसरी फलंदाजी भारताची असेल तर भारताला फॉलोऑन वाचवायला इतक्या धावा हव्यात इथपासून सुरुवात होत असे. कसोटी सामना खेळताना भारताचा उद्देश हा कायम सामना वाचवणे, ड्रॉ करणे हाच असायचा. भारताला जिंकायचे व्यसन लावले ते गांगुली आणि धोनी यांनी.
काळ बदलला आणि वेस्ट इंडिज संघाची अवस्था आता फारच दयनीय झाली आहे. ना त्यांच्या संघात चांगले फलंदाज आहेत ना त्यांच्या गोलंदाजीत आता पूर्वीसारखी धार राहिली आहे.
सध्या सायनो साईडल वेव्ह च्या वरच्या लाटेवर भारत आहे आणि खालच्या लाटेवर वेस्ट इंडिज. 40 वर्षांपूर्वी हेच चित्र याच्या उलटे होते. वेस्ट इंडिज ला यातून बाहेर पडण्यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागणार हे नक्की...
- मंदार कुलकर्णी
30 जून 2019
30 जून 2019


No comments:
Post a Comment