इंग्रजी विकिपीडिया वर 'दि बिग फोर' नावाचा एक लेख आहे. २१ व्या शतकातील ४ महान टेनिस खेळाडूंना समर्पित असलेला हा लेख आहे. फेडरर, नदाल, जोकोविच आणि मरे हे ते चार खेळाडू. कालांतराने मरे ची कारकीर्द आता संपत आली आहे आणि या वर्षी तो फक्त दुहेरी सामने खेळत आहे. पण बाकी ३ मंडळींना तोडच नाही.
फेडरर, नदाल, जोकोविच यांनी अशी कोणतीही स्पर्धा सोडली नसेल ज्यात त्यांना विजय मिळाला नसेल. बाकी कशाला, ग्रँड स्लॅम स्पर्धेचेच घ्या ना. २०, १८ आणि १५ अशी यांची नुसती विजेतेपदे आहेत. आणि या वर्षी ही विम्बल्डन या तिघांपैकीच एक जण घेणार हे निश्चित आहे. मरे आणि वोवरिंका हे प्रत्येकी ३ विजेतेपदे मिळवणारे त्यांच्या खूप खूप मागे आहेत.
२००४ साली फेडररने विजयाचा सपाटा सुरू केला तर नदाल ने २००६ मध्ये. जोकोविच ने २०११ मध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि ते तिघेही अजूनही थांबायचे नाव घेत नाहीयेत. त्यांच्या आधीचे, त्यांच्या बरोबरीचे आणि त्यांचा खेळ पाहून लहानाचे मोठे झालेले आणि आता त्यांच्याशी सामना करणारे आले आणि गेले पण याचा विजयाचा ओघ काही थांबत नाहीये.
फेडरर चे आता प्रत्येक सामन्यांमागे नवीन काहीतरी रेकॉर्ड होत आहे. १९७०-८० च्या दशकातील अनेक महान खेळाडूंना मागे टाकत नवीन उच्चांक तो मोडत चालला आहे. याच आठवड्यात त्याने सर्व ग्रँड स्लॅम मध्ये ३५० आणि विम्बल्डन मध्ये १०० विजय मिळवले. नदालचे तसेच. गवतावरच्या टेनिसचा राजा हे बिरुद लागून अनेक वर्षे झाली पण याचा उत्साह काही कमी होत नाहीये. जोकोविचने तर सर्बिया सारख्या अत्यंत युद्धप्रवण देशातून टेनिसला सुरुवात केली आणि आज सर्व प्रकारच्या टेनिस वर तो आज अधिराज्य करत आहे.
मग प्रश्न पडतो की गेल्या १८-२० वर्षात ही मंडळी अजिंक्य कशी राहिली? इतर बाबतीत आपण म्हणतो, पुढची पिढी नवीन विजय किंवा रेकॉर्ड करते मग टेनिस मध्येच हे का होत नाहीये?
फेडरर, नदाल, जोकोविच हे तिघेही कधीही सहजासहजी हार मानणारे खेळाडू नाहीत. सेटच्या शेवटच्या गुणापर्यंत काहीतरी वेगळे अचूक करायची त्यांची तयारी आहे. हे तिघेही आजही रोज ३ ते ४ तास सराव करतात. नवीन खेळाडूंपैकी किती जण इतका आणि इतके वर्ष सराव करत असतील किंवा अजून या पुढे करतील?
फेडररचा विचार केला तर आजही तो तेवढ्याच ताकदीने खेळ करतो जो तो १८ ते २० वर्षांपूर्वी करत होता. त्या बरोबर त्याला जोड आहे ती अचुकतेची. ही अचूकता फार कमी खेळाडूंना गवसली आहे. त्याने मारलेला फटका हा बेस लाईन पासून दोनच इंच आत पडतो मग तो फोर हँड असो किंवा एक हाताने मारलेला बॅक हँड असो. तो आपोआप किंवा सहज पडत नसतो. त्यासाठी त्याने केलेले परिश्रम दिसतात. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी चेंडू अतिशय वेगात परतवणे आणि प्लेसमेंट करणे अतिशय अवघड गोष्ट पण ती त्याला साध्य झाली आहे. फेडररचा कोर्टवरील वावर पहाण्यासारखा असतो. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवत अगदी कमी पावलात तो संपूर्ण कोर्ट पादाक्रांत करतो आणि अगदी शिताफीने आणि अचूक फटका मारून पॉईंट घेतो. एस हे त्याचे सर्वात प्रभावी अस्त्र आहे. जिंकल्यावर डोके शांत ठेवून अजिबात उत्तेजित न होता अतिशय संयमी प्रतिक्रिया तो देतो आणि तिथेच तो सर्वांचे मन जिंकतो.
नदालची तऱ्हाच वेगळी. त्याचासारखा कोर्ट वर धावणारा खेळाडू मी अजून पाहिला नाहीये. सर्व्ह घेताना तो बेस लाईन पासून १० फूट मागे उभा राहतो जेणेकरून सर्व्ह कुठेही पडली तरी पायाची हालचाल करून ती परतवण्यासाठी त्याला काही निमिष जास्त मिळतात. प्रचंड घामाने निथळत असताना तो कोर्टच्या सर्व बाजूस वेगात पळत जातो. त्याचा फोरहँड हा जास्त जोरकस त्याच्या बॅक हँड पेक्षा असल्याने तो बॅक हँड फोर हँड मध्ये बदलून बऱ्याच वेळेला खेळतो. सहसा नेटपाशी न येणारा नदाल सर्व्ह आणि व्हॉली जरा कमीच करतो. ताकद आणि क्षमता मात्र अफाट. मातीवरचा राजा उगाच नाही म्हणत त्याला.
जोकोविच २०११ पासून भरात आला. त्याच वर्षी मी त्याला विम्बल्डन मध्ये प्रत्यक्ष सामना खेळताना पाहिले आणि तो त्या वर्षी विजेता बनला !! आणि पुढे जिंकतच राहिला. अत्यंत संयमी तर कधी कधी कोर्ट वर मजा करणारा असा हा खेळाडू. बेस लाईन आणि नेट याचा अजोड मिलाप करणारा हा अलौकिक खेळाडू आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूचे कच्चे दुवे शोधून त्या प्रमाणे हा खेळ करतो. नेट जवळच्या त्याच्या उड्या म्हणजे डायविंग व्हॉली थेट बोरिस बेकरची आठवण करून देतो.
तर असे हे तीन महान खेळाडू. उत्तम सर्व्ह, प्रचंड स्टॅमिना आणि सकस खेळ या जीवावर हे ३ खेळाडू आज टेनिसवर अधिराज्य गाजवत आहेत. अर्थात त्यांचे कष्ट, सराव या गोष्टी आपण विसरून चालणार नाहीत. फेडरर तर नेहमी म्हणतो, टेनिस साठी त्याने काय गमावले तर त्याचे अख्खे बालपण. या खेळाडूंना जर हरवायचं असेल तर नवीन खेळाडूंना त्यांच्यापेक्षा चांगला खेळ करावा लागेल. त्यासाठी जास्त सराव, जास्त सकस खेळ आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षात अनेक खेळाडू आले आणि गेले. पण हे तीन हिरे अजूनही टेनिस च्या क्षितिजावर एखाद्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे तळपत आहेत.
मंदार कुलकर्णी
१२ जुलै २०१९
१२ जुलै २०१९


No comments:
Post a Comment