Followers

Monday, August 12, 2019

अलमट्टी धरण आणि सांगली - कोल्हापूर पूर


सध्या सांगली कोल्हापूर परिसरात पुरामुळे झालेला हाहाकार पाहून मन विदीर्ण झाले आहे. 35 वर्षातील सर्वात जास्त पाऊस या गेल्या 10 दिवसात झाला आहे. अजूनही मुंबई बंगळुरू महामार्ग बंद आहे. पुराचे पाणी कमी होत नाहीये, सगळी गावे म्हणजे महासागर झाली आहेत. 3 लाखाच्या वर लोकांना आत्तापर्यंत स्थलांतरीत केले गेले आहे. सर्व स्तरावर आणि सर्व पद्धतीने मदतकार्य दिवस रात्र सुरू आहे. पाऊस जरासा कमी झाला आहे पण पाणी हटत नाहीये.

धोम, कण्हेर, चांदोली आणि कोयना या धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात चांदोली हे धरण मातीचे असल्याने त्यात क्षमतेपेक्षा पाणी जास्त काळ थांबवू शकत नाही. कोयना धरण पूर्ण भरल्याने तेथून दीड लाख क्यूसेक्स पाणी सोडले आहे त्यात पंचगंगा नदीच्या परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने आणि बाकीच्या सहनद्या आणि ओढे नाले यांना पाणी आल्याने अवघ्या कोल्हापूर, सांगली, शिराळ परिसर जलमय झाला आहे. सांगली आयर्विन पूल पाण्यात गर्ल आहे. त्याची ऐतिहासिक पूर रेषा 55 फूट पाण्याने ओलांडून आता 58 फुटावरून पाणी वाहत आहे.


बऱ्याच तज्ञ मंडळींचे यावर मत आहे ते म्हणजे अलमट्टी धरणातून पाणी न सोडल्यामुळे हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी आता थोडा त्या धरणाचा अभ्यास करूया. अलमट्टी धरण सांगली पासून 170 किमी अंतरावर विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांच्या सीमेवर असून 2005 साली याचे बांधकाम पूर्ण झाले. जास्तीत जास्त 519 मीटर धरणाच्या पाण्याची उंची गाठली की हे धरण 123 टी एम सी ही पूर्ण क्षमता प्राप्त करते. कालच्या अधिकृत आकड्यानुसार सध्या धरणाच्या पाण्याची उंची 517.07 मीटर असून त्यात 84.4 टी एम सी पाणी आहे आणि रोज त्यात पाण्याची भर पडत आहे. 4.5 लाख क्यूसेक्स पाणी धरणातून सोडून हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न चालू आहे.

मग इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की अजून 2 मीटर आणि 40 टी एम सी पाणी भरायचे शिल्लक असताना सांगली परिसरात इतकी पूरस्थिती का निर्माण का झाली आहे? मला वाटते की अलमट्टी धरण बांधताना पाण्याचा प्रवाह, त्याचा उतार, वहन क्षमता आणि पूरस्थिती आल्यावर करायचे नियोजन यांच्यात काहीतरी अभ्यास कमी पडला आहे असे वाटते. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य यांच्या मधील संवाद आणि नियोजन हा विषय तर आहेच पण धरण पूर्ण भरलेले नसताना सुद्धा सांगली मधील पाणी काही केल्या कमी होत नाहीये म्हणजे नक्कीच धरण आणि धरण क्षेत्र यांच्या डिझाइन मध्ये काहीतरी गडबड असावी. दरवर्षी अलमट्टी मधून पाणी सोडा म्हणजे म्हणजे सांगलीतील पूर कमी होईल ही मागणी करणे फारच हास्यास्पद आहे.

हे धरण बांधताना बागलकोट जिल्यातील जमीन पाण्याखाली गेलेल्या लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. त्यात अजून भर म्हणजे कृष्णा नदी पाणी तंटा यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अलमट्टी धरणाची उंची अजून 5 मीटर म्हणजे 524 मीटर पर्यंत वाढवायला परवानगी दिली आहे. यामुळे धरणाची क्षमता 200 टी एम सी होणार आहे !! कल्पना करा 517 मीटर पाणी असताना गेले 6 दिवस सांगली कोल्हापूर पाण्यात आहे. 524 मिटर उंची गाठल्यावर या परिसराचे काय होईल?

एकंदरीत हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील पाणी नियोजनाचा प्रश्न आता राहिला नसून दोन्ही राज्याच्या सरकारने एकत्र बसून आणि त्या विषयातील तज्ञ मंडळींना कामाला लावून हा प्रश्न कायमचा सोडवणे आवश्यक आहे.

टीप: वरील माहिती ही आंतर जालावरून आणि त्या विषयातील जाणकार लोकांशी बोलून एकत्र केली आहे. यात काही निखालस चूक असल्यास ते मोठ्या मनाने पोटात घालावे.

- मंदार कुलकर्णी
10 ऑगस्ट 2019

No comments:

Post a Comment