Followers

Friday, November 29, 2019

पुन्हा एकदा फासे उलटे



अखेर भाजपाने महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात खेळलेला जुगार संपला आणि ८० तासातच देवेन्द्र फडणवीस यांना परत एकदा राजीनामा सादर करावा लागला. या निमित्ताने ज्या ज्या हुशार मंडळींनी शाळेमध्ये नागरिक शास्त्र हा विषय आणि कॉलेज मध्ये संविधान हा विषय केवळ कंटाळा येतो म्हणून ऑप्शनला टाकला होता त्या सर्वांना या सर्वाचा भरपूर अभ्यास करायला मिळाला आणि बाकीच्यांचे मनोरंजनही झाले.

गेल्या ८० तासात अनेक पत्रकार, तज्ञ मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेत आपल्याला हवा तो अध्यक्ष निवडून आणणे आणि मुख्य मतदानात १४५ चा आकडा पार करणे हे दोन महत्वाचे टप्पे होते. त्यात व्हेटो, गटनेता, विधानसभा अध्यक्ष, पक्षनेता, त्यांचे अधिकार असे अनेक विषय चर्चिले गेले आणि उद्या विधानसभेत काय होणार इथपर्यंत उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु त्यापूर्वीच अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ह्या कुठल्याही गोष्टी पहायची वेळ आली नाही आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.

महाराष्ट्राच्या बाबतीत दिल्लीश्वर मंडळींचे अंदाज कायमच चुकत आले आहेत आणि या वेळी अजित पवार यांच्या सारख्या बेभरवशाच्या माणसावर संपूर्ण विश्वास ठेवून इतका मोठी कार्यवाही करायची आवश्यकता होती का, याचा विचार करायला पाहिजे. संधी आहे म्हणून त्याचा लाभ उचलणे हे प्रत्येक वेळेला योग्य असते असे नाही. धोका पत्करताना त्यातील पुढील संभाव्य धोके, भविष्यातील अडचणी आणि जनतेला सामोरे जाताना करावयाचे मुद्दे याचा विचार करायला हवा होता.

या उलट आता हे ३ पक्ष अजून शहाणपणाने, काळजीपूर्वक आणि एकजुटीने सरकार चालवणार यात शंका नाही. गेले १५ दिवस या ३ पक्षांत मुख्यमंत्री कोण, सभापती कोण, उप मुख्यमंत्री कोण, किती काळ, कोणाला किती मंत्रिपदे या वरून चर्चा कमी आणि चढाओढ जास्त असे चित्र दिसत होते. महा विकास आघाडी करताना या ३ पक्षातील प्रत्येक पक्ष स्वतः चा स्वार्थ सांभाळून उरलेले बाकी २ पक्षांना देत होता. किंबहुना त्यातूनच सुरू होणाऱ्या कुरबुरी हेच पुढील बेबनावाची सुरुवात झाली असती. पण आता ती संधी लगेच येणार नाही. कदाचित ५ वर्षे सुद्धा. अतिशयोक्ती असेल पण आजच महाविकासआघाडी अजून १५ वर्षे टिकेल असेच सध्या हे नेते बोलत आहेत.

एक मात्र नक्की, गेल्या १० महिन्यातील भाजपाच्या चुकीच्या पावलांनी पक्षाची महाराष्ट्रात होणारी पीछेहाट रोखण्यासाठी भाजपा नेतृत्वाला आणि कार्यकाऱ्यांना चांगली मशक्कत करावी लागणार आहे, हे नक्की.

-मंदार कुलकर्णी
२६ नोव्हेंबर २०१९

Saturday, November 23, 2019

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्जिकल स्ट्राईक





देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि मोदी यांनी धक्कातंत्र वापरून आज भाजपाचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणलेच. शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांना त्यांच्या पद्धतीने खेळवत ठेवून, त्यांना संपुर्ण अंधारात ठेवून ज्या पद्धतीने काल रात्रीपासून वेगवान हालचाली झाल्या त्याला तोड नाही. अगदी आज दुपारी १२ वाजेपर्यंत शरद पवार यांचाच हा डाव असून 'मी नाही त्यातली' असेच ते वागत आहेत असे पत्रकार आणि सोशल मीडियावरील तज्ञ सांगत होते.

ज्या प्रकारचे राजकारण शरद पवार यांनी गेले ५० वर्षे केले, ज्या पद्धतीने पक्ष फोडणे, पक्ष बदलणे, पक्ष श्रेष्ठींचा घात करणे हे प्रकार त्यांनी १९७८ पासून केले, तेच आज त्यांना अंगलट आले. त्यांच्याच पुतण्याने काकांच्या याच प्रकारांचा अवलंब करीत उप मुख्यमंत्री पद आज मिळवले आहे. अजित पवार यांनी योग्य केले का अयोग्य यात मी आज जाणार नाही, पण ५० वर्षांच्या या विषवल्लीने आज कडू फळेच दिली आणि ध चा मा करणाऱ्या काकांवरच डाव उलटवला. नारायणराव पेशवे यांना त्यांच्या लहान वयामुळे जे जमले नाही तेच आज अजित पवारांनी करून दाखवले.

शरद पवार यांनी आजपर्यंत कोणावरच विश्वास ठेवला नाही, अगदी त्यांच्या घरच्या लोकांवरही. Management मध्ये deligation of authority म्हणून एक महत्वाचा भाग असतो. शरद पवारांनी ते कधीच केले नाही. ना कधी आपल्या कार्यकर्ते मंडळींवर विश्वास ठेवला, ना कधी ते स्वतः विश्वासार्ह बनले. १९९८ साली विदेशी जन्माच्या मुद्यावरून काँग्रेस सोडणाऱ्या पवारांनी काही दिवसांत १० जनपथ येथे जोडे झिजवायला सुरवात केली. प्रत्येक वेळी चुकीचे काम करून पत्रकारांच्या कडून मात्र, "आपण कित्ती हुश्शार" हेच कायम मीडियात आणि वर्तमानपत्रात छापून आले. आजही महाराष्ट्रातील अनेक सुजाण मंडळी याच भ्रमात आहेत आणि पदोपदी त्याचाच उल्लेख करीत असतात. विशेष म्हणजे ठाकरे मंडळीही याला भुलली आणि होत्याचे नव्हते करून बसली.

उद्धव ठाकरे काल म्हणतात, दिल्ली भाजपा कडून इतक्या दिवसात फोन का नाही आला? मुळात उद्धव ठाकरे 'शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे' आणि 'भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे' हेच विसरले. प्रादेशिक पक्षाशी प्रादेशिक नेतेच चर्चा करणार इतका साधा कॉमन सेन्स त्यांना राहिला नाही. देवेंद्र फडणवीस यांचा फोन उद्धव ठाकरे यांनी १० दिवस घेतला नाही आणि अपेक्षा करतात मोदी शाह नी फोन करावा? अमित शाह कोणत्या परिस्थितीत मातोश्री वर फेब्रुवारीत गेले हे उद्धव ठाकरे साफ विसरले आणि आता लाचारी झाली म्हणून शरद पवार यांच्या घरी, हॉटेलमध्ये भेटीघाटी घेत राहिले. 'विनाशकाले विपरितबुद्धी' याचे उत्तम उदाहरण म्हणजे
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत.

आता पुढचे होणारे राजकारण पाहूया. अजित पवार हे वैधानिक मार्गाने राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे गटनेते निवडले गेले होते. गटनेता या नात्याने आमदारांच्या बाबतीत त्यांचा निर्णय अंतिम असतो. ते पक्षाचा व्हीप काढू शकतात. तो न मानणारे आमदार अपात्र ठरू शकतात. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर झाले आहे. त्यांना आता व्हीप जरी झाल्यास सरकारला पाठिंबा देणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे १०५ + १४ + ५५ = १७४ हे नव्या सरकारचे संख्याबळ कागदावर आहे. यात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की नवीन सरकार बनण्याच्या आधी अजित पवार यांनी वेगळा गट बनवल्याने त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. हरियाणा मध्ये खट्टर यांची हेच केले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आता कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी नवीन सरकारला बहुमतापासून रोखू शकत नाही. भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठवणाऱ्या केंद्र सरकारला आणि राज्यपालांना हे बेसिक नियम माहिती नसतील अशी सुतराम शक्यता नाही.

उद्धव ठाकरे यांचा 'युती' पासून सुरू झालेला प्रवास, 'महाशिवआघाडी' करत 'महाविकासआघाडी' पर्यंत येऊन पोचला आहे. बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या प्राण्याला जसे वाटते की मीच गाडी वाहतो आहे, त्या प्रमाणे २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेला मिळालेली सर्व मते आणि आमदार / खासदार हे माझ्याच कर्तृत्वावर मिळाले ह्या गैरसमजातून उद्धव ठाकरे कधी बाहेर आलेच नाहीत. आता ज्या पद्धतीने त्यांनी गेले ५ वर्षे वागवले आणि आता खोटे बोलून भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यावरून हा पक्ष किती वेगाने महाराष्ट्रात अस्ताला जाणार आहे हे काळच सांगेल. दिवस रात्र "आमचाच मुख्यमंत्री होणार" ही जपमाळ ओढणारे संजय राऊत आणि त्यांचे आवडते पत्रकार यांनी २४ तास तेच तेच दाखवले तरी बुद्धिबळात जो बुद्धी वापरून आक्रस्ताळेपणा न करता पावले टाकतो तोच विजयी होतो हेच यातून सिद्ध होते.

माझ्या देवेंद्र फडणवीस सरकारला ३० नोव्हेंबर साठी ही भरपूर शुभेच्छा !!!

- मंदार कुलकर्णी
२३ नोव्हे. २०१९

Tuesday, November 12, 2019

पवार - आयुष्यभर पीएम इन वेटींग



आजकाल नवीनच फॅशन झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या किंवा भारताच्या राजकारणात काहीही घटना घडली की शरद पवार त्याच्यामागे कसे आहेत आणि त्यांनीच हे कसे चतुराईने घडवून आणले आणि ते कसे सर्वांना कसे खेळवतात हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. यात निखिल वागळे पासून प्रसन्न जोशी अशा पत्रकार मंडळींपर्यंत आणि सोशल मीडियावर तयार झालेल्या नव लेखकांपासून झाडांच्या पारावर बसलेल्या काकांपर्यंत सर्वजण अथक प्रयत्न करत असतात. मुळात एखाद्या व्यक्तीबद्दल विशेषतः राजकारण्याबद्दल आपल्या मतांची पिंक टाकणे ही जगातील सर्वात सोपी गोष्ट आहे पण त्याचा नीट अभ्यास करून मत प्रदर्शन करणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे.

शरद पवार यांच्याबद्दल मतप्रदर्शन करतांना त्यांनी गेल्या ५० वर्षात लावलेले दिवे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणांत त्यांची झालेली परवड लक्षात घ्यायला हवी. १९७८ मध्ये काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद पक्षाचा मुख्यमंत्री होण्याचा प्रताप ३८ व्या वर्षी यांनीच केला होता. महाराष्ट्र्रात एकूण ४ वेळा मुख्यमंत्री झालेल्या पवारांना एकदाही ५ वर्षाची टर्म पूर्ण केली नाही. प्रत्येक वेळेला वेगळी चूल मांड, पक्षात फोडाफोडी कर हेच या माणसाने जन्मभर केले. मग ते वसंतदादा पाटील असोत किंवा यशवंतराव चव्हाण असोत. १९७८ मध्ये काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले.

१९७८ साली सोडलेली काँग्रेस त्यांनी ९ वर्षांनी परत आपलीशी केली आणि परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर १९९१ मध्ये दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि नंतर परत महाराष्ट्रात मुख्यमंत्री असा खो खो खेळत राहिले. १९९३ साली मुंबईत १२ बॉम्बस्फोट झाले आणि याच महाराजानी ते सर्व स्फोट हिंदू भागात झालेले असताना १३ वा स्फोट मुस्लिम भागात झाले असे धादांत खोटे सांगून जनतेला मूर्ख बनवले.
त्याच काळात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला.

त्यांनतर पुन्हा राष्ट्रीय राजकारणात उडी घेऊन जून इ.स. १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला. इथेच त्यांना "पीएम इम वेटींग" ही महान पदवी पत्रकारानी आणि जनतेने दिली जी अजून पर्यंत त्यांनी सार्थ केली.

१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत वाजपेयी सरकार आले आणि शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले. १९९९ साली सोनिया गांधींच्या विदेशी मुद्यावर काँग्रेस सोडणाऱ्या पवारांनी पुढे लगेच त्याच पक्षाबरोबर आघाडी केली.
जुलै इ.स. २०१०मध्ये क्रिकेटचा क ही माहीत नसताना आणि क्रिकेट ची बॅट आयुष्यात धरलेली नसताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले.

५० - ६० वर्षे राजकारणाचा अनुभव असूनही हा माणूस कधी काय बोलेल आणि नंतर पलटी मारेल सांगता येत नाही. इतक्या वर्षात केलेला प्रचंड भ्रष्टाचार, पुढच्या ५० पिढ्यांची केलेली सोय या गोष्टी करुनही अजून सत्तेची हाव काही सुटत नाही. प्रत्येक वेळेत काहीतरी वेगळे मतप्रदर्शन करून लोकांना बुचकळ्यात टाकायचे आणि नंतर मी त्यातला नाहीच असा आविर्भाव करायचा ही त्यांची खोडच आहे.

लोकांनी जाणता राजा असे म्हटले हा माणूस सुखावतो पण कार्यकाऱ्यांना मात्र कायम हिडीस फिडीस करतो. या माणसाने कधीच स्वतःची मूल्ये जपली नाहीत. आयुष्यभर केवळ जातीचे राजकारण केले. अगदी अलीकडे एका कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना पुणेरी पगडी दिली जात असताना केवळ त्याने टिळकांची आठवण होते म्हणून फुलेंचा फेटा/ मुंडासे आणून त्याला भर कार्यक्रमात "फुले पगडी" असा उल्लेख करायचा आचरटपणा त्यांनी केला होता!

७०,००० कोटी रुपये सिंचन विकास कामांवर खर्च केले असले तरी राज्यातील सिंचन क्षेत्र फक्त ०.१% ने वाढले आहे, हा सिंचन घोटाळा करून आपल्या लाडक्या पुतण्याला पाठीशी घालणारे हेच पवार. लवासा घोटाळा करूनही पवार समर्थक दमत कसे नाहीत याचेच आश्चर्य वाटते.

कॉग्रेस सोडून आपली वेगळी चुल मांडणारे पवार एकटेच नेता नाहीत. ममता बानर्जी. जगनमोहन रेड्डी असे अनेक आहेत. त्यानी आपापल्या राज्यात किती मोठा पल्ला गाठला आहे? त्याचे भान तरी पवार प्रशंसकांना आहे काय? बंगालमध्ये डाव्यांशी कॉग्रेस समर्थपणे लढत नाही, म्हणून तृणमूल या नव्या पक्षाची स्थापना ममता बानर्जींनी केली. त्यांच्याशी तरी शरद पवार यांची तुलना होऊ शकते काय? त्यांनी १९९८ सालात प्रथमच वेगळा पक्ष स्थापला आणि पवारांप्रमाणेच त्यांच्याभोवती कॉग्रेसचे कंटाळलेले कार्यकर्ते दुय्यम नेते एकत्र येत गेले. २००६ सालात त्यांनी बंगालमध्ये विरोधी पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आणि २०११ सालात त्या थेट बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांची किमया छोटी नव्हती. सलग ६ विधानसभा जिंकणार्‍या डाव्या आघाडीला कोणी पाडू शकत नसल्याचा सिद्धांत ममतांनी मोडीत काढला. एकहाती विधानसभेत बहूमत संपादन केले. २०१६ मध्ये तर त्यांनी अधिक बहूमताने विधानसभा जिंकली आणि आज बंगालमधून डावी आघाडी नामशेष होऊन गेली आहे. २००४ सालामध्ये आंध्रप्रदेशात राजशेखर रेड्डी या कॉग्रेस नेत्याने पवारांप्रमाणेच विविध पक्षांची आघाडी करून चंद्राबाबूंच्या तेलगू देसमकडून सत्ता हिसकावून घेतली आणि २००९ सालातही एकट्या कॉग्रेसच्या बळावर पुन्हा बहूमत संपादन केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचाच सुपुत्र मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून कॉग्रेसमधून बाजूला झाला आणि २०१९ पर्यंत संघर्ष करत राहिला. त्यालाही दहा वर्षात आपल्या एकट्याच्या बळावर आज आंध्रामध्ये बहूमत संपादन करता आलेले आहे. पवारांच्या तुलनेत ममता किंवा जगनमोहन ही कालची पोरे आहेत. पण त्यांच्यात जितका संयम व मुरब्बीपणा आहे, तितके पवार कायम उतावळे राहिले आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीला ९८ जागा मिळायचे कारण राहुल गांधी यांनी प्रचार न करणे आणि देवेन्द्र फडणवीस यांनी 'मी पुनः येईन' चा जप करणे हे होते पण अत्यंत चतुराईने सातारच्या पावसाच्या सभेचे फुटेज जास्तीच जास्त व्हायरल झाले आणि शिवाजीचे १३वे थेट वंशज त्या पाण्यात वाहून गेले. ५० वर्षे लोकांना येडा बनवून पेढा, मलई आणि बरच काही गिळंकृत करणाऱ्या एका नेत्याला किती फुटेज द्यायचे आणि किती डोक्यावर बसवायचे हे लोकांनी आता ठरवायला हवे.

१९८० साली ५५ आमदार आणि २०१९ साली पुन्हा ५६ आमदार निवडून आणण्याचा अर्थ काय? एकाच वर्गात मुलगा चाळिस वर्षे बसला आणि अन्य शेजारपाजारची मुले मात्र शाळा कॉलेज करून परदेशात पोहोचली. २००२ सालात निवडणूकीच्या राजकारणात उतरून बारा वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री व गेली साडेपाच वर्षे देशाचा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींची निंदानालस्ती करण्यात आपली बुद्धी खर्ची घालणारे शरद पवार मोदी यांच्या किती मागे फेकले गेले आहेत याचा जरा विचार करा.

अजाणत्या बारामतीकराचे फाजील कौतुक आता जनतेने आणि लाळघोट्या मीडियाने आता थांबवलेच पाहिजे.

मंदार कुलकर्णी
१३ नोव्हेंबर २०१९

टीप: या लेखासाठी भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉग चा नाममात्र आधार घेतला आहे, त्यामुळे त्यांचा नामनिर्देश करण्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. परंतू बाकी विचार आणि अनुभव माझेच आहेत याबद्दल निःसंशय खात्री बाळगा.


Saturday, November 2, 2019

छठपूजेचे आक्रमण



माझी शिवसेना किंवा मनसेच्या इतकी उत्तर भारतीय लोकांबद्दल आत्यंतिक मते अजिबात नाहीत. भारतीय संविधानात लिहिल्याप्रमाणे भारतात कोणीही, कुठेही आपला गाव, प्रदेश, राज्य सोडून राहू शकतो, नोकरी करू शकतो, व्यवसाय करू शकतो. सर्वांनी गुण्या गोविंदाने एकत्र नांदावे हीच माफक अपेक्षा आहे. बाहेरच्या लोकांनी येथील संस्कृती मध्ये सामील व्हावे, तेथील भाषेला आपलेसे करावे आणि इथलेच होऊन जावे.

गेल्या काही वर्षातील पुण्यातील आणि महाराष्ट्र्र प्रदेशातील एकंदर सांस्कृतिक घडामोडी पाहता बऱ्याच वेगळ्या गोष्टी घडत आहेत असे दिसते. साधारण २ - ३ दशकांपूर्वी महाराष्ट्रात फारसे पर राज्यातील लोक येत नसत. आले तरी थोडेफार गुजराथी, मारवाडी लोक.  व्यवसाय करण्यासाठी येणारे पुण्या मुंबई पर्यंत मर्यादित होते.

काही काळानंतर उत्तर भारतातील लोंढे महाराष्ट्र प्रदेशात येऊ लागले आणि त्यांनी बहुतेक प्रदेश आता काबीज केला आहे. सुरुवातीस मिळेल ते काम आणि मिळेल तिथे राहणे अशी कसरत करीत पुढे आपले भाऊ, बहीण, काका, मामा, इतर नातेवाईक त्यांनी आणायला सुरुवात केली. कारखान्यात मिळेल ते काम करत राहिले. हळूहळू सर्व किराणा भुसार दुकानात आधी नोकरी आणि आता मालक होण्याचा प्रवास अनेकांच्या लक्षात आला असेल. आधी गोड हिंदी बोलून लोकांची मने जिंकणाऱ्या या मंडळींनी घरपोच किराणा देऊन मराठी लोकांना अजूनच आळशी बनवले. हळूहळू भाजी, रोजच्या जीवनावश्यक गोष्टी सुद्धा आता कोपऱ्यावरील यांच्या दुकानात मिळू लागल्या आणि मराठी माणूस मंडई मध्ये जायचे सुद्धा विसरला.

'कितने को दिया भय्या ----' पासून चा हा प्रवास 'भाव न विचारता' आयत्या घरी वस्तू यायची आता सवय झाली. मराठी माणसाचा आळस, नाकर्तेपणा, व्यवसाय न करायची वृत्ती आणि कष्ट न करता दिवसभर मोबाईल वर टाइम पास करायचा. याच गोष्टीचा या चतुर लोकांनी फायदा घेतला.

आज हीच मंडळी किती शिरजोर झाली आहेत याची काही प्रातिनिधिक उदाहरणे:

उदाहरण १: कोपऱ्यावरील दुकानदाराकडे आजकाल जो खपेल तोच माल असतो. आपल्याला काही वेगळी वस्तू हवी असल्यास ती मिळतच नाही.

उदाहरण २: कबुतरांच्या विष्ठेतून दम्या सारखे आजार पसरतात हे सरकारनेही मान्य केले आहे, तरी सुद्धा रोज सकाळी दुकान सुरू होताना काही मुठी ज्वारी या कबूतरांसाठी टाकली जाते, रोज च्या रोज या कबुतरांची संख्या प्रचंड वाढत आहे. बाकी कशाला, महाराष्ट्र राज्याचा देव विठ्ठल मंदिर, त्या मंदिराच्या आवारातही सर्रास रोज ज्वारी कबूतरांसाठी टाकली जाते आणि मराठी माणूस काहीही करू शकत नाही. त्यांना सांगितले तर हम ऐसाही करेंगे अशी बेदरकार भाषा वापरली जाते.

उदाहरण ३: गेल्या २ दिवसापासून छठ पूजा सुरू आहे. पुण्यातील नदी काठचे रस्ते काल संध्याकाळी आणि आज सकाळी बेकायदेशीर पणे बंद केले गेले होते. आणि मराठी माणूस काहीही करू शकत नाही.

अशी बरीच उदाहरणे देता देतील. आताच या गोष्टींचा विचार नाही केला तर मराठी माणूस महाराष्ट्रातून कायमचा हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.

- मंदार कुलकर्णी
३ नोव्हेंबर २०१९