आजकाल नवीनच फॅशन झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या किंवा भारताच्या राजकारणात काहीही घटना घडली की शरद पवार त्याच्यामागे कसे आहेत आणि त्यांनीच हे कसे चतुराईने घडवून आणले आणि ते कसे सर्वांना कसे खेळवतात हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. यात निखिल वागळे पासून प्रसन्न जोशी अशा पत्रकार मंडळींपर्यंत आणि सोशल मीडियावर तयार झालेल्या नव लेखकांपासून झाडांच्या पारावर बसलेल्या काकांपर्यंत सर्वजण अथक प्रयत्न करत असतात. मुळात एखाद्या व्यक्तीबद्दल विशेषतः राजकारण्याबद्दल आपल्या मतांची पिंक टाकणे ही जगातील सर्वात सोपी गोष्ट आहे पण त्याचा नीट अभ्यास करून मत प्रदर्शन करणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे.
शरद पवार यांच्याबद्दल मतप्रदर्शन करतांना त्यांनी गेल्या ५० वर्षात लावलेले दिवे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणांत त्यांची झालेली परवड लक्षात घ्यायला हवी. १९७८ मध्ये काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद पक्षाचा मुख्यमंत्री होण्याचा प्रताप ३८ व्या वर्षी यांनीच केला होता. महाराष्ट्र्रात एकूण ४ वेळा मुख्यमंत्री झालेल्या पवारांना एकदाही ५ वर्षाची टर्म पूर्ण केली नाही. प्रत्येक वेळेला वेगळी चूल मांड, पक्षात फोडाफोडी कर हेच या माणसाने जन्मभर केले. मग ते वसंतदादा पाटील असोत किंवा यशवंतराव चव्हाण असोत. १९७८ मध्ये काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले.
१९७८ साली सोडलेली काँग्रेस त्यांनी ९ वर्षांनी परत आपलीशी केली आणि परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर १९९१ मध्ये दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि नंतर परत महाराष्ट्रात मुख्यमंत्री असा खो खो खेळत राहिले. १९९३ साली मुंबईत १२ बॉम्बस्फोट झाले आणि याच महाराजानी ते सर्व स्फोट हिंदू भागात झालेले असताना १३ वा स्फोट मुस्लिम भागात झाले असे धादांत खोटे सांगून जनतेला मूर्ख बनवले.
त्याच काळात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला.
त्यांनतर पुन्हा राष्ट्रीय राजकारणात उडी घेऊन जून इ.स. १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला. इथेच त्यांना "पीएम इम वेटींग" ही महान पदवी पत्रकारानी आणि जनतेने दिली जी अजून पर्यंत त्यांनी सार्थ केली.
१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत वाजपेयी सरकार आले आणि शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले. १९९९ साली सोनिया गांधींच्या विदेशी मुद्यावर काँग्रेस सोडणाऱ्या पवारांनी पुढे लगेच त्याच पक्षाबरोबर आघाडी केली.
जुलै इ.स. २०१०मध्ये क्रिकेटचा क ही माहीत नसताना आणि क्रिकेट ची बॅट आयुष्यात धरलेली नसताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले.
५० - ६० वर्षे राजकारणाचा अनुभव असूनही हा माणूस कधी काय बोलेल आणि नंतर पलटी मारेल सांगता येत नाही. इतक्या वर्षात केलेला प्रचंड भ्रष्टाचार, पुढच्या ५० पिढ्यांची केलेली सोय या गोष्टी करुनही अजून सत्तेची हाव काही सुटत नाही. प्रत्येक वेळेत काहीतरी वेगळे मतप्रदर्शन करून लोकांना बुचकळ्यात टाकायचे आणि नंतर मी त्यातला नाहीच असा आविर्भाव करायचा ही त्यांची खोडच आहे.
लोकांनी जाणता राजा असे म्हटले हा माणूस सुखावतो पण कार्यकाऱ्यांना मात्र कायम हिडीस फिडीस करतो. या माणसाने कधीच स्वतःची मूल्ये जपली नाहीत. आयुष्यभर केवळ जातीचे राजकारण केले. अगदी अलीकडे एका कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना पुणेरी पगडी दिली जात असताना केवळ त्याने टिळकांची आठवण होते म्हणून फुलेंचा फेटा/ मुंडासे आणून त्याला भर कार्यक्रमात "फुले पगडी" असा उल्लेख करायचा आचरटपणा त्यांनी केला होता!
७०,००० कोटी रुपये सिंचन विकास कामांवर खर्च केले असले तरी राज्यातील सिंचन क्षेत्र फक्त ०.१% ने वाढले आहे, हा सिंचन घोटाळा करून आपल्या लाडक्या पुतण्याला पाठीशी घालणारे हेच पवार. लवासा घोटाळा करूनही पवार समर्थक दमत कसे नाहीत याचेच आश्चर्य वाटते.
कॉग्रेस सोडून आपली वेगळी चुल मांडणारे पवार एकटेच नेता नाहीत. ममता बानर्जी. जगनमोहन रेड्डी असे अनेक आहेत. त्यानी आपापल्या राज्यात किती मोठा पल्ला गाठला आहे? त्याचे भान तरी पवार प्रशंसकांना आहे काय? बंगालमध्ये डाव्यांशी कॉग्रेस समर्थपणे लढत नाही, म्हणून तृणमूल या नव्या पक्षाची स्थापना ममता बानर्जींनी केली. त्यांच्याशी तरी शरद पवार यांची तुलना होऊ शकते काय? त्यांनी १९९८ सालात प्रथमच वेगळा पक्ष स्थापला आणि पवारांप्रमाणेच त्यांच्याभोवती कॉग्रेसचे कंटाळलेले कार्यकर्ते दुय्यम नेते एकत्र येत गेले. २००६ सालात त्यांनी बंगालमध्ये विरोधी पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आणि २०११ सालात त्या थेट बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांची किमया छोटी नव्हती. सलग ६ विधानसभा जिंकणार्या डाव्या आघाडीला कोणी पाडू शकत नसल्याचा सिद्धांत ममतांनी मोडीत काढला. एकहाती विधानसभेत बहूमत संपादन केले. २०१६ मध्ये तर त्यांनी अधिक बहूमताने विधानसभा जिंकली आणि आज बंगालमधून डावी आघाडी नामशेष होऊन गेली आहे. २००४ सालामध्ये आंध्रप्रदेशात राजशेखर रेड्डी या कॉग्रेस नेत्याने पवारांप्रमाणेच विविध पक्षांची आघाडी करून चंद्राबाबूंच्या तेलगू देसमकडून सत्ता हिसकावून घेतली आणि २००९ सालातही एकट्या कॉग्रेसच्या बळावर पुन्हा बहूमत संपादन केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचाच सुपुत्र मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून कॉग्रेसमधून बाजूला झाला आणि २०१९ पर्यंत संघर्ष करत राहिला. त्यालाही दहा वर्षात आपल्या एकट्याच्या बळावर आज आंध्रामध्ये बहूमत संपादन करता आलेले आहे. पवारांच्या तुलनेत ममता किंवा जगनमोहन ही कालची पोरे आहेत. पण त्यांच्यात जितका संयम व मुरब्बीपणा आहे, तितके पवार कायम उतावळे राहिले आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीला ९८ जागा मिळायचे कारण राहुल गांधी यांनी प्रचार न करणे आणि देवेन्द्र फडणवीस यांनी 'मी पुनः येईन' चा जप करणे हे होते पण अत्यंत चतुराईने सातारच्या पावसाच्या सभेचे फुटेज जास्तीच जास्त व्हायरल झाले आणि शिवाजीचे १३वे थेट वंशज त्या पाण्यात वाहून गेले. ५० वर्षे लोकांना येडा बनवून पेढा, मलई आणि बरच काही गिळंकृत करणाऱ्या एका नेत्याला किती फुटेज द्यायचे आणि किती डोक्यावर बसवायचे हे लोकांनी आता ठरवायला हवे.
१९८० साली ५५ आमदार आणि २०१९ साली पुन्हा ५६ आमदार निवडून आणण्याचा अर्थ काय? एकाच वर्गात मुलगा चाळिस वर्षे बसला आणि अन्य शेजारपाजारची मुले मात्र शाळा कॉलेज करून परदेशात पोहोचली. २००२ सालात निवडणूकीच्या राजकारणात उतरून बारा वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री व गेली साडेपाच वर्षे देशाचा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींची निंदानालस्ती करण्यात आपली बुद्धी खर्ची घालणारे शरद पवार मोदी यांच्या किती मागे फेकले गेले आहेत याचा जरा विचार करा.
अजाणत्या बारामतीकराचे फाजील कौतुक आता जनतेने आणि लाळघोट्या मीडियाने आता थांबवलेच पाहिजे.
मंदार कुलकर्णी
१३ नोव्हेंबर २०१९
टीप: या लेखासाठी भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉग चा नाममात्र आधार घेतला आहे, त्यामुळे त्यांचा नामनिर्देश करण्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. परंतू बाकी विचार आणि अनुभव माझेच आहेत याबद्दल निःसंशय खात्री बाळगा.

No comments:
Post a Comment