Followers

Wednesday, January 1, 2020

संजय राऊत - एक चुकलेले क्षेपणास्त्र

संजय राऊत - एक चुकलेले क्षेपणास्त्र

24 ऑक्टोबर ला सुरु झालेला संजय राऊत यांचा तोंडाचा पट्टा एकदम म्यान कसा झाला याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पण हा सगळा घटनाक्रम जसा दिसतो तसा नक्कीच नाहीये. राजकारणात प्रत्यक्ष घडलेल्या घटनेपेक्षा पडद्याआड काय घडले हे शोधून काढण्यातच तर खरी मजा आहे. ज्यांना राजकारण आवडते किंवा त्यात थोडीफार रुची आहे त्यांना त्यामागील रहस्य आणि घडलेल्या घटनांची योग्य रीतीने माळ जोडता आली तरच त्याचे यश.

संजय राऊत यांची बडबड ही काही महाराष्ट्र राज्याला नवीन नाही. राज्यसभेचे खासदार कमी आणि शिवसेनेचे बाईट देणारे पत्रकारांचे आवडते राजकारणी अशी त्यांची दिल्लीत जास्त ओळख आहे. त्यातून पत्रकारांना ज्या चुरचुरीत, तडका देणाऱ्या, विरोध करणाऱ्या, वाद वाढवणाऱ्या बातम्या हव्या असतात त्या अखंड पुरवण्याचे काम या संजयाने कायमच केले. स्वतः 'सामना' चे संपादक असताना केवळ बातम्या गोळा करण्यात मन रमवणारा हा माणूसच नाही. माईकच्या मागे राहण्यापेक्षा माईकच्या समोर येऊन वादग्रस्त विधाने करण्यात त्यांना नेहेमीच आनंद मिळत आला आहे.

संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत आणि तत्त्वतः शिवसेनेत क्रमांक 2 चे नेते आहेत शिवसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावरच्या माहितीनुसार ते शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. पण संजय राऊत यांच्या करिअरची सुरूवात राजकारणातून नाही तर पत्रकारितेतून झाली होती. लोकप्रभा साप्ताहिक ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतला प्रवास आहे. राऊत हे 'लोकप्रभा' या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत असत. तिथे त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या होत्या. त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचचे बाळासाहेब ठाकरेंना वाटत होते. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांना 1993 मध्ये कार्यकारी संपादक पदावर रुजू केले.

'सामना'मधले अग्रलेख हे नेहमी चर्चेचा विषय असतात. त्यामधली भाषाशैली बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी शैलीशी मिळतीजुळती आहे. बाळासाहेब नसतानाही त्याच पद्धतीचे लेखन सामनामध्ये होत असल्याचे अनेकांना आश्चर्य वाटतं. बाळासाहेब ठाकरेंची फटकेबाजी मारणारी आणि त्याचवेळा बोचकारे काढणारी अशी मार्मिक शैली होती. ती राऊत यांनी तंतोतंत आत्मसात केली. राऊत त्यांच्या शैलीशी इतके एकरूप झाले, की बाळासाहेब बोलतात तसं संजय राऊत लिहितात की राऊत लिहितात तसं बाळासाहेब बोलतात असा प्रश्न वाचकांना पडायचा. संजय राऊत यांनी बाळासाहेबांवर चांगली छाप पाडली होती. त्यांच्या कामामुळे अर्थातच बाळासाहेबांना ते आवडायचे. त्याचवेळी राऊत यांच्याकडून सामनामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेबाबत आणि शब्दांवरून अनेकदा आक्षेपही नोंदवण्यात आले आहेत. शिवसेनेविरोधात भूमिका घेणाऱ्यांवर सामनामधून अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली आहे. 'महानगर'सारखं दैनिक असो की शरद पवारांसारखे विरोधक किंवा शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे छगन भुजबळ, नारायण राणेंसारखे नेते 'सामना'मधून या सर्वांवर अतिशय अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली होती. राणेंनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचा खरपूस समाचार सामनातून घेतला जात होता. त्यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे यांनी त्यांचा उल्लेख 'शिवसेनेचे पगारी नेते' असा केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या टीकांना आपण फारसं गांभीर्यानं घेत नसल्याचं राणेंनी अनेकदा सांगितलं आहे.

संजय राऊतांनी 'सामना' वृत्तपत्र चर्चेत कसं राहील याची काळजी घेतली. आज तरूण भारत, पांचजन्य, ऑर्गनायझर किंवा पिपल्स डेमोक्रसी या इतर मुखपत्रांपेक्षाही जास्त चर्चा सामनाची होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया सामनाची दखल घेते.

संजय राऊत हे सध्या सगळीकडे शिवसेनेची भूमिका मांडत असले तरी ते कधीच लोकांमधून आलेले नेते म्हणून ओळखले गेले नाहीत. त्यांची नाशिकचा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांना संघटना बांधणीमध्ये अपयश आले. तरीही शिवसेनेनं पक्ष संघटनेत त्यांना महत्त्वाचं स्थान असल्याने राज्यसभेची खासदारकी मिळाली. अर्थात यामागे 'मातोश्री'वर त्यांना असणारा अॅक्सेस हे महत्त्वाचं कारण आहे. दुसरं म्हणजे राऊत माध्यमस्नेही आहेत. अनेकदा सामनामधून किंवा मीडियासमोर उद्धव ठाकरे जे थेट बोलू शकत नाहीत, ते संजय राऊतांच्या माध्यमातून बोलले जाते. कधी शिवसेनेची भूमिका म्हणून आणि जेव्हा पक्ष भूमिका म्हणून अडचणी चे असेल तेव्हा सामनामधून. पीकविमा, कर्जमाफी, जीएसटी, नोटबंदी यांसारख्या अनेक विषयांवर सरकारविरोधी भूमिका घेण्यात आली होती. याच कारणासाठी संजय राऊत हे पक्ष संघटनेत आपले स्थान टिकवून आहेत.

2014 मध्ये भाजपाने युती मोडून स्वतःच्या बळावर विधानसभेत 122 जागा जिंकल्या आणि अनेक वर्षांनी शिवसेनेला लहान भाऊ म्हणून वागवण्याची संधी भाजपाला प्रथमच मिळाली. आमदारांच्या धोशामुळे शिवसेना नाक घासत राज्य सरकार मध्ये सहभागी झाली. त्यावेळेस शिवसेनेची अपेक्षा होती की त्यांना उपमुख्यमंत्री पद विचारतील, कोणती खाती हवीत असेल विचारतील, निदान पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात तरी काही चांगली खाती मिळतील. पण तसे झाले नाही. शिवसेना सत्तेत उशिरा आल्याने सर्व खात्यांचे वाटप भाजपामध्ये आधीच झाले होते, त्यामुळे शिवसेनेला म्हणे कमी महत्वाची खाती मिळाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री हजेरी लावत, माना डोलवत पण 'मातोश्री' वर प्रत्येक गोष्टीची विचारणा आणि परवानगी घेतली जात नसल्याने युतीचे सरकार कागदावर असले तरी शिवसेनेने ते कधीच मानले नाही. त्यामुळे 2014 ते आजपर्यंत सामना मधून भाजपा वर फक्त जहरी टीका संजय राऊत यांनी केली. अमित शाह यांना अफजल खान पासून मोदी यांना गुजराथी म्हणून हिणावण्यात त्यांनी कायम पुढाकार घेतला.

भाजप शिवसेनेला संपवू शकते असं मानणारा शिवसेनेतील नेत्यांचा एक गट आहे. त्यामध्ये पुढाकार असलेल्यात संजय राऊतांचा समावेश होतो. 23 जानेवारी 2017 ला वरळीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवू असा ठराव मांडण्यात आला होता. हा ठराव अर्थातच संजय राऊत यांनीच मांडला होता. लोकसभेतही युती करु नये अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली होती. लोकसभेपेक्षा राज्यात लक्ष केंद्रीत करू. आपण लोकसभेत जिंकलो नाही तरी चालेल, पण आपण भाजपाचे अधिक नुकसान करू शकतो अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पण नंतर राजकीय परिस्थिती पाहून युती करण्यात आली.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 122 पेक्षा म्हणजे गेल्या वेळपेक्षा कमी जागा आल्यामुळे शिवसेनेला प्रथमच आपल्याकडे आता बार्गेनिंग पॉवर आहे हे जाणवले. पहिल्याच पत्रकार परिषदेत 'आमचे सर्व पर्याय मोकळे आहेत' हे वाक्य उद्धवच्या तोंडी घालण्यात राऊत यशस्वी झाले आणि पुढचा 1 महिना पत्रकारांना रोज खाद्य पुरवायची संपूर्ण जबाबदारी राऊत यांनी स्वतःकडे घेतली. 'मी बाळासाहेब ठाकरे यांना दिला आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यात बसवीन' या वाक्यातच संजय राऊत यांना स्वतः मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडायला लागली. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून स्वतः मात्र कोणतेही मोठे पद घेणार नाहीत याची त्यांना खात्री होती. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधानसभा गटनेते असले तरी त्यांची एकंदरीत राजकारणावरील पकड, बोलायची हातोटी आणि त्यांची फडणवीस यांची असलेली जवळीक यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही याचीही राऊत यांना खात्री होती. आता राहिला प्रश्न युवराज आदित्य राजांचा. पण त्यांचे वय केवळ 29 वर्षे असल्याने पुढचे काही वर्षे तरी तो मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही हे ओळखून आदित्य ठाकरेच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयानंतरही त्यांनी त्याला अनुकूल अशी भूमिका घेतली.

भाजपा ने घातलेली ताठर भूमिका आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद न देण्याच्या निर्णयामुळे राऊत यांनी चवताळून जाऊन थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी बोलणी चालू केली अर्थात स्वतः मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठीच. राऊत किंवा उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन सोनियाकडे हांजी हांजी करण्यात कमीपणा असल्याने शरद पवार यांना मध्ये घालायचे त्यांनी ठरवले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या नेत्यांमधील कमालीचे मतभेद उघड होत असताना राऊत मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री (म्हणजे स्वतःच) या एकाच अजेंड्यावर अडून बसले आणि त्यासाठी वाट्टेल त्या गोष्टींची तिलांजली द्यायला तयार झाले. शरद पवार यांना समजायला 100 जन्म लागतील अशी वाक्ये फेकून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला पण इथेही संधीचा फायदा शरद पवार यांनी घेतला. उद्धव नको नको म्हणत असताना ही पवार यांनी त्यांना आदेश वजा 'मुख्यमंत्री' होण्याची आज्ञा दिली आणि उद्धव सर्वच बाजूने अडचणीत सापडल्याने त्यांना होकार द्यावा लागला आणि संजय राऊत यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले. उद्धवला मुख्यमंत्री करून राऊत यांचा काटा पवार यांनी काढलाच पण महाराष्ट्र राज्याच्या रिमोट कंट्रोल जो एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे 1995 ते 2000 होता, तो अलगद स्वतःकडे घेतला. किंबहुना त्यानंतर च्या सर्व बैठकीत राऊत यांना दिल्लीला राज्यसभेला हजेरी लावायला पाठवून सर्व निर्णय पवार यांनी स्वतः उद्धव बरोबर घेतले. मग ते खातेवाटप असो किंवा उप मुख्यमंत्री पद मिळवणे असो.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राऊत यांनी यांच्या भावाला सुनील राऊत यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले होते. आता मुख्यमंत्रीपद पवार यांच्यामुळे गेले निदान भावाला महाराष्ट्र मंत्रिमंडळ मध्ये स्थान मिळेल याची राऊत यांना खात्री होती पण तेथेही फासे उलटे पडले आणि हाती काही लागले नाही. आता हे स्वतः उद्धवनी केले का यातही शरद पवार यांचा हात आहे हे कळायला मार्ग नाही.

संजय राऊत मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीला गैरहजर राहिल्याने नाराज असल्याची चर्चा जोरदार रंगली. सुनील राऊत आमदारकीचा राजीनामा देणार इथपर्यंत चर्चा झाली. राजकारण हे किती क्रूर आहे याची संजय राऊत यांना आता कल्पना आली असेल. त्यामुळेच त्यांची मुलूखमैदान तोफ सध्या त्यांनी खिळा मारून बंद केली आहे.

संजय राऊत यांना कुठलाही जनाधार नसल्याने त्यांना मागील दाराने राज्यसभेत स्थान मिळाले आहे. भविष्यात शिवसेनेने गमावलेला जनाधार आणि त्यामुळे त्यांच्या घटणाऱ्या जागा याचा फटका शिवसेनेला नक्कीच बसणार आहे. त्यामुळे पुढील टर्म साठी राज्यसभेची खासदारकी नाही मिळाली तर संजय राऊत यांना केवळ 'सामना' मध्ये खर्डेघाशी करण्याशिवाय काही काम राहणार नाही हे नक्की.

- @मंदार कुलकर्णी
1 जानेवारी 2020

1 comment:

  1. असंच घडावं ही तर श्रींची इच्छा !

    ReplyDelete