नोटबंदी आणि 2016 साल हे खऱ्या अर्थाने बऱ्याच बदलांची नांदी आहे असे म्हणता येईल. सुरुवातीला सर्वांनाच एक किंवा दोन हजार रुपये बँकेच्या आपल्याच खात्यातून मिळण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले होते आणि मीही त्या त्रासाचा एक भाग होतो. हळूहळू नवीन नोटा मिळायला लागल्या पण त्याचबरोबर ऑनलाइन wallet आली आणि ती वापरायला अनेकांनी अनिच्छेने का होईना वापरायला सुरुवात केली. काहीजण पेटीएम किंवा तत्सम wallet वापरायचे आणि त्यात जर आपल्याला कोणी पैसे पाठवले तर विनासायास आणि विनाखर्च आपल्या बँकेच्या खात्यात एका क्षणात पाठवता येत असत.
डिजिटल पेमेंट ची ही खऱ्या अर्थाने भारतात कुठेतरी सुरुवात होती. अनेक मंडळींनी सुरुवातीला याला प्रचंड विरोध केला. नगद पैसेच हवे, 500 रुपये च्या वर असेल तर wallet किंवा कार्ड घेऊ असा माज अनेक दुकानदारांनी केला. कुठलाही बदल हा माणसाला नको असतो, मग तो रोजच्या कामात असेल किंवा व्यवहारात असेल. डिजिटल पेमेंट साठी या विविध कंपन्यांनी अनेक क्लुप्त्या शोधून काढल्या. पैसे wallet मध्ये भरले तर 10% कॅश बॅक पासून अनेक. एकाने दुसऱ्याला रिफर केले तर इतका कॅश बॅक आणि अनेक...
आज डिजिटल पेमेंट ची काय परिस्थिती आहे? या लेखाबरोबर मी दोन फोटो जोडले आहेत. पहिल्या फोटोत एक भाजीवाला हातगाडीवर भाजी विकतो त्या हातगाडीचा आहे. बारकाईने पाहिलात तर तोही ऑनलाइन wallet किंवा गुगल पे ने पैसे स्वीकारतो! दुसऱ्या फोटोत तर तुम्हाला कदाचित काहीच दिसणार नाही. आमच्या घराच्या कोपऱ्यावर एक मावशी रोज पेरू विकतात. एक छोटेसे लाकडी बॉक्स आणि त्यावर पेरुची टोपली. त्या सुद्धा गुगल पे पैसे स्वीकारतात! ह्या दोनही व्यक्ती अजिबात खळखळ न करता डिजिटल पेमेंट अगदी मनापासून सपोर्ट करतात.
भारताच्या प्रगती साठी डिजिटल पेमेंट किती फायदेशीर आहे हे या गरीब, अशिक्षित मंडळींना कळले पण आपल्याला आणि विशेषतः दुकानदार मंडळींना कधी समजणार?
मंदार कुलकर्णी
29 डिसेंबर 2019
29 डिसेंबर 2019


No comments:
Post a Comment