Followers

Sunday, February 24, 2019

रा-ज ज-रा ....

स्थळ: अभिनव चौक, नळ स्टॉप, पुणे
वेळ: संध्याकाळी 6 वाजता
दिवस: प्रचंड गर्दीचा
अभिनव चौकातील गर्दी आज तर अशक्यच होती. लॉ कॉलेज रॉड बालभारती पर्यंत भरलेला, कर्वे रोड पौड फाट्यापर्यंत भरलेला, सिग्नल चालू असूनही काही बसेस घुसल्याने ट्राफिक पूर्ण जॅम. कुठल्याच वाहनाला इंच भरही पुढे जाता येईना अशी परिस्थिती. चौकातले पोलीस ही हतबल कारण प्रत्येकाला घरी जायची घाई आणि आपले वाहन पुढे नेण्याची इच्छा. जवळच्या शाळाही सुटलेल्या त्यामुळे शाळेच्या व्हॅन आणि बसची क्षणाक्षणाला पडणारी भर.
इतक्यात लॉ कॉलेज रोडवर गर्दीमध्ये काही लोकांच्या लक्षात येते की शेजारच्या 2 गाड्यांमध्ये अनुक्रमे बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे आहेत. काळ्या काचेतून त्यांचा चेहरा दिसतोय का याची लोकांना उत्सुकता. काहींना चेहरा दिसला तर काहीजण "हो हो म्हणजे काय, पाहिलं ना", असं उगाच शेजारच्याला सांगत आहेत! बहुतेक अशा गर्दीची आणि न हलणाऱ्या वाहनांची सवय नसावी त्यांना. त्या गाडीचा चालक विनाकारण हॉर्न वाजवून "माझ्या बापाचा रस्ता आहे, सरका बाजूला" असा आविर्भाव दाखवत होता. जणू काय सर्वांच्या वरून उडुनच याला जायला मिळणार आहे.
इतक्यात दोघा तिघांच्या लक्षात आले की त्या गाडीच्या चालकांनी सीट बेल्ट लावलेला नाही. त्यांनी गर्दीतून चालत थोडे पुढे जाऊन चौकातील पोलिसाला ही गोष्ट सांगितली. जसे बाकीच्या जनतेला नियम लावून दंड वसुली करतात तशी या गाड्यांना करायची विनंती करतात. आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहत ती मंडळी उभी राहिली.
साधारण 15 मिनिटांनी त्या गाड्या अभिनव चौकात पोहोचल्या. चौकातील पोलिसांनी मोठ्या तत्परतेने ट्रॅफिक कंट्रोल करायचे सोडून गाडीपाशी जात त्यांना एकदम कडक सलाम ठोकला. पुढच्या काही सेकंदात दोन्ही गाड्या त्यांच्या वाटेने दिसेनाशा झाल्या...


- मंदार कुलकर्णी

No comments:

Post a Comment