Followers

Wednesday, February 20, 2019

शाह मोदींची हुकुमशाही

शाह मोदींची हुकुमशाही

- मंदार कुलकर्णी
19 फेब्रु 2019

कालच्या माझ्या युतीच्या लेखाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींच्या म्हणण्यानुसार मोदीनी फार लांबचा विचार करून हे केले, शिवसेनेचा काहीच फायदा झाला नाही वगैरे वगैरे.

मुळात 2009 आणि 2014 पेक्षा आज काय गोष्टी बदलल्या हे आधी नीट तपासायला हवे. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपा ने लढवल्या 24 जागांपैकी 23 जिंकल्या. 2009 पेक्षा त्या 9 ने जास्त होत्या. शिवसेनेने 20 पैकी 18 जागा जिंकल्या म्हणजे प्रतिशत मध्ये भाजपापेक्षा जरा कमीच. शिवाय त्या 18 जागा जिंकण्यात ठाकरेपेक्षा मोदी करिश्माच होता हे कोणीही मान्य करेल. याचाच अर्थ भाजपा ने 2009 ते 2014 पक्ष संघटना महाराष्ट्रात वाढवली आणि मोदींनी त्यांच्या ताकदीवर आणि सभांमुळे कळस केला आणि महाराष्ट्र सर केला.

2014 च्या विधानसभा निवड  णुकीत शिवसेना 151 जागांसाठी अडून राहिली आणि भाजपा 144 प्रत्येकी असे वारंवार सांगत असूनही सेनेने त्यांचेच घोडे दामले, तडजोड झाली नाही आणि त्यामुळे युती तुटली. स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय भाजपाने घेतला. हा निर्णय एकनाथ खडसे आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आणि दिल्लीकरांनी त्याला मम म्हटले. हा निर्णय जितका महत्वाचा होता तितकाच धोकादायकही होता. आतापर्यंत भाजपाने महाराष्ट्रात कधीही स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या नव्हत्या. कायम शिवसेनेला बरोबर घेऊन, मोठा भाऊ असे गोंजारून आणि त्याहीपेक्षा बाळासाहेबांच्या आणि प्रमोद महाजन यांच्या काळात कायम पडती बाजू घेऊन भाजपा पुढे जात राहिली. याचे महत्वाचे कारण संघटना म्हणून संघ गावागावात पोहोचला असला तरी भाजपा संघटना म्हणून तोवर तेथे पोहोचली नव्हती. भाजपाने कायम उत्तर भारत हा आपला मुख्य इलाखा मानून तेथेच जास्त लक्ष केंद्रित केले होते. 2014 मध्ये काही प्रमाणात भाजपा जुगारच खेळला होता. मोदींच्या करिष्म्यावर लोकसभेत 48 पैकी 42 जागा जिंकता येत असतील तर विधानसभेमध्ये प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? पण हा एवढाच विचार नसावा. आपली पक्ष संघटना कुठवर पोहोचली याची परीक्षा घेण्याची या पेक्षा चांगली संधी आणि वातावरण भाजपाला या पूर्वी कधी मिळाली नव्हते. हा सगळा विचार करून कोणाचेही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून नाव पुढे न करता किंवा घोषित करता भाजपा निवडणुकांना सामोरा गेला आणि 260 पैकी 122 जागा जिंकल्या. शिवसेनेनें 282 पैकी फक्त 63 जागा जिंकल्या. भाजपा ला 14.7 लाख मते (31%) तर सेनेला 10.2 लाख मते (19%) मिळाली. याचा अर्थ सेनेपेक्षा जवळ जवळ 4.5 लाख जास्त मते मिळाली. याचे मुख्य कारण भाजपा चा तोवर महाराष्ट्रात झालेला प्रसार हेच आहे. जेव्हा भाजपा सेनेत निवड करायची वेळ आली तेव्हा मोठ्या संख्येने भाजपा च्या पारड्यात लोकांनी मते दिली आणि सेनेला भाजपा पेक्षा निम्या जागा दिल्या. 2009 च्या विधानसभेतही भाजपा ला सेनेपेक्षा जास्त जागा होत्या. 2009 च्या 46 जागांवरून 122 ही हनुमान उडी भाजपा मारली ती फक्त मोदी करिष्म्यावर नव्हे. 2009 आणि 2014 मध्ये दोन्ही निवडणुकात जास्त जागा भाजपा ने जिंकल्यावर कोण मोठा आणि कोण छोटा हे चर्चा करायची गरज नाही.

गेल्या 4.5 वर्षातील फडणवीस यांचा कारभार आणि त्याच काळात सेनेने केलेले वेडे चाळे आणि आक्रस्ताळेपणा आपण पाहिला. खिशात राजीनामे घेऊन फिरणारे आमदार मंत्रिमंडळ बैठकीत मात्र माना डोलवायचे. गेली 25 वर्षे सेनेनी केलेली हेटाई, अपमान भाजपा विसरणे शक्यच नव्हते. त्यामुळे साहजिकच त्याची भरपाई 2014 नंतर निघणार हे सांगायला भविष्यवेत्याची गरज नाही.

मूळ मुद्दा हा आहे की शिवसेना स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने कुऱ्हाड मारून घेत असताना त्यांना त्यापासून परावृत्त करायची गरज काय? संघटना म्हणून सेना लोकांच्या मनातून उतरलेली त्याला संजीवन मंत्र घालून म्हणजेच युती करून परत जिवंत का केले?

दिल्लीतील राजकारण आणि राज्यातील राजकारण या गोष्टी वेगळ्या असताना हाय कमांड असे निर्णय कसे घेऊ शकते? आज जर युती केली नसती तरी भाजपा ला गेल्या वेळपेक्षा पुष्कळ जास्त जागा स्वबळावर मिळू शकत होत्या. आता जागावाटपात भाजपा मध्ये बंडखोरी झाली (जी होणारच आहे) ती कोण निस्तरणार? एक साधे उदाहरण घेऊ.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 8 जागा भाजपा ने सेना आणि दोन्ही काँग्रेस ला हरवून जिंकल्या होत्या. नव्या फॉरमूल्याप्रमाणे 8 पैकी 4 जागा सेनेला जाणार. मग 8 विद्यमान आमदार मंडळींपैकी कोण आपल्या जागेची तिलांजली देणार? गिरीश बापट का मेधा कुलकर्णी का माधुरी मिसळ? दिल्लीतून फतवा काढणे वेगळे आणि प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी वेगळी आहे.

अजून एक उदाहरण घेऊ. लोकसभेसाठी 23 विद्यमान खासदार परत उभे राहण्यासाठी निश्चित उत्सुक असणार, म्हणजे नवीन उमेदवारांसाठी राहिल्या मात्र 2 जागा. का बंडखोरी होणार नाही? यात झाले तर फक्त भाजपाचेच नुकसान होणार आहे. आणि दुर्दैवाने भाजपा ला विधानसभा निवडणुकीत सेनेपेक्षा 1 जरी जागा कमी मिळाली तर भाजपाची इतकी वाईट अवस्था सेना करेल याचा विचार न केलेलाच बरा.

अफजलखान आणि चौकीदार चोर है असे हिणवणाऱ्या ठाकरे ना माफ करणे हाच भाजपाचा राजनैतिक पराभव आहे. स्थानिक राजकारणाचा अभ्यास न करता केवळ लाखो कार्यकर्त्यांची इच्छा अशी वाक्ये फेकून या विषयाची बोळवण करणे हाच शुद्ध वेडेपणा आहे. फार लांबच्या भविष्याचा विचार करताना आज काय वाढून ठेवले आहे हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या जीवावर ही मंडळी आज उड्या मारत आहेत त्यांना विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने दिल्लीतून निर्णय लादायची सवय जर मोदी शाह यांनी नाही बदलली तर दिवस फिरायला वेळ लागणार नाही. नंतर मतदारांना दोष देण्यापेक्षा हिमालयात जाऊन दोघांना आत्म चिंतन करायची वेळ येईल हे त्यांनी लक्षात ठेवावे.

*शेवटचे आणि अत्यंत महत्वाचे: हा लेख एका मोदीभक्ताने आणि संपूर्ण भाजपा समर्थक असलेल्या सोशल मीडियावरील कार्यकर्त्याने लिहिला आहे हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.

No comments:

Post a Comment