गांधीहत्या का झाली?
- © मंदार कुलकर्णी
3 फेब्रुवारी 2019
3 फेब्रुवारी 2019
टीप: हा लेख मी माझ्या अनेक वर्षांच्या वाचनातून आणि अनेक संदर्भ घेऊन लिहिला आहे. ज्यांना वाचून झाल्यावर मते पटली नाहीत तर त्याचा राग माझ्यावर काढू नये. लोकशाही मध्ये व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर विचार स्वातंत्र्यही आहे. पटले नाही तर सोडून द्या, आवडले तर अवश्य चर्चा करा आणि आणि बाकीच्यांच्या ज्ञानात भर घाला....
दरवर्षी 30 जानेवारी जवळ की गांधी हत्या, नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मनसोक्त शिव्या घालणे हे ठरलेले विषय पेपर मध्ये, सोशल मीडिया वर यथेच्छ चघळले जातात आणि दुसऱ्या दिवशी सारी मंडळी हा विषय विसरून आपापल्या कामात व्यग्र होतात. मुळात लोकांना आणि विशेषतः काँग्रेस च्या नेत्यांना त्या दिवशी आपला मुद्दा रेटून नेणे एवढेच करायचे असते. काय योग्य, काय अयोग्य त्याहीपेक्षा मी कसा गांधीवादी आहे हे सिद्ध करायचे असते.
मुळात गांधी हत्या करणारा कोणी अतिरेकी किंवा माथेफिरू नव्हता, त्याचे पूर्वज अतिरेकी नव्हते, त्याचे पूर्वज काश्मिरी विस्थापित नव्हते, सरकारने त्याच्यावर कर्ज माफी न देऊन अन्याय केला नव्हता मग का बरे त्यांना असे पाऊल उचलावे लागले असेल?
1920 साली लोकमान्य टिळक यांचे निधन झाले आणि खऱ्या अर्थाने एक मोठ्या देशव्यापी नेत्याची पोकळी निर्माण झाली होती. हीच संधी महात्मा गांधी यांनी साधली आणि नेहरू आणि अनेक त्याच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून टिळकांच्या बरोबर उलटी चळवळ त्यांनी सुरू केली. लोकमान्य टिळकांना आपण 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणतो मग त्यांची चळवळ शांतीच्या मार्गाने पुढे नेणारे गांधीजी कसे हे गणित काही केल्या पटत नाही. त्यात गांधींनी दोन्ही महायुद्धात इंग्रजांना भारतीय लोक सैनिक पाठवून भरघोस मदत केली. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी अगदी सहज थांबवता येणे शक्य असताना ही गांधींनी त्यांना फाशी जाऊ दिले. इंग्रजांची अस्सल कागदपत्रे हे सांगतात.
चापेकर बंधू, मदललाल धिंग्रा, वासुदेव बळवंत फडके, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव अशा असंख्य क्रांतिकारकांच्या कार्याची दखल गांधींनी घेतलेले दिसत नाही. मधल्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सारखे अनेक मोठे नेते त्यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे वेगळी वाट धरून पुढे गेले. सावरकर आणि अनेक अंदमानात खितपत पडत असलेल्या भारतीय क्रांतिकारकांना सोडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले? जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यावरही इंग्रजांना प्रेमाने चुचकरण्यात हेच पुढे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेची 55000 ची फौज घेऊन सिंगापूर हून भारताकडे येत असताना गांधीजी यांनी त्यांना काय मदत केली? एकेकाळी अखंड स्वतंत्र भारताच्या गोष्टी बोलणारे गांधीजी जिनांबरोबर पाकिस्तान वेगळा करायला तयार झाले तेव्हा त्यांनी किती भारतीयांशी चर्चा केली?
फाळणीच्या सुमारास ज्या विक्षिप्त पध्दतीने गांधी वागत होते, अत्याचाराच्या खुणा घेऊन परागंदा लोकांना ज्या हीन पद्धतीने वागणूक मिळत होती त्यावर कडी म्हणून ५५ कोटींचा आहेर देण्यासाठी उपोषणाला बसणारे गांधी सर्व देशाच्या मनातून पार उतरत होते. त्याचवेळी जर गोडसे थांबले असते ते हे महात्मा जोखड जनतेनेच फेकून दिले असते.
स्वातंत्र्य मिळाल्यावर झालेल्या जातीय दंगली थांबवण्यात गांधीजीना सपशेल अपयश आले. हजारो शीख लोकांचे झालेले शिरकाण, त्यांचे जबरदस्तीने केले धर्मांतर या गोष्टी गांधीजीनी का थांबवल्या नाहीत? त्या काळात त्याची सारी वक्तव्ये ही वरवर हिंदू मुस्लिम शांतता करायला लावणारी असली तरी ती केवळ पाकिस्तान आणि त्यातही दोन्हीकडील मुस्लिम जनतेच्या बाजूची होती.
जानेवारी 1948 मध्ये उपोषणाला बसताना त्यांनी घातलेल्या सात अटी हे त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे. 7 व्या अटी वरून तर असे वाटते की महात्मा म्हणवुन घेण्यासाठी गांधी हे हिंदूंचे वाटेल तेवढं नुकसान करून घ्यायला तयार होते अश्या माणसाला महात्मा का म्हणावं हे कळत नाही.
लाहोर, गुजरानवाला, इस्लामाबाद पासून रावळपिंडी पर्यंतचा भाग शीख बहुल असताना पाकिस्तानला कोणत्या अधिकारात देण्यात आला? जर ही सीमारेषा इंग्रजांनी आखली असेल तर गांधीजीनी काहीच विरोध का नाही केला? लाहोर ते अमृतसर अंतर केवळ 58 किमी आहे. ही दोन गावे दोन देशात वर्ग होत असताना आपल्या शीख बांधवांना काय दुःख झाले याची कल्पना आपण करू शकतो. फाळणीनंतर जातीने पाकिस्तान सीमेवर थांबायचे सोडून गांधीजी कलकत्ता येथे जाऊन मौन घेऊन बसले. फाळणीनंतर पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदू आणि शीख बांधवांची योग्य सोय पहायची सोडून भारतातील मुस्लिमांचे लाड करण्यात त्यांनी धन्यता मानली.
गांधीजी हे कायम 'हम करे सो कायदा' या पद्धतीने शेवट पर्यंत वागत राहिले. आपल्या मनासारखे झाले नाही की कर उपोषण. अगदी स्पष्ट सांगायचं तर स्वातंत्र्यानंतर गांधीजी सरकार बाहेरील एक स्वतंत्र सत्ता केंद्र निर्माण झाले होते. स्वतंत्र भारताला नवीन पंतप्रधान, गृह मंत्री, परराष्ट्र मंत्री असताना गांधीजी उठसूट कधीही उपोषणाला बसत आणि आपल्याला हवे तेच साध्य करीत.
अशा गांधीजींनी पुढील काळात आपली प्रजासत्ताक पद्धती खुंटीला टांगून स्वतःची अशी वेगळ्या प्रकारची हुकूमशाही चालवली असती तर? लोकशाही मध्ये सर्वांचे म्हणणे ऐकून बहुमताने निर्णय घ्यायचे असताना स्वतःच्या मर्जीतले नेहरू त्यांनी पंतप्रधानपदी सरदार पटेल यांना डावलून बसवलेच ना? अशा पद्धतीने गांधीजींनी उपोषणाच्या जोरावर पुढील काळात अनेक देशविरोधी निर्णय देशावर लादले असते तर देशाची काय अवस्था झाली असती? सावरकरांपासून आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक त्यांचे समर्थक नव्हते. त्यांना खड्यासारखे बाजूला करून आपल्या मर्जीतली माणसे पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. अशीच जर त्यांची हुकूमशाही या पुढे चालू राहिली असती तर या भारत देशाची पुन्हा हजार शकले व्ह्यायला वेळ लागला नसता.
आज सरदार पटेल यांनी एकहाती सर्व संस्थानिकांशी बोलून ही सारी संस्थाने भारतात विलीन केली ती काय गांधी नेहरू यांच्या हातचे काम होते? हैदराबाद संस्थानाचा पाडाव हा काय गांधीजींच्या उपोषणाने झाला असता? पुढे झालेली पाकिस्तान विरुद्धची युद्धे काय दुसरा गाल पुढे करून जिंकता आली असती?
गांधीजींनी केलेलीे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी केलेली उपोषणे हा वादाचा विषय असताना ते स्वातंत्र्यानंतर तशाच पद्धतीने चालू ठेवणे हे देशविरोधी होते. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता गांधीहत्या आज ना उद्या होणारच होती. नथुराम गोडसे यांनी पहिला नंबर लावला इतकेच. या संदर्भात गोपाळ गोडसे यांचे 'गांधीहत्या आणि मी' हे पुस्तक त्रयस्थ भावनेतून अवश्य वाचावे.
No comments:
Post a Comment