गेले दीड महिने महाराष्ट्र्र राज्यातील सत्ता स्थापनेचा खेळ खंडोबा आपण पाहिला. ३ पक्षांची मोट बांधून सरकारचा गाडा वाहून नेणारे 'स्थगिती' मुख्यमंत्रीही या राज्याने पाहिले. आजपर्यंत ६ मंत्र्यांनी शिवतीर्थ येथे शपथ घेऊनही १३ दिवस खातेवाटप न झालेले हे भारतातील पहिलेच राज्य असेल. केवळ आढावा बैठकी घेऊन राज्य चालवता येते असे वाटत असेल तर या अनुनभावी मुख्यमंत्री महोदयांची अक्षरशः कीव करावीशी वाटते आहे. या सर्व धामधुमीत एक शब्दसमूह कायम मीडिया ने दुर्लक्षित केला आणि अजूनही त्यातला गर्भितार्थ त्यांना आणि अनुषंगाने वाचकांना कळला नाही असे दिसते आहे. तो शब्द समूह म्हणजे, "हीच ती वेळ !!!"
हा शब्द समूहाचा प्रयोग २०१९ मध्ये सर्वप्रथम कोणी केला तर तो म्हणजे शिवसेनेने. त्यातही तो बातमीसाठी वापरणारे ३च लोक, उद्धव, आदित्य आणि संजय राऊत. सुरुवातीला सर्व साधारण वाटणारा हा शब्द समूह थोडासा ऐकिवात आला तो विधानसभा निवडणुकीत जागा वाटप झाल्यानंतर. आणि परत वापरला गेला तो आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर. तसे त्यांनी ट्विट च केले होते.
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जेव्हा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस मातोश्री वर वडा पाव खायला गेले होते आणि त्यांच्यात जी चर्चा झाली त्यानुसार लोकसभेच्या जागा वाटपानंतर विधानसभेसाठी सुद्धा समसमान जागावाटप ठरले होते. लोकसभेत मिळालेल्या अफाट यशामुळे भाजपाने हे विधानसभेचे गणित अमान्य केले आणि जास्त जागांची मागणी शिवसेनेकडे करायला सुरुवात केली. चंद्रकांत पाटील यांना चर्चेला पाठवून आमची थोडी गरज आहे, असे गोड बोलून भाजपा + मित्रपक्ष १६१ आणि शिवसेना ११७ असे प्राथमिक जागावाटप कोणतीही पत्रकार परिषद न घेता भाजपा ने उरकून टाकले आणि तेही विधानसभेचा उमेदवारीचा अर्ज भरायला काही दिवस बाकी असताना. आणि इथेच शिवसेनेने त्यांची चाल चालायचे ठरवले. आणि त्यांनी म्हटले, हीच ती वेळ !!!
या नंतरच्या शिवसेनेच्या सर्व हालचाली या गुपचूप पण भाजपा च्या विरोधात आणि संपूर्ण युतीधर्म न पाळणाऱ्या होत्या. अनेक ठिकाणी विशेषतः कोकणात भाजपा उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केले. युती झाल्यावर जी पक्षात बंडखोरी झाली, त्यात ही भाजपाने जेथे शिवसेनेचा उमेदवार उभा होता तेथे प्रयत्न पूर्वक बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला. पण याच्या अगदी विरुद्ध चाल शिवसेनेने केली. बंडखोरांना प्रोत्साहन तर दिलेच पण जेथे बंडखोरी नव्हती तेथे राष्ट्रवादी च्या उमेदवारांना उघड उघड पाठींबा दिला.
एका बाजूला नावापुरत्या मोदी यांच्या बरोबर संयुक्त सभा ठाकरे यांनी केल्या पण पाठीमागे वेगळीच चाल खेळणे चालू होते. बाकी कशाला, काही ठिकाणी तर हे इतके उघडपणे चालू होते की नागपूर च्या एका सभेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने निवडणुकीनंतर सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार बनवणार हे जाहीर सभेत सांगून टाकले !!
शिवसेनेच्या कुरापती इथे थांबल्या नाहीत. अमित शाह आणि मोदी यांनी अनेक सभात महायुतीचा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच बनणार हे सांगताना ठाकरे आणि मंडळी पद्धतशीरपणे मूग गिळून बसली आणि बरोबर निकालाच्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबरला संपूर्ण निकाल लागायच्या आधीच पत्रकार परिषद घेऊन "आमचे सगळे पर्याय मोकळे आहेत..." असे सांगून "हीच ती वेळ..." सिद्ध करायला सुरुवात केली. त्यांनंतर रोज संजय राऊत यांच्या तोंडून शिवसेनेचा मुख्यमंत्री हा जप पत्रकारांसमोर करून आपला हेतू यथेच्छ रेटून नेण्यास सुरुवात केली.
यावर कळस म्हणजे भाजपा महाराष्ट्र चे प्रमुख आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन घेणेच ठाकरे यांनी बंद केले, त्यांचा निरोप घेणे बंद केले. आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली असे जगाला दाखवले. वास्तविक त्यांचे हे आधीच ठरले होते पण लोकांच्या समोर लगेच गोष्टी केल्या तर डोळ्यात येईल या भीतीने जवळजवळ १ महिना काढला. सोनिया गांधी यांच्या दारात कसे जायचे म्हणून शरद पवार यांना मध्ये घातले.
यात एकच गोष्ट झाली. "हीच ती वेळ !!!" च्या नादात शिवसेना राष्ट्रवादी च्या जाळ्यात अडकत गेली. आतापर्यंत सगळेजण मातोश्री वर भेटायला यायचे पण ठाकरे यांना सिल्वर ओक, ट्रायडंत हॉटेल येथे जाऊन शरद पवार यांच्याशी चर्चा करायला लागली. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे मंडळ राज्यपालांकडे १ तास बसलेले असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना पाठींब्याचे पत्र दिलेच नाही. इतके होऊनही शिवसेनेला आपल्या बाबतीत काय होत आहे याची कल्पना येत नव्हती आणि मुख्यमंत्री पदाच्या जाज्वल्य इच्छेपोटी बाकी अनेक बाबींना तिलांजली द्यायला त्यांनी सुरुवात केली. लक्षात घ्या, मुख्यमंत्री शपथविधीला ना सोनिया गांधी आल्या ना राहुल गांधी.
सत्तास्थापनेचा उन्माद आणि संजय राऊत याच्या सारखे बेलगाम अस्त्र याच्या जोरावर अनेक तडजोडी करत अखेर शिवसेनेने मुख्यमंत्री पद मिळवले आणि लाचारीचा एक नवीन अध्याय सुरू झाला. युतीधर्म न पाळता युतीला निर्विवाद बहुमत असताना विरोधकांशी आघाडी करून मुख्यमंत्री पद बळकवणारे या देशातील ठाकरे हे पहिले 'स्थगिती' मुख्यमंत्री आहेत. निवडणूक आयोग अशा प्रकारच्या वागणुकीला भविष्यात नक्की पायबंद घालेल अशी आपण अपेक्षा करूया...
- ©️ मंदार कुलकर्णी
११ डिसेंबर २०१९
११ डिसेंबर २०१९
No comments:
Post a Comment