आठवणीतील गाव - पळस्पे
माझा पेपरमध्ये आलेला लेख आवडला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 🙏🏻 बऱ्याच जणांनी हा लेख लहान करून पेपरमध्ये छापला असावा अशी शंका व्यक्त केली. हो, मटा ने तसेच केले आहे. त्यासाठी मूळ लेख जसा आहे तसा आपल्याला पाठवत आहे... सवड झाल्यावर तोही वाचवा... 🙏🏻🙏🏻
_______________________________________
चार दशकांच्या सुगंधित आठवणी
आठवणीतील गाव - पळस्पे
आठवणीतील गाव - पळस्पे
आमच्या अख्ख्या खानदानात १९८० पूर्वी कोणी पळस्पे हा शब्द ऐकले नव्हते. माझ्या वडिलांची बदली पनवेलला झाली आणि पळस्पे येथे राहणे आपल्याला परवडेल असा विचार करून त्यांनी राजेंच्या वाड्यात २ खोल्यात संसार थाटला.
खरे तर बाबांना पनवेलमधे हवे तसे भाड्याने घर मिळाले नाही खूप शोधले तरी. मग कोणीतरी पळस्प्याचा पत्ता सांगितला. बहुसंख्य नोकरी व्यवसायानिमित्त पनवेलला आलेली मंडळी राहण्यासाठी पळस्पे गाठायची. पनवेल पळस्पे अंतर ३ किमी आणि पळस्पे तसे खेडेगाव. हा प्रवास सगळी मंडळी सायकलने करायची. पनवेल नाही म्हटले तर शहर आणि तालुक्याचे गाव. तिथून थेट मुंबईला बस सुटायच्या. पनवेल मुंबईत ५० किमी अंतर असले तर तरी मुंबईचे वारे तेव्हा पनवेलला लागले नव्हते. आपली स्वतंत्र गावाची ओळख ते राखून होतं. कुलाबा जिल्ल्याचा सर्व सरकारी कारभार अलिबाग मधून चालत असला तरी बरीच सरकारी कार्यालये पनवेलला असायची. त्यामुळेही या गावाला वेगळे महत्व होते. मुंबईहुन पुण्याचा राष्ट्रीय महामार्ग पनवेल वरूनच जायचा आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तर पनवेलच्या जवळ सुरू व्ह्यायचा आणि ते ठिकाण म्हणजे पळस्पे फाटा. पाहुण्यांना, नातेवाईक मंडळींना या गावाची ओळख अशा रीतीने आम्ही सांगायचो.
त्याकाळी वाहतुकीची आणि प्रवासाची मुबलक साधने नसल्याने बहुतेक वेळेस पुणे किंवा अहमदनगर येथून येणारी पाहुणे मंडळी पळस्पे फाटा येथे बसमधून उतरून सरळ चालत आमचे घर गाठायची. थोडी पायपीट व्हायची पण पनवेलला उतरून परत बस बदलून पळस्पे गाठायचे म्हणजे जरा अवघडच. त्यात गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुळात वाहने कमी. पेण, अलिबाग, श्रीवर्धन अशी कुठलीतरी बस पकडून पळस्पे आले की वाहकाला विनंती करून पटकन उतरून घ्यायचे. लांब पल्याच्या बसचे चालक पळस्पे येथे बस काही क्षण थांबवायलाही राजी नसायचे कारण त्यांचा पहिला थांबा असायचा पेण. पळस्पे गावची अजून ओळख म्हणजे बस थांब्यापाशी असलेला जुना वड. कमीत कमी दोनशे वर्षे उभा असलेला हा वृक्ष या गावच्या १९ आणि २० व्या शतकातील सर्व घटनांचा उभा साक्षीदार आहे.
माझ्यासाठी पळस्पे हे कायम आदर्श गावच होते. तर अशा अत्यंत लहान खेडेगावात माझी लहानपणची ४ वर्षे गेली. काही शे लोकांची वस्ती, अगदी टिपिकल वाडा संस्कृती असलेले हे गाव. गावात बऱ्याचशा घरात त्याकाळी ही वीज पोहोचली नव्हती. गावातुन एक छोटीशी नदी वाहत होती. नदीच्या काठी एक शंकराचे मंदिर आणि एक विष्णूचे मंदिर, बाजूला एक हनुमानाची मूर्ती ही गदा घेऊन उभी होती. गावात पिकणाऱ्या गोष्टी दोनच. एक भात आणि दुसरा आंबा. बाकी सर्व गोष्टी शहरातून आणाव्या लागायच्या अगदी रोजचे वर्तमानपत्र सुद्धा मुंबईहून बसने पनवेलला आणि पनवेलहून सायकलवर इकडे यायचे आणि मग घरोघरी पोहोचायचे.
पळस्पे हे कोकणातील गाव असल्याने भरपूर पाऊस आणि मुख्य पीक भात. आम्ही शाळेतली मुले भातलावणीच्या काळात शाळेतून रीतसर परवानगी काढून शेतावर मदत करायला जायचो. आमच्यासाठी हा मजेचा भाग असला तरी ज्यांची शेती होती त्यांना मात्र प्रचंड कष्ट उपसायला लागायचे. पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे हस्त नक्षत्र लागले की शेताची नांगरणी, थोडा पाऊस झाला की भाताची पेरणी शेताच्या एका विशिष्ट अंगाला करायची, मग भरपूर पासून झाला की तेथील रोपे काढून परत लावणी करायची. पीक तयार झाल्यावर कापणी, झोडपणी, खुरपणी आणि अनेक कामे. कणगीमध्ये भात सुरक्षित भरून ठेवेपर्यंत कोणाला उसंत नसायची. गावात आंबा भरपूर पण तो रत्नागिरी हापूसच्या शर्यतीत फारसा यायचा नाही. त्यामुळे आलेला आंबा शहरात विकून चार पैसे गाठीशी आणायची वृत्ती. धो धो पावसातही राहणीमानात अजिबात बदल व्हायचा नाही.
पळस्पे गावात प्राथमिक शाळा १५० वर्षांपासून होती हेही एक आश्चर्यच म्हणावे लागेल आणि विशेष म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके याच शाळेत शिकले. त्यांचे गाव शिरढोण इथून जवळच. पूर्वी शाळा एका वाड्यातच भरायची. १० वी नंतरचे शिक्षण घ्यायला मात्र पनवेल गाठावे लागायचे. १ ली पासून आम्हीही गांधी टोपी घालून "अबकड" चा प्रवास आणि ५ वी नंतर चा प्रवास I am 'a' Gopal' असा केला आहे.
गावात त्याकाळी ही ब्राह्मण मंडळींची बरीच घरे होती आणि विशेष म्हणजे सर्व मंडळी म्हणजे अगदी कातकरी समाजातील लोकही अगदी गुण्यागोविंदाने येथे नांदत होती. हायवेवरील गाव असल्याने रात्रीच्या वेळेस ट्रक आणि मोठी वाहने जोर जोरात जायची. सतत हायवे वर अपघात व्हायचे आणि पळस्प्यातली जनता मदतीला धावायची. आम्हा मुलांना तर रात्रीच काय दिवसा सुद्धा हाय वे वरून चालायची भीती वाटायची.
१९८३ साली आम्ही टीव्ही घेतला तेव्हा अख्खा गाव आमच्या घरी टीव्ही पाहायला लोटायचे. त्याकाळी आजच्यासारखे केबल टीव्ही किंवा डिश टीव्ही तर नव्हतेच पण नंतरच्या काळात आलेली दूरदर्शनची लघुशक्ती केंद्रे ही नव्हती. त्यामुळे टीव्ही पाहण्यासाठी उंच छतावर मोठ्ठा अँटेना मुंबई दूरदर्शन केंद्राचे सिग्नल मिळवण्यासाठी लावावा लागायचा. चित्रहार, छायागीत आणि रविवार संध्याकाळी हिंदी चित्रपट लागायचा. तो पाहायला साधारण १०० लोक आमच्या घराच्या पुढच्या खोलीत आणि दारात बस्तान बांधून बसायची. सरपंचाच्या घरीही टीव्ही होता पण तिथे लोक जायला घाबरायची. आमच्याकडे तसा काही प्रश्न नव्हता. कृष्ण धवल चित्र ही सगळी मंडळी गोड मानून पहायची.
पावसाळ्यात जरी भरपूर पाऊस असला तरी बाकी ८ महिने पाण्याचे फारच दुर्भिक्ष असायचे. मी आणि माझ्या आईने मैलोनमैल चालत जाऊन खोल विहिरीचे पाणी भरून आणलेले मला चांगले आठवते. कातकरी मंडळी तर फारच गरीब. कर्नाळा किल्याच्या जंगलातील लाकूडफाटा तोडून, त्याची मोळी करून आम्हाला बंबात जाळायला घेऊन इतक्या लांब चालत येत असत आणि त्यांना कसेबसे ५ रुपये किंवा १० रुपये मिळायचे. गावातील मंडळीही काही श्रीमंत नव्हती. पनवेल पर्यंत चा प्रवास रिक्षा परवडत नसल्याने चालत किंवा सायकलनेच करावा लागायचा. आमच्या घरी वीज असली तरी गावातील बहुतेक घरात रात्री अंधारच असायचा. छोट्या चिमण्या, बावटा असेच कायम दिसायचे. गावातील बहुसंख्य मुले याच मिणमिणत्या उजेडात अभ्यास करीत असत. त्याकाळी मला नेहेमी प्रश्न पडायचा, माझ्या घरी वीज आहे मग यांच्याकडे कशी नाही? याचे उत्तर तेव्हा नाही समजले पण आता त्याचे उत्तर मिळते. अत्यंत गरीबी खूप जवळून पहायला मिळाली.
पळस्पे गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कर्नाळा किल्ल्याचा लाभलेला शेजार. शिरढोणच्या थोडं पुढे गेले की कर्नाळा किल्याचा पायथा लागायचा. तेथे एक पक्षी अभयारण्य ही बनवण्यात आले होते. जटायू हा पक्षी सर्व प्रथम तिथेच पाहिला. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका झाल्यावर जे किल्ले स्वतः जातीने जिंकले होते त्यात कर्नाळा किल्याचा समावेश होता, त्यामुळे आम्हाला त्याचे जास्त कौतुक. त्यात कर्नाळा किल्याचा वरचा सुळका तेथील पंचक्रोशीतून कुठूनही अगदी सहज दिसायचा आणि आम्हाला तर तो शंकराची पिंडच वाटायचा. आमच्याकडे आलेल्या सगळ्या नातेवाईक मंडळींना कर्नाळा आणि शिरढोण ची सहल आम्ही अगदी उत्साहाने करायचो.
पळस्पे येथे आमचे शेजारीही चांगला होता. वटपौर्णिमा, हरतालिका, गणपती, दसरा, दिवाळी, कोजागिरी असे अनेक सण आम्ही एकत्र साजरे करायचो. अडी अडचणीत, आजारपणात याच लोकांनी आम्हाला जिवाभावाची साथ दिली. या गावात लहानपणी मित्रांसोबत कैऱ्या पाडण्यात अनेक उन्हाळे घालवले आहेत.
पळस्पे गावच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नुकतीच मी तेथे एक दिवसाची सहल केली आणि लक्षात आले की आपले गाव आता पार बदलून गेले आहे. लहानपणी खूप लांब वाटणाऱ्या गोष्टी आणि अंतरे आज मला अगदी छोटी वाटायला लागली आहेत. लहानपणीच्या माझ्या छोट्या पायांनी तुडवलेल्या वाटा मला त्यावेळच्या आठवणी तर सांगत होत्याच पण काळाप्रमाणे झालेला बदलही मला जाणवत होता.
मुंबई गोवा हायवेचे रुंदीकरण गेले अनेक दिवस चालू आहे त्यात तो प्रसिद्ध वड कापला गेला आणि तिथे आता एक मोठ्ठा फ्लाय ओव्हर झाला आहे. त्यामुळे अलिबाग गोव्याकडे जाणारी वाहने पळस्पे टाळून कधी निघून जातात तेच कळत नाही. १९८९ साली "जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट" सुरू झाल्यावर या परिसरातील भूगोल पूर्ण बदलून गेला आहे. पळस्पे फाटा येथून JNPT ला संपूर्ण नवीन रस्ता झाल्यामुळे या भागातील वाहतूक अनेक पटींनी वाढली आहे. त्या अनुषंगाने लागणारे कंटेनर आणि त्यांची ठेवायची जागा कंटेनर यार्ड यांनी हा पूर्ण परिसर व्यापून गेला आहे. पूर्वीची भातशेती जाऊन तेथे अवाढव्य आकाराचे कंटेनर दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन मोठमोठ्या ऑटो कंपन्यांना भाडे तत्वावर दिली आहे. एकंदरीत शेतजमीन दिवसेंदिवस कमी कमी होत गेली आहे.
अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वीचे बहुसंख्य वाडे आता जमीनदोस्त झाले आहेत आणि त्याची जागा सिमेंटच्या जंगलाने घेतली आहे. पण हे करताना त्यात नियोजनाचा संपूर्ण अभाव आहे. जिथे जशी मिळेल तशी जमीन घरे बांधून संपवली आहे. वर उल्लेख केलेल्या मंदिरांच्या पाशी एक शिवकालीन बाव (विहीर) आहे. मी लहानपणी उगाचच हुंदडायला जायचे ते एक ठिकाण होते. आज अख्या गावाचे गटार त्या विहिरीत जोडले आहे... त्यामुळे त्याच्या जवळपास ही जाणे आता अशक्य झाले आहे.
शाळेची नवीन इमारत झाली आहे पण माझ्याशी म्हणावा तसा त्याचा कनेक्ट नाही झाला. गावात जी काही थोडी फार जुनी मंडळी उरली आहेत त्यांना भेटून फार छान वाटले. जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. तांदळाची भाकरी, भाताचा तो सुगंध परत एकदा मला ४० वर्ष मागे घेऊन गेला भाताच्या शेतात.
आज मुंबईची हद्द पनवेलच्या पुढे गेल्याचे सगळ्याच परिसराचे वारेमाप शहरीकरण झाले आहे. "नवी मुंबई" हे गोड आणि गोंडस नाव घेऊन उधळलेला वारू मुंबईच्या पश्चिमेला केवळ समुद्र असल्याने जाऊ शकला नाही. ओघानेच त्याने पूर्वेची बाजू धरली आणि त्याच्या लाटेत भली भली पळस्पे सारखी गावे वाहून गेली. पळस्पे फाटा हे केवळ एक तिठा न राहता मुंबई JNPT कडे जाणाऱ्या वाहनांना वाट करून देणारा एक मोठ्ठा चौक बनला आहे. एकावर एक फ्लाय ओव्हर, चालू असलेले काम आणि बाजूलाच मुंबई पद्धतीने उभारण्यात आलेल्या गगनचुंबी इमारती. काय खरं आणि काय खोटं? विचार करताना मती गुंग होते. पूर्वी पनवेलहुन मुंबईला आणि ठाण्याला दर तासाला एक बस सुरू झाली तेव्हा आम्हाला केवढे कौतुक वाटले होते. आज मुंबईने पनवेल आणि पळस्पेच गिळंकृत करून टाकले आहे.
लवकरच होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पामुळे हा सर्वच परीसर परत एकदा ढवळून निघत आहे. "नवी मुंबई" तसे "नवीन पनवेल" ही आपल्या कक्षा रुंदावत आहे. मला भीती आहे की शहरीकरणाच्या या लाटेत काही वर्षांनी पनवेल, पळस्पे, शिरढोण, तळोजा, कोलखे, डेरवली, अजीवली अशी असंख्य गावे आपली स्वतःची ओळख गमावून बसतील की काय अशी भीती वाटू लागली आहे. खोपोलीपाशी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाचा जाहिरातीतील पत्ता "न्यू पनवेल" पाहून तर ही भीती जास्तच गडद बनली आहे. लोणावळा तळेगावपाशी तर जाहिरातदारांनी नवीनच शब्द शोधला आहे तो म्हणजे "पुम्बई". पुणे आणि मुंबई यातील अंतर शहरीकरणातून नाहीसे करणारे त्यांच्या मनातले भविष्यकालीन ठिकाण म्हणजे 'पुम्बई'.
आज पळस्पे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांनी जमिनी एकतर विकल्या आहेत किंवा भाड्याने देऊन आपले भविष्य सुनिश्चित केले आहे पण हे करताना आपल्या गावाची ओळख हळूहळू यातून पुसली जात आहे हे कधी त्यांच्या लक्षात येणार? माझ्या मनातील पळस्पे आजही पूर्वीचेच पळस्पे आहे पण येणाऱ्या पिढ्यांनी आपला पत्ता सांगताना पळस्पे सांगायचा की "न्यू पनवेल" की "न्यू मुंबई" सांगायचा याचा विचार करायची वेळ आता आली आहे.
© मंदार कुलकर्णी
१५ डिसेंबर २०१९
१५ डिसेंबर २०१९



No comments:
Post a Comment