मी गेले 6 वर्षे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यासक आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून आपण ज्या पद्धतीने सरकार सांभाळले आणि काम केले त्याबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आजही आपण जे यश मिळाले त्याला आपणच जबाबदार आहात. पण काही मुद्दे आपणास निदर्शनास आणून द्यायलाच हवेत म्हणून हा लेख प्रपंच.
पुढील निर्णय हे चुकीचेच होते...
१. शिवसेनेला धाकटा भाऊ म्हणून सिद्ध करताना इतर पक्षातील लोक विनाकारण भाजपावासी करून घेणे
२. तिकीट वाटप करताना स्थानिक भाजपा नेत्यांना विश्वासात न घेणे
३. पक्ष वाढवताना कोणत्याही प्रकारची तडजोड करणे
४. लोकसभेच्या निवडणुकीआधी मातोश्री ची अमित शाह यांना पायधूळ झाडून 50-50 चा अतर्क्य फॉर्म्युला मान्य करणे आणि चुकीच्या जागा मान्य करणे
५. भाजपा ला 240 पर्यंत जागा मिळतील असा खोटा आत्मविश्वास धरणे आणि वेगवेगळ्या सभात सांगणे
६. चंद्रकांत पाटील यांच्यावर अती विश्वास ठेवून नको असलेली माणसे भाजपा मध्ये घेणे
७. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला अत्यंत कमी लेखणे
८. राणे आणि मंडळींना कोणत्याही लॉजिक शिवाय भाजपा मध्ये घेणे
९. बंडखोरी कमी व्हावी म्हणून अगदी शेवटच्या क्षणी जागा जाहीर करणे आणि त्याही दिल्ली वरून यादी आणून
१०. एकनाथ खडसे आणि त्यांच्या सारख्या असंख्य जेष्ठ नेत्यांना अडगळीत टाकून त्यांचे करियर संपवणे.
तुमच्या हेही लक्षात आलं असेल की तुमच्याच काही भाषणामुळे आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 100 जागा मिळाल्या आहेत. तसेच शिवसेना आता 50- 50 % आणि मुख्यमंत्री पद याला अडून बसली आहे. मग तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद मान्य करणार का? 2.5 वर्षांनी तुम्ही दिल्लीला निघून जाल मग काय महाराष्ट्र आदित्य आणि उद्धव वर सोडून जाणार आहात काय?
प्लॅन बी म्हणून तुम्ही चंद्रकांत पाटील यांना कोथरूडची सेफ जागा दिली पण खरंच जेव्हा तुमची महाराष्ट्र राज्याच्या गरज आहे आणि तुम्ही चांगलं काम करायची आवश्यकता आहे, तेव्हा परत तुम्ही अस्थिरता निर्माण करणार आहात?
गेली 5 वर्षे तुम्हाला नीट कारभार करता आला नाही हे माहीत आहे, पण आता ती संधी आहे, ती तुम्ही चांगली साधाल अशी मला आशा आहे.
अजून एक मुद्दा. स्थानिक राजकारणाचा अभ्यास न करता केवळ "लाखो कार्यकर्त्यांची इच्छा" अशी वाक्ये फेकून या विषयाची बोळवण करणे हाच शुद्ध वेडेपणा आहे. फार लांबच्या भविष्याचा विचार करताना आज काय वाढून ठेवले आहे हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या जीवावर ही मंडळी आज उड्या मारत आहेत त्यांना विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने दिल्लीतून निर्णय लादायची सवय जर मोदी शाह यांनी नाही बदलली तर दिवस फिरायला वेळ लागणार नाही. नंतर मतदारांना दोष देण्यापेक्षा हिमालयात जाऊन दोघांना आत्म चिंतन करायची वेळ येईल हे त्यांनी लक्षात ठेवावे.
हे जर बदलले नाही तर आजच सांगतो, 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपा येणार नाही.
टीप: माझे सगळे अंदाज मी आधी माझ्या ब्लॉग वर आणि सोशल मीडियावर लिहिलेले असतात आणि आतापर्यंत ते कधीच चुकलेले नाहीत.
- मंदार कुलकर्णी
24 ऑक्टोबर 2019

No comments:
Post a Comment