आमचा सौरभदा अर्थात प्रिन्स ऑफ कोलकाता अचानक चर्चेत आला तो BCCI चा होणारा अध्यक्ष म्हणून आणि मला परत एकदा इतिहासात जायला भाग पाडले.
मुळात भारतीय क्रिकेट म्हटले की आमची पिढी सुनील गावस्कर, कपिल देव आणि सचिन तेंडुलकर याच्या पुढे जात नाही. धोनी, कोहली यांना आम्ही आता तरुण पिढीचे धरतो! मरगळलेल्या भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचे काम कोणी केले असेल तर ते सौरभने. 1995 पर्यंत भारतीय क्रिकेटवीर कसोटी क्रिकेट खेळायचे ते सामना अनिर्णित राखण्यासाठी ना की जिंकण्यासाठी. पतोडीच्या पर्यंत भारतीय संघातील खेळाडू गुलामगीरीच्या ओझ्याखाली एवढे दबलेले असायचे की गोरा खेळाडू खेळायला आला की सवयीने सर सर करायचे.वाडेकरने ही सवय बदलली आणि सौरभ ने "अरे ला कारे" म्हणायला शिकवले.
1983 च्या वल्ड कप ही अनेक खेळाडू अमेरिकेला सहलीला निघाले होते त्यात लंडन चा एक स्टॉप होता हे स्वतः श्रीकांतने एका मुलाखतीत मोकळेपणाने सांगितले होते. त्यानंतर त्यांनी वल्ड जिंकला हा भाग वेगळा पण मुळात भारतीय खेळाडू कायम बॅकफूट वर असायचे. आधी वेस्ट इंडिज आणि नंतर ऑस्ट्रेलिया संघाने क्रिकेट वर अधिराज्य गाजवले ते 20 वे शतक संपेपर्यंत. भारतीय क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने विजयाची सवय लावली ती सौरभच्या संघाने. मुळूमुळू खेळत सामना हरण्यापेक्षा लढून किंबहुना बंडखोरी केल्याशिवाय पुढे जाता येत नाही हेच दादाने शिकवले.
याची सुरुवात 1992 साली सौरभ पहिल्यांदा भारतीय कसोटी संघात आला तेव्हा झाली. ड्रेसिंग रूम मधून ग्राऊंडवरच्या खेळाडूंसाठी पाणी नेण्याचे काम त्याला जेव्हा लादण्यात आले तेव्हा सौरभने "मी इथे क्रिकेट खेळायला आलो आहे, पाणक्या म्हणून नाही." त्यानंतर त्याला तातडीने भारतीय संघातून डच्चू देण्यात आला. पण हळू हळू त्याने पुन्हा संघात स्थान मिळवले. सौरभ ने भारतीय संघाला देशात आणि परदेशात जिंकायची सवय लावली.
2000 च्या आसपास भारतीय संघ match fixing मध्ये अडकला असताना संघाची फारच वाताहत झाली होती. सचिनने कप्तान पद सोडले आणि या परिस्थितीत सर्व जबाबदारी सौरभवर येऊन पडली. आहे त्या परिस्थितीला सामोरे जात त्याने चांगली संघ बांधणी केली आणि म्हणता म्हणता 2003 च्या वल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघ पोहोचला. सौरभ आणि भारतीय संघाचे दुर्दैव की भारताला पराभव पत्करावा लागला. 1983 नंतर खऱ्या अर्थाने बनलेला चांगला संघ थोडक्यात हरला आणि आपला जीव हळहळला.
सचिन, राहुल, लक्ष्मण आणि सेहेवाग या सर्व खेळाडूंची कारकीर्द घडली ते सौरभ च्या काळातच. पण मला सौरभचा अभिमान वाटतो तो त्याने लोर्ड्स वर सामना जिंकल्यावर टीशर्ट काढून साजरा केला तो जल्लोष. त्याच्यावर यथेच्च टीकाही तेव्हा झाली पण हेच टीकाकार लोक जेव्हा हे कृत्य फ्लीनटोफ ने मुंबईत वानखेडे मैदानावर केले तेव्हा मूग गिळून बसले होते. मी जेव्हा लोर्ड्स पाहायला गेलो होतो तेव्हा 'त्या' गॅलरीत जाऊन ही घटना आठवणीत ठेवून आमच्या गाईडला विचारली होती. तेव्हा तो जरा नाराज झाला होता पण इंग्रजांच्या भूमीत, इंग्रजांच्या पंढरीत असा बदला घ्यावा तो सौरभनेच. त्यानंतर आजपर्यंत असले कृत्य कोणाही परदेशी खेळाडूने करायचे धारिष्ट्य दाखवले नाही हे लक्षात घ्यावे. ही लिंक पहा... https://youtu.be/
चॅपल ने दादागिरी करून संघात फूट पाडली नसती तर सौरभला आणखीन यश मिळाले असते.
आज आपण धोनीला सर्वात यशस्वी कप्तान म्हणतो पण त्याच्या यशस्वीतेची बीजे ही सौरभच्या कारकिर्दीत सापडतात. सौरभने ऑफ साईडला मारलेले खणखणीत फटके पहाणे म्हणजे केवळ सुख. त्याच्याच जोरावर 1 डे मध्ये 10000 धावांचा पल्ला त्याने ओलांडला.
आज सौरभ ची निवड BCCI च्या अध्यक्षपदासाठी झाली आणि खूपच भारी वाटले. पण तो जेमतेम 10 महीने म्हणजे साधारण 1 वर्षच आहे . त्यामुळे त्याने घेतलेले निर्णय अमलात येतील का नाही हे माहीत नाही. 47 व्या सुरू केलेली ही नवीन batting तो चांगलीच करेल याची खात्री आहे, त्याला या लेखातून आपण शुभेच्छा देऊया..
- मंदार कुलकर्णी
20 ऑक्टोबर 2019

No comments:
Post a Comment