Followers

Friday, October 4, 2019

देवघरातील टाक



देवघरात देवांच्या मूर्ती असतात तसे देवांचे टाकही असतात. बऱ्याच जणांना विचारूनही या बद्दल फारशी माहिती मिळत नव्हती. अनादी काळापासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवतांमधील कुलदैवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्वपूर्ण आहे. या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली असावी. दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात.

देवघरातील टाक या गोष्टीचे मला कायम आश्चर्य आणि उत्सुकता होती. पण देवाची मूर्ती असताना या टाकाची गरज काय? याचे उत्तर असे की पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने नव्हती. आपल्या प्रदेशात असणारा देव आणि देवता हे अनुक्रमे कुलदैवत आणि कुलदेवता असायचे. पण दरवेळेस इतक्या लांब चालत जाऊन त्यांचे दर्शन घेणे त्या काळी अशक्य होते. निर्गुण पूजा हा पूजेतील पुढचा टप्पा असल्याने सामान्य लोकांना डोळ्यासमोर कुलदैवत कसे आणायचे हा मोठा प्रश्न होता. त्यावर उपाय म्हणजे टाक. म्हणजे आजच्या काळातील फोटो. फोटोग्राफीची शोध जरी विदेशात लागला असला तरी आपले पूर्वज खूप हुशार होते. चांदीच्या पत्र्यावर नुसता 2डी फोटो न काढता 3डी चित्र करून त्यांनी टाक बनवले!! कुलदैवतांचे टाक धातूपासुन बनलेले असतात. चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते. पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे.आज जसे फोटोच्या रक्षणासाठी आपण फोटोला फ्रेम करतो तशीच तांब्याची पाठ किंवा फ्रेम ही त्या काळपासून लावायची पद्दत आपल्याकडे आहे.

त्या टाकाकडे पाहून आपल्या डोळ्यासमोर खऱ्या मूर्तीचे रुप येते. रोजच्या पूजेत टाक असल्याने कुलदेवतेची उपासना करणे सहज शक्य होते. चांदी आणि तांबे हे सुपर कंडक्टर ऑफ हिट आणि वीज त्यामुळे निसर्गातून पडणाऱ्या विजेपासून ही आपले संरक्षण होते. चांदी पांढरी शुभ्र असल्याने त्यावर केलेला उठाव किंवा 3 डी काम हे एकदम उठून दिसते. किती विचार केला आहे पहा पूर्वजांनी !!!

तसेच देवघराचा विचार हा मुख्यतः कुलदेवतांची पूजा इतक्यातच मर्यादित असावा. सर्वांनाच देवाची किंवा देवीची मूर्ती बनवणे (जशीच्या तशी) हे बनवणे शक्य नसेल किंवा तसे परवडत ही नसेल.
हाच विचार डोक्यात ठेवून कुलदेवतेच्या मंदिरापाशी किंवा गावात देवांचे टाक बनवणे हा व्यवसाय सुरू झाला असेल. देवाची मूर्ती धातूंत बनवणे अवघड त्यामानाने टाक बनवणे सोपे हा त्या मागचा विचार असेल. शिवाय वजनाला हलके, कुठे घेऊन जायला ही सोपे.

टाकाची पूजा करताना ही काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगून ठेवले आहे त्यामुळे टाक चांगले टिकतील.
# देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत , गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात,ओला गंध लावू नये. कारण त्यावर डाग पडू शकतात.
# दही, दुध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पुजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकट पण पुर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत.
# सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा. अथवा टूथपेष्ट व मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा.
# देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाचे टाकान पासुन दूर लावावा, त्याचा तेलकटपणा टाकान वर चढणार नाही याची दक्षता घ्यावी.
# टाक हाताळताना त्यांचे असलेल्या कोनावर टाक खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. टाक कोनावरखाली पडल्याने त्याचे किनारीची पक्कड सैल होऊ शकते.

एवढे करूनही टाक खराब झाला किंवा भंगला तर नवीन बनवायची सोय आहेच की. जेजुरीच्या मंदिराजवळ अशा अनेक पिढ्या टाक बनवायचे काम करतात. टाक बनवून झाल्यावर मुख्य देवतेला दाखवून विधिवत पूजा करून मग ते घरी नेऊन देवघरात बसवतात. एक प्रकारे घरातील देवांचे चार्जिंग जणू किंवा एनर्जी ट्रान्सफर !! हा सगळा अभ्यास केल्यावर थक्क व्हायला होते.

यात बाकीच्या देवांच्या टाकाची भर नंतरच्या काळात झाली असावी. देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी तीन, पाच, सात, नऊ, अकरा अश्या वेगवगळ्या संखेत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते हा कदाचित संख्या वाढवण्याचा प्रकार असू शकतो.

कालानुरूप त्यात वाढ होत गेली आणि कुलस्वामी, कुलस्वामिनी बरोबर क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष, इत्यादी दैवतांचा समावेश झाला. कुटुंबाचे कुळाचे मुळ ठिकाण, जात, कुळ, इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो, त्या मुळे प्रत्येकाची कुलदैवते बदललेली असतात.

खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वच घरामध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सातीआसरा, अश्या कितीतरी विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळा मधून कुलदैवता मध्ये दिसतात, जोतीबा, रवळनाथ, वीर, बापदेव, अशी अनेक पुरुष दैवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात, तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानी ओळखली जातात, काही परिवारा मध्ये पूर्वज यांची ही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते, तर काही भागात चेडा, वेताळ, मुंज्या,अशी वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते.

या टाकांचे अजून एक वैशिष्टय म्हणजे कालानुरूप त्यात होत गेलेले बदल. दोन उदाहरणे विस्ताराने सांगून हे समजेल. देवळामध्ये खंडोबा एकटा असला तरी टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे. पती-पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास ह्यात वृद्धी करणारी ही देवता आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला जातो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्व हेच आहे. पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो. खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतिक म्हणून या टाकात दिसतो. पती-पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याच्या यामागील उद्देश असावा.

जानाई (योगेश्वरी अथवा जोगेश्वरी) देवीचाही टाक आहे. जानाई ही भैरवनाथाची पत्नी. जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. ह्या देवीचे नीट निरीक्षण केले असता, एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पिक दिसते. म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मुल दिसते आहे. म्हणजे पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते. सोबत एक पशु दर्शविला आहे. म्हणजे दूधदुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत. म्हणजे तुमचे संसार भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना ह्या देवीकडे केली जाते. थोडक्यात ग्राम किवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाईदेवी आहे.

तर अशा ही देवांची टाकाची माहिती इतरांपर्यंत पोहोचावी हा या लेखाचा उद्देश. हुशार लोकांनी 3डी चे पेटंट आपल्या भारतीयांना या निमित्ताने मिळण्यासाठी अवश्य प्रयत्न करावेत !!!
स्रोत: आंतर जाल

मंदार कुलकर्णी
१० नोव्हेंबर २०१८

1 comment:

  1. म्हसवड येथील आमचे कुलदैवत श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यांचे चांदीचे टाक कुठे विकत मिळतील

    ReplyDelete