आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे आणि 24 तारखेला कोणता पक्ष बहुमत मिळवणार, युती का आघाडी आणि कोण मुख्यमंत्री ह्याची उत्तरे मिळतील. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता युतीला पूर्ण बहुमत मिळेल हे नक्की असले तरी कोणाला किती जागा हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची त्यांनी युती करताना भाजपा च्या लढवायच्या जागा जास्त पदरात पाडून पक्की केली असली तरी युतीला नक्की किती जागा हे अंदाज बांधणे सोपे नाही. स्वतः फडणवीस निवडणूक प्रचार करताना 220 ते 240 जागा मिळतील असा अंदाज मांडला आहे. बरेचसे पत्रकार अगदी भाऊ तोरसेकर यांनी ही 240 च्या पुढेच युतीला नेऊन ठेवले आहे.
अमित शाह आणि भाजपा ची सारी यंत्रणा अगदी बूथ लेव्हल पर्यंत काम करून त्यांचे अंदाज बांधतात. मुळात बहुतेक जणांनी लोकसभेत मिळालेल्या जागा आणि मतांची टक्केवारी याचा अभ्यास करून वरील अंदाज बांधले आहेत. पण अशा पद्धतीने मांडलेले अंदाज हे स्थानिक परिस्थिती आणि बदलणारी गणिते यांनी पूर्ण चुकीचे ठरू शकतात. उदा द्यायचे तर एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघ असे असले तरी तेथील लोकसभेची जागा जिंकली म्हणजे सर्व 6 विधानसभेच्या जागा जिंकल्या असा अर्थ होत नाही. लोकसभेत साधारण 10 ते 12 लाख मतदान होते तर विधानसभेच्या एका जागेसाठी अंदाजे 2 लाख मतदान होते. त्यातही जितके जास्त पक्ष किंवा उमेदवार जास्त तेवढी मतविभागणी जास्त होणार. याचा फायदा जसा काही पक्षांना मिळतो तसा तोटाही होऊ शकतो. या शिवाय काही मतदारसंघात होणारी बंडखोरी सुद्धा चित्र बदलू शकते. या वेळी पितृ पंधरवडा याचे कारण पुढे करत बहुतेक पक्षांनी बंडखोरी रोखण्यासाठी अगदी शेवटी शेवटी उमेदवार जाहीर केले पण तरीही बंडखोरी व्हायची ती झालीच.
गेल्या विधानसभा निवडणुकीत युती किंवा आघाडी नव्हती आणि म्हणूनच प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मतांमध्ये बऱ्याच ठिकाणी अगदी कमी अंतर होते. या वेळेला होणारे कमी मतदान हे सुद्धा निवडणुकीचे निकाल काही प्रमाणात फिरवू शकतात.
एकंदर परिस्थिती पाहता युती करून भाजपच्या स्वतःच्या जागा गेल्यावेळपेक्षा कमी होणार असे दिसते आहे. 100 ते 110 जागा मिळाल्या तरी उत्तम. शिवसेनेला मात्र या वेळेस चांगली संधी आहे. अमित शाह यांना मातोश्रीवर आणून लोकसभेच्या जवळजवळ निम्म्या आणि विधानसभेच्या तशाच जागा ठरवून त्यांनी चांगलीच बाजी मारली आहे. शेवटी 114 जागांवर समाधान मानावे लागले असले तरी गेल्या वेळच्या 63 जिंकलेल्या जागांपेक्षा खूप जास्त आहेत. शिवाय प्रथमतः आदित्य ठाकरे हा पहिला ठाकरे कुलोत्पन्न निवडणूक लढवत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. शिवाय कोकणात आणि काही ठिकाणी युती मोडून त्यांनी त्यांचे स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. याचा नक्कीच फायदा शिवसेनेला मिळेल. भाजपा पेक्षा जास्त नाही पण कमीतकमी 80 ते 90 च्या घरात त्यांच्या जागा जाऊ शकतात.
आता राहिला प्रश्न आघाडीचा. संपत चाललेल्या पक्षांकडून फार अपेक्षा नाही पण आघाडी केल्यामुळे 40 ते 50 जागा मिळू शकतात. अर्थात त्याला कमी झालेले मतदान, स्थानिक प्रश्न आणि मोदी यांनी घेतलेल्या अत्यंत कमी सभा अशी बरीच कारणे आहेत.
मनसे हा एक फारच अंदाज चुकवणारा आणि धोकादायक पक्ष आहे. "विधानसभेत आम्हाला चांगला विरोधी पक्ष करा" असे भावनिक आवाहन करत त्यांनी बरीच बाजी मारली आहे. कोथरुड मध्ये "स्थानिक नेता" हा जिव्हाळ्याचा मुद्दा करून आघाडीची मदत घेऊन चमत्कार होऊ शकतो. सध्या मनसेला फार भाव नसला तरी 10 ते 40 इतक्या जागा त्यांना मिळू शकतात. मनसे ला रेंज जरा जास्तच दिली आहे.
बाकी वंचित आणि इतर बारीक बारीक पक्ष फार दिवे लावतील असे वाटत नाही पण 288 मध्ये 10 ते 20 जागा धरायला काही हरकत नाही.
मला पूर्ण कल्पना आहे की माझाही हा अंदाजच आहे आणि तो पूर्णपणे चुकीचा ठरू शकतो. त्यातूनच मलाही काहीतरी नवीन शिकायला मिळेल.
एकूण काय, फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पक्की आहे, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री पद नक्की घेणार. आता विरोधी पक्ष नेते पद आघाडी मध्ये राहणार का मनसे खेचून घेणार एवढाच काय तो प्रश्न आहे.
- मंदार कुलकर्णी
21 ऑक्टोबर 2019
विधानसभा मतदान संपायच्या आणि exit पोल यायच्या आधी !!!
21 ऑक्टोबर 2019
विधानसभा मतदान संपायच्या आणि exit पोल यायच्या आधी !!!

No comments:
Post a Comment