आज कर्वेनगर मधून सकाळी चालत असताना झेंडूच्या फुलांचे प्रचंड ढीग दिसायला लागले. त्यांनी लावलेला भाव पाहून चाट पडलो. भाव रुपये 170 मात्र प्रति किलो. मी कालच मार्केट यार्ड मधून 1 किलो फुले 30 रु ला आणली आणि इथे दर 170 रु किलो !!!
याचा नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्यांकडून ही फुले मार्केट यार्डला 5 किंवा 10 रु किलोने येत असणार. मार्केट यार्ड चे ठोक व्यापारी तिथल्या खालच्या व्यापाऱ्यांना 15 ते 20 रुपयाला विकणार. आणि ते व्यापारी कर्वेनगर - कोथरूड मध्ये तीच फुले 170 रु ला विकणार. आता यात शेतकऱ्यांना किती मिळाले आणि मधल्या व्यापाऱ्यांना किती मिळाले? विचार करा.
तिच गोष्ट कांद्याची. कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यावरून अनेक शेतकऱ्यांनी आणि मधल्या दलालांनी आरडाओरडा केला. आजही कांदा कर्वेनगर मध्ये 60 रु किलो ने विकला जातो आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडून तो 5 - 10 रु ला उचलला असणार.
माझी या सर्वांना विनंती आहे, दसऱ्याच्या निमित्ताने का होईना आज उद्या जरा वेळ काढा. मार्केट यार्ड, मंडई इथे जाऊन चांगल्या आणि स्वस्त मालाची खरेदी करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले वाहन काढून पिरंगुट, सासवड, शिरवळच्या बाजूस जाऊन डायरेक्ट शेतकऱ्यांकडून फुले आणू या. त्यांना आणि आपल्याला जास्त आनंद मिळेल त्यात..
मंदार कुलकर्णी
7 ऑक्टोबर 2019

No comments:
Post a Comment